संपादकीय एका माणसाला किती जमीन लागते?

वीसेक लक्ष वर्षांपूर्वी आजच्या माणसांसारखी माणसे (होमो सेपियन्स) आफ्रिकेत उपजली. फळेमुळे गोळा करून, छोट्यामोठ्या शिकारी करून या माणसांचा उदरनिर्वाह चालत असे. फळझाडे कोठे उगवतात, प्राण्यांची दिनचर्या काय असते, लाकडांना टोकदार करायला दगडांपासून पाती कशी बनवावी, अशा विषयांचे ज्ञान या माणसांना होते. हे सारे त्यांच्या जीवनशैलीसाठी गरजेचे असे तंत्रज्ञान होते. या जीवनशैलीला आज ‘सावड-शिकार’ किंवा ‘संकलन शिकार’ (hunting-gathering) जीवनशैली म्हणतात. तिच्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानालाही आपण शिकार सावड तंत्रज्ञान म्हणू शकतो.
माणसे उपजली तो काळ खूप थंडीचा होता, ‘हिमयुग’ असे नाव असलेला. माणसे मुख्यतः उष्णकटिबंधातच राहत. कधी, काही काळासाठी हिमयुग सौम्य होई, आणि माणसे उत्तरेकडे युरोप आणि आशिया खंडात पसरत. शिकार-सावड जीवन भटकेच असावे लागते. नवी जंगले, प्राण्यांचे नवे कळप, असे अन्नाचे साठे शोधायला फिरावेच लागते. या भटकंतीतून अखेर माणसे आफ्रिकेतून इतर जगात पसरली आहेत.
पासष्ट ते पन्नास हजार वर्षांपूर्वी ‘ऑस्ट्रिक’ (Austric) भाषा बोलणारे माणसांचे समूह आफ्रिकेतून मध्यपूर्व, चीन, अशा वाटेने भारतात आले. भारतातली पहिली माणसे अशी ईशान्येकडून आली. या माणसांनी वस्तू आणि क्रिया यांसाठी आवाजाची ‘प्रतीके’ (म्हणजे ‘शब्द’!) वापरणारी भाषा घडवली होती. जगण्याचे तंत्रज्ञान मात्र शिकार सावडीचेच होते.
दहाएक हजार वर्षांपूर्वी हिमयुग संपले. ध्रुवप्रदेश आणि उंच पर्वतशिखरां-वरच बर्फ उरले, आणि बाकी जग माणसांच्या जगण्या-तगण्याला लायक झाले. माणसांची संख्याही वाढू लागली आणि नवनवे प्रदेशही ‘माणसाळले’. द्राविडी भाषा बोलणारा माणसांचा एक समूह या काळात भारतात आला. यावेळी भारताच्या वायव्य कोपऱ्यातून ही नवी माणसे आत आली. यांची जगायची पद्धत मात्र शिकार-सावडीची नव्हती. त्यांना पशुपालन करता येऊ लागले होते. त्यांना थोडीफार धान्यांचीही जाण होती. असे समजतात की भारतात गहू आला तो या लोकांसोबत. यांचे जगण्याचे तंत्रज्ञानही वेगळे होते. पशुंना माणसाळवणे, त्यांची प्रजा सांभाळणे आणि वाढवणे, त्यांना योग्य अन्न मिळेल अशा त-हेने कुरणे शोधत भटकणे, हे सारे या जीवनशैलीचे तंत्रज्ञान होते.
साडेसहा-सात हजार वर्षांपूर्वी चिनी-तिबेटी वळणाची भाषा बोलणारी माणसे पुन्हा एकदा ईशान्येकडून भारतात आली. हेही प्रामुख्याने पशुपालन करणारे आणि त्याला पूरक शेतीची जाण असलेले लोक होते. तांदूळ आणि म्हशी यांना या लोकांनी भारतात आणले. तंत्रज्ञानाचा प्रकार तोच राहिला, पण तपशिलात भर पडली. आणि साडेतीन ते सहा हजार वर्षांपूर्वी ‘इंडो-यूरोपीय’ भाषा बोलणारी माणसे पुन्हा एकदा वायव्येकडून भारतात आली. यांचे वाहन होते घोडा. पशुंना माणसाळवण्यातला आणखी एक टप्पा पार पडला होता. सोबतच हे लोक लोखंड हा धातूही सोबत घेऊन आले होते. यांच्या आगमनापर्यंत भारतातली माणसे काही जागी तरी पशुपालन तंत्रज्ञानाकडून शेतीपर्यंत पोचली होती. शिकार-सावड आणि पशुपालन या दोन्ही भटक्या जीवनशैली आहेत. शेतीसाठी मात्र एका जागी रुजावे लागते. खेडी, गावे, नगरे वसवावी लागतात.
