गॉड इज डेड

गॉड इज डेड असे कुणीतरी हट्टी तत्त्ववादी मागेच सांगून गेला म्हणे. असेलही कदाचित हे सपशेल खरे किंवा धादान्त खोटेही अथवा अर्धे खरे अर्धे खोटे. पण ज्या काळी तू खऱ्या अर्थाने जिवंत होतास तेव्हा तरी काय दिवे लावलेस? सोळा सहस्र गवळणींसह नाचलास आपल्या बायकोसह वनात
चालता झालास रोजच घडणारे आम रस्त्यावरचे इन-मिन-तीन सीन बघून सारा संसार असार म्हणत महाशून्यात पसार झालास किंवा सर्वांगावर खिळे ठोकून घेत शेवटी आपलीच मान खाली घातलीस वा स्वतःचाच देह चरकात पिळून घेत त्याचे सताड चिपाड केलेस: आणि ज्या क्षणी हा तुझा पवित्र-पीडित अन्तरात्मा चाबुकराणीचा रोग लागलेल्या उसागत शेंड्यावर निमूळ होत होत दिवंगत झाला तेव्हा तुझ्या ह्या ग्यानी अनुगामी भक्तांनी तुलाच आकाशात व पाताळात समुद्रात नी पहाडात ढकलून दिले (आगामी सिसिफसच्या गड चढणीसाठी) इतकेच नव्हे तर म्हातारी मेली उन्हाळ्यात नी रड आला पावसाळ्यात या म्हणीनुसार त्याच बिलंदर बुकींनी इहलोकाशी विचित्र फिक्सिंग करून तुझ्या अज्ञात व अदृष्ट गढी-मढी वर मोठमोठाली देवळे — रावळे पुतळे व मकबरे उभारलेत, कला आणि साहित्य याचे उदंड पीक अशाच मूठ मातीतून तरारलेत असे नंतरचे शोधकर्ते सांगतात: आणि आजकाल तर सारा आनंदी आनंदच परमेश्वरा! तू जिवंत राहिलास काय किंवा मेलास काय याचे कुणालाही सोयर-सुतक वा विटाळ पाटाळ नाही अहिंसा व सत्य ही तुझी भाकड बैलजोडी आपलय अहिंसेतील “अ” चे शिंग मोडून त्याला सत्याच्या गुडघ्यावर बाशिंगा सारखे चढवून आता ती सरळ घुटका खात खात थेट कत्तलखान्यात डेरे दाखल झाली आहे अभिनव गीतापाठ शिकवीत आहे; तसेच वेदान्ताच्या तत्पुरुष समासाचा वेदाचा अन्त (निकाल) असा विग्रह करीत एक नवे कात्यायन घडवीत आहे, कारखान्यांच्या सांडपाण्यातून रक्ताचे पाणी वाहत आहे व पाण्यात आग. एकूण जिकडे तिकडे चोहिकडे धूळ व धूर यांचा नवा नेबुला अंतराळात चक्क तरळत आहे; कवीच्या महाकाव्यातील लाडका फिनिक्स उड्डाण-पुलाखाली जमलेल्या राखेच्या ढिगाऱ्यात हायतोबा करीत जिहाद पुकारतोय हाय रब्बा हाय हसीना हाय मसीना मेरा खुदा मर चुका है आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली जागोजाग पोस्टर्स लागले आहे गॉड इज डेड — — गॉड इज डेड ड्रिंक नेट वाईन बी डिव्हाईन . . .
८१, शंकर नगर, नागपूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.