मातृत्व

हा लेख वाचण्या आधी वाचकाला थोडी पार्श्वभूमी समजणे महत्त्वाचे आहे. माझी आई मी तीन वर्षांची असताना मृत्यू पावली. एकत्र कुटुंबात माझ्या काकीने मला प्रेमाने वाढवले. म्हणून मला आईची अनुपस्थिती जाणवलीही नसती, पण भोवतालच्या समाजाने ती जाणवून दिली. आईवेगळी मुलगी म्हणून शेजारी, नातेवाईक माझी कीव करीत. वडिलांचे मित्र मुलींना आईची जरुरी असते म्हणून माझ्यासमोर वडिलांना दुसरे लग्न करण्याचा आग्रह करीत. माझ्या बहिणीला व मला शिस्त लावण्याचा वडिलांनी फारसा प्रयत्न केला नाही. आमच्या बेशिस्त वागणुकीचे कारणही इतरांच्या मते ‘आम्हाला आई नव्हती’ हेच होते.
ह्या समाजाच्या वक्तव्यांचा माझ्या मनावर परिणाम झाला. आपल्याला आई नाही हा न्यूनगंडच माझ्या मनात निर्माण झाला व मग ‘आपली आई कशी होती? ती आपल्याशी कशी वागली असती?’ ह्या प्र नांनी मला पछाडले. परिणामी मी माझ्या संबंधात आलेल्या आयांचे, त्यातल्यात्यात समवयस्क मुलामुलींच्या आयांचे निरीक्षण करू लागले. त्या वेळच्या आयांच्या वागणुकीचा खोल ठसा माझ्या मनावर उमटला तो असा —
त्या काळच्या माझ्या भोवतालच्या आया मुलींना शिस्त लावण्यात बराच वेळ खर्च करीत असत. “मुलीच्या जातीला स्वैपाक, शिवण आले पाहिजे”, “तुझ्या सासरी आम्हाला कुणी नावं ठेवता कामा नये”, “पाय पसरून बसू नकोस. लाज वाटत नाही का?’, “नवऱ्याच्या घरी गेल्यावर हवे ते करा. आमच्या घरी असली थेरं (भेळ खाणं) चालणार नाहीत”, अशा धर्तीच्या वाक्यांची त्यांच्या आपल्या कन्यांशी चाललेल्या व मी ऐकलेल्या संभाषणात खैरात असे. माझ्या ओळखीच्या आया अगदी क्षुल्लक कारणाने मुलींना मारत असत. एवढेच नव्हे तर तापलेल्या पळीने डागणे, तळहातावर पट्टीने मारणे अशाही धर्तीच्या शिक्षा मुली केविलवाणेपणाने रडत असताना आया करीत असत. अशी शिक्षा देताना “मी करते आहे ते तुझ्या हितासाठीच’ अशा वाक्यांची उधळण असे. मी पहिली-दुसरीत होते तेव्हा ‘आई मिरचीची धुरी देते’ असे सांगणाऱ्या मुलीही भेटल्या.
सहाव्या सातव्या वर्षीच हे सर्व प्रकार बघून ‘मला आई नाही म्हणून मी दुर्दैवी’ हे समाजाचे माझ्याविषयांचे मत बरोबर आहे का, याविषयी मला शंका येऊ लागली आणि मुलींना व मुलांना मार खाताना मी पाहिले की आपल्याला आई नाही याबद्दल मला आनंदच होऊ लागला.
मी थोडी मोठी झाल्यावर मातांचे पक्षपाती वागणे माझ्या लक्षात येऊ लागले. शाळेतून घरी आल्यावर माझ्या मैत्रिणींना घरकाम करावे लागे. त्यांचे भाऊ मात्र घराबाहेर खेळत असत. मुलग्यांच्या शिक्षणावर जसा मुक्तहस्ते पैसा खर्च होत असे तसा हुशार मुलींच्याही शिक्षणावर केला जात नसे. “नाही तरी तुम्ही दुसऱ्यांच्या होणार!”, “मुलगे हे पुढच्या दारचे दिवे”, हे पक्षपातांचे समर्थन मी ऐकत होते. “मला भाऊ असता तर माझ्या आईनेही असा पक्षपात केला असता का?”, माझ्या डोक्यातला विचार! लिंगभेदांमुळे मातांच्या दृष्टीने पोटच्या गोळ्यांची किंमत कमी-अधिक असते “हे कटु सत्य मला दहाव्या अकराव्या वर्षीय उमजले.” (आईप्रमाणे मी इतर मुलींचे वडील कसे असतात ह्याचाही शोध घेतला. पण थोडे अपवाद सोडल्यास बहुतेक घरांत वडिलांची उपस्थिती प्रगति-पुस्तकावर सही करण्याइतपतच होती.)
