“धर्मप्राय” श्रद्धा

आ.सु.(१२.५) मध्ये श्री. सुधीर बेडेकर यांचे ‘धर्मश्रद्धा आणि दि. के. बेडेकर’ हे टिपण प्रसिद्ध झाले आहे. आंदोलन या मासिकाच्या ऑगस्ट २००० च्या अंकात माझा ‘धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्याचा संक्षेप आ.सु. (११.८) मध्ये प्रसिद्ध झाला व त्यावर श्री. दि. य. देशपांडे यांची टिप्पणीही प्रसिद्ध झाली. प्रस्तुत संक्षेप मी केला नव्हता; तसेच, तो मला दाखवून संमतही करून घेतला नव्हता, ही वस्तुस्थिती येथे नोंदवणे आवश्यक आहे.
दि. के. बेडेकर यांच्या भूमिकांविषयी गैरसमज होऊ नये, त्यांच्या भूमिकेचा विपर्यास केला जाऊ नये, याविषयी सुधीर बेडेकर यांच्याशी माझे शंभर टक्के एकमत आहे. दि. कें. च्या दोन पत्रांमधील काही भाग सुधीर बेडेकर यांनी उद्धृत केला आहे. दि. के. ची भूमिका अधिक नेमकेपणाने समजून घेण्यासाठी हा मजकूर अभ्यासकांच्या नजरेला आणून दिल्याबद्दल सुधीर बेडेकरांचे आभार. एक काहीशी बुचकळ्यात पाडणारी गोष्ट नमूद करतो. धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७७ मध्ये सुधीर बेडेकरांनीच मागोवा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केली. याच वेळी श्री. राजाभाऊ गवांदे व प्रा. गो. म. कुळकर्णी यांनी पुस्तकांच्या संहितेमध्ये ‘धर्मप्राय’ च्या जागी ‘धर्मपर्याय’ हा शब्दप्रयोग सर्वत्र का टाकला नाही, हा प्र न पडतो. दि. के. चे हे पत्र (३–७–१९७२ चे) सुधीर बेडेकरांच्या वाचण्यात कधी आले, हा प्र नही मनात येतो. प्राज्ञपाठशाळामंडळाने धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार ची दुसरी आवृत्ती १९९५ मध्ये प्रसिद्ध केली. त्यावेळी, सुधीर बेडेकरांनी ही महत्त्वाचा दुरुस्ती का करून घेतली नाही! हे पत्र त्यांना त्यावेळी उपलब्ध झाले नव्हते असे असू शकेल. आ.सु.मधील टिपणात त्यांनी याबाबत खुलासा करावयास हवा होता.
बेडेकरांचे तसे स्पष्ट म्हणणे हाताशी असतानाही, पुस्तकाची संपादित मुद्रणप्रत तयार करताना राजाभाऊ गवांदे व गो. म. कुळकर्णी यांनी ‘धर्मप्राय श्रद्धा’ हे शब्दच कायम का ठेवले, हा प्र न सुधीर बेडेकरांनी उपस्थित करून त्याचे समाधानकारक उत्तर शोधावयास हवे होते. दि. के. ची भूमिका विपर्यस्त स्वरूपात लोकांसमोर मुद्दामच ठेवावी, ही या उभयतांची इच्छाच होती असे सुधीर बेडेकरही म्हणणार नाहीत. मग एक गंभीर शक्यता अशी राहते की, बेडेकरांनी व्याख्यानांच्या वेळी केलेले विस्तृत विवेचन लक्षात घेता ‘धर्मप्राय’ हा मुळात ह्यांनी वापरलेला शब्दप्रयोगच योग्य व अर्थपूर्ण आहे असे बेडेकरांच्या या दोन मित्रांचे मत बनले असावे.
