विक्रम-वेताळ

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाची वाट चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.
राजा, ह्या वेळेस मी तुला थोडी अलीकडची गोष्ट सांगणार आहे. अमरावती नावाचे एक राज्य होते. हे राज्य अत्यंत प्रगत राज्य होते. त्या काळच्या राज्यांमध्ये सगळ्यांत प्रगत आणि संपन्न. तेथील प्रजा शिकली-सवरलेली आणि उद्यमशील होती. प्रजेला सर्व प्रकारचे स्वातंत्र्य होते त्यामुळे ह्या देशाचा नागरिक बनण्याची इतर देशांतील लोकांची महत्त्वाकांक्षा असायची. ह्या देशाचे सैन्यदलही बलाढ्य होते आणि इतर कोणत्याही देशाला नामोहरम करण्याची शक्ती त्याच्यात होती.
अशा ह्या देशात एके दिवशी एक अघटित घटना घडली. ह्या देशातील व्यापारउदीमाचे दोन महामेरू काही मोजक्याच व्यक्तींनी पाडून हजारो निरपराध नागरिकांना कंठस्नान घातले. ह्या भयंकर घटनेचे जगभर पडसाद उमट ले. लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरली. जगातला हा सर्वशक्तिमान देश आपल्याच देशातील व्यापाराच्या मानबिंदूंचे संरक्षण करू शकला नाही, निरपराध नागरिकांचे जीव वाचवू शकला नाही हे पाहून लोकांच्या ह्या देशाविषयीच्या प्रतिमेला तडा गेला. जीवितहानी आणि स्थावर जंगम मालमत्तेची हानी तर झाली होतीच पण मानहानी देखील झाली होती. बाजारातली ह्या देशाच्या उद्योगांची पत एका दिवसात हजारो कोटींनी घसरली होती.
अमरावती देशाचे हेरखाते ह्या घटनेने खडबडून जागे झाले. रात्रीचा दिवस करून त्यांनी ह्या घटनेच्या सूत्रधाराचा छडा लावला. त्यांच्या माहितीप्रमाणे ह्याचा कर्ताकरविता दूर गांधार देशातला एक धर्मांध नेता होता. खरे म्हणजे त्याला नेता बनवण्यात पूर्वी अमरावतीनेच मदत केली होती पण आता तो त्यांच्यावरच उलटला होता. अमरावतीच्या राजाने आता ह्या माहितीच्या आधारे ह्या नेत्याविरुद्ध युद्ध पुकारले. हे युद्ध त्याच्या धर्माविरुद्ध नसून त्याच्या धर्मवेड्या अनुयायांपुरतेच आहे असेही जाहीर केले. आणि गांधारच्या राजाला त्याला आपला हवाली करण्याचा आदेश दिला. गांधारच्या राजाने ह्याला नकार देताच ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ ह्या न्यायाने त्याने गांधारवर चाल कस्न जाण्याचे ठरविले. गांधारच्या नेत्याच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या त्याच्या आसपासच्या देशांनाही ह्यामुळे अतिशय आनंद झाला त्यांनी आपणहोऊनच अमरावतीला सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. अमरावतीच्या राजानेही मग ही मोहीम केवळ गांधारच्या धर्मांध नेत्यापुरती मर्यादित न ठेवता सर्वच धर्मांधांचा निःपात होईपर्यंत, अनंत काळापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर केले. आणि इतके नुकसान झाले असतानाही युद्धासाठी आणखी चार हजार कोटी रक्कम खर्च करण्याचे ठरविले.
एवढी गोष्ट सांगून वेताळ थांबला व म्हणाला, राजा, आज मी तुला एकच प्र न विचारणार आहे. अमरावतीचा राजा त्याचा हेतू सिद्धीस नेण्यात यशस्वी झाला असेल की गांधारचा धर्मांध नेता? माझ्या ह्या प्र नाचे तू योग्य उत्तर दिले नाहीस तर परिणाम तू जाणतोसच. तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील. वेताळाच्या ह्या प्र नाचे उत्तर देत राजा विक्रमादित्य म्हणाला, एकाच प्र नात तू मोठ्या चतुराईने दुसराही प्र न गोवला आहेस. तुझ्या प्र नाचे योग्य उत्तर द्यायचे झाले तर आधी अमरावतीच्या राजाचा हेतू काय होता हे समजून घ्यावे लागेल. ह्या संदर्भात आपल्या पुराणातील काही उदाहरण देतो. परशुरामाने एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे म्हणतात. त्याचा हेतू जर खरंच पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा असता तर एकदाच पृथ्वी संपूर्ण निःक्षत्रिय करून भागायला हवे होते. एकवीस वेळा त्याने हेच केले म्हणजेच एकदाही त्याने पूर्ण काम केले नाही. आपले श्रेष्ठत्व त्याला वारंवार सिद्ध करावयाचे होते. तसेच कंसमामाचेही पहा. देवकीच्या मुलांना दगडावर आपटून त्याने ठार केले. पण तो तर राजा होता आणि वसुदेव-देवकीला त्यानेच कैदेत टाकले होते मग दोघांना दोन वेगळ्या कोठड्यांत नसता टाकू शकला? पण हेच कशाला, सर्व शक्तिमान देवसुद्धा राक्षसांशिवाय आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू शकत नाहीत. त्यामुळे आधी राक्षसांना वर द्यायचा आणि नंतर त्यांचा वध करावयाचा, हे काम त्यांना केवळ आपले श्रेष्ठत्व सामान्य माणसाच्या मनात ठसवण्यासाठी करत राहावे लागते.
सौंदर्य हे बघणाऱ्याच्या नजरेत असते असे म्हणतात, तसेच श्रीमंतीचे आणि श्रेष्ठत्वाचे आहे. एकाची श्रीमंती किंवा श्रेष्ठत्व हे इतरांच्या मनांत वास करत असते. अमरावतीवर झालेल्या हल्ल्यांनी त्यांची पत इतर देशांच्या मनांतून घसरली होती; आदराची जागा सहानुभूतीने घेतली होती. आणि हा अमरावतीला सगळ्यांत मोठा धोका वाटत होता. आपली पत परत वाढवणे आणि इतर देशांत आदराचे स्थान मिळवणे, व आपले श्रेष्ठत्व परत एकदा सिद्ध करणे, हा त्यांचा मुख्य हेतु होता. मग त्यासाठी युद्धात आणखी कितीही खर्च करावा लागला तरी तो मुद्दा गौण होता. आणि तो हेतू त्यांनी नुसते युद्ध पुकारताच साध्य झाला होता. गांधारमधील धर्मांधांच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या देशांच्या नजरेत अमरावतीची पत परत वाढली होती. अमरावती गांधारचा स्वबळावर सहज पराजय करू शकत असली तरी तिला ह्या युद्धात मदत करण्यासाठी सर्व देशांची जणु अहमहमिकाच लागली होती.
अमरावती धर्मांधतेची पाळेमुळेच खणून काढायला निघाली आहे असा त्यांचा भाबडा विश्वास होता. आणि अमरावती पाळेमुळे खणून काढण्यासाठी खांद्यावर कुदळ न घेता कु-हाड घेऊन सज्ज झाली तरीही तिचा खरा हेतू कोणाच्या लक्षात आला नाही. आता गांधारच्या नेत्याबद्दल सांगायचे तर त्याचा हेतू त्याचे धर्मांध अनुयायी वाढवणे इतकाच होता आणि अमरावतीचे नाक कापल्यावर आणि अमरावतीने त्याच्या विरुद्ध युद्ध पुकारल्यावर त्याच्या अनुयायांत भराभर वाढच झाली. धर्मासाठी प्राण देण्याची त्याची तयारी नव्हे इच्छाच होती, कारण त्यांच्या मते अशा मृत्यूनंतर देव त्यांच्या स्वागतासाठी स्वर्गाच्या दारावर हात पसरून उभा राहणार होता. त्यांचीही चढाओढ मात्र सुरू राहणार होती अनंत काळपर्यंत, आपल्या ह्या गोष्टी सारखी.
अशा त-हेने राजाचा मौनभंग होताच बेताळ प्रेतासह अदृश्य होऊन पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला.
मोहनीभवन, धरमपेठ, खरे टाऊन, नागपूर — ४४० ०१०

