तिसऱ्या बिंदूच्या शोधात

साहित्य-क्षेत्रात प्रस्थापित आणि विद्रोही असे गट असल्याचे उघडपणे दिसतेच आहे. साहित्याची समीक्षा केवळ प्रस्थापितांच्या आणि सवर्णांच्या दृष्टिकोनातून व्हावी हे सर्वांना पटण्यासारखे नाही. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना, परंपरा, रूढी आणि मनावर रुजलेले संस्कार ह्यांचा खोल परिणाम पाहणाऱ्यावर होत असतो आणि त्या दृष्टीने कलाकृतीचे मूल्यमापन होणे अपरिहार्य असते. साहजिकच पुरुष-प्रधान संस्कृतीत होणारी समीक्षा विशिष्ट ‘पुरुषी’ चष्म्यातून आजवर होत आलेली आहे. पण स्त्रीवादाचा हुंकार उमटल्यापासून समीक्षाही स्त्रीवादी होणे सहाजिकच आहे. अशा स्त्रीवादी भूमिकेतून डॉ. तारा भवाळकर ह्यांनी निरनिराळ्या माध्यमां तील वेधक कृतींवर आपल्या प्रतिक्रिया तिसऱ्या बिंदूच्या शोधात’ ह्या पुस्तकात नोंदवलेल्या आहेत.

स्त्रीवादी दृष्टिकोनातून जेव्हा एखाद्या निर्मितीची समीक्षा होते तेव्हा पुरुष-प्रधान समाजाच्या मानसिकतेमधील विसंगती आणि विकृती सहजपणे लक्षात येतात. स्त्रीवाद म्हणजे केवळ स्त्रीनिर्मित, स्त्रीसाठी व पुरुषाविरुद्ध असे नाही तर निखळ स्त्रीच्या नजरेतून, स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगाचे मूल्यमापन करणे होय. आजचे जग म्हणजे पुरुषकेंद्री, पुरुषांसाठी घडवलेली व्यवस्था आहे. पुरुषाची व स्त्रीची सुद्धा जडणघडण पुरुषकेंद्री परिदृष्टीतून झालेली आहे. ती नैसर्गिक नाही. ती घडण कायम रहावी, स्त्रीला तिचे निम्न स्थान जाणवून तिने त्याविरुद्ध बंड पुकारू नये म्हणून स्त्री घडवली जाते. ती तशी जन्माला येत नाही. ही परंपरा फार जुनी आहे. अनेक शतकांच्या परंपरेमुळे जी असमानता व जी अन्याय निर्माण झालेला आहे तो स्वाभाविक मानून स्त्री व पुरुष तिचा सहजपणे स्वीकार करतात. स्त्रीला जेव्हा स्वहक्काची जाणीव झाली तेव्हा ह्या प्रचलित समाजव्यवस्थेबद्दल असंतोष तिच्या मनात निर्माण झाला. त्यातून स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली. बापघर व आपघर–नवऱ्याचे घर ह्या दोन ठिकाणांशिवाय स्त्रीला गती नाही, थारा नाही हा पुरातन समज मोडीत काढून स्त्री स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या तिसऱ्या बिंदूचा शोध घ्यायला सज्ज झाली. ह्याचे पडसाद साहित्य, चित्रपट, सामाजिक विषयांवरील लेखन ह्या सर्वांमध्ये उमटले. अशा काही कृतींची आस्वादक समीक्षा ह्या पुस्तकात येते.