‘धर्मप्राय’ हा शब्द . . . खरे म्हणजे समजला तरी तो बरोबरच नाही. धर्मपर्याय – धर्माऐवजी नवी श्रद्धा —- हवा.” असे जरी दि. के. नंतर म्हणत असले तरी, व्याख्याने देतेवेळी त्यांना त्यांच्या मनात असलेल्या ‘श्रद्धे’ला फक्त नवी असे म्हणणे अर्थपूर्ण वाटत नव्हते; काही कारणांनी धर्म हा शब्द श्रद्धेशी जोडणे त्यांना आवश्यक व महत्त्वाचे वाटत होते; पारंपारिक धर्मश्रद्धेपेक्षा वेगळ्या श्रद्धेची गोष्ट आपण करीत आहोत हे ठसविण्यासाठी त्यांनी ‘धर्मप्राय’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला, ही खरी गोष्ट आहे, असे गवांदे व कुळकर्णी यांचे विचारांती मत पडले, असेच मानावे लागते. एरवी, मुंबई मराठी साहित्य संघातले तिसरे व्याख्यान बेडेकरांच्या विचारांमधील गोंधळाचेच प्रदर्शन/प्रकटन मानण्याची पाळी येते.
साहित्य संघातील व्याख्यानात मी तसे विवेचन केले हे खरे; पण आता तो माझा पुरता वैचारिक गोंधळच होता, अशी कबूली देण्याइतकी ऋजुता व नम्रता दि. कें. चा ठायी होती. अशी कबुली मित्रद्वयाला देऊन, ही व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध करू नका (कारण माझी भूमिका मलाच त्यावेळी उमगलेली नव्हती) असा आग्रह दि. के. नी राखला असता. माझा तर्क असा की पत्रातील त्यांच्या म्हणण्याबद्दल संपादक द्वयाची बेडेकरांशी काही चर्चा झाली असावी. ते पत्र लिहिल्यानंतर बेडेकर १० महिने हयात होते, आणि त्यांच्याशी वैचारिक चर्चा शक्य असण्याइतकी त्यांची बुद्धी काम देत होती.
श्रद्धा = विश्वास इतके उथळ समीकरण बेडेकरांनी मांडलेले नाही. ‘श्रद्धेचा व्यूह’ (धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार; पृ. ३) असे ते म्हणतात. तिसऱ्या व्याख्यानात बेडेकर म्हणतात, “ज्या श्रद्धेचा पुनर्लाभ मानवजातीला व्हावा असे मला मांडावयाचे आहे ती अशी विश्वसमावेशक श्रद्धा असेल, पण म्हणून तिला धर्मश्रद्धा म्हणण्यात ‘धर्म’ संज्ञेचा काही गैरवापर आहे, अलंकारिक वापर आहे, किंवा ढ धर्मांच्या श्रद्धांशी नाते जुळविण्याचा अशास्त्रीय हव्यास आहे, असे म्हणता येईल का?” (पृ. ४१-४२; यापुढीलही सर्व पृष्ठसंदर्भ बेडेकरांच्या उपस्थित पुस्तकाचे आहेत.) म्हणजे, ‘धर्म’ ही संज्ञा आपल्या मनातल्या श्रद्धा-व्यूहाशी का व कशी जोडलेली आहे, हा प्र न बेडेकरांनी मुळातच उपस्थित केला होता.
धर्म या संज्ञेचा ‘तात्त्विक’ आशय पाहण्यास “भारतीय व मराठी सुशिक्षित समाजही उत्सुक नाही व जिज्ञासेने पाहणारा नाही. ‘धर्मश्रद्धा’ म्हणजे पारंपरिक धर्मश्रद्धा, असे समीकरण आज लोकमानसात रूढ आहे.” असे म्हणून “पारंपारिक धर्मांच्या अस्तानंतर पुन्हा मानवी मनात उद्भूत होणाऱ्या श्रद्धेला ‘धर्मश्रद्धा’ म्हणणे गोंधळात टाकणारे होईल. म्हणून जिच्या पुनर्लाभाची आशा मी प्रकट करू इच्छितो त्या श्रद्धेला मी यापुढे ‘धर्मप्राय श्रद्धा’ असे कटाक्षाने म्हटले आहे.’ (पृ. ४२-४३) असे बेडेकरांनी म्हटले आहे. असा गोंधळ होणार नसता तर धर्मश्रद्धा हा शब्द वापरणेच दि. के. चा युक्त वाटत होते, असा याचा अर्थ होतो. एखादी श्रद्धा ‘धर्मप्राय’ कधी ठरते? पारंपरिक धर्मश्रद्धेला पर्यायी पण धर्मश्रद्धेची व्यवच्छेदक वैशिष्ट्ये ग्रथित करणारी ‘नवी श्रद्धा’ कशी ओळखावयाची? हा मग कळीचा प्र न ठरतो.
