अग्नि व यज्ञ: वेदकाल आणि विसावे शतक

अग्नीला साक्ष ठेवून सध्याचे भारतवर्षीय त्रैवर्णिक हिंदू लोक विवाह-संपादन करतात. अग्नीची साक्ष नसेल, तर तो विवाह धर्म्य समजला जात नाही. येथे असा प्रश्न उद्भवतो की, अग्नीचा व विवाहाचा संबंध काय? . . .

अशा प्रश्नांना उत्तर द्यावयाचे म्हणजे रानटी आर्यांची पुरातन काळी सामाजिक व भौम स्थिती काय होती ते पाहावे लागते.

ऋषींचे अतिप्राचीन पूर्वज वानरीय पाशवावस्थेत असताना, वानरांप्रमाणेच त्यांनाही झाडे, पर्वतांचे कपरे, गुहा वगैरेंच्या आश्रयाने राहून हिंस्र पशृंपासून, वादळांपासून व थंडीवाऱ्यापासून आपला बचाव मोठ्या संकटाने करावा लागे. . . . हरणे वगैरेंना बचावाकरिता शिंगे, दाढा, टापा वगैरे सहज शस्त्रे तरी असतात, मनुष्यांना तीही नाहीत. फक्त अकलेचे शस्त्र तेवढे मनुष्याजवळ जास्त, तेही बाह्य साधनाभावी प्रसंगी अत्यंत पंगू ठरते. अशा पंगू व दुबळ्या स्थितीत प्राचीन ऋषि-पूर्वजांत मृत्युसंख्या किती भयंकर असेल तिची कल्पनाच करावी. अरण्यातील वानरांची वाढ ज्या अल्प प्रमाणावर होत असलेली आपण पाहतो तेच किंवा त्याहूनही अल्पतर प्रमाण पाशवावस्था माणसाच्या लोकसंख्येच्या वाढीचे असे. यूथातील लोकसंख्या जेमतेम आहे तितकी टिकली म्हणजे महभाग्य. मनुष्याची अशी किर-कोळ संख्यावृद्धीची किती हजार वर्षे गेली असतील ते सांगवत नाही. . . . उष्णकाली अरण्यात सहज पेटणाऱ्या दावाग्नीने दग्ध झालेल्या वनस्पतींच्या निखाऱ्यांची धग सहन न होऊन कृमिकीटक व गजव्याघ्र जीव घेऊन पळतात, ही बाब लक्षात आली व तिचा अनुभव घेऊन पाहण्याची कित्येक कल्पक ऋषि-पूर्वजांना सुदैवाने बुद्धी झाली. रानातील जळकी कोलिते हत्ती, वाघ, सिंह, हरणे इत्यादींच्या अंगावर फेकिली असता, ती श्वापदे मनुष्याच्या वाऱ्याला उभी रहात नाहीत, हा अनुभव ऋषिपूर्वजांनी प्रथम मिळविला. स्वसंरक्षणार्थ व शत्रुनिर्दालनार्थ कोलितांचा उपयोग करण्याचा शोध लागल्या दिवसापासून, पशुप्राय ऋषिपूर्वजांची उत्तरोत्तर आस्ते आस्ते संस्कृतीत प्रगती होत गेली. . . . या क्लृप्तीचा उपयोग उन्हाळ्यात रानांना वणवा लागेल तेव्हाच तेवढा करता येण्याजोगा असे. आयती कोलिते। मिळण्याचे असले सुप्रसंग फारच क्वचित् व फार झाले तर दोन अडीच महिने मिळण्याचा संभव असल्यामुळे वर्षाच्या बाकीच्या दहा महिन्यांत ऋषिपूर्वज इतर पशृंइतकेच दुबळे असत. ह्या दुबळेपणात शेकडो वर्षे काढल्यावर, वणव्याने पेटलेले ओंडके डोंगरातील गुहांतून जळके राखून ठेवण्याची क्लृप्ती सुचली. . . . ऋषिपूर्वजांचा अत्यंत पहिला पूर्वज कोणी अंगिरस या नावाचा पुरुष होऊन गेला. त्याने गुहेत जतन करून ठेवलेल्या अग्नीस गुहेच्या बाहेर आणून लोकांत आणून सोडले म्हणून ऋग्वेदात अनेकदा उल्लेख आलेले आहेत. . . . झोपड्यातून राहण्याची कला माहीत झाल्यावर गुहेत अग्नी न ठेविता, ते तो झोपड्यातून ठेवू लागले. ही झोपड्यातून अग्नि ठेवण्याची क्लृप्ती समाजात प्रथम अंगिरसाने काढिली. गुहेत जोपर्यंत अग्नी ठेविला जात असे, तोपर्यंत शत्रूवर फेकण्यासाठी कोलिते आणण्यास वारंवार गुहेकडे जावे लागे आणि प्रसंगी गुहेतील अग्नी वेळेवर