विनाश पर्व

अकरा सप्टेंबर दोन हजार एक. एकविसावे शतक उदयाचली असतानाच महासत्ता अमेरिकेवर अतिरेक्यांनी हल्ला चढवला. आर्थिक सत्तेचे केंद्र असलेल्या न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे गगनचुंबी जुळे मनोरे आणि संरक्षण व्यवस्थेचा किल्ला पेंटॅगॉनच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. आणि अमेरिकेसकट जग सैरभैर झाले.
महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक व विख्यात विचारवंत श्री. कुमार केतकर हे त्यावेळी शिकागोहून न्यूयॉर्ककडे निघण्याच्या तयारीत होते. हतबुद्ध अमेरिकेतील स्पंदने ते इ-मेलने मित्रांपर्यंत पोहोचवत होते. त्या पत्रांतील निवडक भागाचा भावानुवाद.
प्रिय मित्रांनो,
अमेरिकेतील मूड संताप, धक्का, हतबलता, असहाय्यता, दुःख, सांत्वन, आशा, सहकार्य, करुणा, धीर, मदत इ. व्यक्त करत होता. लोकांमध्ये एवढी एकी कधीही दिसली नव्हती. अग्निशामक दल, वैद्यकीय पथक, पोलीस, नोकरशाही, माध्यम अशा कित्येक यंत्रणांमध्ये कमालीचे सहकार्य होते. आजपर्यंत कुठल्याही आपत्तीनंतर मला असे चित्र दिसले नव्हते. तक्रार नाही, चोरी नाही. गोंधळ जाणवत नव्हता. भारतात आपत्तीमध्ये मृत्यूविषयी बेपर्वाई असते. संपूर्ण अनागोंदीने व्यवस्था कोलमडून पडते. अशा वातावरणात जगायची सवय भारतीयांना अंगवळणी पडली आहे.
मी किती तरी वेळा न्यूयॉर्कच्या गगनाला गवसणी घालणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या मनोऱ्यांमध्ये गेलो आहे. डावे म्हणतात तसे ते केवळ अमेरिकन भांडवलशाहीचे प्रतीक नव्हते. अमेरिकन आशा, आत्मविश्वास, जीवनेच्छा व चैतन्याचेही ते प्रतीक होते. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा (सी आय ए व एफ बी आय), सुरक्षा-व्यवस्था व राज्यकर्त्यांपेक्षा हल्लेखोरांचे नियोजन चाणाक्ष निघाले. ज्यांनी कुणी हा हल्ला घडवला असेल त्यांचे क्रौर्य गरगरवून टाकणारे आहे. यातून अमेरिकेला सावरायला बरीच वर्षे लागतील. पहिल्यांदा युद्ध त्यांच्या दारावर येऊन धडकले आहे. याची १९४१ डिसेंबरच्या पर्ल हार्बरच्या हल्ल्याशी तुलना होऊ शकणार नाही. त्यावेळी युद्ध चालू होते आणि अमेरिकेच्या बऱ्याच किनाऱ्यावर हल्ल्याची शक्यता वाटत होती. परंतु आता अमेरिका कमालीची आत्मसंतुष्ट होती.