पुस्तकातील आधीचे विवेचन येथे उपयोगी येते. (१) अशी श्रद्धा ‘विश्व-समावेशक’ असायला हवी. विश्वाविषयी जे सारे प्र न माणसाला पडत आले आहेत (यांचा काही तपशील पृ. ४ वर येतो) त्यांना उद्देशून बेडेकर म्हणतात, “या साऱ्या प्र नांत ‘मानव व विश्व’ हा धर्माचा सामान्य विषय आहे.” आता हे प्र न हा तत्त्वज्ञानाचाही सामान्य विषय आहे. यापैकी काही प्र न हा विज्ञानाचा सामान्य विषय आहे. या प्र नांची तत्त्वज्ञान व विज्ञान यांच्या मध्ये न सामावली जाणारी, आणि केवळ श्रद्धेने स्वीकारणेच शक्य व आवश्यकही असणारी ‘उत्तरे’चा ‘धर्मा’चा भाग होऊ शकतात, याचे भान बेडेकरांना होते. तिसऱ्या व्याख्यानात त्यांनी म्हटले आहे, “श्रद्धेचा हा स्वभाव आहे की तिला सर्वस्वी स्वीकारता येते किंवा धिक्कारता येते; तिचा संशयित वृत्तीने अर्धामुर्धा स्वीकार वा धिक्कार करता येत नाही.’ (पृ. ४३)
विश्वावरील नव्या श्रद्धेसंदर्भात बेडेकर म्हणतात, “आपल्या वृत्तींना उत्तेजित करणारे व सफल करणारे हे विश्व आहे अशी श्रद्धा. या विश्वाशी नाते जोडून आपण जे ‘मानुष’ विश्व निर्माण करीत आहोत ते विश्वसंवादी आहे, ही ग्वाही मानवाला मनोमन मिळाली पाहिजे. . . . ही ग्वाही फक्त श्रद्धाच देऊ शकते.’ (पृ. ४५) विश्वाकडून काही अपेक्षा केलेल्या आहेत. विश्वाकडे कर्तेपण दिलेले आहे. मानुष विश्व व अ-मानुष विश्व परस्परसंवादी आहे याची ग्वाही हवी आहे. ही ग्वाही फक्त श्रद्धाच देऊ शकते, हे देखील बेडेकरांना ठाऊक आहे. ग्वाही फक्त श्रद्धाच देऊ शकते, असे का? कारण विज्ञान वा तत्त्वज्ञान ती देण्यास असमर्थ आहेत. आणि ‘विश्वाशी संवादित्व’ याचा अर्थ, विश्वाची व्यवस्था स्वायत्त आहे, ती अनाद्यनंत चालत आलेली आहे, हीच गोष्ट मुळात श्रद्धेने स्वीकारण्याची ठरते. विश्वात नित्य बदल घडून येतात हा अनुभव. या बदलांना काही दिशा, लक्ष्य, साध्य नसते; बदल हे सर्वस्वी निरर्थक अपघातस्वरूप असतात असे म्हटले तर ‘व्यवस्था’, नियमबद्धता त्या पली कडची गोष्ट असली पाहिजे. ‘मानुष’ विश्व तर उद्देश, दिशा, हेतू, साध्ये यांनी आकारित होत असते मग संवादीपण कसे शक्य होईल? तेव्हा, बदलांनाही दिशा असते, साध्य गाठावयाचे असते, हेतू असतात, असे श्रद्धेने स्वीकारावे लागते. स्वतःच्या ठायी असलेल्या चैतन्यतत्त्वाचा प्रत्यय माणसाला येतो; आत्मभानाचा, ने आत्मभान असल्याचा प्रत्यय माणसाला असतो. त्याची अभिव्यक्ती, त्याद्वारे (भाषेच्या माध्यमातून व अन्यही माध्यमांमधून) संवाद करण्याची क्षमता असण्याचा प्रत्यय त्याला असतो. विश्वाचा घटकमात्र असलेल्या मानवाला स्वतःच्या संदर्भात या साऱ्याचा साक्षात् प्रत्यय