फटाक्यांना घाला आळा आणि प्रदूषण टाळा

हिंदू धर्मातील सर्वांत महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी, सणांचा राजाच म्हणा ना! ह्या सणाइतकी आकर्षणे किंवा वैशिष्ट्ये इतर सणांत क्वचितच सापडतील. त्यांतील एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे फटाके. फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जणू रंगांशिवाय होळी,
फटाक्यांची सुरवात चीनमध्ये झाली हे सर्वश्रुत आहे. चीनमध्ये प्राचीन काळी भूत-पिशाच्च-सैतान ह्यांना मोठे आवाज करून घालवण्यासाठी फटाके उडवत असत. म्हणजे फटाक्यांचे उगमस्थान अंधश्रद्धा हे होय. पण भारतात जे पूर्वापार फटाके वाजविले जातात ते मजा म्हणून. पूर्वी फटाके फक्त दिवाळीतच वाजवले जात. पण आजकाल फटाके लावण्याचे ‘प्रसंग’ इतके वाढले आहेत की फटाके फक्त दिवाळीतच वाजतात की सकाळी-संध्याकाळी, उन्हाळी-हिवाळी, असा प्र न पडतो. उदा. लग्न, मुंजी, साखरपुडे, बारशी, वाढदिवस, ३१ डिसेंबर, निवडणुका, राज-कारण्यांचे दौरे, त्यांचे स्वागत, वर्धापन दिन, उद्घाटने, रावणदहन, गणपतीचे आगमन व विसर्जन, नवरात्रात देवीचे आगमन व विसर्जन, तुळशीचे लग्न, त्रिपुरी पौर्णिमा, देवादिवाळी आणि अर्थात भारताने क्रिकेटचा सामना जिंकल्यावर (आपण क्रिकेटचे सामने जिंकण्यापेक्षा हरतो जास्त, ही इष्टापत्तीच म्हटली पाहिजे. भारत जर ऑस्ट्रेलियासारखा खेळायला लागला तर आपल्याला फटाके आयात करावे लागतील!) हा लेख लिहीत असताना एकदम फटाक्यांचा कडकडाट झाला! चौकशी केली असता समजले की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका झाल्याबद्दल हे फटाके होते आणि फटाके लावण्याच्या कारणांत आणखी एक भर पडली!
भारतात दररोज (सरासरी) कमीत कमी १०,००० हिंदू लग्ने लागतात (म्हणजे वर्षाकाठी ३६.५० लाख!) त्यातील २५% लग्नांमध्ये जरी फटाके वाजत असतील असे गृहीत धरले तरी वर्षभरात किती हवा-व-ध्वनिप्रदूषण होत असेल ह्याची कल्पना येईल. म्हणजे दिवाळीच्या चार दिवसांत जेवढे फटाके वाजत असतील त्याच्या काही पट तरी जास्त फटाके इतर ३६० दिवसांत वाजत असतील, असा अंदाज करणे चुकीचे ठरणार नाही. ह्या विवेचनाचा हेतू असा की फटाक्यांची समस्या ही फक्त दिवाळीच्या दिवसांपुरतीच मर्यादित न राहता ती एक दैनंदिन समस्या बनली आहे. पर्यावरणवादी व बुद्धिवादी जी फटाक्यांविरुद्ध टीकेची झोड उठवतात, त्याची काही सबळ कारणे आहेत, जी खालीलप्रमाणे सांगता येतील:
