राजस्व–वर्चस्वासाठीच

मागच्या लेखात आपण ऐपत हा विषय चर्चेला घेतला होता, आज कर हा घेऊ. सामान्य नागरिकाच्या पाठीवर कराच्या वाढत्या बोझ्याची चित्रे दरवर्षी अर्थ-संकल्पाच्या प्रकाशनाच्या सुमारास वर्तमानपत्रांतून हमखास दिसतात. वजनाखाली अतिशय वाकून गेलेला, घाम पुसत असलेला एक माणूस त्यांमध्ये दिसतो. ते चित्र पाहून हा माणूस तंबाखू, दारू, पेट्रोल इत्यादि वस्तू विकत कसा घेऊ शकेल असा विचार मनात येई कारण सारा वाढीव कर मुख्यतः त्याच वस्तूंवर लादलेला असे. वर्षानुवर्षे वाढत राहणारा कर सामान्य नागरिक देऊ शकतो याचे रहस्य पुढेपुढे समजू लागले. हा वाढीव कर देता येईल इतके त्याचे उत्पन्न असतेच आणि तेही करासोबत वाढत असते. सारी आकड्यांची देवाणघेवाण असते. उत्पन्न वाढले नसते तर पेट्रोल पंपावरच्या रांगा आखूड झालेल्या दिसल्या असत्या. पूर्वी आठ बारा आण्याला लिटर-भर मिळणारे पेट्रोल पस्तीस रुपये लिटर म्हणजे सत्तर पट महाग झाले. तरी त्याचा वापर कमी झालेला नाही. उलट तो प्रचंड प्रमाणात वाढला आहे. कारण पूर्वी क्वचित दिसणाऱ्या मोटारींच्या, फटफट्यांच्या संख्येतही रोज खूप मोठी भर पडत आहे. ह्या गाड्या उभ्या करण्याच्या जागेची (पार्किंग) टंचाई भासू लागली आहे.

करांचा इतिहास पाहिल्यास राजे आपला सेनेवर खर्च करता यावा ह्यासाठी तो प्रजेकडून वसूल करीत असे सांगण्यात येते. पण त्याविषयी शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. प्रजेकडून कराच्या रूपाने रक्कम वसूल करून राज्यकर्ते स्वतः चैनीत राहत हे खरे आहे. कर न देणाऱ्याला त्याच्या जमिनीवस्न बेदखल करून ती जमीन जप्त करण्याचा राजाचा अधिकार प्रजेने मान्य केलेला आहे. कराच्या मोबदल्यात प्रजेला परचक्रापासून सुरक्षा प्राप्त होते. पण वास्तवात राजा प्रजेलाच वेठीला धस्न सैन्य उभारतो. म्हणजे प्रजाच स्वतःचे रक्षण करीत असते. राजाने हाक द्यायची (दवंडी पिटवायची), सेनापती नेमावयाचा, त्याने सामरिक धोरणे आखावयाची आणि आपला बचाव करायचा किंवा शत्रूवर चाल करायची हा प्रघात. हे सगळे सांगण्याचा उद्देश असा की प्रजाच आपले स्वतःचे रक्षण करीत असते. राजा हा निमित्तमात्र असतो. तो जुलम-जबरदस्तीने कर वसूल करतो आणि प्रजेच्या तुलनेत चैनीत राहतो. तो असल्याशिवाय प्रजेला स्वतःला संघटित करता येत नाही ह्या प्रजेच्या मानसिक दुबळेपणाचा तो फायदा घेतो.