येत असतो. आता, ज्यात त्याचे अस्तित्व एक घटक म्हणून आहे, ते विश्व मात्र केवळ जड द्रव्याचा पसारा? याचे उत्तर साक्षात् प्रत्ययकारी ज्ञानाच्या आधारे देणे ‘मानवाच्या तुटपुंज्या सामर्थ्याच्या बाहेरचे’ हे बेडेकरांचे म्हणणे समजायला कठीण नाही : आपल्याच नमुन्यावस्न मग देवाची (वा देवांची) निर्मिती करणे, आणि त्यांच्या इच्छा-आकांक्षाविषयी कल्पना करून त्या श्रद्धेने स्वीकारण्याची बेडेकरांची तयारी नव्हती. पण संवा-दित्वाची गोष्ट करणाऱ्या बेडेकरांना येथे थांबताही येत नाही. विश्वात एक चैतन्य-तत्त्व ओतप्रोत आहे आणि ते सतत कार्यरत आहे व ते सुव्यवस्थित व नियमबद्ध आहे, त्याच वेळी नवसर्जनशीलही आहे —- ही श्रद्धाच बेडेकरांना हवी असलेली ग्वाही देऊ शकते.
ज्या नव्या श्रद्धेची गोष्ट बेडेकर करतात “त्या श्रद्धेचे एक महत्त्वाचे व निर्णायक अंग . . . म्हणते मानवी समूहाची एकात्मता’ असल्याचे ते सांगतात. (पृ. ४६) बेडेकरांच्या विचारव्यूहात व्यक्ती आणि समाज, दोघांचेही,एकात्मता साधणारे संभरण पुनःपुन्हा होत राहण्याला मध्यवर्ती महत्त्व आहे. बेडेकर या संदर्भात म्हणतात, “साऱ्या मानवजातीची समूहता, एकात्मता, जर साध्य होणार असेल तर ती एका नव्या श्रद्धेच्या साक्षीनेच होऊ शकेल. ती श्रद्धा सर्वांची होईल तेव्हा साकार होईल.” थोडे पुढे बेडेकर म्हणतात, “. . . ‘मानवाची एकात्मता’ ही ‘मानुष’ विश्वावरील श्रद्धेचे फार मोठे व प्रभावी अंग आहे.’ (पृ. ४७)
या एकात्मतेच्या व तिच्या संभरणाच्या बाबतीत, श्रद्धेच्या अधिष्ठानाच्या अभावी या गोष्टी, त्याही संपूर्ण मानवजातीच्या (आणि विश्वातील वस्तुजाताच्या) पातळीवर, व्यवहारात साकार होण्याची प्रक्रिया गतिमान होऊ शकत नाही. व्यावहारिक अनुभवांच्या व तार्किक युक्तिवादाच्या आधारावर एकात्मता व संभरण यावरची श्रद्धा उत्पन्न होत असती तर, श्रद्धा हा शब्द वापरण्याचे कारणच उरले नसते. ‘मानव-समूहाची एकात्मता’ म्हणताना, एकत्व, ‘युनिटी’ हा बेडेकरांना अभिप्रेत अर्थ आहे. भेद, स्तर ठेवून राष्ट्रीय-सामाजिक एकात्मता साधण्याचा विचार असतो त्या अर्थाने ‘इंटिग्रेशन’ त्यांना अभिप्रेत नाही; हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. ‘एकत्व आहेच आहे’ हे (सत्य) श्रद्धेने निःसंदेहपणे स्वीकारलेले असले तरच त्याची प्रचीती ‘दर्शना’च्या (‘व्हिजन’च्या) स्ख्यात येते आणि ती संभरणाच्या विधींच्या द्वारा पुनःपुन्हा साध्य करण्याचा आचार शक्य होतो. आणि ही संभरणाची प्रक्रिया यातुनिर्भर (इरॅशनल/मॅजिकल) राहते. म्हणजे श्रद्धा असते म्हणून विधिपूर्वक केलेल्या कृतींचे इष्ट ते परिणाम/फल हाती येते.
