मीमांसा: सुखदुःखाची

‘सुख पाहतां जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असे तुकाराम महाराज म्हणाले! बहुधा सर्वांचाच अनुभव याहून वेगळा नसावा. सुख किंवा दुःख हे अनुभवावे लागते. अनुभव घ्यायचा तर पंचेंद्रियांमार्फत आणि मनामार्फतच ह्याचा अनुभव घेता येतो. सर्वसामान्यांची मजल ‘मन’ आणि ‘इंद्रिये’ यांच्या पलिकडे जात नाही. आणि यांच्या पलिकडे जाता येते किंवा यांच्या पलिकडेच खरे सुख आहे असे सांगणाऱ्यांना अध्यात्म-वादी म्हणतात. सर्वसामान्य माणसे काय किंवा अध्यात्मवादी काय दोघांनाही दुःख नको असते आणि फक्त सुखच सुख हवे असते. उत्तम आरोग्य, चांगली विद्या किंवा कला, भरपूर पैसा आणि इस्टेट, सुशील-सुंदर बायको किंवा नवरा, उत्तमोत्तम कपडे आणि दागदागिने, गुणवान आणि कर्तबगार संतती यांचा लाभ म्हणजे सुख अशी सर्वसामान्यांची सुखाची कल्पना असते. ही कल्पना साकारण्यात विज्ञानाने माणसाला खूप मदत केलेली आहे. अध्यात्मवादी हे सत्य नाकारीत नाहीत, मात्र त्यांना ही सर्व सुखे क्षणभंगुर वाटतात. कोणतीही क्षणभंगुर सुखाची अवस्था अध्यात्मवाद्यांना नको असते. त्यांना कायमस्वरूपी चिरंतन आणि शा वत सुखाची अभिलाषा असते.
अशा त-हेचे चिरंतन, शाश्वत सुख असते का? अध्यात्मवादी या प्र नाचे उत्तर अगदी ठामपणाने होकारार्थी देतात. त्यांना विचारले की ह्या तुमच्या म्हणण्याला आधार कोणता, तर ते अध्यात्मशास्त्राकडे बोट दाखवितात. सामान्य माणूस आपल्या सुखासाठी विविध वस्तू खरेदी करतो. विश्वासार्ह कंपन्या ह्या वस्तू काही ठराविक, नि िचत काळापर्यंत, नीट काम देतील याची हमी देतात. हमीकाळ संपला की कंपन्यांची जबाबदारी संपली. चिरंतन, शाश्वत सुख आहेच असे ठणकावून सांगणारे अध्यात्मवादी हमी देतात पण ते सुख कधी प्राप्त होईल याचे उत्तर देत नाहीत. फक्त ते चिरंतन सुख आहेच आणि एकदा का ते प्राप्त झाले की बस्स, कायम सुखच सुख!
चलनी नाण्याला दोन बाजू असतात. एका बाजूला छाप आणि दुसऱ्या बाजूला काटा. एखाद्या नाण्यावर चुकून जर दोन्ही बाजूंना छाप किंवा काटा असला तर ते नाणे चालत नाही, ते खोटे ठरविण्यात येते. सर्व सृष्टी, प्राणी, माणूस हे सर्व परमेश्वरानेच निर्माण केले असे अध्यात्मवादी मानतात. दुःखसुद्धा परमेश्वरानेच निर्माण केले हेही त्यांना मान्य आहे. तरीसुद्धा अगदी प्राचीन काळापासून सुख-दुःखाच्या जीवननाण्यावरील काट्याचा काटा काढण्याचे त्यांचे प्रयत्न अखंड चालू आहेत. ह्या उपक्रमाचा आराखडा म्हणून त्यानी अध्यात्मशास्त्र विकसित केले. त्या आराखड्यातील प्रमुख भाग म्हणजे प्रार्थना,
सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा क िचद्दुःखभाग्भवेत् ।।
सर्वांसाठी केलेली अप्रतिम, उदात्त अशी ही प्रार्थना! ही प्रार्थना म्हटल्या-मुळे सुखांत वाढ झाल्याचे या मृत्युलोकी तरी जाणवत नाही! अशा त-हेच्या प्रार्थनांबरोबर त्यांनी अनेक ‘याचना’ रचल्या. कृष्णयजुर्वेदातील स्वाध्यायात ‘चमक विभागात’ ह्या एकत्रपणे सापडतात. मला वाटते त्याकाळी अध्यात्मवाद्यांमध्ये दोन तट पडून दोन मार्ग तयार झाले. एक गट सुखोत्पत्तीसाठी पूजाअर्चा, नानाविध कर्मकांडे, प्रार्थना आणि याचना ह्या उद्योगात रमू लागला. सुख पुरविण्याचे काम या गटाने परमेश्वराकडे देऊन आपल्याकडे फक्त याचना करण्याचे काम ठेवले. दुसरा गट वरील मार्गाच्या विरुद्ध नाही! सुखनिर्मितीसाठी त्यांनी एक सुधारित आराखडा तयार केला. याचनेबरोबरच त्या गटाने व्यक्तीला बरेच काही करण्यास सांगितले:-
परमेश्वराचे सतत चिंतन आणि नामस्मरण. हे करीत असताना मनोनिग्रह, मनोविजय, उपासना, ध्यानधारणा, एकाग्रचित्त, भक्ती आणि मोक्षप्राप्ती! प्रत्येकाने यातले जे जे जमेल ते ते सर्व करीत राहायचे. हे सर्व जमले की या जन्मी नाही तर पुढील कुठल्यातरी जन्मी तुम्हाला मुक्ती मिळून चिरंतन, शाश्वत सुखाच्या अंगणात जाल.