स्त्रियांच्या आत्मकथनांचा विचार करता मराठीत अगदी सुरवातीचे असे लेखन म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीत शोभेल असेच होते. तारा भवाळकर प्रामुख्याने ज्यांचा वेध घेतात ती तीन आत्मकथने म्हणजे माधवी देसाई ह्यांचे ‘नाच ग घुमा’ सुनीता देशपांडे ह्यांचे ‘आहे मनोहर तरी.’, आणि कमल पाध्ये ह्यांचे ‘बंध-अनुबंध’ ही होत. ह्या तीनही स्त्रिया मान्यवरांच्या पत्नी होत्या. माधवी देसाई सोडता इतर दोघींना प्रचलित अर्थाने कुठलाही त्रास असा झाला नाही. उलट संपन्न, वैविध्यपूर्ण, रोचक आयुष्य लाभले. पण तरीही स्त्रीला नेहमी गृहीत धरले जाणे, सदैव येणारा दुहेरी मानदंडाचा अनुभव आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून नाकारण्यात येणारे अस्तित्व ह्याचा त्रास तिघींनाही झाला. त्यात कमल पाध्ये व सुनीता देशपांडे ह्यांचे लिखाण जास्त दर्जेदार आहे. त्यात केवळ आपल्या असमाधानाला वाचा फोडून खळबळ माजवणे हा उद्देश अजिबात नाही. त्यांनी खूप अंतर्मुख होऊन अनेक वर्षे सातत्याने एकत्र राहिलेल्या स्त्रीपुरुषांमधील नातेसंबंधाचा वेध घेतलेला आहे. पती अहंच्या कोशातून मुक्त होऊन मित्र बनू शकत नाही आणि मालकी हक्काची जाणीव त्याच्या मनातून जात नाही ही खंत त्यांच्या लिखाणातून जाणवते. ह्या लिखाणाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही असे भवाळकरांचे मत आहे. अस्मितेच्या विचारांची स्त्रीला गरजच नाही अशी भावना पुरुषांच्याच काय पण स्त्रियांच्या सुद्धा मनात दृढपणे रुजलेली आहे. ‘सुनीताबाईंच्या लेखनामागची आर्तता समजून घेण्याइतकी-सुद्धा संवेदनक्षमता दिसू शकत नाही’ ह्याची क्षिती भवाळकरांना जास्त वाटते.

कमल पाध्यांनाही पतीच्या अहंकारामुळे म्हणावा तसा भावनिक आधार मिळाला नाही ही व्यथा होती. त्या स्त्रियांना एका आधार देऊ शकणाऱ्या शरीरातील प्रेम करणाऱ्या संरक्षक मित्राची उणीव जाणवते. स्त्री-पुरुषांचे असे नाते घडावे की अर्धनारीनटेश्वराची प्रतीती त्या नात्यात यावी अशी आस त्यांना आहे. परंतु अशी कांक्षा, ओढ, पुरुषाशी असलेल्या नात्याबद्दल जशी स्त्रीला वाटते तशी पुरुषाला कधी वाटल्याचे कोणत्याही आत्मचरित्रात दिसून येत नाही. हा मुद्दा मात्र भवाळकरांनी चर्चेत आणलेला नाही. कोणाही पुरुष आत्मचरित्रकाराने आपल्या स्त्रीशी असलेल्या नात्याची खोलवर चिकित्सा केलेली आढळत नाही. ह्याचा अर्थ प्रचलित समाजव्यवस्थेमुळे पुरुष पूर्ण समाधानी आहे असा आहे की पुरुषाच्या मानसिकतेमुळे त्याला अशा एकरूपतेची आस वाटत नाही?

तारा भवाळकरांनी ह्या आत्मचरित्रांवर भाष्य करताना असे म्हटले आहे की ‘अंतर्मुख वृत्तीने लिहिलेली आणि भावी काळातील स्त्रीपुरुषसंबंधांच्या आकांक्षाचे सूचन करणारी ही स्त्रियांची आत्मकथने समाजशास्त्रीय वि लेषणासाठी फार चांगली सामुग्री आहे. मात्र, व्यक्तिगत चौकटीतून बाहेर येऊन त्यांचा विचार व्हायला हवा’ ह्याबद्दल कुणाचे दुमत होणार नाही.