हाती येण्यापूर्वी हिंस्र पशू व त्याहून हिंस्र असे जे दस्यू ते ऋषिपूर्वजांना इजा करून निघून जात. झोपड्यातून अग्नी ठेवण्याची जेव्हा क्लृप्ती निघाली, तेव्हा शत्रूला वाटेल तेव्हा तोंड देण्याचे सामर्थ्य ऋषिपूर्वजांत आले. . . . रानटी ऋषींहून जास्त सुधारलेले देव म्हणून कोणी लोक असत. . . . ते दस्यूंचा पाडाव आग टाकून करीत. . . . हा अग्नी दस्यूंची सैन्ये मास्न काढितो, याच्या साहाय्याने देवांनी दस्यूंचा पुरातन काली पाडाव केला, असे वर्णन वैदिक ऋषींनी केलेले आहे. शत्रूच्या अंगावर देव आग पाखडीत त्यांना पिटाळून लावीत हे रानटी ऋषिपूर्वज शेकडो वर्षे पाहत होते; परंतु ही आग ते कशी निर्माण करीत व कोठून आणीत ते ऋषिपूर्वजांना कळत नसे. देवांनीही रानटी ऋषिपूर्वजांना अग्नी उत्पन्न करण्याचे गुह्य आपण होऊन परोपकारबुद्धीने कधी सांगितले नाही, सांगितले असते तर देवांचा श्रेष्ठपणा राहिला नसता. कदाचित् देवांनी मानवांना ते गुह्य सांगण्याचा प्रयत्न केला असता, तरी ते रानटी माणसांना कळले असते की काय याचा संशय आहे. .  पुढे वन्य ऋषिपूर्वज गुहा सोडून झोपड्या करून जेव्हा राहण्याच्या पायरीला आले, जळाऊ इंधने कोणती हे अनुभवजन्य शास्त्रज्ञान जेव्हा त्यांना त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने आले, आणि पुढील संकटांना तोंड देण्याकरिता अगाऊ जय्यत तयारी कस्न असावे लागते, हे नीतिज्ञान जेव्हा त्यांनी संपादन केले, तेव्हा आगीचे स्वामित्व ऋषि पूर्वजांना येऊन, त्यांची सुधारणेच्या कामात उत्तरोत्तर प्रगती होत गेली. अगदी प्रथम ऋषिपूर्वज अग्नी कसा तयार करीत त्याचे दिग्दर्शन ऋग्वेदात केलेले सापडते. अग्नी हा दहा बहिणींचा पुत्र होय, अशी काव्योक्ती आहे. . . . हाताच्या आंगुळ्या ह्याच कोणी ज्या दहा बहिणी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या मेहनतीने जेव्हा पुत्र झाला तेव्हा अत्यानंद झाला. दोन शीघ्र ज्वालाग्राही लाकडाच्या काटक्या घेऊन व त्या दोन्ही हातांच्या बोटांनी खालीवर घासून ऋषिपूर्वज इतर आधुनिक रानटी लोकां-प्रमाणे अग्नी उत्पन्न करीत. . . . कित्येक ऋषिपूर्वजांनी झोपड्यांच्या आत किंवा जवळ लहान-मोठ्या खाचा खणून त्यात लाकडाचे ओंडके व झाडांची सबंध खोडे सतत जळत ठेवण्याची युक्ती काढली. या खाचांना ते कुंडे म्हणत, कुंडात धगधगीत निखारे साही ऋतूंत रात्रंदिवस तयार असत. येणेप्रमाणे कुंडातील अग्नी हे एक ऋषिपूर्वजांना जवळ अप्रतिहत हत्यार बनून गेले. ह्या हत्याराला ऋषिपूर्वज कधीही व कोठेही विसरत नसत; भयंकर अशा निबिड महारण्यात जावयाचे असो किंवा विस्तीर्ण नद्या-होड्यांतून पार व्हावयाचे असो, ऋषिपूर्वज बरोबर अग्नी घेतल्या शिवाय झोपड्याबाहेर एक पाऊलही टाकीत नसत. अरण्यात एकटे राहण्याचा प्रसंग आल्यास, बरोबरच्या अग्नीने एखादे वाळलेले खोड, किंवा बुंधा पेटवून त्याच्या शेजारी अशन, प्राशन, शयन व आसन ऋषिपूर्वज निर्धास्तपणे करीत आणि सिंह, हत्ती, वाघ किंवा लांडगा हिंस्रबुद्धीने जवळ आल्यास आगीतील कोलिते किंवा जळ-जळीत निखारे त्यांच्या अंगावर टाकून त्यांना पळवून लावीत किंवा ठारही करीत.