(१) हवा-प्रदूषणः फटाक्यांचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे हवा प्रदूषण होय. विशेषतः लहान मुलांची श्वसनसंस्था पूर्ण विकसित न झाल्याने त्यांना हवा-प्रदूषणाचा जास्त त्रास होतो. फटाक्यांच्या ज्वलनामुळे खालील विषारी वायूंमुळे व पदार्थांमुळे प्रदूषण होते : प्रदूषकांची नावे व दुष्परिणाम खालीलप्रमाणे:—- कार्बन मोनॉक्साईड (CO) – रक्तातील हिमोग्लोबिनशी संयोग पावतो व शरीरातील पेशींना प्राणवायू मिळत नाही. दृष्टी मंदावणे, डोकेदुखी, बेशुद्ध पडणे, प्रसंगी मृत्यू येणे. लहान मुले व वृद्ध माणसांना जास्त त्रास. सल्फर डाय ऑक्साईड (SO2) – दमा, ब्रॉन्कायटिस (फुप्फुसाच्या नळ्यांना सूज), श्वसनसंस्थेची चुरचुर, खोकला, अॅलर्जी, कोरोनरी हृद्रोग व कंजेक्टिव्ह हार्ट फेल्यूअर, फुप्फुसांची झीज. नायट्रोजन डायऑक्साईड (NO2) व नायट्रोजन ट्राय ऑक्साईड (NO3)- श्वसन-संस्थेची जळजळ, मज्जासंस्थेवर विपरीत परिणाम. मॅग्नेशियम ट्राय ऑक्साईड (MgO3) व मॅग्नेशियम पेंटॉक्साईड (MgO5)- श्वसनसंस्थेचा कर्करोग. मॅग्नेशियम, सल्फर, फॉस्फरस, अल्युमिनियम, पोटॅशियम, कार्बन, ट्राय नायट्रो टोल्युन (TNT) इ. च्या घनकणिका [Suspended particulate Matter (SPM)] – फुप्फुसांचा कर्करोग, श्वसनसंस्थेचे इतर विकार, कोरोनरी हार्ट डिसीझ, कंजेक्टीव्ह हार्ट फेल्युअर. कार्बन डाय ऑक्साईड (CO2) – सूर्यकिरणांतील व पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारी उष्णता शोषून घेतो. ह्यास हरितगृह परिणाम (Green House Effect) असे म्हणतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढून (Global Warning) समुद्रांची पातळी वाढत आहे व अधिकाधिक भूभाग पाण्याखाली जात आहे. CO2 अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे हानिकारक असतो. आता आले ना लक्षात फटाक्यातील ‘दारू मुळे आपल्याला किती विषारी वायूंची धुरी दिली जाते? (खरे तर दारू ही प्यायली जाते आणि सिगरेट ओढली जाते; पण फटाक्यातली ही दारू मात्र आपल्याला ‘ओढावी’ लागते!).
कुठचेही ज्वलन होताना हवेतील ऑक्सिजन शोषला जातो व त्याचे CO2 आणि इतर ऑक्साईडस् मध्ये रूपांतर होते. म्हणजेच फटाक्यांमुळे हवेतील प्राणवायूचे प्रमाण (जो आपला प्राण आहे!) कमी होते. ह्यास अप्रत्यक्ष प्रदूषण (indirect pollution) असे म्हणतात. माणसांप्रमाणेच वनस्पती व प्राण्यांनासुद्धा फटाक्यांपासून होणाऱ्या हवा प्रदूषणाला सामोरे जावे लागते.
(२) ध्वनि-प्रदूषण : हा एक फटाक्यांचा ‘श्राव्य’ दुष्परिणाम होय. आवाज डेसिबल (dB) ह्या एककात मोजतात आवाजाची पातळी ५५-६० dB च्या वर गेली की आपल्याला त्याचा त्रास होतो. सुतळी बाँब व डामरी माळा ह्यांची dB पातळी नेहमीच १०० च्या वर असते. ध्वनि-प्रदूषणामुळे रक्तदाबात वाढ, चिडचिड, मानसिक व भावनिक ताण, श्रवणदोष, आम्लपित्तात वाढ इ. दुष्परिणाम संभवतात. रात्री-अपरात्री उडवलेल्या फटाक्यांमुळे निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध, रुण ह्यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. पशु-पक्षी बिथरतात. इमारतींजवळ जर ‘आवाजी’ फटाके लावले तर त्यांना हादरे बसतात व त्यांचे आयुष्य कमी होते.
