विक्रम, वेताळ आणि आधुनिक शेख महंमद

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि आपली पावले त्याने स्मशानाच्या दिशेने वळवली. थोडे अंतर जाताच प्रेतातील वेताळ त्याला गोष्ट सांगू लागला. . . .
राजा, कोणे एके काळी केकय देशात सत्यवान नावाचा एक ब्राह्मण राहत होता. केकय देशाची परिस्थिती तशी वाईटच होती. अर्ध्याहून अधिक प्रजा अत्यंत दरिद्री होती. देशाची लोकसंख्या जशी भरमसाठ होती, तशीच तेथील बेकारी देखील. शेती सगळी पावसावर अवलंबून असलेली आणि लोक आळशी व अज्ञानी त्यामुळे इतर उद्योगधंदेही मरगळलेले.
सत्यवान देखील देशातल्या बहुसंख्य प्रजेप्रमाणे गरिबीतच आयुष्य कंठत होता. त्याचा मुलगा सोमदत्त आता मोठा झाला होता. परंतु अजूनही उद्योगाला लागला नव्हता. सत्यवानाने हरत-हेचे प्रयत्न करून पाहिले परंतु मुलाला उद्योगास लावणे त्याला जमले नाही. मुलगा देखील परिस्थितीमुळे मेटाकुटीस आला होता. आला दिवस मित्रांसोबत घालवायचा आणि केवळ जेवण्यानिजण्यापुरतेच घरी यायचे असा त्याचा क्रम होता. असेच दिवस जात असताना सोमदत्ताला एक दिवस त्याच्या एका मित्राकडून एका उद्योगाची माहिती मिळाली. हा उद्योग करायला अत्यंत सोपा, आपल्या फावल्या वेळात करण्याजोगा आणि भरपूर उत्पन्न देणारा आहे असे त्याला कळले. साहजिकच त्याच्या मनात उत्साह संचारला. मित्राच्या घरी जाऊन त्याने ह्या उद्योगा-विषयी आणखी माहिती घेतली आणि तो हरखूनच गेला.
एका परदेशी उद्योग-समूहाने ही संधी त्याच्या देशातल्या नागरिकांना उपलब्ध करून दिली होती. सुरवातीला केवळ पाच हजार रुपये त्याला गुंतवावे लागणार होते. त्यापैकी अर्धे पैसे त्याचे नाव वितरक म्हणून नोंदवण्यासाठी आणि उरलेले अर्धे पैसे हे ह्या समूहाची उत्पादने विकत घेण्यासाठी. अशा त-हेने वितरक झाल्यावर तो जितकी जास्त उत्पादने विकेल तितका जास्त नफा त्याला कमावता येणार होता. परंतु सर्वांत गमतीची बाब म्हणजे एकट्या माणसाला हा महागाचा माल जास्त खपवता येणार नाही ह्याची त्या समूहाला कल्पना होती. म्हणून हा समूह त्याला त्याच्याचसारखे आणखी वितरक नेमण्याचा अधिकारदेखील देणार होता. आणि त्याने नेमलेल्या सर्व वितरकांच्या नफ्यातील काही हिस्सा त्याला मिळणार होता. इतकेच नव्हे तर त्याने नेमलेले हे वितरक जोपर्यंत विक्री करत राहतील तोपर्यंत त्याला त्याचा हिस्सा मिळत राहणार होता. त्याच्या मृत्यूनंतरही तो ज्याला त्याचा वारस ठरवील त्यालादेखील. तो जे वितरक नोंदवील, तसेच त्याने ज्या मित्राकडून वितरकपद घेतले अशा सर्वांना हाच नियम लागू होता. त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर कोणालाच प्रत्यक्ष विक्री फारशी करावीच लागणार नव्हती. नवनवीन वितरक नेमून त्यांच्याकडून सुरुवातीचे भांडवल वसूल करणे आणि आपण नेमलेल्या वितरकांना आणखी वितरक नेमण्याच्या कामी मदत करून ही साखळी किंवा जाळे वाढवत नेणे असेच काहीसे कामाचे स्वरूप राहणार होते. सोमदत्ताच्या मित्राने त्याला ह्या व्यवसायाचा साधा हिशेब मांडून दाखवला. त्यानुसार सुरुवातीला केवळ सहा वितरक जरी सोमदत्ताने नेमले तरी पुढे त्या प्रत्येकाने आणखी प्रत्येकी सहा व ह्या छत्तीस जणांचे आणखी प्रत्येकी सहा असे २१६ वितरक वर्षभरात जमणार. ह्या सगळ्यांच्या प्राथमिक गुंतवणुकीवरच सोमदत्ताचा नफ्याचा हिस्सा लाखाच्यावर जाणार होता. त्यांनी जर आणखी उत्पादने विकली तर आणखी जास्त नफा आणि हे २१६ वितरक त्यांचे प्रत्येकी सहा वितरक नेमतील तेव्हा? सोमदत्तचे तर डोकेच चालेना. त्याने उधार उसनवार करून रु. ५०००/- जमवले आणि ते मित्राला देऊन तो त्या समूहाचा वितरक बनला. जास्तीत जास्त व्यक्तींना आपल्यामार्फत वितरक कसे बनवता येईल त्याचा तो आता प्रयत्न करू लागला आणि त्याचाच एक भाग म्हणून तो व त्याचा मित्र पैसे भरून एका शिकवणी-वर्गालाही जाऊ लागले. त्या शिकवणी-वर्गात ठिकठिकाणच्या यशस्वी वितरकांना पैसे देऊन बोलावले जात असे, आणि विद्यार्थ्यांना ते त्यांच्या यशोगाथा ऐकवत असत. सोमदत्ताला भेटलेल्या शेकड़ो वितरकांमध्ये एकही अयशस्वी वितरक त्याच्या नजरेस पडला नव्हता.