माझ्यासारख्या एकाने विचारले की हे खरेच घडेल काय हो? मीच कशाला, अगदी पूर्वीपासून अनेक जन हा प्र न विचारीत आले आहेत. अध्यात्मवाद्यांचे या प्र नाला मिळणारे उत्तर मोठे मार्मिक आहे, “शंका कुशंका सोड आणि ‘श्रद्धा’ ठेवा.” पटो न पटो, पण श्रद्धा ठेवणे हे बहुसंख्य माणसांना जमत नाही. एवढेच काय पण दुसऱ्या गटाचा सुधारित आराखडा बहुसंख्याना शक्य होत नाही असे दिसते. तात्पर्य श्रद्धा ठेवल्यामुळेच सुखनिर्मिती होते असा त्यांचा अनुभव नाही. अध्यात्मवाद्यानी हेरलेल्या ज्ञानचक्षूनी पाहिलेल्या, चिरंतन, शाश्वत सुखाबद्दल अध्यात्मशास्त्राचे उद्गाते योगेश्वर भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात —
“ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ।।” (गीता: ९-२१). . (अशा प्रकारे वेदोक्त यज्ञादिद्वारा पुण्य मिळविलेले लोक इंद्रलोकाला प्राप्त होऊन स्वर्गांत दिव्य देवांचे भोग भोगतात) . . असे ते लोक त्या विशाल स्वर्गलोकाला भोगून पुण्य क्षीण झाल्यानंतर मर्त्यलोकाला प्राप्त होतात.
याप्रमाणे तिन्ही वेद शिरोधार्य मानून उत्तम सुखाची कामना करणारे लोक स्वर्गात वारंवार येणे आणि मर्त्यलोकात जाणे ही स्थिती प्राप्त करून घेतात.”
म्हणजेच इथे भूलोकी शाश्वत, चिरंतन सुख नाही आणि तसे ते स्वर्गातसुद्धा नाही! तर मग आहे कुठे हा प्र न शिल्लक राहतोच वैज्ञानिक शोधांमुळे हल्ली अध्यात्मवाद्यांनी ही स्वर्गाची कल्पना बदललेली दिसते. भूलोकी सुख नाही, शाश्वत चिरंतन सुख स्वर्गात आहे म्हणावे तर भगवंतांच्या सांगण्याप्रमाणे तिथले सुखसुद्धा इथल्याप्रमाणे क्षणभंगुरच दिसते. म्हणून मोक्षप्राप्ती म्हणजेच चिरंतन शाश्वत सुख हे ओघानेच आले.
मोक्षप्राप्ती म्हणजे काय? कपाळमोक्ष होणे म्हणजे मोक्षप्राप्ती नव्हे आणि आयुष्य संपून मरणे म्हणजेही मोक्षप्राप्ती नाही. मनसुद्धा जिवंत राहणे ही कल्पना अध्यात्मवादाची असावी. ते काहीही असले तरी अध्यात्मवाद्यांच्या ज्ञानचक्षूपुढे भगवंतानी केलेले मानवाचे निदान (diagnosis) मला पूर्णपणे पटते. श्रीकृष्णांच्या वरील लोकामध्ये खालील मुद्दे विचारप्रवर्तक आहेत असे मला वाटते.
१. मृत्युलोक सोडल्यानंतर पुण्याच्या जोरावर माणूस स्वर्गात प्रवेश करतो. तिथे सुखस्त्य पोहोचला तरी भोग भोगण्याचा (सुख मिळविण्याचा) चान्स तो कधीही सोडीत नाही.
२.भोग भोगल्याने पुण्य क्षीण होते.
३.पुण्य मिळविण्याचे कार्य मर्त्यलोकीच होते (स्वर्गात नाही).