अग्नी चाहेल त्या वेळेस मिळावा म्हणून कुंडातून सतत धुमत ठेविलेला असे. अग्निकुंडाच्या भोवतालील जागा गाईच्या शेणाने सारवून बसण्याउठण्यास सोईस्कर अशा केलेल्या असत. दिवसा उपजीविकेची कामेधामे करून रात्री ह्या अग्निकुंडाच्या भोवती ऋषिपूर्वज उबायला बसत आणि शिळोप्याच्या करमणुकी करत किंवा मद्य-मांसाची सिद्धता करीत. सोमवल्लीची दारू व गाईबैलांचे किंवा इतर श्वापदांचे मांस ह्या अग्निकुंडाच्या सान्निध्याने व साहाय्याने निष्पन्न करीत. नंतर मद्यमांसावर यथेच्छ हात मारून, निरनिराळ्या छंदांतली गाणी म्हणून ते एकमेकांना रिझवीत किंवा आपल्या इष्ट देवतेची करुणा भाकीत. ह्या काली ऋषिपूर्वजांचा मोठा आवडता देव म्हटला म्हणजे महदुपयोगी जो अग्नी तो असे. अग्नीच्या साह्याने उघड्या मैदानात झोपड्या कस्न सुखाने राहता येऊ लागले, अग्नीच्या साह्याने सुग्रास पाकनिष्पत्ती करिता येऊ लागली. अग्नीच्या साह्याने हिंस्र पशू व दुष्ट शत्रू यांचा प्रतिकार करता येऊ लागला, अग्नीच्या योगाने दाट जंगलाची चरती कुरणे करता आली, सबब अग्नी ह्या अजब व अतयं वस्तूवर आर्यपूर्वजांचे निरतिशय प्रेम ऊर्फ भक्ती बसली व खाणे, खेळणे, बसणे, उठणे, निजणे व प्रजोत्पादन करणे ते सर्व अग्नीच्या साक्षीने ते करू लागले. हे शेवटले व अत्यंत महत्त्वाचे जे प्रजोत्पादनाचे कर्म ते अग्निकुंडा-भोवताली उबाऱ्याच्या भूमीवर आर्यपूर्वज उरकीत, हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे; कारण, यज्ञ म्हणून जी संस्था आर्यपूर्वजांत पुढे उदयास आली तिचा उगम अग्निकुंडा-भोवती प्रजोत्पादनाचे जे कार्य चाले त्याच्याशी संबद्ध आहे. . . .
ऋषिपूर्वज थंड हवेच्या प्रदेशात राहत असत. दिवसा श्रमसाहस व स्वारी-शिकार केल्यावर उबाऱ्याकरिता धगधगीत धुमीच्याभोवती येऊन बसत आणि तेथे ते पाशवावस्थ स्त्रीपुरुष ऋषिपूर्वज यभनक्रिया करीत. धुमीभोवती ऊर्फ अग्निकुंडा-भोवती अतिप्राचीन आर्य स्त्रीपुरुष यभनक्रिया करीत, या विधानाला पोषक असे कृष्णयजुर्वेदातील व शुक्लयजुर्वेदातील साक्षात् काही मंत्र आहेत. सोम नामक मादक रस प्राशन केला असता माद येऊन रतिक्रिया मनसोक्त होत असे. सबब प्राचीन ऋषिपूर्वज तो सोमरस यथेच्छ पीत व त्याच्या अमलात मनमुराद निर्भयपणे स्त्रीसमागम करीत. सोमरसाचा हा जो माद आणून यथेच्छ रतिकर्म संपादण्यास समर्थ करण्याचा गुण सोम या देवतेचा आहे असा यजुर्वेदकालीन ऋषींचा समज होता. . . . रानटी ऋषिपूर्वज आगटी व धुमी पेटविताना काटक्या, समिधा, डाबल्या, गवत, मद्य इत्यादी ज्या ज्या साधनांचा उपयोग करीत, ती ती सर्व साधने त्या रानटी ऋषीचे वंशज जे ऋक्कालीन व यजुःकालीन ऋषी —- त्यांना देवताप वाटत. रानटी साधनांच्या साहाय्याने रानटी पूर्वजांनी घरे, दारे, संपत्ती, गाई, गुरे व विशेषतः प्रजा संपादन केल्या. त्या रानटी साधनांचा रानटी पूर्वज जो सहज उपयोग करीत