प्रजेकडून कर वसूल करायचा आणि तो युद्धासाठी खर्च करायचा म्हणजे पुन्हा प्रजेमध्येच ती रक्कम वाटायची. फक्त मध्यंतरी त्या रकमेची, वा करख्याने दिलेल्या वस्तूंची मालकी बदलावयाची. ही मालकी राजस्व म्हणवते. निराळ्या शब्दांत सांगायचे तर राजा प्रजेचा भर्ता नव्हता तर तो प्रजेचा आश्रित होता. राजाला राजस्वाची गरज कधीही नव्हती. राजाकडे स्वतःच्या मालकीच्या पुष्कळ जमिनी असत. त्यांवर पिकणारे धान्य राजवाड्यात राहणाऱ्या लोकांना पुरुन उरण्याइतके नक्कीच असे. राजा कितीही खादाड असला तरी तो फारतर दोघातिघांचे अन्न खाई. बाकीचे प्रजाच खात असे. मग राजा कर कशासाठी वसूल करी? आपले श्रेष्ठत्व लोकांना पटावे, प्रजेवर सत्ता गाजवता यावी ह्यासाठी कर वसूल करण्याची त्याला गरज असे. आजही शासनकर्ते आणि सामान्य प्रजा ह्यांचा सामाजिक दर्जा वेगळा दाखवता यावा ह्यासाठीच मुख्यतः करांचा उपयोग होतो. म्हणजेच काय तर राजस्वाचा वापर सार्वजनिक हिताची कामे करण्यासाठी कमी आणि राज्यकर्त्यांचे राहणीमान वाढवण्यासाठी अधिक केला जातो.

आज लोकशाहीमध्ये कर वसूल करण्याची गरज अजिबात राहिलेली नाही. कारण लोकशाहीमध्ये सत्ता कोण्या एका व्यक्तीच्या हाती नसते. ती पूर्ण देशवासीयांच्या ठायी असते. सत्ता भोगणारे जे प्रशासक असतात ते प्रजेचे प्रतिनिधी असतात. समस्त प्रजेच्या इच्छांची आणि संकल्पांची प्रतीके म्हणून ते निवडून आलेले असतात.

देशाची सगळी प्रजा स्वतःच्या हिताची जी कोणती कामे संघटितपणे करणार त्यांची यादी अर्थ-संकल्पाच्या रूपाने संसदेत एकमेकांसमोर ठेवली जाते. अर्थसंकल्प नीट राबवण्यासाठी ‘वर्गणी’ची गरज असते. वर्गणी जमा होवो न होवो आम्ही इतके काम तडीला नेणारच असाही संकल्प आम्हाला करता येतो. अश्या वेळी वर्गणी (सद्यःकाळी कर) पैशात जमा होऊ शकत नसेल तर चलनवाढ कस्न देश ते काम पूर्ण करतो.

वर्गणीला कराचे स्वरूप दिल्याबरोबर आणि जबरदस्तीने तो वसूल केल्या-बरोबर त्याला राजस्वाचे स्वरूप येते. आणि कर टाळण्याकडे लोकांचा कल होतो. कारण कराची रक्कम राज्यकर्त्यांचे राहणीमान वाढविण्यासाठी वापरली जाईल असे प्रजेला सकारण वाट ते. सारा भ्रष्टाचार येथूनच सुरू होतो. भ्रष्टाचाराच्या गटाराचा उगम कर-आकारणीत झालेला आहे. किंवा वर्गणीला कर म्हटल्यामुळे झालेला आहे. परकीय राज्यकर्ते आणि स्वकीय शासनकर्ते ह्यांच्या भूमिकेतही फार मोठा फरक आहे. गेल्या अनेक शतकांमध्ये आमच्या देशाला स्वकीय राज्यकर्त्यांचा अनु-भवच नाही. राजे (राज्यकर्ते) आणि शासनकर्ते, (प्रशासक) यांमधला फरक आमच्या मनांत अजून स्पष्ट झालेला नाही. शासनकर्त्यांचा आणि प्रजेचा परस्पर संबंध लोक-शाहीमध्ये समतेच्या पायावर आधारलेला असावयास पाहिजे. त्याऐवजी तो उच्चनीच-भावावर आधारलेला पाहण्याची आम्हाला सवय आहे. हा उच्चनीचभाव प्रजेच्या मनामध्ये ठसविण्यासाठी कर लादला जात असतो, आणि कराची वसुली कठोरपणे केली जात असते. किंबहुना आपण असे म्हणू या की राज्यकर्त्यांना प्रजाजनांपैकी कोणाचेही मानगूट पकडता यावे यासाठी करवसुलीची संस्था निर्माण झालेली आहे.