इतकी गोष्ट सांगून वेताळ थांबला आणि विक्रमादित्यास म्हणाला. राजा आता गोष्टीचा पुढचा भाग तुला सांगायचा आहे. सोमदत्ताच्या भविष्यात काय लिहून ठेवलेले होते? मिळालेल्या ह्या अपूर्व संधीचे तो सोने करू शकला असेल का? आपली पाचवीला पुजलेली गरिबी तो कायमची नष्ट करू शकला असेल का? माझ्या ह्या साऱ्या प्र नांची तुला योग्य उत्तरे द्यायची आहेत. अन्यथा परिणाम तू जाणतोसच. तुझ्या मस्तकाची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायावर लोळू लागतील.
वेताळाच्या प्र नांची उत्तरे देत राजा विक्रमादित्य म्हणाला, आधी तुझा पहिला प्र न पाहू. खरे तर माझ्या मते हा प्र नच चुकीचा आहे. भविष्य कोणीतरी आधी लिहून ठेवलेले असते ह्यावर माझा विश्वास नाही पण आता तू मला थेट तथाकथित ललाटलेख लिहिणाऱ्या सटीच्या पंक्तीत नेऊन बसवलेच आहेस, तेव्हा तू सांगितलेल्या जीवनपटावरून सोमदत्ताच्या भविष्याचा साधारण आलेख काढण्याचा प्रयत्न करतो. पण आधी सोमदत्ताचे वि लेषण करू,
तू केलेल्या सोमदत्ताच्या वर्णनावरून तो मनाने आळशी, स्वतःच्या डोक्याला फारसा ताण न देता दुसऱ्याच्या मताने काम करणारा, थोड्या श्रमात जास्त पैसा कमावण्याची इच्छा असलेला परंतु अंगचे फारसे काही विशेष कौशल्य नसलेला असा युवक दिसतो. त्यामुळे घेतलेले काम यशस्वी रीतीने पार पाडण्याची शक्यता कमीच, आता तुझ्या दुसऱ्या प्र नाचे उत्तर द्यायचे तर तू म्हणतोस तशी ही खरोखरच सुवर्णसंधी होती का हे तपासून बघावे लागेल. अर्थशास्त्राच्या साध्या नियमाप्रमाणे नफा हा आपण घेत असलेल्या धोक्याच्या प्रमाणात मिळत असतो. जितका जास्त धोका तितका जास्त नफा. दुसऱ्या नियमाप्रमाणे जितके भांडवल जास्त तितका नफा जास्त. वितरकांच्या जाळ्याद्वारे विक्री करणाऱ्या ह्या समूहाचा दावा मात्र ह्या दोन्ही मूलभूत नियमांच्या विपरीत केवळ रु. ५०००/- च्या भांडवलावर वितरकांना रु. ५०,०००/- महिना मिळवण्याची आशा दाखवतो, आणि तेही केवळ फावल्या वेळात काम करून. आता दुसऱ्या बाजूने विचार करू इतकी कमाई करण्यासाठी प्रत्येक वितरकाच्या मार्फत सहा सहा असे निदान २१६ वितरकांचे जाळे सोमदत्ताला वाढवायचे होते. पण इतके जाळे तो खरंच वाढवू शकणार होता का? त्याने स्वतः केवळ सहा वितरक जरी नेमले तरी त्या सहांना प्रत्येकी आणखी सहा ह्या प्रमाणे हे जाळे वाढत जाणार होते. केकय देशाची लोकसंख्या समजा एक कोटी धरली आणि ५ व्यक्तींचे एक कुटुंब धरले तर २० लाख लोक वितरक होण्यासारखे होते (त्यातही ५०% दारिद्र्यरेषेखालील).