मग श्यामची आई हे पुस्तक वाचनात आले. त्यातल्यासारखी आई तर मला आजतागायत पुष्कळ शोधूनही सापडली नाही.
सावत्र आईबद्दल मला विशेष कुतूहल होते. “मुलींना सावत्र आई आणावीशी वाटत नाही, म्हणून परत लग्न नको’ असे माझे वडील म्हणत. सावत्र आया खाष्ट असतात का, हा एक प्र न तेव्हा माझ्या मनात होता. मी पाहिलेल्या सावत्र आया सख्ख्या आयांपेक्षा नक्कीच दयाळू होत्या. कदाचित समाजाच्या, नातेवाईकांच्या धाकाने असेल किंवा सावत्रपणाच्या छायेमुळे असेल त्या सावत्र मुलामुलींना मारत तरी नसत.
नंतर “मातृ देवो भव”, “स्वामी तिन्ही जगांचा आईविना भिकारी’ वगैरे मातांचे गुणगान करणारे बरेच काही साहित्य कानावर पडले. हे थोडेफार समजू लागत नाही तोच एक परिचित अविवाहित सोळा सतरा वर्षांची मुलगी माता होणार आहे अशी बातमी कानावर आली. एव्हाना हिंदी सिनेमातून अविवाहित मातृत्वाचे दुष्परिणाम मी पाहिले होते. पण त्या पडद्यावरच्या चित्रांपेक्षा हे ओळखीचे चित्र जास्त परिणामकारक ठरले. इतर मातांनी त्या बिचाऱ्या मुलीच्या वागणुकीवर जी टीकेची झोड उठवली ती मला धक्का देऊन गेली.
एकूणच मातृत्व हे नेहमीच पवित्र, पूज्य वगैरे नसते. काही माता अगदी वाळीत टाकण्यालायक असतात, हे एक कटु सत्य आणि अब्रू हा प्रकार संभाळून मातृत्वाचा खेळ खेळायचा असतो हे दुसरे सत्य मला समजले. जन्मतःच गळा दाबून मास्न टाकणाऱ्या माताही मला वर्तमानपत्रांतून भेटल्या. अशा खुनी माता अपवादात्मक असतात असे मी तेव्हा धरून चालले, तरी एकूण आयांच्या वागणुकीवरून बहुतेक माता स्वार्थत्याग करणाऱ्या, प्रेमळ, थोर अशा नसतात, हा निष्कर्ष मी काढलेला होता. नंतर मातृत्वाचा बडगा उभास्न मुलग्यांना व मुलींना आपल्या मताप्रमाणे वागण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या माता मला भेटल्या. हा बडगा मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह करण्याचे ठरवल्यास “मी विष खाईन”, “स्वतःला जाळून घेईन’ या थराला पोचू शकतो हेही माझ्या लक्षात आले. मातेची थोरवी ह्या प्रकरणात लुप्त झाली होती. उरला होता आततायीपणा! त्याच वेळी माता मुलग्यांकडे एक आर्थिक
गुंतवणूक ह्या दृष्टिकोनातूनही बघतात हेही माझ्या लक्षात आले. “एवढे कष्ट करून वाढवला, एवढे पैसे खर्च करून डॉक्टर केला आता लग्नात X X X लाख हुंडा हवाच”.
