संपादकीय:

आस्तिकांविरुद्धची आघाडी कशासाठी?
श्री. श्यामकान्त कुळकर्णीचे पत्र या अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. कुळकर्णी ह्यांना पडलेला प्र न अनेकांच्या मनांत येत असावा. देव मानल्यामुळे फायदे पुष्कळ होतात हे मान्य आहे. पण तोटे फायद्यांपेक्षा जास्त आहेत. कारण फायदे व्यक्तींचे होतात. तोटे समाजाचे होतात. पुन्हा माझे आवडते उदाहरण द्यावयाचे झाले तर ते विहिरींचे आहे. जो आपली विहीर सर्वांत खोलपर्यंत खणील त्याचा फायदा. त्याच्या विहिरीला कायम पाणी, कारण तो बाकीच्यांच्या विहिरीमधले पाणी ओढून घेतो. देवाला मानणारा बाकीच्यांचे काय घेतो हा प्र न आता निर्माण होतो. त्याचे उत्तर देणे सोपे नाही, पण प्रयत्न करून पाहू.

देव मानल्यामुळे फायदे कोणते ते आधी बघू या. मुख्य फायदा असा की मन त्यामुळे आ वस्त राहण्यास मदत होते. देव आणि आई ह्यांमध्ये काही बाबतींत फार साम्य आहे. लहान बाळाला जेव्हा बाहेरचे जग माहीत नसते, कोण आणि काय आपल्या बाजूचे आणि कोण आपल्या विरुद्ध ह्याची कल्पना नसते, तेव्हा ते बाळ पूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असते. तिच्यापासून ते सुरक्षितता प्राप्त करते. पुढे ते जसे मोठे होते तसे त्याचे त्याच्या आईवरचे अवलंबन कमी होते. प्रौढ माणसाचे आणि देवाचे संबंध हुबेहूब बाळ आणि त्याची आई असे माझ्या डोळ्यांना दिसतात. आई आणि बाळ एकमेकांच्या सान्निध्यात एक उत्कट भावसमृद्धी अनुभवतात. देवाच्या स्मरणाने प्रौढ व्यक्तीलासुद्धा तसाच भावसमृद्धीचा अनुभव घेता येतो. आणि तो अनुभव खरा असतो. तो भास नसतो. ईश्वरप्राप्तीसाठी करावयास सांगितलेली कर्मकांडे मनापासून करताना मातेचे स्तनपान करताना व्हावा तसा आनंद होतो. आईच्या कुशीत पहुडले असताना बाळाला जसे शान्त-निवान्त वाटते तसेच ईश्वरशरणते-मुळे प्रौढ व्यक्तीला वाटते हे मान्य करावयाला माझी काहीच हरकत नाही.
ईश्वरशरणतेमुळे एकट्या व्यक्तीचा लाभ अपरिमित असला, तरी समाजाचा अजिबात फायदा होत नाही. भगवच्चिन्तनामध्ये आणि देवपूजेमध्ये घालविलेला वेळ ह्या विश्वामधले मानवाचे दु:ख कमी करण्यासाठी कधी उपयोगी पडला आहे असे आढळत नाही. जो स्वतः दुःखी असतो त्याला देवपूजेपासून दुःखातून मुक्तता मिळत नाही. ते दुःख सोसण्याचे बळ तेवढे त्याला मिळते. माणसाचे श्रमसुद्धा ईश्वरावर श्रद्धा ठेवल्याने कमी होत नाहीत. जनाबाईला दळण दळावेच लागत होते पण ईश्वराच्या स्मरणाने ते कष्ट तिला जाणवत नव्हते. (आज गिरण्यांमुळे घरोघरी कोणालाच दळावे लागत नाही.)

ईश्वर आहे असे नुसते मानून आस्तिकाचे समाधान होत असते तर माझी काही हरकत नव्हती. पण आस्तिकाला आपला ईश्वरावरचा विश्वास दृढ करण्याची गरज वाटते. त्याच्या साशंक मनाला स्वस्थता नसते. तो एकाच वेळी आश्वस्त असतो आणि शंकेने व्याकुळ झालेला सुद्धा असतो. त्याच्या मनाची ही ओढाताण कमी करण्यासाठी ईश्वराने घडविलेल्या चमत्कारांच्या कथा त्याला ऐकाव्याश्या वाटतात. त्या पुन्हा पुन्हा ऐकावयाच्या असतात. त्यांची पारायणे करावी लागतात. त्याला ईश्वराची प्रतीती पाहिजे असते. त्याच्या प्राप्तीची आस्तिकाला आकांक्षा असते. ज्याच्या मनात ही तीव्र आकांक्षा जागृत होते तो त्यासाठी कोणतेही दिव्य करावयाला तयार होतो. व्रते–वैकल्ये, उपास–तापास, खडतर यात्रा (यात्रा जितकी कष्टाची तितकी पुण्यप्रद), जप–तप, ध्यान–योग, भक्ति– उपासना (पूजा–अर्चा, भजन-कीर्तन,) यज्ञादि कर्मकांडे, किमानपक्षी सत्संग अशांसारख्या साधना आस्तिकाला कराव्या लागतात. क्वचित् ईश्वराच्या प्राप्तीची नसली तरी मोक्षाची आकांक्षा त्याला ठेवावी लागते.