दशकापासून असलेली आर्थिक भरती, अपूर्व समृद्धी व हाय-टेक जीवनशैलीमुळे आनंदसागरात डुंबत असल्याची भावना समग्र अमेरिकनांच्या मनांत होती. सध्याच्या जगामधील एकमेव महासत्ता सुरक्षिततेच्या भ्रमामुळे निर्धास्त होती. अमेरिकन यंत्रणा कम्युनिस्ट राजवटीपेक्षा वरचढ ठरली. त्यांनी युरोपला नगण्य केले, इराकला नेस्तनाबूद केले. आपल्या देशाने इराकवर केलेले क्रूर बाँबहल्ले अमेरिकन जनता विसरून गेली. बगदादमधील राणालये, शाळा, मशिदी उद्ध्वस्त केल्या. इराकी बालकांना कसल्याही प्रकारची वैद्यकीय मदत नाकारली. कट्टरवादी मुस्लिमांना अफगाणिस्तानातील सोव्हिएट राजवटीविरुद्ध लढण्याकरिता तालिबानींना अर्थाचा व शस्त्रांचा पुरवठा केला. अमेरिकेनेच ओसामा बिन लादेनची निर्मिती केली. सोव्हिएटांच्या ‘सैतानी राजवटीचा’ नायनाट करण्यासाठी अमेरिकन गुप्तचर खाते व परराष्ट्र धोरणकर्त्यांनी त्याला यथेच्छ उत्तेजन दिले. भारत व चीनवर दहशत बसवण्याकरिता पाकिस्तानला अर्थाची व शस्त्रांची कुमक पुरवून भारतीय उपखंडात स्वतःचा तळ उभा केला. इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण केल्यानंतर पाकिस्तानचा निषेध करायला अगदी बिल क्लिंटननी नकार दिला. प्रवाशांच्या सुटकेसाठी अतिरेक्यांना सोडण्याचा सल्ला अमेरिकेने दिला. भाजप सरकार त्या दबावापुढे झुकले एवढेच नाही तर
परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह अतिरेक्यांना घेऊन कंदाहारला गेले. अमेरिकेनेच त्यांच्या शस्त्रास्त्र निर्मितीचे उद्योग चालवण्यासाठी मादक पदार्थांच्या व शस्त्रास्त्रांच्या तस्करीला प्रोत्साहन दिले. तणाव निर्माण करून युद्धांना जन्म दिले.
अमेरिकेने मुलांच्या हातांत खेळण्यातल्या बंदुका दिल्या. बंदूक संस्कृती, युद्धक्रीडेचे जनक तेच होते. हे सर्व काही त्यांच्यावर बूमरँगसारखे उलटले आहे. नव्या सहस्रकातील पहिल्या शतकाच्या पहिल्या दशकात आपण आणखी एका शीतयुद्धाला सामोरे जात आहोत. कुठलेही नि िचत देश नाहीत, सैन्य नाही, म्हणून हे महाभयंकर युद्ध ठरेल. मानवी बाँब स्वतःचा आणि त्याच्यासह जगाचा संहार घडवून आणतील. – कुमार केतकर
हाय-टेक रानटी
अमेरिकेतील न्यू जर्सी विद्यापीठात ‘जागतिकीकरणाची आव्हाने’ ह्या विषयाचे अध्यापन करण्यासाठी चार महिने श्री. कुमार केतकर यांचे वास्तव्य होते. त्यांच्या सहकारी श्रीमती दलिला सुहोन्जीक ह्या जन्माने युगोस्लाव्हियन असून तेथील वंश-द्वेषाच्या आणि रक्तपाताच्या साक्षीदार आहेत. त्यांनी समविचारी मित्रमैत्रिणींना पत्राने सध्याच्या अस्वस्थ काळासंबंधी कळविलेल्या भावनांचा भावानुवाद. “एखाद्या
ख्रि चनाची कृती त्याची व्यक्तिशः असते. कोणत्याही ज्यू ची कृती यच्चयावत ज्यू धर्मीयांची ठरते.” डायरी ऑफ अॅन फ्रँक
प्रिय स्वजन,
गेला महिनाभर मी दहशतवाद, इस्लाम, द्वेष आणि सूडाबद्दल वाचत ऐकत आहे. धर्मयोद्धे मुस्लिम आणि दयाळू ख्रि चनांच्या वर्तनासंबंधी पांडित्यपूर्ण वि लेषण वाचायला मिळते. अपहरणकर्ते व अतिरेकी हे मुस्लिम नव्हेतच. इस्लामला दोष देण्यात अर्थ नाही, असा सूर पा चात्त्य माध्यमातून लिहिणाऱ्या मुस्लिमांनी लावला आहे.