आत्मकथांच्या संदर्भातच भवाळकर चित्रपट अभिनेत्रींच्या आत्मचरित्रांचा ऊहापोह करतात. दुर्गा खोटे, लीला चिटणीस, शांता हुबळीकर, हंसा वाडकर, जयश्री गडकर, ह्यांची आत्मचरित्रे चित्रपटसृष्टी आणि तेथील स्त्रियांचे जीवन ह्याबद्दल बरेच काही सांगून जातात. ह्या सर्वांमध्ये असे दिसते की ह्या स्त्रियांचे नवरे-प्रियकर ह्यांच्या बरोबरीने त्यांचे वडील, भाऊ असे जवळचे तथाकथित ‘रक्षक’ समजले गेलेले पुरुष व काही वेळा आईसुद्धा—-ह्या सर्वांनी त्यांचे सर्व दृष्टीने शोषण करण्यात मागेपुढे पाहिलेले नाही. पुरुषांच्या आधाराशिवाय जगणे अशक्य आहे अशी मनोवृत्ती असणाऱ्या नट्यांच्या वाट्याला यश, कीर्ती, पैसा मिळूनसुद्धा दुप्पट ससेहोलपट आली. मात्र अगदी आधुनिक गृहिणींचीही आत्मकथने जशी त्यांच्या पतीभोवती फिरतात तसा प्रकार अभिनेत्रींच्या बाबतीत आढळत नाही.

गौरी देशपांडे ह्या लेखिकेचा स्त्रीपुरुष संबंधाविषयीचा दृष्टिकोन किती वेगळा आहे हे त्यांचा कोणीही वाचक सांगू शकेल. भवाळकरांनी देशपांडे ह्यांच्या ‘तेरुओ’ आणि ‘काही दूर पर्यंत’ ह्या लघुकादंबऱ्या इथे विवेचनासाठी घेतलेल्या आहेत. ‘तेरुओ’ ची नायिका लग्नाला बंधन न मानता केवळ प्रेम करणे एवढाच त्याचा अर्थ मानते. ‘लग्नाची बंधने उभयपक्षी कोणावरच नाहीत’ ही पुरुषप्रधान लग्नकल्पनेला लेखिकेची चपराक आहे. आजवरच्या पुरुषांच्या जगात युद्ध, विध्वंस, हिंसा, क्रूरपणा, आक्रमणे ह्या माणूसपणा संपवणाऱ्या गोष्टीच प्रामुख्याने घडत आलेल्या आहेत यावर खरा विधायक उतारा केवळ स्त्रीच देऊ शकेल अशी विधायकत्वाला नेणारी स्त्रीवादी भूमिका ‘तेरुओ’ मध्ये भवाळकरांना दिसते. खरे सांगायचे तर स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा ह्या विधानाबद्दल एवढी छातीठोक खात्री कुणी देऊ शकेल असे वाटत नाही. आशा बगेंच्या कथांचे परीक्षण करताना लेखिकेला जाणवलेले सत्य म्हणजे कथा नायिकाप्रधान असल्या तरी त्या नायिका बापघर व आपघर ह्या दोन बिंदूंतच घोटाळताना दिसतात. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व हा त्यांच्या समस्यांवर तोडगा होऊ शकेल किंवा त्यांच्या अस्मितेसाठी ते आवश्यक आहे हे त्यांना जाणवलेले वाटत नाही. पारंपारिक पुरुषी दृष्टिकोनाचा जबरदस्त पगडा संवेदनशील बुद्धिमान मनावर किती प्रमाणात असू शकतो ह्याचे उदाहरण म्हणून भवाळकर ह्या कथांचा उल्लेख करतात.
‘अंतरांजली यात्रा’ आणि ‘अग्निस्नान’ ह्या दोन प्रादेशिक चित्रपटांमध्ये पुरषी जुलमांमुळे स्त्रीची झालेली पराकोटीची गळचेपी दाखवलेली आहे. ‘अंतरांजली यात्रा’ मधील नायिका अगदी कोवळी आहे. तिच्या परिस्थितीला तिचा प्रत्यक्ष जन्मदाताच कारणीभूत आहे. तिला सहानुभूती दाखवणारा तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करणारा आहे एक डोंब–तिच्या सारखाच पददलित. परंतु ह्या मुलीवर संस्कारांचे आणि स्टींचे एवढे प्रचंड दडपण आहे की,मानसिकदृष्ट्या दास्यावस्थेत असलेल्या मुलीची जीवनेच्छा पार कोलमडून जाते. तिची जगण्याची शक्तीच नाहीशी होते. अत्यंत विदारक व तटस्थतेने चित्रित केलेला हा चित्रपट भारतीय परंपरेचे सार स्फोटकपणे सांगून जातो.
‘अग्निस्नान’मधील नायिका मात्र खंबीर आहे. प्रचलित पुरुषप्रधान व्यवस्थेचा बळी झालेली ही नायिका बाजी उलटवते आणि मातृत्वाच्या अस्त्राने आपल्यावरील अन्यायाचा बदला घेते. मातृत्व खरे तर समाजव्यवस्थेत स्त्रीला दुबळेच करते. इथे मात्र उलट घडते. स्त्रीबद्दल शरीरनिष्ठ व्यभिचाराची एकतर्फी केलेली आजवरची मांडणी इथे मोडीत काढलेली आहे. समाजाच्या रूढ चौकटीत स्वतःचा तिसरा बिंदू निर्माण करण्यात ही नायिका यशस्वी झालेली आहे.