कर आकारण्यामागे दुसरेही एक महत्त्वाचे कारण आहे. ते आहे पैशाचे महत्त्व वाढवणे त्याचप्रमाणे ‘खाजगी मालकी’ ही संस्था बळकट करणे. निरनिराळ्या लोकांच्या मालकीचे धान्य अथवा दुसरी कोणतीही संपत्ती आधी राजाच्या मालकीची करायची, या धान्याचा अथवा पैशाचा भरणा राजाच्या कोठारात आणि खजिन्यात करायचा. असे करताना मूळ मालकांच्या हक्काचे विसर्जन करून ते हक्क राजाच्या स्वाधीन करायचे असे एकंदर कर-आकारणी मागचे तत्त्वज्ञान आहे असे मला जाणवते. राजाला प्रजेवर अप्रतिहत सत्ता गाजवता यावी असा विचार कर घेणाऱ्या राजांच्या मनात उपबोध पातळीवर (sub conscious level) वर काम करीत असला पाहिजे. कर आकारण्याच्या आणि वसूल करण्याच्या पद्धती आमच्या देशाच्या पारतंत्र्याच्या काळात चालत होत्या तश्याच आम्ही पुढे चालवीत आहोत. त्या पद्धती आम्ही जोपर्यन्त बदलणार नाही तोपर्यन्त आमच्या देशातला करचुकवेपणा कमी होणार नाही.

आमच्या देशात पुढची पंचवीस वर्षे, एक पूर्ण पिढी बदलेपर्यन्त, कर-आकारणी पूर्णपणे थांबविण्याची गरज आहे. किमानपक्षी विक्रीकर, आयकर हे दोन तरी ताबडतोब बंद केले पाहिजेत. कर-आकारणी आज मालाच्या उत्पादनापासून विक्रीपर्यन्तच्या प्रवासात अनेक टप्प्यांवर होत असते. आणि त्या प्रत्येक टप्प्यावर ग्राहकाची वा विक्रेत्याची नाडणूक करण्याला वाव असतो. ही सगळी पद्धती नष्ट करून त्याऐवजी कारखान्यातून माल बाहेर पडताना आणि परदेशातून माल आपल्या देशात येताना ती एकाच वेळी करण्यात यावी. तेवढी कर आकारणी पुरत नसेल तर सरकारी मालकीच्या कारखान्याच्या उत्पादनातून खर्चाची तोंडमिळवणी करावी. तेही पुरेनासे झाले तर भारतीय सेनेचा एक विभाग सैन्याला लागणारे अन्नधान्य निर्माण करण्यासाठी लावावा. परंतु आपण कर्जाच्या बोझ्यातून पूर्णपणे मुक्त झालो आहोत असा विश्वास साधारण नागरिकाच्या मनात निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आधुनिक काळात कागदी चलनाचा, त्याचप्रमाणे हुंड्या, धनादेश, धनाकर्ष, (Negotiable instruments) इत्यादींचा वापर सुरू झाल्यानंतर पैशाचे स्वरूप हे केवळ आकड्यांची देवाण घेवाण अशा प्रकारचे झाले आहे हे जाणून त्याप्रमाणे शासनाचे प्रजेशी आणि प्रजेचे शासनाशी व्यवहार होतील असे पाहिले पाहिजे.

खादीच्या निमित्ताने सुरू केलेल्या ह्या लेखमालेला आता थोडा विराम द्यावयाचा आहे. त्यापूर्वी पुन्हा थोडे खादीकडे वळू या.