वरील सारे वर्णन नागपुरातील मानववंशशास्त्राच्या संग्रहालयात प्रदर्शित आहे. अनेक इतिहास आणि समाजशास्त्राच्या ग्रंथांमध्येही हे वर्णन सापडते. हा घटनाक्रम सर्वमान्य नसला तरी बहुमान्य आहे. शिकार-सावड, पशुपालन, शेती अशा तीन जीवनशैलींची माणसे एकाच भू-प्रदेशात जगत असली की त्यांच्यात संघर्ष होतोच. शिकार-सावड करणाऱ्यांना जंगले हवी असतात. वनस्पती, प्राणी यांच्यात विविधता हवी असते. गुराख्यांना आणि शेतकऱ्यांना जंगले तर नको असतातच, पण जंगले नसलेल्या जमिनींच्या वापराबद्दलही या दोघांचे मतभेद असतात. आणि शेतीच्या तंत्रज्ञानातही तपशिलांचे फरक अनेक तंत्रांचा एक इंद्रधनुष्या-सारखा पट दाखवतात. ‘रामभरोसे’ कोरडवाहू शेती, विहिरीच्या किंवा कालव्यांच्या पाण्यावरची कमीजास्त व्यापक क्षेत्रातील शेती, बराच विचार करून नैसर्गिक-जैविक खते आणि कीटकनाशके वापरणारी सेंद्रिय शेती, यंत्र-उद्योग आणि रसायन-उद्योगांच्या आधाराने उभी राहणारी शेती, नियंत्रित पर्यावरणाची ‘हॉट-हाऊस’ शेती, जीन-बदल कस्न घडवलेली पिके वापरणारी शेती—-अनेक पातळीची तंत्रज्ञाने एका शेतीत आढळतात.
अशा वेगवेगळ्या जीवनशैलींचे आणि तंत्रज्ञानांचे संघर्ष नवीन नाहीत. काही उदाहरणे पाहा –
वेदांमध्ये ‘बांधलेल्या’ नद्यांना ‘मुक्त’ केल्याची वर्णने आहेत. नद्या ‘बांधणारी’ शेती आणि फुगलेल्या नद्या न आवडणारे गुराखी यांच्यातला हा संघर्ष. महाभारतात कृष्ण आणि अर्जुन यांनी खांडववन त्यातल्या सर्व ‘नागां’ सह जाळल्याची घटना आहे (त्यातला एक नाग सुटला आणि त्याने परीक्षिताचा बळी घेतला). काही इतिहासकार (दामोदर कोसंबी) ‘नाग’ म्हणजे नागाला दैवत म्हणून, टोटम म्हणून पुजणारे शिकार-सावड वृत्तीचे लोक असा अर्थ लावतात. गुराखी (पण ‘गिरिधर नागर’!) कृष्ण आणि शेतकऱ्यांवर राज्य करणारा कुरुवंश यांनी जंगले जाळून जमीन गुरचराई व शेतीसाठी मोकळी केली. शिकार-सावड करणाऱ्या रेड इंडियन्सना मारण्यासाठी शेती करू इच्छिणारे यूरोपीय वसाहतकार बक्षिसे देत. शेती आणि ‘नागरी’ पाणी, ऊर्जा आणि पूर-नियंत्रण अशांसाठी धरण योजना आखणारे आणि ‘राबवणारे’ हे शिकार-सावड आणि ‘भरड’ शेती करणाऱ्यांना अत्यंत अनिच्छेने आणि अपुऱ्या प्रमाणात मोबदले आणि पर्यायी जमिनी देऊन बेघर करतात, ही तर आजची कहाणी. दुष्काळ-उन्हाळ्याने भटकू लागलेले कच्छ–सौराष्ट्रातील चरवाहे आजही शेतकऱ्यांशी भांडतात, तेही दूर वहाड–मराठवाड्यात येऊन.