इस्लाम हा शांततेला जपणारा महान धर्म आहे. अफगाणिस्थानातल्या घटनांचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही. अशा आशयाचे बरेच काही बोलून झाल्यावर सी.एन.एन. दूरचित्रवाणीचे संयोजक वदले, “एक अब्ज इस्लामींचा हा कणखर धर्म असून त्यांच्यापैकी बहुसंख्य शांतताप्रिय आहेत. परंतु अल्लाच्या नावावर कत्तल करणारे काही इस्लामला बदनाम करीत आहेत.” याच सुरात काही ख्रि चन येशूच्या नावावर रक्तपात घडवतात असे तुमच्या कानावर कधी आले का? बोस्नियातील मुस्लिमांचे सर्वांनी मुडदे पाडले. रशियनांनी चेन्नियात संहार घडवला. अशी अनेक उदाहरणे देता येतील. कालपर्यंत एकमेकांचे गळे कापण्यास आतुर आज कमालीचे सभ्य झाले आहेत. कारण त्यांचा शत्रू एक आहे—-रानटी इस्लाम. त्यांच्या पाठीशी अमेरिकन माध्यमजगताचे संपूर्ण पाठबळ आहे. मूलतः खलप्रवृत्तीचा, काळाच्या प्रवाहात स्वतःला गोठवून घेतलेला इस्लाम अशी विशेषणे बहाल करताना हे युद्ध इस्लामविरोधी नसल्याची ग्वाही ते देतात.
केवळ विसाव्या शतकात ख्रि चन युरोपात शंभर कोटींच्या नरसंहाराचा इतिहास साक्षी आहे. त्याचा उल्लेख करताना ख्रि चन धर्मात अंगभूत दुष्टावा असल्याची विद्वत्ताप्रचुर चिकित्सा कधी वाचायला मिळाली आहे? सरत्या शतकातील अखेरच्या दशकातील आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्या तुमच्यासमोर ठेवते. बऱ्यापैकी पुरोगामी-कम्युनिस्ट युगोस्लाव्हियात, बहुसंख्य मुस्लिम असलेल्या बहुविध संस्कृतीच्या बोस्नियामध्ये मी वाढले. हॉलिवूडचे चित्रपट, अमेरिकन सिगारेट, फास्ट फूड, वाइन आम्हाला आवडत असे. इथिओपियातील दुष्काळानी आम्ही कासावीस व्हायचो. जगात कुठेही आपत्ती आली तर निधी जमवायचो. आण्विक चाचण्यांचा निषेध करण्यात पुढाकार घ्यायचो. पर्यावरण जपण्यासाठी सायकल प्रसाराची मोहीम आखायचो. सकल विश्वाला एकत्र आणून नवी रचना करावी. जग अधिक सुंदर करण्यासाठी ग्रीन पार्टी हीच एकमेव आशा मानून उमद्या स्वप्नांना आकार देणे हाच विद्यार्थिदशेतला ध्यास होता. कॅथॉलिकांकडून पियानो, मशिदीतून सुफी कविता, इस्लामी शैलीतील मातीकाम शिकलो. आम्ही धार्मिक, निधर्मी होतो. दोन्हींचा संगम झाला होता. वातावरण खुले होते. मुस्लिम भागात पुरुषांपेक्षा महिला डॉक्टर अधिक असत. लिंगभेद नव्हता. दडपण नव्हते. आणि १९९२ उगवले.