दिवाळीच्या दिवसांत ‘आवाज करणारे फटाके लावण्यापेक्षा शोभेचे फटाके लावा’ असे आवाहन केले जाते. पण ध्वनि-प्रदूषणापेक्षा हवा-प्रदूषण जास्त हानिकारक आहे हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. का ते बघू:
फटाक्यांच्या ध्वनि-प्रदूषणामुळे मुख्यतः घबराट, चिडचिड होते व रक्तदाब थोडा वाढतो. श्रवणशक्तीवर विशेष परिणाम होत नाही. जर ध्वनि-प्रदूषण मोठ्या प्रमाणावर सलग ८-१० तास होत राहिले तरच श्रवणदोष निर्माण होतो. श्रवणदोष हा मुख्यतः कारखान्यांतील ध्वनि प्रदूषणामुळे उद्भवतो. हवा-प्रदूषणामुळे मुख्यतः फुप्फुस व हृदय ह्या अवयवांवर विपरीत परिणाम होतो. हृदय, मेंदू व फुप्फुस ह्या तीन अवयवांना Life Tripod’ (जीवनाची तिपाई) असे म्हणतात. म्हणजे त्यातील एक जरी अवयव काम करेनासा झाला तरी आयुष्याचा शेवट होतो.
ध्वनि-प्रदूषण हे ‘क्षणजीवी’ (temporary) असते. ते मागे काहीही शेषभाग न ठेवता, त्वरित नष्ट होते. (अर्थात त्याचे परिणाम कायमस्वरूपी असू शकतात). या उलट हवा-प्रदूषण करणारी दूषके पर्यावरणात बराच काळ टिकून राहतात. म्हणजे हवा प्रदूषण व त्याचे परिणाम दोन्हीही ‘चिरंजीवी’ असतात. ध्वनि-प्रदूषण फक्त सुतळी बाँब, डामरी-लवंगी माळा ह्यांनी होते. हवा- प्रदूषण मात्र प्रत्येक फटाक्याने होते. मग तो शोभेचा असो अथवा आवाजाचा. म्हणूनच फुलबाजी, अनार ‘झाड’, भुईचक्र ह्या तथाकथित शोभेच्या फटाक्यांना ‘silent killers’ म्हटले पाहिजे. तडतड्या, फुलबाज्या, ‘पेन्सिली’ व ‘साप’ ह्यांनी तर प्रचंड हवा प्रदूषण होते. त्यातील ‘सापाच्या’ गोळ्यांवर तर बंदीच आली आहे.
(३) अनुत्पादक खर्च: भारताच्या आर्थिक प्रगतीच्या कूर्मगतीचे एक कारण म्हणजे अपुरी साधनसंपत्तीची उभारणी (capital formation). आपला कल पैसा साठवण्यापेक्षा उडवण्याकडे असतो. फटाक्यांवरील खर्च हा त्यातील एक अनुत्पादक खर्च. फटाके उडवणे म्हणजे पैसा शब्दशः जाळणे! अशा खर्चाने मालमत्ता उभारली जात । नाही व महागाई वाढते, आर्थिक प्रगती खुंटते.
(४) कागदाचा अपव्यय : फटाक्यांचा मुख्य कच्चा माल म्हणजे ‘दारू व कागद. फटाके फुटल्यावर अर्थातच कागद जळून जातो वा त्याच्या चिंध्या होतात व त्याचा पुनर्वापर करता येत नाही. अशा रीतीने कागदाचा दुस्पयोग होतो व वृक्षतोड होते. (कागद हा झाडांपासून बनलेला असतो.).