पुरुषप्रधान समाजात एरवी दुय्यम स्थानी असलेल्या स्त्रियांच्या हातांत मातृत्वाच्या महतीमुळे सत्ता येते. मुलग्यांच्या मातांच्या हातांत तर जास्तच सत्ता येते. ही सत्ता त्या अस्त्राप्रमाणे वापरू शकतात, हेसुद्धा मी बघितले. एखाद्या तरुणाची मातृदेवता आपल्याच सुनेला छळताना डाकीण होऊ शकते. थोडक्यात ही माता आपल्या मायेचे छत्र फक्त आपल्या अपत्याच्या डोक्यावर धरते. इतरांच्या अपत्यांना छळताना, त्यांचा जाळून खून करतानाही ती मागेपुढे पाहत नाही. याप्रमाणे भारतात मी बरीच मोठी होईपर्यंत माता, मातृत्व, त्यांची महती, मातांचे मी पाहिलेले वर्तन याबद्दल माझ्या मनात उलटसुलट विचार येत राहिले. “आई थोर तुझे उपकार’ यामध्ये सत्य किती आणि स्वप्नरंजन किती याबद्दल माझ्या मनात घोटाळाच होता. या विषयावर चर्चा करणेही अशक्य होते. “काय मूर्खासारखे बरळते आहेस?” म्हणून मैत्रिणी, नातेवाईक मला झिडकारून टाकत असत. शेवटी कधीतरी केव्हातरी वैचारिक परिपक्वता आल्यावर लक्षात आले की मातांची वागणूक ही सामाजिक परिस्थितीला अनुसरून होती. ती तत्कालीन पुरुषप्रधान समाजात जगण्याची धडपड करणाऱ्या स्त्रियांची नैसर्गिक प्रतिक्रिया होती. स्त्रिया ह्या अखेरीस मनुष्यप्राण्यांत मोडतात. त्या जातीचे सर्व दुर्गुण, सद्गुण त्यांच्यात होते.
समाजाने, धर्माने, शास्त्राने मातांभवती मोठेपणाचे, स्वार्थत्यागी वृत्तीचे, प्रेमळपणाचे सांस्कृतिक वलय रेखाटले आहे, त्यात समाजाचा स्वार्थ आहे. शेतीसाठी, वंश चालवण्यासाठी मुले हवी होती. मुले तर बायकांनाच होतात. एकदा वरचे अन्न खाऊ लागली की मुले कुणालाही लहानाची मोठी करता येतात. पण तोवरची जबाबदारी, ते चोवीस तासांचे काम कुणाच्या गळ्यात मारणार? मग ते काम मातृपदाला, मातृत्वाला मान देऊन, मातांवर मोठेपणाचा न शिक्का मास्न पितृ-सत्ताक समाजाने मातांच्या गळ्यांत मारले. मुलांना लहानाची मोठी करण्याची जबाब-दारी बायकांना दिली तरी पितृसत्ताक समाजपद्धतीने संततीवरचे हक्क पित्याच्या हाती ठेवले.
मुलांवरती आईचे प्रेम नसते असे मी मुळीच म्हणत नाही. कठीण परिस्थितीतही माता मुलांचा त्याग क्वचितच करतात. माता मुलांसाठी प्रचंड खस्ता खातात, हे मी नाकारत नाही. तरीसुद्धा मातांच्या स्वतःच्या इच्छा, आकांक्षा असतात. परावलंबन, दुय्यम स्थान, कौटुंबिक प्र न यामुळे त्या वैतागलेल्या असतात. त्यांची मुले त्यांच्यावरच्या ओझ्यांत भरच घालतात. मातांच्याही सहनशक्तीला सीमा असते. लहानपणी मी पाहिलेल्या माता इतरांचा राग आपल्या मुलांवर काढत असत. वैफल्याचा निचरा करण्याचा मुलांना मारणे हा प्रयत्न होता. मुले हक्काची होती. आपण स्वतः उच्च दर्जाच्या माता आहोत, ही समजूत भारतीय मातांमध्येही प्रचलित आहे. “ती अमेरिकन बाई भारतीय आईसारखी मुलांवर प्रेम करते”. “त्या अमेरिकन बाईने अगदी भारतीय आईसारखा मुलांसाठी स्वार्थत्याग केला” अशा धर्तीचे उद्गार मी ऐकले आहेत. मातेचे मुलांवरचे प्रेम हे नैसर्गिक असले तर भारतीय व अमेरिकन मातांत फरक कसा असेल? मातांचे अपत्यप्रेम संस्कृती, परंपरा, देश, धर्म यानुसार कमी जास्त होते का, ह्या माझ्या प्र नाने भारतीय आया गोंधळल्या, पण भारतीय आयांचे मुलांवर जास्त प्रेम असते ह्या मुद्द्याला त्या चिकटून राहिल्या.