या साऱ्या संघर्षांचे कारण काय? जो माझी जीवनशैली आणि माझे तंत्रज्ञान न वापरता जगतो तो माझा शत्रूच का ठरावा? एक उत्तर सुचते की यात लोकसंख्येचा प्र न आहे. असे का वाटते ते आपण तपासू, पण हे कोणत्याही अर्थी संपूर्ण किंवा अंतिम उत्तर नव्हे. पुढे चर्चा व्हावी म्हणून हे फक्त ‘सुरवात करणे’ आहे. ‘एका माणसाला किती जमीन लागते?’, या ‘अभिजात’ प्र नाचे उत्तर टॉल्स्टॉयने एका नीतिकथेतून दिले —- सहा फूट लांब, तीन फूट रुंद अशी दफनापुरती जमीनच काय ती ‘अखेर’ माणसाला लागते. ह्या उत्तरात जगण्याचे तंत्रज्ञान नाही, तर मरणोत्तर विल्हेवाटीचे तंत्रज्ञान आहे. दफनाऐवजी दहन केले आणि ती राख वाहवून, पसरवून टाकली तर माणसाला जमीनच लागत नाही. म्हणजे प्रत्येक तंत्रज्ञानासोबत माणसांची जमिनीची गरज बदलते. पण आपल्याला जगणाऱ्या माणसांमध्ये रस आहे, प्रेतांमध्ये नाही. जगण्याला आवश्यक जमिनीची प्रमाणेही तंत्रज्ञानाप्रमाणे बदलत असणारच. अशी दोन प्रमाणे मला सापडली. इतर काही प्रमाणे कोणाला सापडली तर ती जाणून घ्यायला आवडेल. रिचर्ड लीकी हा ज्येष्ठ पुरामानववंशशास्त्रज्ञ लिहितो,
“सावड-शिकार जीवनपद्धतीत माणसे जमिनीवर विरळपणे विखुरलेली असावी लागतात. सरासरीत दर माणसाला एक चौरस मैल (२५० हेक्टर) हे सामान्य माप आढळते. या लोकांना इतर माणसांची जवळीक नको असते असे नाही, पण वनस्पती आणि प्राण्यांपासून अन्न कमावण्याचे अर्थशास्त्राच मोठ्या क्षेत्राची गरज आवश्यक ठरवते.” (‘पीपल ऑफ द लेक’, अॅव्हन, १९७८)
दुसरा ‘आकडा’ येतो दहा गुंठ्यांचा प्रयोग या नावाने केल्या जाणाऱ्या विचारी सेंद्रिय शेतीतून. या प्रयोगांचा ढोबळ निष्कर्ष असा आहे की दहा गुंठे (एक-दशांश हेक्टर) जमिनीतून फक्त सेंद्रिय खते आणि कीटकनाशके वापरून एका कुटुंबापुरते अन्न पिकवता येते. सोबतच काही कापूस, गरजेपुरते सरपण आणि थोडेसे इमारती लाकूडही उपलब्ध करवता येते. पण या प्रयोगात शेतकऱ्याने आपल्या जमिनीची क्षमता व आपल्या भूभागाचे हवामान नीट जोखून, आपल्या अनुभवांची तपशिलात नोंद ठेवून, पिकांचे मिश्रण ठरवून ‘विचारी’ शेती करणे अपेक्षित आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आज स्वच्छ हवापाणी, आरोग्यसेवा, शिक्षण या गोष्टीही जीवनावश्यक मानल्या जातात. ढोबळमानाने असे म्हणता येईल की एक-दशांश हेक्टर शेतीवर एका कुटुंबाच्या नव्हे तर एका माणसाच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण करता येतात. (ही अतिशयोक्ती वाटल्यास साधार वेगळे प्रमाण कळवावे.) आता सर्वच जमीन काही शेतीखाली नसते. ढोबळमानाने ५०% ‘काळी’ (शेतीखालची), १५% ‘पांढरी’ (घरे-शहरे, रस्ते, वाळवंटी वा दलदलीची जमीन) आणि ३५% ‘हिरवी’ (जंगलांखालची) जमीन असल्यास भूप्रदेशाचा नीट आणि टिकाऊ वापर करता येतो. अर्धीच जमीन शेतीखाली ठेवायची असेल तर दहा गुंठे प्रयोगाप्रमाणे जगणाऱ्या दर माणसाला एक-पंचमांश हेक्टर जमीन आवश्यक असते.
शिकार-सावड करणाऱ्याला अडीचशे हेक्टर जमीन लागते, तर दहा-गुंठे तंत्रज्ञानाला फक्त एक-पंचमांश हेक्टर! हा फरक सव्वा हजार (१,२५०) पटींचा आहे.
आता आपण ह्याच मापांचे ‘निगेटिव्ह’सारखे रूप पाहू, भारताच्या संदर्भात. भारताचे क्षेत्रफळ सुमारे ३३ लक्ष चौरस किलोमीटर आहे, म्हणजे तेहेत्तीस कोटी हेक्टर (किंवा दर देवाला एक हेक्टर!) जर भारतीयांनी शिकार-सावड जीवनपद्धतीने राहायचे ठरवले तर जेमतेम सव्वा तेरा लक्ष माणसेच येथे जगू शकतील. आणि जर सर्वांनी दहा-गुंठे तंत्रज्ञान वापरले तर या जमिनीची क्षमता सुमारे एकशेपासष्ट कोटींना जाऊ शकेल. काही अंकांपूर्वी वसंत गोवारीकरांच्या लेखात भारतात दोनशेपन्नास कोटी माणसे जगू शकतील, असे तज्ज्ञांच्या हवाल्याने नोंदले होते. आपला दहा-गुंठे आकडा या ‘तज्ज्ञ-मता’शी समकक्ष (of the same order) आहे.