प्रत्येकी सहा ह्या Geometric-Progression ने विचार केल्यास केवळ ८ कड्यांमध्ये पूर्ण २० लाख लोक संपतात. ह्या २० लाखांपैकी १६ लाख लोक शेवटच्या म्हणजे आठव्या कडीत असणार. ह्या सर्वांना पुढे आणखी वितरक नेमणे शक्यच होणार नाही. त्यांची गुंतवणूक वाया जाणार. नव्हे ती आधीच्या सात कड्यांच्या पोटात गेलेली असणार. म्हणजे ८०% वितरक हे फसवले जाणार. सातव्या कडीतल्या ३ लाख लोकांचीही गुंतवणूक जेमतेम परत निघणार. ह्यात अर्थातच त्यांनी घालवलेल्या त्यांच्या वेळाची किंमत धरलेली नाही; तसेच शिकवणी वर्गाची फी देखील धरलेली नाही. ह्याचा अर्थ आठव्या कडीतले १६ लाख गुंतवणूक गमावलेले आणि सातव्या कडीतले केवळ गुंतवणूक जेमतेम परत मिळालेले असे १९ लाख लोक ह्या जाळीदार विक्रीच्याच जाळ्यात फसणार. केवळ १ लाख लोक ह्यातून थोडीफार कमाई करणार आणि तीदेखील पुढच्या १९ लाखांना फसवून. परंतु त्यांची कमाईसुद्धा ८ कड्या पूर्ण होईपर्यंतच होणार. त्यानंतर सर्वच ग्राहक वितरक झालेले असणार. मग कोण कोणाला काय विकणार? स्वतःला लागणारी ह्या समूहाची उत्पादने मग अवाच्या सवा किंमतीला विकत घेऊन त्यावर मिळणाऱ्या कमिशनमध्येच त्यांना समाधान मानावे लागणार. सापाने भूक लागल्यावर स्वतःची शेपटी गिळून भूक भागवावी तसा काहीसा प्रकार ह्यांच्या बाबतीत होणार परंतु मजेदार गोष्ट अशी की मास्तीच्या बेंबीत बोट घालून विंचू चावला तरी थंड लागते असेच ह्या सर्वांना म्हणावे लागणार होते. ह्या संदर्भात एक उदाहरण आठवते,
एका गावात एक मित्रमंडळ होते. त्यातील एकाकडे एक घोडा होता. तो तरुण ह्या घोड्याची नेहमी खूप स्तुती करत असे. ही स्तुती ऐकून त्याच्या एका मित्राने तो घोडा त्याजपासून विकत घेतला. पण घोडा विकत घेतल्यावर त्याचा पूर्वीचा मालक सांगत असे तो एकही गुण घोड्यात नाही हे त्याच्या लक्षात आले. दुसऱ्याच दिवशी जेव्हा सर्व मित्र जमले तेव्हा तो त्याच्या पूर्वीच्या मालकाशी जोरजोरात भांडू लागला आणि आपण घेतलेला घोडा कसा नालायक आहे हे सांगू लागला. तेव्हा घोड्याच्या जुन्या मालकाने त्याला शांत करत म्हटले, मित्रा तू म्हणतोस ते सगळे मला मान्य आहे. पण तू जर इथे जोरजोरात तुझ्या घोड्याचे दुर्गुण सांगू लागलास तर तुला मात्र त्याला पुढे कोणालाच विकता यायचे नाही. त्यापेक्षा मी करत होतो तशी घोड्याची स्तुती करत रहा आणि आपल्यापैकी कोणा तिसऱ्या मूर्ख मित्राला घोडा विकून मोकळा हो कसा,
तेव्हा तू ज्याला अपूर्व संधी म्हणतोस ते प्रत्यक्षात गळाला लावलेले आमिष होते. परंतु सोमदत्ताच्या मनातील हाव आणि आळस ह्यांनी त्याच्या विवेकबुद्धीचा केव्हाच शिरच्छेद केला होता. त्यामुळे त्याने हे आमिष सुवर्णसंधी समजून गिळले. आणि गरिबी दूर होणे तर दूर, उलट तिला आपल्या जीवनात अढळपदच दिले. राजाचा अशा त-हेने मौनभंग होताच वेताळ प्रेतासह अदृश्य झाला व झाडाला जाऊन लोंबकळू लागला.
मोहनी भवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

अभिप्राय 1

  • मस्त जबरदस्त भरत! मोदीकेयर, ॲमवे या संस्थांचे मूळ सामर्थ्य लोकांच्या अतिलोभात असते हेच खरे. रिसाॅर्टवाले पण या कॅटँगरीत येवू शकतील.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.