शेकडा ८० टक्के लोक आपला ऐहिक लाभ व्हावा ह्यासाठी ईश्वराची उपासना करतात. त्यांना आपण अंधश्रद्ध म्हणून सोडून देऊ. पण ज्यांची श्रद्धा डोळस आहे, त्यांनासुद्धा आपल्या चिंताविवंचना विसरण्यासाठी आणि आपल्याला स्वतःला, तशीच इतरांना सबुद्धी लाभावी म्हणून देवाची गरज भासते. म्हणजे माणसाला भासणारी देवाची गरज निरपेक्ष नाहीच. आपले मन चळू नये, आपल्या मनातली सकारण किंवा अकारण भीती कमी व्हावी, आपण गर्वोन्मत्त होऊ नये म्हणून—-आपल्यापेक्षा अनंतपटीने श्रेष्ठ अशा कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम शक्ती ह्या विश्वात विद्यमान आहेत ह्याचे भान आपणास निरंतर राहावे म्हणून—ईश्वराची गरज आम्हा हिंदुधर्मीयांना वाटत आली आहे हे नाकबूल करण्याचे कारण नाही. म्हणजेच काय तर देव मानण्याची गरज स्वार्थमूलक आहे. देव स्वयंभू नाही. तो आपल्या दुबळेपणातून माणसाने निर्माण केला आहे.

देव मानल्यामुळे माणूस सदाचारी झाला आहे असा पुरावा आपल्या देशात तरी कोठेही सापडत नाही. माणूस सदाचारी झाला असता तर आपल्याकडे भ्रष्टाचार इतका फोफावला नसता. इतकेच नाही तर पापाचरण करणाऱ्याला देवाच्या कृपेची गरज जास्त भासते; आणि देव ती कृपा त्यावर सढळ हाताने करतो. एक संस्कृत लोक मागे वाचण्यात आला त्याची येथे आठवण होते. लोक असा:
पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यं नेच्छन्ति मानवाः। न पापफलमिच्छन्ति पापं कुर्वन्ति यत्नतः।।
‘मानव पुण्याच्या फळाची कामना करतात. पुण्याची करीत नाहीत. पापाची फळे त्यांना नको असतात. पापाचे आचरण ते यत्नपूर्वक करतात.’ ह्यावर अधिक भाष्याची गरजच नाही. नास्तिकांपेक्षा आस्तिकच पापाचरण (एकमेकांचे नुकसान) अधिक करतात आणि ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असे म्हण-ण्यास हरकत नसावी. तुम्ही कितीही पापाचरण करा, देव ते पोटात घालील ह्या विश्वासामुळे लोक एकमेकांचे म्हणजेच एकूण समाजाचे नुकसान करतात. एकट्याचा फायदा आणि समाजाचे नुकसान हे आस्तिक्यामुळे घडते असे मला वाटते त्याचे कारण वर दिले आहे.