बांगलादेशी निर्वासितांना काय मोहवते?
भारत पाकिस्तान बांगलादेश एकूण
१. क्षेत्रफळ (हजार चौरस किमी) ३,२८८ ७९६ १४४ ४,२२८
२. ९९ सालची लोकसंख्या (दशलक्ष) ९९८ १३५ १२८ १,२६१
३. दरडोई जमीन (चौरस मीटर) ३,२९५ ५,८९६ १,१२५ ३,३५३
४. दरडोई शेतजमीन (चौरस मीटर) १,७०० १,७०० ६०० १,५८८
५. दरडोई क्रयशक्ती (९९ सालच्या डॉलरात) २,१४९ १,७५७ १,४७५ २,०३९

जर बांगलादेश व भारत ‘एक’ झाले, तर दर बांगलादेशीला (सरासरीने) १,९२३ चौरस मीटर ज्यादा जमीन मिळेल. ह्यापैकी ९७५ चौरस मीटर शेतजमीन असेल. क्रयशक्ती सुमारे ६०० डॉलरने वाढेल.
दोन देशांमध्ये ‘सरासरी’ गाठली गेली तर आजच भारतात आठ कोटी बांगलादेशी येतील, आणि भारत-बांगला सीमा ‘हवाबंद’ करता येणे अशक्य आहे. या ‘अति-क्रमणा’ने लोकसंख्येचे गणित सुमारे चार वर्षांनी ‘चुकेल’. (Statistical Outline of India 2000-2001, टाटा सर्व्हिसेस लि.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.