रशियातील चेचनियामधल्या युद्धात गोळीबार चालू असताना रशियन माता मुलग्यांना शोधत युद्धस्थळी गेल्या. अमेरिकेत आगीने भडकलेल्या घरात शिस्न मुलांना शोधणाऱ्या माता मी पाहिल्या आहेत. (दूरदर्शनवर), अशी चर्चा भारतीय मातृदेवतांचे मन बदलू शकली नाही. भारतीय मातांपेक्षा जगात उच्च माता नाहीत, ही भूमिका त्यांनी बदलली नाही. मातांच्या, मातृत्वाच्या उच्च स्थानाचा खोल ठसा भारतीय पुरुषांच्याच नव्हे भारतीय स्त्रियांच्या मनांवरही उमटला आहे. विशीत मी भारतातून परदेशी आले. माझा इतर समाजांशी, संस्कृतींशी परिचय झाला. आता त्या अनुभवांबद्दल थोडेसे लिहिते. माझ्या लक्षात आले की इतर धर्मांतही मातेला असे महत्त्व दिलेले आहे. ख्रिस्ती धर्मात व्हर्जिन मेरी देवतेसमान मानली जाते. ज्यू-धर्मीय तर आई ज्यू असेल तरच मूल ज्यू आहे असे मानतात. वडील ज्यू व आई दुसऱ्या धर्माची असल्यास त्यांचे मूल ज्यू मानले जात नाही. मुलांमुळे आपला फायदा होतो म्हणून मूल होऊ देणाऱ्या माता व जोडपी माझ्या पाहण्यात आहेत. अमेरिकेत जन्मल्यास त्या मुलाला अमेरिकन सटिझनशिप मिळते म्हणून आपल्याला अमेरिकेत राहता येईल या समजुतीमुळे अमेरिकेत बच्चा पैदा करणारी जोडपी किंवा वेलफेअरचे सरकारी पैसे मिळावेत म्हणून मूल होऊ देणाऱ्या बायका मी बघितल्या आहेत. मुलांचे पालनपोषण योग्य रीत्या माताच करू शकतात, मुलांच्या योग्य वाढीसाठी मातांची आवश्यकता आहे, अशी विचारसरणी जगात सर्वत्र प्रचलित आहे. पण माताशिवाय मूल वाढवण्याची पद्धत जगात होती व आहे. भारतीय व युरोपीय उच्चवर्णीयांतील तसेच राजघराण्यातील मूल बहुधा दाई वाढवत असे. काही ठिकाणी दूधआई ठेवण्याची पद्धत होती. अशी मोठी झालेली युरोपीय मुले बोर्डिंग स्कूलमध्ये राहत असत. इस्राएलमध्ये मुले किबुझमध्ये लहानाची मोठी होत. त्यांच्या आईचा त्यांना वाढवण्यात फारसा भाग नसे. या जगात ज्यांना शक्य असते ते सगळे मूल वाढवण्यासाठी पैसे देऊन मदतनीस नोकरीला ठेवतात. भारतीय एकत्र कुटुंबातही आजी, आजोबा, मोठ्या बहिणी, भाऊ, चुलत्या यांचा मुलांचे संगोपन करण्यात मोठा भाग असे. अशी उदाहरणे असली तरी बहुतेक जगात संतती ही आईचीच जबाबदारी मानली जाते. पा चात्त्य देशात घटस्फोट झाल्यास मुलांची कस्टडी बहुतेक आईलाच मिळते. मुले आईची मानली गेल्याने मुले बिघडली, आजारी पडली, नापास झाली, मोठेपणी त्यांना मानसिक व्याधी झाल्या तर दोषही आईलाच दिला जातो. फ्रॉईड ह्या मानसशास्त्रज्ञाने न्युरोसिससारख्या आजारांचे खापर मातांच्याच डोक्यावर फोडले आहे. तसेच ऑटिझम हा मुलांचा मानसिक आजार मातांच्या मुलांबद्दल उदासीन वागणुकीमुळे होतो असा सिद्धान्त सुरवातीला मांडला गेला होता.
जगात सर्वच देशांत सर्वच भाषांत व संस्कृतीत आईवरून शिव्या दिल्या जातात, मग बहिणीची, बापाची वर्णी लागते. माझ्या मते या शिव्याही मातेला समाज देत असलेले महत्त्व सिद्ध करतात. जगात कुटुंब, समाज व राज्यकर्ते सोयीस्कर रीत्या मातांना व त्यांच्या प्रजोत्पादनक्षमतेला महत्त्व देतात किंवा त्या क्षमतेवर जबरदस्तीने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात. गर्भपरीक्षा कस्न मुलगी असेल तर स्त्रीला गर्भपात करण्यास भाग पाडणे, मुलगी झाल्यास मास्न टाकणे, हे सर्व प्रजोत्पादनक्षमतेवर नियंत्रण ठेवण्या-चेच प्रयत्न आहेत.
