मुलांच्या बुद्धिमत्तेची जोपासना . . .

महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे ह्यांनी असे नमूद केले आहे की इसवी सनाच्या आठव्या शतकापर्यंत भारतात पदार्थ-विज्ञान, रसायन-शास्त्र, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित इत्यादी क्षेत्रात प्रगती होत होती. त्याचे प्रमुख कारण असे आहे की त्या काळात गुरुशिष्य परंपरा होती आणि शिष्य प्रत्येक बाबतीत गुस्ता अनेक शंका विचारीत असे, आणि गुरु शिष्याचे शंकानिरसन करीत असे. कपिल, कणाद, पाणिनी, पतंजली, चरक, सुश्रुत, चाणक्य इ. त्या काळातील अनेक नावे प्रसिद्ध आहेत. गीतासुद्धा अर्जुन-कृष्णाच्या प्र नोत्तरांतूनच निर्माण झाली. अर्थात गीतेतील संस्कृत भाषा ज्याप्रमाणे लिहिली गेली आहे त्यावस्न गीता इसवी सनाच्या चौथ्या शतकात लिहिली गेली असे प्रा. दा. ध. कोसंबी यांनी नमूद केले आहे. त्या वेळच्या ज्ञानाला मर्यादा होत्या हे पण लक्षात ठेवले पाहिजे. इ.स.च्या आठव्या शतकानंतर अशा प्रकारे शंका विचारण्यावर निर्बंध घातले गेले. प्र न विचारावयाचे नाहीत तर ‘बाबावाक्यं प्रमाणम्’ अशी प्रवृत्ती वाढली. त्यामुळे स्वतंत्र बुद्धीने रचावयाचे ही धमक, ही प्रतिभा लोपली आणि मानवी कर्तृत्व आटून गेले.
डॉ. म. ग. गोगटे ह्यांनी लिहिले आहे की, सर्वसाधारणपणे मुलाचे आईवडील आणि आईवडिलांचे आईवडील ह्यांच्याकडूनच बुद्धिमत्तेचे देणे मुलास मिळते. तरीही लहान मुलांची बुद्धिमत्ता ही सर्वसाधारणपणे सारखीच असते. १ डॉ. ह. वि. सरदेसाई ह्यांच्या मते मूल गर्भात असताना त्याच्या मातेला पुरेशी प्रथिने. अमायनो अॅसिडयुक्त अन्न, लिसिटीन मिळते की नाही ह्यांवर बुद्धिमत्ता अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे वयाच्या बारा वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूची वाढ होत असते आणि त्यातही सहाव्या वर्षापर्यंत बहुतांशी वाढ होते. त्या वयात त्यांची योग्य ती काळजी न घेतल्याने पुढे मुलांची बुद्धिमत्ता कमी कमी होत जाते. त्याची सर्व जबाबदारी आईवडील आणि शिक्षक ह्यांवर आहे. बारा वर्षापर्यंतचे मुलांचे विश्व भावनाप्रधान असते. त्या काळात त्यांना प्रेम मिळाले पाहिजे आणि विशेषतः आईचे प्रेम जास्त आवश्यक आहे. तसेच त्यांच्या खाण्यात मेथी, सोयाबीन, नाचणीचे सत्त्व, गाजरे, खजूर, मोड आलेली कडधान्ये इ. यावयास हवी. चॉकलेट, गोळ्या, केक, टॉफी इ. पदार्थ देण्याचे शक्यतो टाळावे. त्या काळात मुलांना भरपूर चित्रांची पुस्तके आणि मेकॅनो सारखे खेळ आणून द्यावेत. बालवयात ह्या मुलांनी अशी पुस्तके फाडली किंवा खेळांची मोडतोड केली तरीसुद्धा खेळ, पुस्तके देणे बंद करू नये. त्यामुळे बालमन घडत असते. नोबेल पारितोषिक मिळालेले जॅन मिर्दाल२ ह्यांनी असे नमूद केले आहे. मेकॅनोपासून दूर गेलेल्या प्लॅस्टिकच्या खेळांमुळे समाज बुद्धिनिष्ठेपासून दूर जातो. तसेच शिक्षकांनी आणि आईवडिलांनी मुलांच्या शंका विचारण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन दिले पाहिजे आणि त्यांचे निरसन केले पाहिजे. आज ज्ञानाच्या कक्षा खूपच रुंदावल्या आहेत तेव्हा सर्वच माहिती शिक्षकांना असेल असे नाही परंतु ह्या बाबत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र आणि चिल्डेन्स नॉलेज बुक, न्यू दिल्ली ह्यांच्यातर्फे अनेक पुस्तके प्रसिद्ध होतात ती मुलांना उपलब्ध करून दिली पाहिजेत.
काही आईवडिलांना असे वाटते की आपल्या मुलाने खूप मोठे व्हावे आणि त्यासाठी ते मुलांना विनाकारण मारहाण करतात. त्यातून मुले तर कोडगी बनतातच पण शिवाय त्यांच्यात द्वेषबुद्धी बळावते. ह्याबाबत महाराष्ट्र शासनाने मुंबई येथे “व्होकेशनल गायडन्स सेंटर’ स्थापन केले आहे आणि त्यातून अल्प दरात मुलांची बुद्धिमत्ता चाचणी घेता येते.
टी. व्ही. मधून गॅमा सारखे किरण बाहेर पडत असतात. हे किरण जास्त काळ मेंदूपर्यंत गेले तर मेंदूची विचारशक्ती मंदावते त्यामुळे सर्वसाधारणपणे रोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना टी. व्ही. पुढे बसू देऊ नये. अर्थात ह्याबाबत आई-वडिलांनीच संयम पाळण्याची जास्त जरूरी आहे. मेंदू मरेपर्यंत कार्यरत रहावा असे वाटणाऱ्याने रोज किमान दहा पाने विचारप्रवर्तक वाङ्मय वाचले पाहिजे. अशाप्रकारे मुलांच्या खाण्याची तसेच त्यांना योग्य ते खेळ देण्याची पालकांनी काळजी घ्यावी. शिक्षकांनी त्यांची जिज्ञासावृत्ती जोपासावी आणि त्यांच्या शंका विचारण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन द्यावे. त्यांचे शंका निरसन करावे असे केल्याने नापास होणाऱ्यांची टक्केवारी पुष्कळच कमी होईल.
1. हे शंकास्पद आहे.
2. जैन हे नोबेल-विजेत्या गुनारचे चिरंजीव.
– संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.