देवाविषयीच्या कल्पना देशकाल आणि धर्म ह्यांनुसार बदलतात. त्यामुळे कोठे नवससायासांचे, व्रतवैकल्यांचे, उपासतापासांचे महत्त्व असते तर कोठे प्रार्थनेचे. कोठे देवांची संख्या तेहतीस कोटी असते तर कोठे तो एकच असतो. नि चन धर्म पवित्र त्रयी मानतो. कोठे अवतार असतात तर कोठे प्रेषित. कोठे एकमेकांच्या साह्यावर भर दिलेला असतो तर कोठे ‘एकला चालो रे’ असे सांगितले असते. कोठे उपासक आणि देव ह्यांच्यात कोणी मध्यस्थ (पुरोहित पुजारी) असतो तर कोठे तो नसतो. कोठे पौरोहित्य वंशपरंपरा चालते तर कोठे चांभाराचा मुलगासुद्धा पुरोहित होऊ शकतो. उत्पन्नाचा दशांश चर्चला देण्याचा प्रघात ख्रिस्ती लोकांमध्ये तर मुसलमानांमध्ये जकात. हे पैसे (पौरोहित्य वंशामध्ये चालत नसल्यामुळे) समाजातील गरजू लोकांपर्यंत पोचू शकत. देवाविषयीच्या ह्या विभिन्न कल्पनांमुळे आस्तिक्याचे दुष्परिणामसुद्धा कमी-अधिक होतात. पूजेचा जो विधि आहे तो अत्यंत आनंददायक होतो ह्यात संशय नाही. ती डोळ्यांना सुखावणारी रंगीबेरंगी फुलेपाने; तो घ्राणेन्द्रियाला तृप्त करणारा धुपाचा, चंदनाचा आणि विविध पुष्पांचा सुगंध; तो लहानमोठ्या घंटांचा, शंखांचा, झांजांचा रोमांचित करणारा नाद; ती समईतली किंवा नीरांजनातली शांत तेवणारी ज्योत; स्वतः नेसण्याची किंवा देवाला नेसविण्याची शरीराला स्पर्शसुख देणारी रेशमी वस्त्रे; ते दूध, तूप, दही, मध वगैरे घातलेले पंचामृत; तो तूपसाखर आणि रवा समप्रमाणात घालून शिजविलेला किंवा खारीक, खोबरे, खडीसाखर वगैरेंचा प्रसाद; सामुदायिकपणे अहमहमिकेने होणारे आरत्यांचे गायन वा चित्रविचित्र छंदांमध्ये रचलेल्या स्तोत्रमंत्रांचा घनगंभीर ध्वनि — ह्या सगळ्यांच्या नुसत्या स्मरणानेही माझे मन उल्लसित होते. थोड्या वेळासाठी देहभान हरपेल किंवा तितके न झाले तरी प्रापंचिक समस्यांचा विसर पडेल असेच त्या विधीचे स्वरूप आहे हे मान्य. पण हे सारे कस्न समाजाचे काय कल्याण होते ते मला समजत नाही.

नियमाने स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये ज्याप्रमाणे त्याविषयी अनावर ओढ असते त्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक तीव्र ओढीने आमचे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात. वर्षानुवर्षे जातात. पूर्वी ते साथीच्या रोगाने तेथे मरत असत तरी तो धोका पत्करण्याची त्यांची तयारी असे. पंढरपुरी सर्वांशी जुळवून घेणारे ते माळकरी घरी परतले की पुन्हा जुने सारे हेवेदावे, भाऊबंदकी, बायकोचा छळ, सुनांना सासुरवास ह्या चक्रात अडकून जात. घरोघरच्या पाणी-पुरवठ्याचा प्र न सोडवण्याचा किंवा बायकांचे, मुलीबाळींचे कष्ट कमी व्हावे ह्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार त्यांच्या मनाला शिवलासुद्धा नसेल. भारतीय आस्तिकांची एकूण मनोवृत्ती ‘मला काय त्याचे?’ ‘तुझे तू पाहा, माझे मी पाहतो’, ‘तुझ्या पूर्वजन्मीच्या कर्मांची फळे तू भोग’ अशी असल्यामुळे ती समाज म्हणून पुढे येण्यास उपकारक नसते.

देवावरच्या अढळ विश्वासामुळे माणूस जुने ते सोने असे मानून चालण्याकडे जास्त झुकतो. आहे त्या परिस्थितीत समाधान मानण्याचा त्याचा स्वभाव बनतो. ‘देवाच्या मनात असेल तर माझ्या प्रयत्नांशिवायच परिस्थिती बदलेल. त्याच्या शक्तीपुढे माझा काय पाड?’ असा त्याचा विचार असतो. आपण आपल्या सामूहिक प्रयत्नांनी आपली भौतिक स्थिती बदलू शकतो हा विश्वास तर सोडाच पण ही कल्पनासुद्धा जे पूर्ण आस्तिक आहेत, (आस्तिकांच्या श्रेणी आहेत. त्यांचा देवावरचा विश्वास कमी जास्त आहे.) त्यांना सुचलेली दिसत नाही. ह्या वाक्यावरून असे वाटण्याचा संभव आहे की आस्तिकांना नवीन शोध लागतच नाहीत. त्यांची भौतिक प्रगतीच होत नाही. परंतु हे खरे नाही. संशोधक वृत्तीचे लोक सर्व काळांत, सर्व प्रदेशांत जन्माला येतात. त्यांना नवनवीन कल्पना सुचतात. त्यांच्यापैकी काही अंमलात येतात. मंद गतीने प्रगती झाल्यास पूर्वीच्या परिस्थितीत पडलेला फरक मानवी बुद्धीच्या वापरामुळे पडला की ‘परमेश्वराच्या योजने’मुळे हे कोणालाच समजत नाही. कोणत्याही समाजामधले परस्परावलंबन आणि त्याची जाण जशी वाढत जाते तसा ईश्वराच्या आधिपत्याखालचा प्रदेश, बुद्धीवरचा त्याचा प्रभाव आकुंचित होत जाता आणि त्याची बुद्धी अधिक मोकळेपणाने विहार करू शकते. माणूस जितका भाविक तितका तो आखून दिलेल्या मार्गाने जाणारा. ज्ञानेश्वर एका ठिकाणी म्हणतात —-
माळियें जेउतें नेले, तेउतें निवांतचि गेलें।
तया पाणियाऐसें केलें। होआवेगा।। (माळ्याने काढून दिलेल्या मार्गाने पाणी जसे निमूटपणे जाते तसे; त्या पाण्यासारखे, माझ्या मनाने करावे.)