पारंपरिक यातुप्रधान विधी व कर्मकांड (यज्ञयागादी) तसेच पारंपारिक धर्म—-लोकधर्म तसेच उन्नत मानले गेलेले थोर धर्म दोन्ही—-यांचे पुनरुज्जीवन आपल्याला अभिप्रेत नाही हे पक्के ठसवीत असतानाच, ज्या श्रद्धेच्या पुनर्लाभाची गरज आपल्याला वाटते, व जी लाभेल अशी आशा आपण बाळगतो, ती श्रद्धा विज्ञान, तत्त्वज्ञान, कला यांच्या प्रगतीमधून वा त्यांच्या अधिक प्रगल्भ आविष्कारां-द्वारे लाभणारी नाही; त्या श्रद्धेचा आशय व आकार, दोन्ही असे आहेत की ‘धर्म’ ही संज्ञा आपणास वापरावयास हवीच, हा एक पेच बेडेकरांसमोर होता. ‘धर्मप्राय’ हा शब्द या पेचाची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने, ‘धर्मपर्यायी’, ‘नवी’ या शब्दांच्या तुलनेत योग्य व श्रेयस्कर ठरतो, म्हणूनच त्यांनी तो व्याख्यानांचे वेळी निवडला.
बेडेकरांच्या विवेचनात “ ‘मानुष’ विश्व” हा शब्दप्रयोग कळीचे महत्त्व राखणारा आहे. माणसाने निर्माण केलेले, या मर्यादित अर्थाने मानुष या शब्दाचा वापर ते करीत नाहीत. ‘मानुष’ म्हणजे माणुसकीने, नैतिक दृष्ट्या चांगल्या व हितकारी आचार-विचारांनी ओतप्रोत (‘ह्यूमन’ अँड ‘ह्यूमेन’) हा अर्थही या शब्दात सामावलेला आहे. चराचर विश्व कसे आहे, ते कोणत्या नैतिक तसेच वैज्ञानिक, ज्ञानात्मक, व कलात्मक नियमांनी चालते, त्यांची दिशा कोणती आणि साध्य काय या संबंधीच्या एका ‘समावेशक’ अशा श्रद्धेच्या आधारेच ‘मानुष’ विश्वाची धारणा होऊ शकते. या श्रद्धेचा आशय व आकार मानवेतिहास ध्यानात घेता ‘धर्म’ या शब्दानेच यथार्थपणे प्रकट होतो, म्हणून ‘धर्मप्राय’ शब्दाची योजना.