खादीच्या निमित्ताने शेवटी मला जो प्र न उपस्थित करावयाचा आहे तो असा की माणसाने एकमेकांच्या साहाय्याने उत्पादनामध्ये भर टाकून उत्पादनांच्या नवनवीन पद्धती शोधून काढून—-त्यामध्ये एकमेकांना अमर्याद साह्य कस्न माणसांच्या भौतिक संपन्नतेत वाढ करावयाची की नाही? भौतिक संपन्नतेत वाढ करताना सृष्टीचे कायमचे, भस्न न काढता येण्याजोगे नुकसान होऊ द्यावयाचे नाही हे पथ्य तर त्याने पाळलेच पाहिजे, पण ललित कलांचा आस्वाद घेण्यासाठी विज्ञानाच्या प्रत्येक शाखेचे माणसांच्या एकूण सुखवृद्धीसाठी खोलवर अध्ययन करण्यासाठी पूर्वी पेक्षा अधिक वेळ त्याने काढावयाचा की नाही? की उत्पादनाच्या जुन्या कालबाह्य पद्धती वापरल्यामुळे अध्ययनासाठी वेळच राहत नाही तरी तेच करावयाचे? आपल्या देशापुरता विचार केला तर हे अध्ययन आम्ही आजवर केलेच नाही. ते परदेशांतच झाले आहे. तसे अध्ययन करून परदेशस्थांनी आमच्यावर आर्थिक वर्चस्व गाजवले. त्या वर्चस्वांतून मुक्तता मिळविण्यासाठी आम्ही तत्त्व म्हणून स्वावलंबनाचा आश्रय करावयाचा की परस्परावलंबनाचा?

आज खादीचा वापर शोषणापासून मुक्ति मिळावी यासाठी होत नाही. नव्हे तो कधी होऊ शकला नाही. पूर्वीसुद्धा तो सांकेतिकच होता आणि आजही तो तसाच आहे. तरी खादी हा खरा उपाय नाही—तो सांकेतिक आहे हे जाणून शोषणमुक्तीचे नवीन मार्ग शोधून ते अंगीकारावयाचे की नाही? ह्या लेखमालेद्वारे आपल्या देशातील आणि एकंदर अर्थकारणाविषयीचे माझे अवलोकन आणि आकलन मी संक्षेपाने वाचकांपुढे ठेवण्याचा यत्न केला आहे. यातील त्रुटी वाचकांनी माझ्या ध्यानी आणून द्याव्या अशी त्यांना नम्र विनंती आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया समजल्यानंतर त्यांवरचे माझे म्हणणे मांडण्याचा इरादा आहे. आपल्या समस्त व्यवहारात समता आणण्यासाठी आणि ती टिकवून धरण्यासाठी तीन आघाड्यांवर आम्हाला लढावे लागणार आहे. पहिली आघाडी देवावरच्या विश्वासाची. कारण जोपर्यन्त आम्हाला येथे जाणवणारी विषमता दैवी किंवा परमेश्वर निर्मित आहे असे आपण धरून चालू तोपर्यन्त समतेसाठी केलेले आमचे प्रयत्न वाया जातील हे आम्ही समजले पाहिजे. दुसरी आघाडी आमच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अर्थदेवतेला तिचे आमच्या आयुष्यातले स्थान दाखवून देण्यासाठी उघडली आहे. प्रस्तुत लेखमाला त्या हेतूने अर्धीकच्ची लिहून वाचकांसमोर मांडली आहे. आणि तिसरी आघाडी आमच्या आजच्या कुटुंब-रचनेविरुद्ध आहे. तिच्याविषयी ऊहापोह काही प्रमाणात आजचा सुधारक मधून यापूर्वी होऊन चुकला आहे.
ह्या आघाड्या वास्तविक त्या त्या संस्थांविरुद्धच्या नसून आमच्या मनावर घडून आलेल्या संस्काराच्या विरुद्ध आहेत हे पुन्हा एकवार येथे स्पष्ट करतो.

मोहनीभवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.