प्राचीन संत कवयित्रींचा भवाळकरांनी इथे समावेश केलेला आहे. महादेवी, संत लल्लेश्वरी, अव्वैयार, रंगनायकी आंदाळ आदि संतस्त्रियांना सर्वसंगपरित्याग करणे पुरुषांइतके सोपे गेले नाही. त्यांनी बंड पुकास्न, कठीण प्रसंगाना तोंड देऊन स्वतःचे स्वातंत्र्य मिळवले. पण ह्या स्त्रियांना त्यासाठी आपले स्त्रीत्व झुगारावे लागले. आपले सौंदर्य, तारुण्य ह्यांचा त्याग करावा लागला. भवाळकर जरी ह्याची भलावण करत असल्या तरी तरी स्त्रीमुक्तीच्या दृष्टिकोनातून हे स्वीकार्य वाटत नाही. स्त्रीत्वाचा त्याग करून स्वातंत्र्य मिळवणे हा स्त्रीशक्तीचा पराजय वाटतो. संतकवी म्हणून त्या थोर असल्यातरी स्त्रीमुक्तीचा हा उद्गार आहे असे वाटत नाही.

ह्या लेखामध्ये भवाळकर विवाहसंस्थेच्या ‘आमदार सौभाग्यवती’ हे श्रीनिवास जोशी ह्यांनी रा. रं. बोराडे ह्यांच्या कादंबरीवस्न लिहिलेले नाटक ह्याची समीक्षा करतात. भवाळकर सहजपणे जमदग्नी ऋषी, त्यांची पत्नी रेणुका व पुत्र परशुराम ह्यांच्या मिथकाशी तुलना करतात. नवऱ्याच्या छत्राखाली असणाऱ्या पारंपरिक भारतीय स्त्रीला तिचा नवरा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आमदार बनवतो तेव्हा तिला आपल्या अस्मितेची जाणीव होते. हे नवऱ्याच्या फायद्याचे नसल्याने तो पुत्राची मदत घेऊन तिचे जाहीर चारित्र्यहनन कस्न तिला नामशेष करण्याचा प्रयत्न करतो. जमदग्नी ऋषीनेही रेणुकेचे स्वतंत्र अस्तित्व पार उखडून काढण्यासाठी पुत्राकरवी तिचा वध करवला. प्रचलित असलेली स्त्रीसत्ता धुळीस मिळविण्यासाठी स्त्रीचे पावित्र्य, शील, पातिव्रत्य या कल्पना जनमानसात आणि मुख्यतः स्त्रीमनात घट्ट रुजवण्यात येतात. शील आणि चारित्र्य ह्यांच्या व्याख्या पुरुषसत्तेने पार संकुचित केलेल्या आहेत. ह्या नाटकाच्या नायिकेला असाच विदारक अनुभव येतो.

