फलज्योतिष विज्ञान का नाही?

[विद्यापीठ अनुदान आयोगाने (विअआने) वैदिक फलज्योतिष हा विभाग सुरू करण्यासंबंधीचे निवेदन’ एका परिपत्रकातून केल्यानंतरच्या चर्चेची एक महत्त्वाची कडी म्हणून मराठी विज्ञान परिषदेने (मविपने) ‘फलज्योतिष विज्ञान आहे का?’ यावर एक विशेषांक काढला (नव्हेंबर २००१). सात ‘ज्योतिर्विदां’नी मते मांडल्यावर त्यांच्या युक्तिवादाचा वैज्ञानिक वृत्तीच्या समर्थकांकडून प्रतिवाद केला गेला. हा पूर्णच अंक वाचनीय आहे, पण त्यातील जयंत नारळीकरांच्या लेखातील ‘फलज्योतिष हे विज्ञान का नाही?’ हे प्रकरण कळीचे आहे. ते मविपच्या सौजन्याने पुनर्मुद्रित करत आहोत.]

विअआने हा अभ्यासक्रम सुरू करायचे म्हटल्यावर भारतातील वैज्ञानिकांनी विरोधाची एक आघाडी उघडली आहे, ती फलज्योतिष वैदिक आहे की नाही या संबंधी नसून तिला विअआ विज्ञानाचे रंगरूप देऊ इच्छितो यासाठी आहे. फलज्योतिषाला शास्त्र अथवा विज्ञान म्हणू नये या विधानाच्या विरोधात फलज्योतिषाचे पाठीराखे काय म्हणतात ते पाहू.

(अ) वैज्ञानिक पाहणीतून ग्रहांची जी स्थिती मिळते तिचाच उपयोग फल-ज्योतिषात आणि खगोलशास्त्रात केलेला असतो. मग जर खगोलशास्त्र हे विज्ञान मानले जाते तर फलज्योतिष हे विज्ञान का मानले जात नाही?
(ब) अमुक फलज्योतिषाचे भाकीत आपल्या बाबतीत खरे ठरले असे काही लोक ठासून सांगतात. मग भाकिते जर अशी खरी ठरत असतील तर त्याला विज्ञान का म्हणू नये?
(क) हवामानशास्त्र आणि वैद्यकशास्त्राचेच पहा. हवामानाचे अंदाज कित्येक वेळा चुकतात, वैद्यकातील निदानेही खूप वेळा चुकतात, एवढेच नव्हे तर दोन डॉक्टरांच्या निदानांतही फरक पडतो. असे असूनही या दोन शास्त्रांना तुम्ही विज्ञान म्हणता आणि फलज्योतिषाला मात्र दुय्यम वागणूक देता.
(ड) काही ज्योतिष्यांची भाकिते चुकतात कारण त्यांनी फलज्योतिषाचा चांगला अभ्यास केलेला नसतो. ज्योतिषात असे कुडमुडे लोक आहेत हे दुर्दैवी आहे. पण फलज्योतिष हा विषय मात्र पूर्णपणे वैज्ञानिक आहे.
(इ) वैज्ञानिक फार बेजबाबदार आहेत. त्यांनी फलज्योतिषाचा पूर्ण अभ्यास करण्यापूर्वी आणि कसोटी घेण्यापूर्वीच त्याला नाकारले आहे.
वरील आरोपांना उत्तरे देण्यापूर्वी एखाद्या विषयाला विज्ञानाचा दर्जा देण्या-साठी कोणकोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते हे पाहू या. उपपत्ती मांडणे (उ), प्रयोग करणे (प्र), त्यासाठी निरीक्षणे करणे (नि). या पद्धतीतून अनेक शतके विज्ञान उत्क्रांत होत आले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया चक्राकार आहे. एखाद्या गोलगोल जिन्या-सारखी. तिला शेवटच नाही. उ-प्र-नि-उ-प्र-नि या क्रमाने निसर्ग अधिक चांगला समजून घेणे आणि त्या दृष्टीने प्रगती करत जाणे हे विज्ञानाचे ध्येय होय. परंतु व्यवहारात या गोष्टी वाटतात तितक्या सरळ नसतात. वाटेत खूप अडथळे आणि वळणावळणाच्या वाटा असतात. विज्ञानाच्या इतिहासात खूप वाईट गोष्टीही आहेत. लबाड उपपत्ती, एखाद्याला फसवणारे प्रयोग, चुकीची निरीक्षणे वगैरे. परंतु तरीही अमुक गोष्टी चुकीच्या आहेत हे सिद्ध झाल्यावर वैज्ञानिक तसे मान्य करतात. सर्व समस्यांची उत्तरे विज्ञानातून मिळतील हेही ते कधी म्हणणार नाहीत. प्रगतीची शिडी आपण जसजशी चढत जातो तसतशा वाटेत नवनवीन समस्या येतच जातात हे त्यांना अनुभवातून ठाऊक झाले आहे. किंबहुना प्रगतीच्या वाटेत अडथळे निर्माण करणाऱ्या गोष्टी या समस्या आहेत, हेही अगोदर ओळखता येतेच असे नाही. त्यासाठी फार मोठी आकलनशक्ती लागते. मग ज्याला आपण विज्ञान म्हणतो त्याचे बल कशात आहे ? विज्ञानाचे बल त्याने घालून दिलेल्या शिस्तीच्या चौकटीतच आहे, कसे ते पहा.