वर्षाच्या आरंभी घरासमोरच्या जनरल स्टोअर्समध्ये काहीतरी आणण्यासाठी पळतपळत गेले. आमच्या घरासमोर काही बायका आपसात कुजबुजत असल्याचे माझ्या लक्षातही आले नव्हते. दुकानाच्या पुढ्यात नव्यानेच फलक दिसला. “मुस्लिमांना आणि कुत्र्यांना प्रवेश बंद” ठीक आहे. माझा काय संबंध? मी नास्तिक, आई ख्रि चन अशा विचारात असतानाच दुकानातील कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावरील कडवट भाव पाहून माझ्या वडलांमुळे आलेल्या मुस्लिम नावाची जाणीव होऊन मी एकाएकी शरमिंदी झाले. एक बाई दुकानापर्यंत येऊन मालकाशी (आमचा शेजारी) बोलू लागली. मी पळतच घर गाठले. दोन युद्धांनी युरोपात धार्मिक कट्टरता आणि द्वेषाचे धडे शिकवल्याचे मी स्वतःला समजावत होते. पोलिसांची मदत घेण्याचे ठरवत होते. बायकांचा आवाज चढत गेला. “ते सगळे सारखेच आहेत. तेवढेच क्रूर आहेत.” माझ्याकडे पहात एकजण ओरडत होती.
महिन्याभरात आमचा फोन गेला. रुणालयातून वडिलांची हकालपट्टी झाली. ते ‘खतरनाक कडवा मुस्लिम’ असल्याने सर्बियन महिलांची नसबंदी करतील असा संशय त्यांच्या सहकाऱ्यांना वाटू लागला. वीज गायब झाली आणि आम्हाला शब्दशः हिंडण्याफिरण्यासाठी परवाना घ्यावा लागला. काही धाडसी मित्र अन्न पुरवत राहिल्याने आम्ही जगू शकलो. जाताजाता सैनिकांनी खिडक्यांच्या काचा फोडल्याने आम्ही जिन्यात आळीपाळीने झोपू लागलो. रोज रात्री बंदुकांचे आवाज घुमायचे. सकाळी सर्बियनांसाठी आणखी एक घर ‘स्वच्छ’ व्हायचे. काही काळ लोटल्यानंतर ह्या प्रक्रियेला वांशिक सफाई अभियान असे संबोधन लाभले. सरहद्द पार करून लोक क्रोएशियात आणि तिथून पुढे जर्मनी, डेन्मार्क, इंग्लंड, अमेरिकेत जात असल्याच्या बातम्या कानावर येत होत्या. मला संयुक्त राष्ट्रसंघात अनुवादकाच्या तात्पुरत्या नोकरीमुळे क्रोएशियात जाण्याची संधी मिळाली. माझ्या आईवडिलांनी येण्याचे ‘काहीच कारण’ नसल्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सोबत नेण्यास मला नकार दिला.
शहराला कधीही कशाची गरज पडू शकते म्हणून माझ्या आईवडिलांना घर उघडे ठेवण्याचा सल्ला मिळाला. अजिबात कल्पना न देता त्यांना वाटेल तेव्हा शहर घरी येत गेले. आधी गॅस गेला. मग फ्रिज, स्टिरिओ, जुन्या रेकॉर्ड्स आणि अखेरीस घर गेले. अर्धागवायूमुळे अंथरुणाला खिळलेल्या आईची हेटाळणी झाली. तेव्हा बंदुकधारी इसम त्यांना खेटून बसला असताना वडिलांनी सर्व मालमत्ता सर्बियन प्रजासत्ताकाला स्वेच्छेने दान दिल्याच्या कागदपत्रांवर सही केली. त्यांना कौटुंबिक फोटोसुद्धा नेऊ दिले नाहीत. ते राहत असल्याचा कसलाही पुरावा शिल्लक ठेवायचा नव्हता. आमचा साराजिव्हो नष्ट होत होता. वाचनालये जळत होती. कर्मठ पाद्यांच्या आशीर्वादाने मृतांच्या शरीरावर सुरी, कात्रीने क्रूसाची निशाणी कोरली जात होती. आबालवृद्धांची प्रेते विच्छिन्न अवस्थेत दिसायची. क्रोएशियातील सर्व रेल्वे स्टेशनां-वर निर्वासितांच्या लोंढ्यांनी दाटी व्हायची. ओळखीचा चेहरा पाहण्यासाठी मी रोज जात असे.