४.माणसाला कधीच निरिच्छ होता येत नसल्यामुळे स्वर्गातील सुख सुद्धा, मर्त्यलोकी यावे लागल्यामुळे, क्षणभंगुरच ठरते.
५.विश्वात ‘चिरंतन, शाश्वत’ सुख कुठेही नाही.
६.मर्त्यलोकात पुण्यसंग्रह – त्यामुळे स्वर्गप्रवेश-तिथे भोग भोगून सुख मिळविण्याच्या त्याच्या हव्यासापायी त्याची तिथून उचलबांगडी—-क्षीण झालेले पुण्य पुन्हा मिळविण्यासाठी मर्त्यलोकी आगमन.
चिरंतन शाश्वत सुखाची मानवाला लालूच दाखविणाऱ्या अध्यात्मवाद्यांपेक्षा श्रीकृष्णांना माणूस उत्तम समजला. तरी सुद्धा ‘मनाला मुरड घाला, इंद्रिय-विजय मिळवा, कसलाही मोह टाळा, निरिच्छ व्हा, असला उपदेश—-कुणालाही शक्य नसणारा—-हे करीत असतात! भगवंत म्हणतात की, ‘माणूस कधीही निरिच्छ होत नाही;’ तर अध्यात्माचे पुरस्कर्ते म्हणतात, “सर्व कामनांचा आणि वासनांचा त्याग केल्याशिवाय मोक्षप्राप्ती नाही आणि शाश्वत सुख नाही.”
अनेक वेळा दुप्पट, तिप्पट व्याजाचा दर ठेवून व्याज आणि मुद्दल दोन्ही गडप केल्याची उदाहरणे अनेकदा सापडतात. निसर्गनिर्मित सृष्टीत सुखाचा दर क्षणभंगुर ठरलेला असताना माणसाने चिरंतन, शाश्वत सुखाच्या वारेमाप दराच्या अभिलाषेपोटी स्वतःच्या आयुष्याचे मुद्दल गमावू नये. हातातले क्षणभंगुर सुख फेकून देऊन अध्यात्मवादी, चिरंतन, शाश्वत सुखामागे धावताना दिसतात, त्यांना निरिच्छ कसे म्हणता येईल?
ज्याची खात्री देता येत नाही अशा गोष्टींवर अध्यात्मवादी सांगतात म्हणून श्रद्धा ठेवली तर मनुष्य एक त-हेच्या चक्रव्यूहात अडकतो. अध्यात्मवाद्यांनी घालून दिलेली आचार संहिता स्वीकारली की येणाऱ्या दुःखांना उपाय शोधण्याची क्षमता माणूस गमावतो. अगतिकपणे “परमेश्वरी इच्छा’ म्हणत सुस्कारे सोडणे एवढेच त्याच्या हाती राहते. अशावेळी त्याचे आध्यात्मिक गुरू आपल्या ज्ञानाप्रमाणे त्याची समजूत घालतात, “वत्सा, असा निराश होऊ नकोस. परमेश्वर तुझी परीक्षाच घेत नसेल कशावरून? त्या परमेश्वरावर नितांत, अढळ श्रद्धा ठेव आणि सर्व दुःख सहन कर”.
सरतेशेवटी माझी मीमांसा अशी की क्षणभंगुर म्हणून अध्यात्मवाद्यांनी संभावना केलेल्या सुखांना कमी न लेखता त्या मिळणाऱ्या सुखांची लज्जत कशी वाढविता येईल याचा बुद्धिवादी दृष्टिकोणातून विचार करावा. येणाऱ्या दुःखांची तीव्रता मानवी उपायांनी नि िचतपणे कमी करणे माणसाला शक्य आहे, माणसाने नेहमी सुखाचा शोध घेत राहावे आणि दु:खापासून बोध घेत राहावे. अध्यात्मवाद्यांनी सांगितलेल्या आचारसंहितेशिवाय, कोणतीही श्रद्धा न ठेवता, माणसाला पुण्य जमविता येते. काय म्हणालात, ‘कसे?’ महर्षी व्यास म्हणतात —
“परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ।”
धारणेसारखे गहन आणि कठीण मार्ग अवलंबून वैयक्तिक, ‘कल्पित लाभापेक्षा’ दुसऱ्यांना पीडा न देता त्यांच्यावर उपकार करून समाधानाचे सुख अनुभवणे कोणालाही केव्हाही शक्य आहे. आणि बरं का, हे सुख मात्र मुळीच क्षणभंगुर नाही ! निदान आपण जिवंत असे पर्यंत तरी !
६७५ गव्हे, दापोली, जि. रत्नागिरी — ४१५ ७१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.