ह्या संदर्भात ‘आश्रमहरिणी’ ह्या तुलनेने जुन्या कादंबरीचा समावेश येथे होतो. तत्त्वचिंतक आणि स्त्रीविषयी उदारमनस्क असलेल्या वा. म. जोशी ह्यांच्या सर्वच नायिका सुधारलेल्या व पारंपारिक पठडीत न बसणाऱ्या अश्या होत्या. अशा उदारमतवादी जोशींनी आश्रमहरिणीमध्ये मात्र फार वरवरचे निष्कर्ष काढलेले आहेत. नायिका सुलोचना ही पती जिवंत असताना अजाणतेपणे तो मृत झाला असे समजून दुसरे लग्न करते. तो परत आल्यावर पडलेला पेच आश्रमातले कुलपती अतिशय सोपेपणे सोडवतात. ते सुलोचनेला दोन्ही पतींचा स्वीकार करायला सांगतात. सुलोचनेचे भावविश्व सहानुभूतीने वा सजगपणे उलगडले जात नाही. त्यावर ‘लेखक कितीही तत्त्वचिंतक पुरोगामी असला तरी काळाची चौकट फारशी बदलू शकत नाही’ अशी टिप्पणी भवाळकर करतात.

‘विवाहसंस्था आणि राजवाडे’ आणि ‘इतिहास काळातील विवाहबाह्य संबंध’ ह्या लेखांमध्ये भवाळकर विवाहसंस्थेच्या संदर्भात स्त्रीच्या स्थानाची चर्चा करतात. विवाह व नीतिनियम हे खरे तर कृत्रिम आहेत. नैसर्गिक आहे ती कामप्रेरणा व वंशसातत्याची भावना. विवाहसंस्था समाजात हळूहळू अस्तित्वात आली. त्यात अनेक प्रयोग झाले. मातृसत्ताक व पितृसत्ताक दोन्ही पद्धती अस्तित्वात आल्या. कालांतराने सर्वत्र पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा बसला. हे सर्व राजवाड्यांनी अतिशय तटस्थपणे सांगितले आहे. पण ह्या लेखाचे प्रयोजन ह्या आस्वादक समीक्षेच्या पुस्तकात काय असावे हे कळत नाही. हा इतिहास आहे. तेथे स्त्रीवादाचा संबंध आहे असे वाटत नाही. ‘इतिहासकाळातील विवाहबाह्य संबंध’ इथे भवाळकरांनी मध्ययुगीन काळापासून स्त्रीचे गौणत्वाचे स्थान समाजात कसे होते आणि आतापर्यंत त्याबाबत दुहेरी मापदंड कसे वापरले जातात ह्याची चर्चा केली आहे. ह्यात काही नवीन सांगितलेले नाही. हाही लेख काहीसा अस्थानीच वाटतो.

निरनिराळ्या ललित साहित्य कृती आणि इतर माध्यमातील कलाकृती ह्यांची भवाळकरांनी केलेली स्त्रीवादी समीक्षा एकंदरीत खूपच रोचक आहे आणि वाचनीय आहे. त्यांचे सादरीकरण आकर्षक तर आहेच, जोडीला ते विचारप्रवृत्त करणारे आहे. समीक्षा ही एकूण पाहता कोणत्याही ‘वादा’शी संलग्न नसावी. कलात्मक दृष्टीनेच कलाकृतींचा आस्वाद घ्यावयास हवा. परंतु समाजात जेव्हा नवे प्रवाह येतात तेव्हा त्यांची दखल घेणे आवश्यकच असते. काळानुसार समाजचौकट बदलते. त्याचे प्रतिबिंब कलाकृतींमध्ये उमटते. त्यांची नोंद घेण्यासाठी अशी समीक्षा गरजेची आहे. त्यामुळे समाजमन अधिक जागृत, जागरूक व प्रगल्भ बनते. त्या दृष्टीने भवाळकरांचे ह्या अतिशय वाचनीय पुस्तकाबद्दल आभार मानायला हवे.

(‘तिसऱ्या बिंदूच्या शोधात’, डॉ. तारा भवाळकर, सुगावा प्रकाशन, पुणे. रु. १२०/- )
वैशाली, टिळकनगर, नागपूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.