१९९२ च्या नोव्हेंबर महिन्यात मी गर्दी बघत होते. आधी आजी दिसली, मागून सगळे. आम्ही कडकडून भेटलो. हमसून रडलो. “मी तीन युद्धे अनुभवली. पण मला कोणी कवळी काढून ठेवा, मुस्लिम रानटी आहेत आणि तसेच दिसले पाहिजेत असे कोणी दरडावले नव्हते.” त्यांच्यावर देखरेखीसाठी माझ्या शाळेतील मित्र आला होता. “ख्रि चनांच्या ऐतिहासिक भूमीतून तुमच्यासारख्या घुशींना हद्दपार केले तरच ती पुन्हा एकदा पवित्र होईल.’ असे खेकसून तो निघून गेला. बोस्नियातील हा इतिहास सी.एन.एन., बी.बी.सी. नी नोंदवून ठेवला आहे. अशा त-हेच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. आमच्यावर बलात्कार झाला नाही, आम्ही मारले गेलो नाही, म्हणून ही बरी कथा म्हणता येईल.
मुस्लिम असलो तरीही आम्ही मूल्यांची बूज राखतो. संस्कृती, भाषा, भौगोलिकता यासारख्या अनेक भेदांचा विचार न करता समग्र मुस्लिमांना एक जमाव ठरवणे हे नैतिकदृष्ट्या बेजबाबदारपणाचे असून ते भयानक आहे. सर्व ख्रि चन एकसंध, एकसारखेच आहेत, असे माझ्या चुकूनही मनात येत नाही. बोस्नियात अडीच लाख बळी धर्माने घेतले, दहा लाख परागंदा झाले. सामूहिक कबरी, छळ-छावण्या हे सारे कशासाठी? १९९० मध्ये युरोपला इस्लामपासून वाचवण्याकरिता! तरीही सर्व ख्रि चन धर्मवेडे, वंशविच्छेदक, जातिसंहारक आहेत, असा सिद्धान्त मी मांडत नाही.
बोस्नियामधील द्वेष, तिरस्कार व नफरत यांची मोहीम शिक्षित बुद्धिवाद्यांनी हाती घेतली. कॅरॅझिक हे डॉक्टर, मायलोसेव्हिक हे प्रसिद्ध वकील, साराजिवो विद्यापीठात शेक्सपीअर शिकवणारे प्रा. कोल्जेव्हिक यांना ‘इस्लामच्या रानटीपणाचा धोका’ जाणवला. त्याला महासंकटाचे रूप देऊन हे विष पसरवण्याचे त्यांचे व्यवस्थापन कुशल होते. सभ्यता, संस्कृती वाचवण्याकरिता खून करावा लागतो, हे पटल्यावर पुढची क्रिया अवघड जात नाही. बोस्नियातील घडामोडींमुळे युरोपीय संकल्पनेची हत्या होत असल्याचे युरोपच्या ध्यानात आले नाही. “तू त्यांच्या सान्निध्यात वावरलीस, खरोखरीच मुस्लिम इतके भयंकर असतात?” माझ्या मैत्रिणीने इतक्यात विचारले. मला ख्रि चन समजून ती बोलत होती. माझ्या डोळ्यासमोर आजी, तिच्या चोरलेल्या कवळ्या आल्या. तुमच्या आतील ‘सभ्यता’ नष्ट न करता बाहेरच्या असंस्कृतपणाचा नायनाट कसा करता येईल? — दलिला
बुरख्यातली घुसमट
अफगाणिस्थानातील तालिबान राजवटीतही तरुण. झुंझार महिला स्वातंत्र्या-साठी झगडत होत्या. त्या एकमेकींशी व बाहेरच्या जगातील सहकाऱ्यांना पत्राने भेटत. अमेरिकेने अफगाणिस्थानावर बाँब हल्ले चालू केल्यानंतर लंडनमधील टेलि-ग्राफ वृत्तपत्राच्या ख्रिस्तिना लँब यांनी शिताफीने चोरून हाती आणलेले काबूलमधील महिलेचे हे पत्र.