दि. के. बेडेकर मरणाच्या क्षणापर्यंत नास्तिकच राहिले, ते मार्क्सवादीच राहिले हे सुधीर बेडेकर यांचे म्हणणे खरे आहे, पण अपुरे आहे. धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार या पुस्तकांची संहिता ज्यांनी संपादित केली त्या श्री. राजाभाऊ गवांदे व प्रा. गो. म. कुळकर्णी यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना जोडली आहे. तिच्याखाली ३ मे १९७७ ही तारीख आहे. म्हणजे, बेडेकरांच्याशी झालेल्या पत्रव्यवहाराची दखल घेतल्यानंतर लिहिलेली ही प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत बेडेकरांनी ‘धर्मप्राय’ हा शब्द का वापरला याचा खुलासा संपादकद्वय पुढील शब्दांत करतात. “धर्म या शब्दाभोवती असलेले स्ढ कल्पनांचे शेवाळ ते नजरेआड करू शकत नव्हते. आणि त्याबरोबरच ‘धर्म’ या शब्दाचा पूर्णतया त्यागही करू शकत नव्हते. ‘श्रद्धा’ शब्दाचा वापर करणेही अत्यावश्यक होते; ढ धर्माहून वेगळे आणि तरीही धर्मासारखेच असे काही सूचित व्हावे म्हणून त्यांनी ‘धर्मप्राय’ या शब्दाची योजना प्रस्तुत व्याख्याना-साठी केली.’ येथे ‘धर्मपर्यायी श्रद्धा’ हा शब्दप्रयोगही संपादकद्वयाने नोंदविला आहे. पण ‘धर्मप्राय’ हा शब्द “बेडेकरांच्या विवेचनांचे वेगळेपण स्पष्ट करण्याच्या दृष्टीने चपखल वाटतो.’ असे म्हटले आहे. सुधीर बेडेकर यांनी या प्रस्तावनेचाही संदर्भ द्यावयास हवा होता. बेडेकरांच्या पत्रावर काही विचारविनिमय बेडेकर व संपादक यांच्यात आपापसात झाला असणार; ही प्रस्तावना लिहितेवेळी व संहिता पक्की करतेवेळी गवांदे कुळकर्णी या बेडेकरांच्या मित्रांचा कौल ‘धर्मप्राय’ या शब्दाच्या बाजूने पडला, ही गोष्टही आ.सु.च्या वाचकांसमोर यावयास हवी होती.
प्रार्थनासमाजातील एका समारंभप्रसंगी बेडेकरांनी काढलेले उद्गार प्रस्ताव-नेच्या शेवटी उद्धृत केले आहेत. ह्यातला शेवटचा भाग असा : “मानवी हृदयाला सान्ततेचा, स्वतंत्रतेचा व विश्वाच्या गूढतेचा प्रत्यय आल्यामुळे, मानवी अस्तित्वाचा व श्रेयाचा विचार करताना मानवी मर्यादांची व मर्यादित सामर्थ्याची जाणीव मनाला होते. या जाणिवेच्या पायावर एका मानवधर्माची श्रद्धा उदित होते. मानवाचे अस्तित्व, सान्तता व श्रेयासाठी प्रयत्न यांचा प्रत्यक्ष अनुभव, हे या श्रद्धेचे अभिप्राय व केंद्र आहे. विश्वासंबंधी कुतूहल व विश्वाच्या गूढतेसंबंधी विस्मय हा या श्रद्धेचा परिघ नास्तिक, मार्क्सवादी ही ओळख न टाकून देताही, बेडेकर या कोटींचे रूढ आशय व आकार उल्लंघत वेगळा विचार करण्यात गढले होते. व्यक्ती, कुटुंब, आणि त्यापलीकडे समूह यांच्या ‘एकात्मते’च्या —- खरे तर भेदविलोपन साधणाऱ्या एकत्वाच्या —- संभरणाचे महत्त्व ज्या प्रकारे बेडेकर आवर्जून प्रतिपादत्वात ती एक गोष्ट देखील नास्तिक व मार्क्सवादी या कोटींमध्ये पूर्णतया ते सामावले जाऊ शकत नव्हते हे स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. माणूस दोन विश्वांमध्ये राहतो : एक भौतिक आणि दुसरे ‘मानवी’ असे त्यांचे म्हणणे. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला इत्यादी सर्व ‘मानवी’ विश्वाचा भाग राहतात. वैज्ञानिक आकलनही ‘मानवी आकलन’च राहते, आणि मानवाच्या मर्यादा याही क्षेत्रात लागू असतातच. धर्मश्रद्धा : एका पुनर्विचार या पुस्तकाला जोडलेल्या परिशिष्टांपैकी ‘विज्ञानपद्धती व इतर आकलन-पद्धती’ या चौथ्या परिशिष्टात मानवी ज्ञानप्रक्रियेच्या अनेकपदरी स्वरूपाबद्दल बेडेकर लिहितात. तेच बेडेकर ‘निः संदेह स्वीकारा’ची गोष्ट करतात. ज्या गोष्टींचा आपण निःसंदेह स्वीकार करतो,—-म्हणजे ज्या श्रद्धेचा भाग असतात—-त्या श्रद्धेचा भाग म्हणून असतात तोवर स्वतःसिद्ध सत्य म्हणून आपण ह्या गोष्टींचा स्वीकारतो. केवळ व्यक्तिशः माझ्यापुरत्या त्या गोष्टी सत्य नाहीत, तर त्या सर्व मानवांसाठीच सत्य आहेत हे माझे ज्ञान आहे, हा दावा असतो. येथे मानवी अस्तित्वाच्या दोन पातळ्या माणूस त्याच्या आत्मप्रत्ययाच्या पातळीवर करतो की नाही? एक लौकिक व एक अ-लौकिक. एक नित्य बदलते, दुसरे सनातन असलेले. एक इतर सर्वांपेक्षा मी वेगळा आहे हा, दुसरा सर्वांशी माझे एकत्व आहे, हा.
