हक्क केवळ मातेचाच

वसंत पळशीकर यांच्या लेखात (आ.सु. सप्टें. २००१) पुढील विधान आहे. “मुलांना जन्म देणे, अर्भकावस्थेत त्यांचे पोषण व संगोपन करणे हे कार्य सामान्यपणे माता बनणाऱ्या स्त्रीचे राहावे हे स्वभाविक व इष्टही आहे. ते अटळही आहे.”
“एकदा मुलाचा जन्म झाल्यावर त्याचे पोषण व संगोपन करणे हे मातेचे काम व ते स्वाभाविक व इष्टही आहे” ह्या वसंत पळशीकरांच्या भूमिकेला माझा विरोध आहे. आपल्या मुलांचे संगोपन कुणी करावे हा मातेचा निर्णय आहे. आपल्या मुलांसाठी काय इष्ट आहे हे ठरवण्याचा हक्क फक्त मातेला आहे. तीच स्वतःची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेऊन स्वतःच्या व मुलांच्या हिताचा विचार करू शकते. आतापर्यंत मुलांच्या हिताचा विचार करून समाजाने, शास्त्रज्ञांनी धर्माने, कुटुंबीयांनी बायकांवर बंधने घातली आहेत. मुलांचे व मातांचे हित आपल्याला समजते, अशी या सर्वांची गैरसमजूत आहे. मुलांच्या योग्य संगोपनासाठी मातांना निर्णय घेण्याचे हक्क दिले पाहिजेत. मातांवर बंधने घातली की त्यांचा गैरफायदा घेण्यास संधीसाधू लोक कुटुंबात व समाजात टपलेले असतात. मुलांचे हित बाजूलाच राहते.
वसंत पळशीकर पुढे म्हणतात, “मुलांचे पोषण व संगोपन मातांनी करणे अटळ आहे.” माझ्या मते ते मुळीच अटळ नाही. मुलांचे संगोपन कुणीही करू शकतो. ते तसे केले जाते. आपल्या एकत्र कुटुंबात सर्व कुटुंबीय, टोळीसमाजात सबंध टोळी, श्रीमंत समाजात आया, बोर्डिंग स्कूल्स, गव्हर्नेस, नोकरी करणाऱ्या स्त्रीसाठी पाळणाघर, असे मुलांचे संगोपन करण्याचे अनेक मार्ग आहेत. आईला स्वतःला त्यांचे संगोपन करायचे असेल तर तिने करावे पण एकट्या आईवर मुलांच्या संगोपनाची व पर्यायाने चुलीची जबाबदारी ढकलणे व तेच इष्ट आहे असे म्हणणे ही पुरुषप्रधान विचारसरणी आहे. स्त्रीच्या पायात बेडी घालण्याचा तो प्रयत्न आहे. मूल पित्याचेही असते. मग मातापित्यांनी दोघांनाही मुलाच्या संगोपनाची जबाबदारी घेणे इष्ट आहे असे वसंत पळशीकर का म्हणत नाहीत?
वसंत पळशीकर त्याच लेखात म्हणतात, “कुटुंब ही संस्था खिळखिळी होताना दिसत असली तर त्याचे मोठे कारण कुटुंबाला महत्त्व न देणारी आजची अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्था आहे.” मुलाला लहानाचे मोठे करणे ही एकट्या आईची किंवा आईवडिलांची जबाबदारी नाही. ती सर्व समाजाची आहे, हे तत्त्व आता पा चात्त्य देशांत कमी अधिक प्रमाणात समाजमान्य झालेले आहे.
(आजचा सुधारक सप्टेंबर २००१ मधला चिं. मो. पंडित यांच्या लेखातला देविदास बागूल यांच्या ‘नवे बालसंगोपन’ यातला उतारा पाहा.)
पा चात्त्य राष्ट्रात एकदा मूल झाले की कुटुंबाला आर्थिक आधार देण्याचे अनेक प्रयत्न केले जातात. माता व मुलांसाठी मोफत सर्व्हिसेस उपलब्ध असतात. (जसे, वैद्यकीय, मानसशास्त्रीय, शैक्षणिक, बालवाड्या) ह्याच पा चात्त्य देशांत कुटुंबांना सरकार मदत करत असूनही कुटुंबसंस्था खिळखिळी झालेली आहे.