(५) अपघात, आग इ. : फटाके उडवणे म्हणजे अक्षरशः आगीशी खेळ! मग त्यातून भाजणे, चटके बसणे हे ओघानेच आले. कधी कधी तर बधिरत्व, अंधत्व असले गंभीर परिणामसुद्धा उद्भवतात. फटाक्यांच्या दुकानांना
आगी लागणे, बाण, चिडी इ. फटाके डोक्यात पडून इजा होणे, त्यांच्यामुळे वणवे वा इतर आगी लागणे हे धोकेही संभवतात. शिवाय फटाक्यांमुळे कचरा होतो. वातावरण तापते.
फटाक्यांचे इतके दुष्परिणाम असूनही आपण परंपरेच्या नावाखाली ह्या प्रथेचे जतन करतो. ही प्रथाच आपली व्यथा ठरतेय. ही संस्कृती नव्हे; विकृती होय. हा प्रघात नव्हे; आत्मघात! आपला आनंद व्यक्त करण्यासाठी इतरांना दचकवायचे आणि अनेक विषारी वायूंची धुरी द्यायची, ह्यात कसली आलीय गंमत? फटाके निर्मूलन — उपाययोजना . फटाक्यांचे उच्चाटन करायचे असेल तर त्याला सुरवात स्वतःपासूनच झाली पाहिजे. फटाके जास्त वाजवत असाल तर संयमाने कमी वाजवा. शक्य झाल्यास वाजवूच नका. (मी गेल्या दहा वर्षात एकही फटाका वाजवलेला नाही). सुरवातीला सांगितल्याप्रमाणे फटाके ही दिवाळीची मक्तेदारी राहिलेली नाही. फटाक्यांचे सार्वत्रिकीकरण पाहून ‘दिवाळीत फटाके लावू नका’ असे म्हणण्या- ऐवजी ‘फक्त दिवाळीतच फटाके लावा’ असे सांगायची वेळ आलीय! तेवढे जरी झाले तरी प्रदूषणाला खूप आळा बसेल. दिवाळीतही चारही दिवस फटाके लावण्याऐवजी कुठच्यातरी एकाच दिवशी फटाके उडवण्याचे शहाणपण आपल्या पचनी पडेल का?
फटाक्यांच्या दुष्परिणामांचा आक्रमक प्रचार होण्याची गरज आहे; विशेषतः शाळकरी मुलांमध्ये. अगदी प्राथमिक शाळेपासून दहावी-बारावीच्या अभ्यास- क्रमात फटाक्यांच्या दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती दिली पाहिजे. गणेशोत्सव, नवरात्र इ. सणांत फटाक्यांविषयी भाषणे आयोजित केली पाहिजेत. प्रबोधन हाच कुठच्याही अनिष्ट प्रथेचे निर्मूलन करण्याचा राम बाण’ उपाय होय. . ध्वनि-प्रदूषणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रबराचे ‘ear-plugs’ वापरावेत. किंमत अंदाजे रु. ४०. कुठच्याही स्पोर्टस्च्या दुकानात उपलब्ध. वापरण्यास अतिशय सुरक्षित व परिणामकारक. . फटाक्यांवर बंदी आणणारा कायदा करावा हा एक टोकाचा उपाय होऊ शकतो. पण नजिकच्या भविष्यात ते संभाव्य वाटत नाही. सामाजिक बदल हे बलाने करण्यापेक्षा समाजाच्या कलाने केले तर ते चिरकाल टिकतात असे इतिहास सांगतो. अर्थात कायद्याच्या बडग्याने ह्या ‘स्फोटक’ प्रथेला नक्कीच आळा बसेल. तेव्हा प्रत्येक उपलब्ध व्यासपीठावरून तसा कायदा होण्यासाठी ‘आवाज’ उठवला पाहिजे आणि वातावरण ‘तापवले’ पाहिजे. (फटाके न लावता!). [सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच फटाक्यांवर काही अवरोध आणले आहेत. —- सं.
अ-१, जीवनज्योती, शिवाजीनगर, नौपाडा, ठाणे (प िचम) — ४०० ६०२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.