प्रिय ख्रिस्तिना,
या आठवड्यात काही मैलांवरचे विमानतळ आणि लष्करी ठाण्यांवर बाँब पडल्याचे आवाज फेकू येतात. बहिरेपणा यावा एवढे स्फोट होतात. घराचे दरवाजे खिडक्या थरथरत राहतात. आम्ही भीतीने कापत राहतो. तरीही आम्ही बाहेर येऊन आकाशातला लखलखाट पाहतो. आम्हाला काहीच होणार नाही असे मनोमन वाटत राहते. आमच्या यातनांचा शेवट व्हावा यासाठी प्रार्थना करीत रहातो.
तू मला तालिबानी राजवटीतील आमच्या अवस्थेविषयी लिहायला सांगितलेस. बुरख्याची सक्ती झाल्यानंतर शिकलेल्या अफगाणी महिलेच्या भावना काहीशा समजू शकतील. मी माझे खरे नाव लिहिलेले नाही. ते असंख्य धोक्यांना आमंत्रण ठरेल. मी तीस वर्षांची असून माझ्या कुटुंबीयासमवेत काबूलपासून काही अंतरावर तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये राहते. माझे वडील दूतावासात काम करायचे. आई इंग्रजीची शिक्षिका होती. मला पुश्तु, दारी व इंग्रजी भाषा येतात.
तुझे पती उदार आहेत. तुला छोटा मुलगा असूनही तू पत्रकारितेसाठी जगभर फिरतेस हे मला मैत्रिणीकडून समजले. तुझे आयुष्य माझ्यासाठी अगदी स्वप्नवत आहे. काय गंमत आहे. आपण दोघी एकाच जगात राहत असलो तरी आपल्यामध्ये पाचशे वर्षांचे अंतर आहे. आम्ही आता बुरख्यात आहोत. मातीमध्ये सर्रकन दडून बसणाऱ्या क्षुद्र कृमि-कीटकासारखे जगणे कंठायचे. पण ही स्थिती काही पूर्वापार चालत आलेली नाही. रशियन आक्रमण झाले तेव्हा मी शाळेत होते. महिला शिक्षिका, डॉक्टर होत्या. सरकारी कार्यालयात जायच्या. आम्ही सहली काढायचो. जीन पँटचा पेहराव सर्रास होता. मलाही आईसारखे विद्यापीठात शिकून शिक्षण-क्षेत्रात जायचे होते.
युद्धामध्ये बऱ्याच खेडेगावातील शाळा उद्ध्वस्त झाल्या. पण काबूलमध्ये आम्ही नशीबवान होतो. तालिबानी आल्यावर मुलींच्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि आमचे बाहेरचे जग बंद झाले. आता आम्हाला नखशिखांत बंद करणारा पोशाखच घालावा लागतो. उंच टाचेची चप्पल घालून माझ्या मैत्रिणी रस्तावर चालताना आवाज झाल्यामुळे त्यांना बदडून काढण्यात आले. तुम्हाला वाटत असेल आम्ही काहीच करू शकत नाही. पण मी व माझ्या मैत्रिणी अफगाणी महिलांना शिकवतो. आम्ही महिला हक्क समितीमार्फत पाव, नान तयार करतो. गरजूंमध्ये त्यांचे वाटप करतो. तशा ह्या क्षुल्लक बाबी. आम्ही फार काही करूही शकत नाही. चिमुकले बंडखोर म्हणा हवे तर.