पण आज भारतातला शेतकरी दहा गुंठ्यांच्या विचारी पातळीला पोचलेला नाही. आपण आपले पोट भरुन, अंग झाकून, पण निवारे, आरोग्य, शिक्षण यात कमी पडत, असे जगतो आहोत. आणि लोकसंख्या एकशेपाच कोटींजवळ आहे. बहुधा आज आपली सरासरी जमीन-वापराची कार्यक्षमता दहा गुंठे प्रमाणाच्या अर्ध्याजवळ आहे किंवा ऐंशी-पंच्याऐंशी कोटींना नीटसपणे जगू देण्याइतकी आहे. असली आकडेवारी ‘खरे पाहता’ काय साधते, हा एक प्र न बरेचदा उपस्थित केला जातो. इतका ढोबळ (macroeconomic) विचार निरर्थक मानणारेही बरेच आहेत. पण एक मान्य व्हायला हरकत नसावी की नैसर्गिक साधनसंपत्ती आणि तंत्रज्ञानाची पातळी या दोघांच्या ‘एकत्रित मर्यादा’ किती आहेत आणि आपण त्यांच्यावर कितपत ताण देत आहोत याची जाण असली ढोबळ वि लेषणे चित्रवत् स्पष्टतेने दाखवत असतात.
शेतीची तंत्रे जास्त ‘शहाणी’ करणे, जंगलांचे क्षेत्र आणि गुणवत्ता सुधारणे, ही आपली प्राथमिकता असायला हवी, ही एक बाब तरी ढोबळ वि लेषण ठसवून दाखवते आहेच. धरणग्रस्त-प्रकल्पग्रस्तांचे प्र न, नागरी-ग्रामीण समाजांमधील तणाव, यांची कारणे स्पष्ट करण्यातही या चित्रांचा उपयोग होतो. हे निर्विवाद आहे.
शेतीचे आणि जंगलांचे व्यवस्थापन नीटपणे करायचे तर शेतकरी आणि वनरक्षक सुशिक्षित-प्रशिक्षित हवे. दहा गुंठे तंत्रज्ञानाला तर विचारी शेतकरी ही अत्यावश्यक बाब आहे. आणि सुशिक्षित-प्रशिक्षित माणसे घडवल्यावर ती आजच्या शेतकऱ्या-वनरक्षकांसारखी दारिद्र्यरेषेला ‘लटकून’ वरखाली हेलकावत राहायला तयार होणार नाहीत, हे नि िचत. ती कोणत्याही वैद्याच्या, अभियंत्याच्या, माहिती-तंत्रज्ञाच्या समकक्ष उत्पन्नाची मागणी करतील जी टाळता येणार नाही.
अनेक मध्यमवर्गीयांना ही आपत्ती वाटेल, पण जरा जरी खोलात विचार केला तर ती गरजच नव्हे तर ‘हवीहवीशी’ वाटणारी बाब आहे, हे लक्षात येईल. आर्थिक मंदीची एक ‘यंत्रणा’ सांगितली जाते की बहुसंख्य लोकांकडे उपलब्ध वस्तू व सेवा विकत घेण्याची क्षमताच नसते. त्यामुळे उत्पादने व सेवा खपत नाहीत. ती उत्पादने घडवणारे आणि सेवा पुरवणारे यांची खरेदी करण्याची क्षमता कमी होते. आणि असे हे दुष्टचक्र अर्थव्यवहाराला मंदीच्या गर्तेत ढकलत जाते. मोहनींचे रोजगारविषयक लेख परिचयाच्या उदाहरणांमधून ही यंत्रणा स्पष्ट करतात. हिचे औपचारिक नाव ‘परिणामकारक मागणीचा अभाव’ (lack of effective demand) हेही एका लेखात नोंदले गेले आहे.