वसंत पळशीकर कुठल्या अर्थव्यवस्थेवर व राज्यव्यवस्थेवर टीका करत आहेत? भारतीय का? तसे असेल तर भारतात राज्यव्यवस्थेची मदत नसतानाही पा चात्त्य देशांच्या तुलनेत कुटुंबसंस्था तग धरून आहे. माझ्या मते कुटुंबसंस्था खिळखिळी होण्याचे कारण स्त्रियांच्या नव्या मानसिकतेत आहे. आजपर्यंत कुटुंबसंस्था स्त्रीच्या दुय्यम स्थानाच्या पायावर उभी होती. स्त्रियांचे, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक स्थान बदलताच स्त्रिया आता दुय्यम स्थान स्वीकारायला तयार नाहीत. म्हणून कुटुंबव्यवस्था खिळखिळी झाली आहे. अमेरिकेत जाणून बुजून ‘सिंगल मदर’ होणाऱ्या स्त्रिया आहेत. त्यांचे बॉयफ्रेंडस् असतात. लग्न का करत नाही, ह्या प्र नाला त्या मला एकच मूल हवे आहे. दोन नकोत, बॉयफ्रेंड, फ्रेंड म्हणूनच उत्तम आहे. तो नवरा म्हणून नको, आम्हाला टू इक्वालिटी हवी, अश्या धर्तीची उत्तरे देतात. स्त्रीची मानसिकता बदलली पण पुरुष अजूनही पुरुषप्रधान भूतकाळात राहत आहे, हे एक पा चात्त्य कुटुंबसंस्था खिळखिळी होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. “सधन परदेशात कुटुंब नियोजनामागे मुख्य मुद्दा व्यक्तिस्वातंत्र्य वाढवण्या-चाच मानला आहे’ असे एक विधान वसंत पळशीकर करतात. ह्या विषयाचा मी अभ्यास केलेला नाही पण अमेरिकेत विवाहित जोडपी मुलांची संख्या, किती मुलांचे आपल्याला (आपले) करिअर आणि आर्थिक जबाबदाऱ्या वगैरे संभाळून पालन करता येईल ह्याचा विचार करून ठरवतात असा माझा अनुभव आहे. जसा राहणीमानाचा दर्जा सुधारतो तशी मुलांची संख्या व पर्यायाने लोकसंख्या घटते, हा सिद्ध झालेला मुद्दा आहे.
वसंत पळशीकर व चिं. मो. पंडित यांची कुटुंबाची व्याख्या आईवडील व मुले अशी असावी. पण आता अमेरिकेत मला एक तिसरा प्रवाह दिसतो. (दोन मैत्रिणी व त्यांची मुले), (आजी, मुलगी, नातवंड), (मित्र, मैत्रीण व त्यांची मुले), अशी कुटुंबे इथे आता सर्रास आढळू लागली आहेत. घटस्फोटांमुळे व लग्न न करता मुले होऊ देण्याच्या पद्धतीमुळे ह्या कुटुंबांची संख्या वाढत चालली आहे. चौकोनी कुटुंबात आईवडिलांकरवी मुलांचे योग्य संगोपन होते, की अशा कुटुंबातही होते, हे अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु ह्या कुटुंबांचा पाया स्त्रीच्या अथवा पुरुषांच्या दुय्यम स्थानावर घातला गेलेला नाही. ह्या कुटुंबात वाढलेली मुले स्त्रीपुरुष यांच्याविषयी पूर्वग्रहविरहित निपजतील. (अशी आशा) इंग्लंडमधल्या चॉसर या लेखकाने बाराव्या शतकात स्त्रियांना काय हवे असते याचे भेदक उत्तर दिले आहे. “A woman wants to control her own destiny” (हसरी किडनी-पद्मजा फाटक) मुलांची डेस्टिनी आईच्या डेस्टिनीत गुंतलेली असते. म्हणून मुलांच्या संगोपनाचे सर्व हक्क मी तिच्या स्वाधीन केले आहेत. जर वडिलांनी मुलांचे प्रामुख्याने पालन केले तर ते हक्क मी त्यांना देईन.
स्त्रियांना त्यांच्या जीवनाबद्दलचे निर्णय घेऊ देत, असे मी पूर्वीही आ.सु.मध्ये लिहिलेले आहे. त्याचीच ही पुनरावृत्ती.
[हा लेख मागील अंकातच छापावयाचा होता परंतु काही कारणाने तो या अंकात येत आहे.
– संपादक
65 Oxford Road,
Newton MA 02459-2407, U.S.A.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.