मला दोन भाऊ व दोन बहिणी आहेत. दोघे भाऊ कामाला जातात. आम्हाला सदानकदा घरात बसून राहावे लागते. घरात बसून इंग्रजी शिकावे, शेजाऱ्यांना शिकवावे म्हटले तर इंग्रजीवर बंदी. रात्री वीज नसते. चित्र काढता येत नाही. संगीत ऐकता येत नाही. इथले आयुष्य भयंकर आहे. आता इतक्या काळानंतर तरी जगाचे लक्ष अफगाणिस्थानाकडे वळले हे एक बरे लक्षण आहे. सुधारलेल्या आणि सुसंस्कृत देशांना आमच्या हाल-अपेष्टांची खबरच नव्हती. अमेरिकेवरील हल्ल्यांनंतर आम्ही सदैव बीबीसीवर असतो.
शिकलेल्या अफगाणी मुलींची अवस्था तर बिकट आहे. आम्ही बाजारात खरेदीसाठी जातो तेव्हा तालिबानी विशेषतः पाकिस्तानातील तालिबानी आमची यथेच्छ नालस्ती करतात. “शरम नाही वाटत, तुम्ही काबुली मुली अजूनही रस्त्यावर येता?’ ही भाषा खूप सभ्य झाली. गलिच्छपणाचा कळस आमच्या वाट्याला येतो. अफगाणिस्थान आमची मातृभूमी असूनही पाकिस्तानी तालिबानी इथे येऊन आम्हाला अशी वागणूक देतात. माझे लग्न का झाले नाही असा प्र न तुला पडेल. या अशा भीषण परिस्थितीत प्रेम तरी कसे होणार? आम्हाला अतिशय उबग आला आहे. आरशात पाहते तेव्हा युद्धापूर्वीचा काळ अजिबात न आठवणारा चेहरा आरशात दिसतो. भयाने सदासर्वदा ग्रासलेल्या शहरात मला मूल जन्माला घालण्याची यत्किंचित इच्छा नाही. किती तरी कुटुंबे अफगाणिस्थान सोडून गेली आहेत. आम्ही अजूनही बदलाची प्रार्थना करत आहोत. आम्ही काबुली अतिशय टणक आहोत. बाजारात तेल नाही. अन्न मिळते. ते संपले तरी काही दिवस पुरेल एवढा साठा आम्ही केलाय.
तालिबान म्हणतात, हे अफगाणिस्थान विरोधी युद्ध आहे. आमचे काही मित्र म्हणतात. बाहेरच्यांविरुद्ध लढताना तालिबान्यांना पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे. पण आम्हालाच बंदिवासात ढकलणाऱ्यांना पाठिंबा कसा देणार? आम्ही लपूनछपून बीबीसी ऐकतो. बुश आणि ब्लेअर यांची उक्ती आणि कृती यात तफावत राहू नये ही आशा लावून बसतो. आमच्यावरच बाँब पडणार नाही हे सतत मनाला पटवत राहतो. यापुढे सीएनएनवरील बाँबहल्ले पाहशील. तेव्हा कदाचित तुला बंदुका आणि दाढी-धाऱ्यांना पाहून विटलेली आणि कधी तरी नृत्यही करता येईल असे स्वप्न पहाणाऱ्या माझ्यासारख्या मुलीची आठवण येईल. आता लिहीत बसले तर सगळे कागद भस्न जातील. डोळे भरून वहात राहतील. गेल्या सात वर्षांत मी कुणालाही पत्र लिहिले नाही. कुणी आमच्या अवस्थे-बद्दल विचारपूसही केली नाही.
मनातच मी तू कशी असशील याचे चित्र रंगवते. तुझे घर, तुझ्या परिवारा-संबंधी कल्पना करते. तुला पोहायला, गाडी चालवायला येते का? एक दिवस मी तुला आमच्या देशातील सुरेख डोंगरदऱ्यातील धबधब्यांनी नटलेले नयनमनोहर दृश्य दाखवेन. हे खरेच मला कधीतरी जमेल? का दोन विश्वातील अंतर कायम तेवढेच राहील?
असोमा ‘चंद्रमौळी’ सरस्वती नगर, लातूर — ४१३ ५३१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.