यावर इलाज असतो की सरकारी खर्चाच्या प्राथमिकता सर्वांची खरेदीची ऐपत वाढवणाऱ्या असाव्या. अमेरिकेत तिशीच्या दशकात फ्रँकलिन डिलानो रुजव्हेल्टने ‘न्यू डील’ हे आर्थिक धोरण राबवले. टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीसारखी रोजगार निर्माण करणारी कामे सुरू झाली. या कामांमुळे मंदी ओसरू लागली असतानाच दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि उन्हाने धुके विरावे तशी मंदी नाहीशी झाली. याचा एक दुष्परिणाम असा की एखादे युद्ध सुरू करणे हा आर्थिक मंदीवर उतारा वाटू लागला! पण हा घृणास्पद उपाय वापरणे हे कल्पकतेचा अभावच फक्त दाखवते.
स्वातंत्र्यानंतर भारतातही न्यू डीलला समांतर आर्थिक धोरण होते. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, भाक्रा– नंगलसारख्या योजना, हे सारे थेट टेनेसी व्हॅली ऑथॉरिटीवर बेतलेले प्रभावी रोजगार देणारे प्रकल्प होते. त्यांच्यावर टीका केली गेली की त्या योजनांचे लाभ दिसायला लागायला दशके जावी लागली. आधी योजना रेंगाळल्या, मग फायदे रेंगाळले आणि अखेर फायदे कमी लोकांना मिळून विषमता आणि तिच्यातून येणारे ताणतणाव वाढले. उच्चभ्रू दिवाणखानी चर्चामध्ये ‘नेहरुवियन सोशलिझ्म्’हा हेटाळणीचा शब्दप्रयोग ठरला. ती वरकरणी कम्युनिस्टप्रणीत अर्थव्यवस्था मुळात अमेरिकन नमुन्याची होती, याकडे (बहुधा) जाणूनबुजून दुर्लक्ष झाले.
पण नावे, लेबले, देश यांच्यात न अडकता आजही मंदीवर मात करणारी न्यू डील तपासणे उपयुक्त ठरते. अमेरिकेतली एकोणीसशे तिशीतली स्थिती आणि आजचा भारत यांच्यात मुख्य फरक आहे तो सुशिक्षित प्रजेबाबतचा. सर्व मुलामुलींनी शाळेत जावे आणि असे न करणाऱ्या मुलांमागे शिक्षणखात्याच्या ‘टूअंट’ (truant, शाळाचुकार) अधिकाऱ्याने ससेमिरा लावावा, ही अमेरिकन पद्धत होती. आजही असेल. भारतात मात्र याकडे ठार दुर्लक्ष होत असताना दिसते—-भलेही नोकरशाहीचे अहवाल प्रगतीच दाखवत असतील.
काल्पनिक ‘खडू-फळा’ शाळांपासून ते डून स्कूलपर्यंत अनेक दर्जाचे शिक्षण भारतात उपलब्ध आहे. शिक्षण कसे हवे, कशासाठी हवे, असल्या प्र नांवर एक विशेषांक काढायची इच्छा ‘आ.सु.’ने जाहीर केली आहे, आणि त्या दिशेने प्रयत्नही सुरू आहे. शाळांमध्ये नेहेमीच ‘किमान-समान’ (अल्पसंतोषी!) अभ्यासक्रम असतील, हेही अटळ आहे. पूरक शिक्षण घरापरसात, ‘निवृत्त’, वानप्रस्थाश्रमाच्या वयाच्या आजीआजोबांनी द्यायला हवे. आईबाप, इतर ‘गृहस्थी’ वयाचे लोकही इतर कामांतून वेळ काढून मुलांना ‘क्वालिटी टाईम’ देऊन शिकवणारे हवेत. सध्या (२००१ साली) भारतातील सुमारे पस्तीस कोटी माणसे पाच ते एकोणीस या वयोगटातील आहेत. चांगल्या शिक्षणासाठी ह्या माणसांना दीड-पावणेदोन कोटी शिक्षकांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र एकूण ‘सेवा’ क्षेत्रात एक कोटी, तीस लाख माणसे रोजगार कमावतात. म्हणजे शिक्षक पेशात रोजगार-निर्मितीला खूप संधी आहेत कारण सेवा-क्षेत्रात सारेच काही शिक्षक नसणार.
जर आपण पाऊणेक कोटी शिक्षक वाढवू शकलो, जर त्यांच्या विद्यार्थ्यांना वनांचा आणि शेतीचा दर्जा सुधारायला प्रशिक्षित करू शकलो, तर मंदी हटवणे शक्य होईल. आणि तो टिकाऊ उपाय ठरेल.
मग प्र न सोडवावा लागेल, की ह्या नव्या रोजगार कमावणाऱ्या लोकांना पगार कोणत्या फंडातून द्यायचे, आणि त्यांचे काम चांगले होईल याची ग्वाही द्यायला कोणती यंत्रणा वापरायची?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.