चीनमध्ये एका जोडप्याला एकच मूल होऊ देण्याची परवानगी आहे. (ह्या कायद्याला माझा विरोध नाही.) परिणामी मुलगी झाली तर जोडपी तिचा त्याग करत आली आहेत. हा त्याग मातेच्या संमतीनेच केला जातो का? त्याग करणे ही कृती योग्य आहे का? अमेरिकेत बऱ्याच जोडप्यांनी चीनमधली मुले दत्तक घेतली आहेत. आशियन फेस्टिव्हलमध्ये मी अशी बरीच मुले पाहिली. त्या सगळ्याच मुली होत्या. मला एकही दत्तक मुलगा दिसला नाही. मुलगा वृद्ध आईवडिलांची काळजी घेतो ही कल्पना भारत, चीन या अशियामधल्या देशांत प्रचलित आहे. ह्या देशांत जन्मलेल्या मुलींची हत्या होते, त्यांचा त्याग केला जातो; परंतु साऊथ अमेरिकेत विवाहित मुलीही आईवडिलांना वृद्धापकाळात संभाळतात. ह्या गरीब देशात नवजात मुलींची हत्या होत नाही. काही समाजांत सहा सात वर्षांची मुले पैसे कमावू लागतात. त्यांच्या आईवडिलांना मुलांवर फार पैसे खर्च करावे लागत नाहीत. उलट मुलांपासून त्यांना आर्थिक फायदा होतो. असे समूह मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ज्या समूहांना श्रमिकांची शेतीवर अथवा जंगलात काम करण्यासाठी आवश्यकता असते तेही मुलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवत नाहीत.
मुद्दा हा की बहुतेक समाज मुलांकडे म्हातारपणातली काठी, वंशवृद्धी, शेतीसाठी अथवा धंद्यासाठी कामगार, अशा फायद्यातोट्याच्या दृष्टिकोणातून पाहतात. ‘मातृ देवो भव’, ‘पितृ देवो भव’ वगैरे सर्व मुले होत राहावीत, समाजाला संतती हवी होती म्हणून. प्रजोत्पादनात समाजाचा’, कुटुंबाचा असा अंतस्थ हेतू असतो. पा चात्त्य समाजात आता मुलांपासून आईवडिलांना आर्थिक तोटाच होतो. परिणामी लोकसंख्येची वाढ नुसती थांबलेली नाही तर निगेटिव्ह झाली आहे. मुलांचे पालनपोषण ही फक्त आईची जबाबदारी नसून समाजाची आहे, हे फ्रान्स व स्कॅडेनेव्हियन देशांनी ओळखले आहे. त्यांनी मूल झाले की आईवडिलांना ‘सपोर्ट सर्व्हिसेस’ देण्याची पद्धत सुरू केली आहे, करांत सूट, विनामूल्य पाळणाघर, वैद्यकीय मदत इत्यादी. अमेरिकेत अजूनही तेवढी प्रगती झालेली नाही. पा चात्त्य समाजात स्त्रिया मुले होऊ देण्याचा निर्णय घेतात तो विचारपूर्वक घेतात. हे मूल होऊ देण्या-मागे त्यांची वृद्धापकाळात आपल्याला ते संभाळेल अशी अपेक्षा नसते. एकवीस-बावीस वर्षांचा मुलगा किंवा मुलगी झाली की त्याला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न ह्या स्त्रिया करत नाहीत. आईपणाबद्दल आपल्याला मान मिळावा अशी त्यांची अपेक्षा नसते. म्हणजे त्यांच्यात व त्यांच्या मुलामुलींत कलह नसतात असे नाही. पण निदान आपण आपल्या संततीवर जन्म देऊन मोठे उपकार केले आहेत, अशी भावना त्यांच्या मनांत नसते.
पा चात्त्य देशांत मूल नकोच म्हणणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढत आहे.२ ह्या स्त्रिया बहुतेक उच्चशिक्षित व उच्चपदस्थ असतात. ह्या स्त्रिया मातृत्वाभोवती समाजाने आपल्या सोयीसाठी निर्माण केलेले वलय ओळखतात. मूल झाले तर ते मुख्यतः आपली जबाबदारी असेल ह्याची त्यांना जाणीव असते. मुलामुळे करिअरमध्ये खंड पडण्याची किंमत आपण मोजू, हे त्यांना माहीत असते. ह्या सर्वांचा विचार करून हा निर्णय त्या घेतात.