त्या उपयोगाची नक्कल यज्ञ करणारे यजुःकालीन ऋषी हुबेहूब उठवून देत, आणि ती नक्कल बिनचूक केली म्हणजे फलप्राप्ती हटकून होईल अशी आशा बाळगीत. रानटी पूर्वज लाकडांवर लाकडे घासून अग्नी उत्पादन करीत म्हणून त्या रानटी पूर्वजांचे सुधारलेले वंशजही लाकडावर लाकडे घासून यज्ञार्थ अग्नी संपादन करण्याची नक्कल उठवून देत. सुधारलेल्या वेदरचनाकालीन ऋषींना गोवऱ्या, चकमकी इत्यादी साधने उपलब्ध असत, परंतु त्या नव्या साधनांनी अग्नी भरदिशी न निष्पादिता, ते भोळ्या श्रद्धेने पूर्वजांनी ज्याप्रमाणे लाकडे घासून अग्नी सिद्ध केला त्याप्रमाणे अग्नी सिद्ध करीत. हेतु असा की, पूर्वजांना जी फलप्राप्ती ज्या प्रक्रियेने झाली ती फलप्राप्ती त्या प्रक्रियेवाचून होणार नाही. येथून तेथून सर्व यजुःसंहिता रानटी पूर्वजांच्या कृतीची नक्कल कशी करावी या एका बाबीने भरली आहे. अमुक कार्य करताना किंवा अमुक सामग्री मिळविताना पूर्वजांनी जागती किंवा शक्वरी छंद म्हटला, सबब ते कार्य किंवा ती सामग्री मिळविण्याची कामना असल्यास जागती किंवा शक्वरी छंदच म्हटला पाहिजे, नाहीतर कार्य बिघडेल, असे इशारे यजुःसंहितेत जागजागी दिलेले आहेत. तात्पर्य, रानटी पूर्वजांची नक्कल अणुरेणूचीही चूक न होता उठली तरच इष्टकामना परिपूर्ण होईल अशी यजुःकालीन याजकाची समजूत असे.

विसावे शतक:
दक्षिण (प्रशांत) समुद्रातल्या काही बेटांवरच्या लोकांमध्ये एक ‘कार्गो कल्ट’ (‘माल-पंथ’) आहे. ह्या लोकांनी लढाईच्या (दुसरे महायुद्ध व कोरिया) काळात खूपशा मालाने भरलेली विमाने आपल्या बेटांवर उतरताना पाहिली. आणि त्यांना हे पुन्हा घडून हवे आहे. म्हणून ते जमिनीवर धावपट्ट्या आखतात. त्यांच्या कडांना आगट्या पेटवतात. झोपड्या उभारून त्यांच्यात बांबूच्या ‘हेडफोन’ सारख्या वस्तू पेहेन माणसे बसवतात. अँटेनांसारख्या बांबूच्या रचना उभारतात —- आणि मालाने भरलेली विमाने यायची वाट पाहतात. पूर्वी जशा रचना होत्या तसेच हे सगळे दिसते. पण विमाने येत नाहीत. मी याला ‘कार्गो कल्ट विज्ञान’ म्हणतो. काहीतरी महत्त्वाचे अंग इथे नाही, नाहीतर विमाने आली असती.

[फलज्योतिषासोबतच वैदिक कर्मकांडेही आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कृपेने पदव्या—-परीक्षा वगैरेंसाठी ‘मान्यताप्राप्त’ होणार आहेत. यज्ञ हे महत्त्वाचे कर्मकांड, तेही वैदिक, कसे उपजले याचे इतिहासाचार्य राजवाड्यांचे वि लेषण त्यांच्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या ग्रंथातून घेतले आहे. त्याच प्रकारचे कर्मकांड विसाव्या शतकात कसे उपजते आहे, हे ‘द प्लेझर ऑफ फाइंडिंग थिंग्ज आउट’ या रिचर्ड फाइनमनच्या पुस्तकातून घेतले आहे. माझी खात्री आहे की मुरली मनोहर जोशींना दक्षिण पॅसिफिक समुद्रातल्या बेटांवरची वागणूक हास्यास्पद वाटेल] —- संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.