एखाद्या वैज्ञानिक उपपत्तीने आपण कोणती गृहीतके मानली आहेत हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे आणि ती गृहीतके आजच्या माहितीशी सुसंगत असली पाहिजेत. गृहीतकांवर आधारित विधानांची एक अशी तार्किक चौकट उभारता आली पाहिजे की त्यामुळे कोणत्याही भाकिताची नीट तपासणी करता आली पाहिजे. उपपत्तीने मोघमपणा दाखवू नये आणि निष्कर्ष काढताना मूलतत्त्वात बदल करू नये. थोडक्यात म्हणजे गृहीतकातही अनोखेपणा असतो. जे काही निष्कर्ष काढायचे त्यांचीही तपासणी करता येते आणि त्या तपासणीसाठीही परत प्रयोग करणे, निरीक्षणे करणे हे सर्व आलेच. यात एक स्वयंरचित उद्देश आहे. ‘अ’ या शास्त्रज्ञाने प्रयोग करून त्यालाच फक्त त्याचे अपेक्षित निष्कर्ष मिळतील आणि ‘ब’ व ‘क’ शास्त्रज्ञांना ते मिळणार नाहीत असे काही नाही. प्रयोग आणि निरीक्षण अशा नियंत्रित पद्धतीने बेतावेत की त्याचे निष्कर्ष संख्याशास्त्राच्या आधारे वि लेषित करून सांगता येतील. इतक्या प्रकारची खबरदारी घेऊनही कोणतीही उपपत्ती अचूक आहे असा दावा करता येत नाही. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आईनस्टाईनने त्यांच्या सापेक्षता-वादाच्या सिद्धान्ताने सुधारला. पण यासाठी त्यांनी ढोरमेहनत घेतली. खूप प्रयोग केल्यानंतरच त्यांना हा दावा करता आला. हे असे असले तरीही सापेक्षतावादाचा सिद्धान्त हा गुरुत्वाकर्षणाबाबतचा अंतिम शब्द आहे असे शास्त्रीय जगात कोणीही मानत नाही. सापेक्षतावादाचा सिद्धान्त सुधारणाऱ्यांना आता पुंज गुरुत्वाकर्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आता फलज्योतिषाचा याच मुद्द्यांसंदर्भात विचार करू या..
(अ) खगोलशास्त्र वर वर्णन केलेली विज्ञानाची कडक शिस्त तंतोतंत आचरणात आणते. फलज्योतिषात असे होते का? फलज्योतिषासाठी अशा काही मूलभूत गोष्टी गृहीत धरतात का? मिळालेली माहिती पारखून पाहण्यासाठी काही नियम घातलेत का? नियम घातले म्हणजे त्यात वस्तुनिष्ठपणा येतो आणि विवक्षित ज्योतिष्यावर ते अवलंबून राहत नाही. जी भाकिते चुकली ती उपपत्तीच्या सिद्धतेतील चुकीने, हे मान्य झाले का? दुर्दैवाने या सर्व प्र नांची उत्तरे नकारार्थी मिळतात. फलज्योतिषाचे सर्व पाठीराखे आमची उपपत्ती, आमचे शास्त्र अचूक आहे असाच धोशा लावतात आणि जर भाकीत चुकले तर त्याचा अन्वयार्थ चुकीचा लावल्यामुळे, असे म्हणतात, शिवाय प्रत्येक ज्योतिष्याचा अन्वयार्थ वेगवेगळा. मग विद्यापीठात एखादा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी पाठ्यपुस्तके कशी बनवणार? किंवा सर्वांना एकच दृष्टिकोणही नसल्याने शिक्षक तरी कसे मिळवणार?
(ब) फलज्योतिष्यांनी कार्ल पॉपरचे नाव ऐकलंय का? समजा त्यांनी ते ऐकले असले तरी वैज्ञानिक उपपत्तीवरचे त्याचे म्हणणे ते दुर्लक्षून टाकतात. पॉपरचे म्हणणे असे आहे की, एखादी वैज्ञानिक उपपत्ती, एखाद्या भाकिताबाबत जरी चुकीची ठरली तरी ती त्याज्य ठरते. तिचा परत विचारसुद्धा करू नये. खरी ठरलेली भाकिते जरूर हवी आहेत पण एखादी उपपत्ती सिद्ध करायला तेवढीच पुरेशी नाहीत. तुम्ही एखाद्याला विचारले की क्ष या ज्योतिष्याने सांगितलेल्या भाकितातील किती भाकिते आजवर चुकली तर त्याचे उत्तरही त्यांच्याकडे नसते, कारण ही माणसे अशा गोष्टींच्या नोंदी ठेवत नाहीत.
(क) हवामानाचे अंदाज आणि वैद्यक-शास्त्रातील निदाने नेहमी अचूक ठरत नाहीत हे मान्य. परंतु ते विज्ञानप्रणालीचा अवलंब करतात.
हवामानाचा अंदाज करताना वातावरणाच्या विविध अवस्था आणि जमिनीवरील हवेची निरनिराळी स्थित्यंतरे यांच्यावर आधारित गुंतागुंतीचे गणित केले जाते. या शास्त्रातील कोडे आपल्याला आता हळूहळू उलगडू लागले आहे. मनुष्यनिर्मित उपग्रहही यासाठी मदत करीत आहे. हवामानशास्त्राला शास्त्र न म्हणणारे त्याचे विरोधकही आता या शास्त्राला मिळालेल्या आधुनिकतेच्या जोडीमुळे आणि निरीक्षणामुळे त्यातील अंदाज खऱ्याच्या अधिक जवळ येऊ लागल्याचे मानू लागले आहेत. वैद्यकशास्त्रही आपल्याला परिपूर्ण मानत नाही. परंतु जीवशास्त्र आणि जीवतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मानवी शरीराची ओळख आपल्याला अधिक प्रमाणात होऊ लागली आहे. निदान आणि त्या आधारे केलेले उपाय यात सुधारणा झाली आहे. जेव्हा जेव्हा एखादे नवे औषध बाजारात येते तत्पूर्वी खूप वर्षे त्याची तपासणी तज्ज्ञांच्या नजरेखाली झालेली असते. विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून फलज्योतिषाने अशासारखी काही प्रगती केली आहे का?
(ड) या मुद्द्याचा विचार आपण अगोदरच केला आहे. दरवेळी फल-ज्योतिष्याने आपली भाकिते सुधारत नेली असतील तर त्याला शास्त्र म्हणायला मुळीच विरोध नाही. परंतु चुकीचे भाकीत सांगणारा हा कुडमुडा ज्योतिषी आहे असे म्हणून चालणारही नाही आणि सुटकाही होणार नाही. कारण मग कुडमुड्याशिवाय या व्यवसायात आणखी कोणी आहे असे दिसणारही नाही. ज्योतिषी जसा इतरांना सल्ला देतात तसे आपल्या विषयाच्या प्रगतीसाठी प्रत्यक्ष काही करून पाहायची वेळ या व्यवसायावर अजून आली नाही का?
(इ) शास्त्रज्ञांनी ज्योतिष्यांची भाकिते खूप बारकाईने तपासून पाहिली आहेत आणि जो जो बारकाईने तपासणी करावी तो तो अधिक चुका सापडत आहेत. शास्त्रज्ञांनी हे सर्व सप्रमाण लिहून प्रसिद्धही केले. म्हणून शास्त्रज्ञ ज्योतिष्यांच्या कामाचा अभ्यास न करताच त्यांच्यावर बेजबाबदारपणे टीका करत आहेत हे म्हणणे चुकीचे आहे. मिशिगन स्टेट विद्यापीठातील मनोविकारतज्ज्ञ बर्नी सिल्व्हरमन यांनी केलेला अभ्यास आपण उदाहरणादाखल पाहू. जोडप्यांच्या कुंडल्या जुळल्या तर त्यांची लग्ने यशस्वी होतात का यावर त्यांनी अभ्यास केला. २९७८ जोडप्यांचे संसार यशस्वी झाले आणि ४७८ लोकांनी घटस्फोट घेतले. या सर्वांच्या कुंडल्या दोन प्रसिद्ध ज्योतिष्यांना दिल्या होत्या. (पण त्या कोणाच्या आहेत हे त्यांना सांगितले नव्हते.) त्या ज्योतिष्यांनी कुंडल्या पाहून अमूक लग्ने यशस्वी ठरावीत तर अमुक अयशस्वी असे निदान केले. त्यांची भाकिते प्रत्यक्ष परिस्थितीबरहुकूम नव्हती असे दिसून आले. संख्याशास्त्राच्या पद्धतीने पडताळून पाहिल्यावर हे सर्व निष्कर्ष काढले होते.