ज्या शिक्षित स्त्रिया मुले होऊ देतात त्याही मूल ही आपलीच जबाबदारी असणार आहे हे ओळखतात व पडेल ती किंमत देण्याची तयारी ठेवतात. काही स्त्रियांना मूल हवे असते पण लग्न नको असते. मुलाचा बाप त्यांचा बॉयफ्रेंड म्हणून भेटायला येतो पण वेगळा राहतो. ह्या स्त्रियांना विचारले की तुम्ही लग्न का करीत नाही, तर आम्हाला एक मूल हवे आहे, दोन नकोत, ह्या धर्तीची उत्तरे मिळतात. नवऱ्याची, त्याच्या कामांची व भावनिक जबाबदारी घ्यायला या स्त्रिया तयार नसतात. ह्या स्त्रिया एकूण अपवादात्मक आहेत. बहुतेक स्त्रिया लग्न करतात, एक किंवा दोन मुले होऊ देतात, पण मुलांची संख्या स्त्रियांच्या हाती प्रजोत्पादनाचे निर्णय येताच घटत चालली आहे. थोडक्यात कुटुंब व समाज यांच्या दृष्टीने संततीचे आर्थिक महत्त्व नाहीसे होताच, स्त्रियाना संतती व्हावी की न व्हावी हा निर्णय घेण्याची मुभा मिळताच, मुलांची संख्या कमी होऊ लागली.
वेळ व काळ बदललेला आहे. मातृ देवो भव, ही समजूत एका काळी आवश्यकही होती व असेल, पण आता स्त्रिया ह्या माणूस आहेत. आपले जीवन कशा रीतीने व्यतीत करावे हे ठरवण्याचा निर्णय घेण्याची मोकळीक त्यांना देण्याची वेळ आलेली आहे हे समाजाने मान्य केले पाहिजे. संतती ही सर्व देशांत प्रामुख्याने स्त्रीची जबाबदारी असल्याने संतती हवी असल्यास त्या ती होऊ देतील. नको असल्यास होऊ देणार नाहीत. संतती झाल्यास मुलांना लहानाचे मोठे कसे करायचे हे पण त्याच ठरवतील. माझ्या मते मुले आवडणारा, मुले वाढवण्याची हौस असणारा व हौस नसणारा असे दोन समूह समाजात असतात. मी खाष्ट आया व अतिशय प्रेमाने मुलांना संभाळणारे पुरुषही पाहिले आहेत. ही प्रवृत्ती स्त्रीपुरुषांमधले सांस्कृतिक भेद निवळू लागले की उमलेल. अमेरिकेत मुलांना संभाळणाऱ्या वडिलांची संख्या वाढत चालली आहे. आईविरहित कुटुंबात आईचे व वडिलांचे काम एकटा पुरुषच करतो. मुलांची मनापासून आवड असणाऱ्यांनीच मुले सांभाळावीत हेच योग्य आहे.
टीप : अमेरिकेत गोऱ्या बायांचा जननदर १.८ मुले आहे, तर युरोपात तो १.४ आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स प्रांतात ‘एकट्या’ बापांची संख्या १९९० मध्ये २२,८५७ होती. दहा वर्षांत ती ३६,९५५ झाली.
[१. प्रजोत्पादनाची इच्छा व्यक्तीला नसून समाजाला असते, ही मांडणी सर्व स्ढ जीवशास्त्राच्या विरुद्ध आहे. सामाजिक ‘दबावा’मुळे मुले होऊ दिली जातात, असे मानले तर दबावाची यंत्रणा, मुले न होण्याला शिक्षा व जास्त मुले होणाऱ्यांना बक्षिसे, असे दिसायला हवे. मला तरी ते दूरान्वयानेही ‘दिसत’ नाही. २. मुले न होऊ देणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण आजही नगण्य असावे. जर स्त्रीमागे दीड-पावणेदोन मुले हा जननदर ‘प्रस्थापित’ झाला, तर मानववंश संपेल. ही आकडे-वारी एकूण मानववंशाच्या लहान, श्रीमंत (परिणामी
अप्रातिनिधिक!) अशा भागा-बद्दल आहे. एकाच देशात/समाजात श्रीमंत स्त्रियांचे जननदर गरीब स्त्रियांच्या दरापेक्षा कमी असतात. एकूणच ह्या प्रकारच्या आकडेवारीचे निष्कर्ष घाईने न काढणेच बरे. — संपादक
Lalita Gandbhir, 65 Oxford Rd.,
Newton MA 02459-2407, U. S. A.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.