विश्वातील सर्व मानवांना व वस्तुजाताला ‘सहृदयते’ने एकत्र करीत त्यांचे एकत्व अनुभवण्यासाठी ‘एकत्वा’चे सत्यत्व श्रद्धेने स्वीकारलेले असायला लागते. हा एक घटक. दुसरा, पुनःपुन्हा संभरण घडत येण्याच्या प्रक्रियेचा. संभरण घडून येण्यासाठी देखील, एकत्वाची स्थिती ही मूळ, स्वस्थ व सत्य स्थिती होय व ती पुनःपुन्हा काही प्रकारच्या विधीद्वारा प्राप्त होऊ शकते ही श्रद्धा आधी स्वीकारलेली असावी लागते. आणि श्रद्धेने निःसंदेहपणे काही स्वीकारणे यामध्ये अभिप्रेत असल्याने ‘धर्मप्राय’ हा शब्द वापरणे बेडेकरांना आवश्यक वाटले.
विश्व, मानवी व्यक्तित्व आणि माणसांचे समूहजीवन, माणसाचा चराचर सृष्टीशी असलेला संबंध, या साऱ्याच्या गाभ्याशी माणसाला न उकलणारा व त्याच्या मर्यादांमुळे उकलू न शकणारा एक गूढ प्रांत शिल्लक उरतो. या गूढ प्रांताची पूर्ण उकल झालेली आहे असा दावा सर्वच पारंपरिक धर्म करतात. बेडेकरांचे वेगळेपण मला यात आढळते की, ते पारंपरिक धर्मांचा हा दावा नाकारतात पण गूढ प्रांताचे अस्तित्व नाकारीत नाहीत. त्या प्रांतात ते काही गोष्टींची श्रद्धेने प्रतिष्ठापना करतात आणि त्याच्या आधारे एका श्रद्धा-व्यूहाला आकार देतात. माणसाची स्वभावप्रकृती, त्याच्या ठायी आढळणाऱ्या ऊमी, त्यांचे आजवरच्या ऐतिहासिक वाटचालीच्या ओघात झालेले आविष्कार यांचा आधार घेऊन ते या गोष्टींची निवड करतात. या अर्थाने या सर्व गोष्टी ‘मानुष’ आहेत असे म्हणता येते. बेडेकरांचा विचारव्यूह हा आपणास परिचित असलेल्या नास्तिक-निरीश्वरवादी, विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्य वादी, इहवादी, मार्क्सवादी चौकटींमध्ये सामावला जात नाही. व्याख्यानांच्या प्रसंगी व नंतरच्या परिशिष्टांच्या लेखनाच्या वेळीहि ‘धर्मप्राय’ शब्दाच्या त्यांच्या निवडी-मधून त्यांना आपले वरील सर्व स्ढ मांडण्यांपासूनचे वेगळेपण अधोरेखित करावयाचे होते, असा अभिप्राय ठसतो.
[दिकेंचे मत बदलले का, केव्हा, ते सुधीर बेडेकरांना केव्हा कळले, ही चर्चा सुधीर बेडेकर व पळशीकर यांनी ‘थेट’ करावी. इतर मुद्देच आ.सु. विचारात घेईल.
– संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.