१९७५ साली १८६ नामवंत शास्त्रज्ञांनी फलज्योतिषाविरुद्ध एक पत्रक प्रसिद्ध केले. त्यात १८ नोबेल पारितोषिक विजेते होते. त्यांनी फलज्योतिष अवैज्ञानिक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या प्रसिद्धिपत्रकातील महत्त्वाचा भाग खालीलप्रमाणे आहे —- “आम्ही या पत्रकावर सह्या केलेले खगोलशास्त्रज्ञ, खगोलभौतिकी शास्त्रज्ञ आणि इतर अनेक क्षेत्रातील शास्त्रज्ञ, फलज्योतिष्यांनी खाजगी वा जाहीररित्या व्यक्त केलेल्या भाकितांबद्दल जनतेला सावध करू इच्छितो. फलज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की फलज्योतिष्यांच्या भाकितांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी बऱ्याच जणांना फलज्योतिष्यांच्या सल्ल्याची गरज भासते. त्यांच्या नियंत्रणांत नसलेल्या आकाशस्थ ग्रहांच्या बलामुळे आपले प्राक्तन पूर्वनियोजित असते, असा त्यांचा विश्वास असतो. आम्ही शास्त्रज्ञ आपणा सर्वांना सांगू इच्छितो की जीवनात घडणाऱ्या गोष्टींना स्वतःच तोंड द्यायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे. आपले भवितव्य आपल्याच हातात असते. ते कोणा ग्रहताऱ्यांच्या हातांत नसते.” (द ह्यूमनिस्ट, सप्टेंबर | ऑक्टोबर १९७५) (परिशिष्ट पान क्र. ९३ पहा)