आज संगणित्राच्या क्षेत्रात परदेशी राबणारे बुद्धिमान भारतीय तरुण कल्पकतेसाठी कमी आणि चिकाटीसाठी जास्त परिचित असावेत. ह्या आमच्या साऱ्या स्वभाववैशिष्ट्यांचा आमच्या देवाच्या आणि धर्माच्या बाबतीतल्या कल्पनांशी साक्षात् संबंध आहे असे माझे प्रतिपादन आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय बोधवाक्य ‘In god we trust’ असे असले तरी त्यांच्या ईश्वरावरच्या विश्वासाची श्रेणी वेगळी असेल, नाहीतर आमच्या ‘सत्यमेव जयते’ सारखी त्याचीही गत झालेली असेल.

लहान मुले देवाची मूर्ती तोंडात घालतात ते श्री. श्यामकान्त कुळकर्णी ह्यांना मुलांच्या नास्तिकतेचे लक्षण वाटते हे वाचून नवल वाटले. आस्तिकता हा एक मनोभाव आहे. तो मनोभाव आम्ही परिस्थितीतून सहजपणे शिकतो. कोणतेही तान्हे मूल आस्तिक किंवा नास्तिक असू शकत नाही. मुलाला थोडेफार समजू लागल्यावर क्रमाक्रमाने ते आस्तिक होते, कारण मुलाच्या भोवतालची सगळी परिस्थिती आस्तिकतेला पोषक असते. नास्तिकता मनाला प्रौढत्व आल्यानंतर, सृष्टीमधले कार्यकारणभाव समजू लागल्यानंतर काहींच्या ठिकाणी येते. पुष्कळदा मनावर राज्य करणारी आस्तिकता पदच्युत करून तिच्या जागी विवेकाची प्रयत्नपूर्वक प्रतिष्ठापना करावी लागते.
आस्तिक्याला मुख्य आक्षेप असा आहे की आपल्या देशातला आस्तिक हिंदु समाजहिताविषयी अतिशय उदासीन असलेला, इतरांच्या दुःखांविषयी संवेदनाशून्य असा (अस्पृश्यांची आणि विधवांची परिस्थिती आठवा) त्यामुळे नीतिनियमांची आणि कायद्याचीही चाड नसलेला असा आहे. उपास कस्न वा देवापुढे बळी देऊन देव प्रसन्न होतोच ह्यावर किंवा त्याच्या क्षमाशीलतेवर त्याचा इतका प्रचंड विश्वास आहे की त्याला पापाची किंवा नरकवासाची भीतीच नाही. मामेकं शरणं व्रज, अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः असे साक्षात् भगवंतांनीच त्याला आश्वासन देऊन ठे वले आहे. सगळी दुःखे दैवजात आहेत आणि माणूस पराधीन आहे अशीही आस्ति-काची खात्री असल्याकारणाने त्याने दुसऱ्याला कितीही दुःख दिले तरी तो तेव्हा स्वतःला देवाच्या हातातले बाहुले समजतो आणि त्या जबाबदारीतून मुक्त होतो. त्याच्या मनाला टोचणी लागल्याचे दिसतच नाही. कोणी दु:खे कमी करण्यासाठी सामाजिक सुधारणा सुचविल्या तर त्यांना सहकार्य करीत नाही—-त्याच्या मार्गात अडथळे आणतो. आमच्या जातींच्या उच्चनीचतेच्या कल्पनांनी, स्पृश्यास्पृश्यतेच्या आणि योनिशुचितेच्यादेखील कल्पनांनी संबंधितांच्या आयुष्यात अपरिमित दुःख निर्माण केले आहे. हे सारे परमेश्वराने घालून दिलेले पूर्वापार नियम आम्ही कोण बदलणार ह्या समजुतीमधून घडले आहे. आस्तिकाची ईश्वरावर जितकी श्रद्धा दृढ तितका तो समाजकल्याणाच्या संदर्भात हतबुद्ध आणि हतवीर्य असतो की काय अशी मला शंका येते.

बरे तर बरे, सारेच पूर्ण आणि निःशंक आस्तिक नाहीत. काही साशंक आहेत आणि त्यांची संख्या वाढती आहे. म्हणूनच आशेला जागा आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.