[या अंकातील काही घोर अवैज्ञानिक भागांबद्दल नेरळचे राजीव जोशी लिहितात —- डॉ. राजीव जोशी, ‘तत्त्वबोध’, नेरळ (जि. रायगड) ४१० १०१
‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’, नोव्हेंबर २००१ अंकात ‘फलज्योतिष्या’ची उद्बोधक चर्चा आहे. माजी अध्यक्षांच्या चर्चेत “जाहिराती घेताना म.वि.प.ने विचार करूनच त्या घ्यायला पाहिजेत’ असे प्रा. डॉ. जयंत नारळीकर यांनी नमूद केलेले आहे. तथापि त्याच अंकात ‘फलज्योतिष्य-वास्तुशास्त्र’ इत्यादिविषयक जाहिराती आहेत!

‘फलज्योतिष्या’विषयी ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मतास टाकून निर्णय घ्यावा, असे श्री. म. ना. गोगटे यांनी सुचविले आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती जयललिता यांचेवर झालेल्या खटल्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. “घटनेतील तरतुदींना जनादेश हा दुय्यम आहे.” विज्ञानाच्या प्रसाराचे ध्येय असलेल्या म.वि.प.ची वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्याही अ-वैज्ञानिक माहितीच्या प्रसाराबाबत आदेश देऊ शकत नाही. चॅरिटी कमिशनर आणि त्यांचे-वरील अधिकारी न्यायसंस्थेत हस्तक्षेप करू शकतात, डॉ. नारळीकर यांनी राजीनामा देण्याचा प्र न उद्भवत नाही, हे कृपया नमूद केले जावे.

‘वास्तुशास्त्रा’ची निरर्थकता श्री. गोगटे यांना पटते. वास्तु शास्त्र’, फल-ज्योतिष्य, मूर्तीने दूध पिणे इ. सर्वच धार्मिक भावना/अंधश्रद्धा याबाबत उच्चशिक्षितांच्या-सुद्धा भावना तीव्र झाल्या आहेत. आर्थिक-सामाजिक परिस्थितीचा विशेषतः मुक्त (मोकाट) अर्थव्यवस्थेचा यात भाग किती? याबाबत म.वि.प. ला प्रत्यक्ष कार्यक्रम घेता आला नाही, तरी या अंगाची जाण म.वि.प.च्या उपक्रमात स्पष्टपणे दिसावी आणि निदान क्रियाशील कार्यकर्त्यांना तरी ही जाण आग्रहाने करून दिली जावी. हे मला पूर्णपणे पटते.
—- संपादक
Inter-University Centre for Astronomy and Astrophysics Post Bag 4, Ganeshkhind, Pune – 411 007

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.