धिस फिशर्ड लँड : लेख १

विवेक आणि उधळेपणा

[माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड : अॅन इकॉलॉजि-कल हिस्टरी ऑफ इंडिया’ (ऑक्स्फर्ड इंडिया पेपरबॅक्स, १९९२) हे पुस्तक भारताची सद्यःस्थिती समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. अत्यंत शिस्तबद्ध संशोधन-पद्धती, प्रचंड आवाका आणि अनेक विषयांची सांगड घालण्याची लेखकांची हातोटी, हे स्तिमित करणारे आहे. या पुस्तकाचा संक्षेप करून काही लेखांमधून तो आ.सु.च्या वाचकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. खरे तर पूर्ण पुस्तक मराठीत यायला हवे—-मल्याळममध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषदेने ते मागेच नेले आहे. पण त्रोटक स्पात तरी त्याला मराठीत आणू या. प्रकाशकांनी भारतीय भाषांमध्ये भाषांतर करण्यासंबंधात कॉपीराईटवर आग्रह धरलेला नाही, आणि लेखकद्वयानेही उदार मनाने परवानगी दिलेली आहे. पहिल्या लेखांकात ‘प्रूडन्स अँड प्रॉफ्लिगसी’ या उपोद्घाताचा सारांश देत आहोत.]

सध्याच्या भारताचे चित्र रेखाटायला अनेक रंगांचे एक अद्भुत मिश्रण वापरावे लागते. भाताच्या खाचरांपासून रबराच्या मळ्यांपर्यंत आणि हातमागांपासून अणुभट्ट्यांपर्यंत इथे सारेच आहे. अब्जाहून जास्त माणसांच्या जीवनपद्धतीही बहुरंगी आहेत. एक स्वयंपाकाची पद्धत पाहायची तर ती तीन दगडांमधील फुफाट्यापासून अत्याधुनिक विजेच्या आणि गॅसच्या ‘कुकिंग रेंजेस’ पर्यंत विविधता दाखवते. आणि म्हणूनच लोकांच्या निसर्गसंपदेकडून असणाऱ्या अपेक्षाही बहुविध असतात. गावाजवळील पडीक जमीन प्रस्थापित शेतकऱ्यांना गुरे चारायसाठी हवी असते, तर भूमिहीनांना तिथेच थोडेफार धान्य पिकवायची इच्छा असते.
डोंगरदऱ्यांचे उतार लहान शेतकऱ्यांना भाताच्या खाचरांसाठी हवे असतात, तर वीज उद्योगाला तेथे जलविद्युत् केंद्रे, उभारायची असतात. संसाधनांच्या (resources) वापरातील ही विविधता नियंत्रणाच्या पद्धतींमध्येही दिसून येते. कसेल त्याची जमीन असा कायदा असूनही कुळे आणि त्यांचे दूर राहणारे ‘यजमान’, ही स्थिती कायमच आहे. उलट आदिवासींच्या शेतीखालचा महत्त्वाचा भाग सरकारी मालकीच्या राखीव जंगल क्षेत्रात आहे. ईशान्येकडे पूर्ण जमातीकडे भूप्रदेशाचे मालकी हक्क असतात, आणि त्या प्रदेशात ‘फिरती शेती’ (shifting agriculture) केली जात असते. आणि अशा रंगीबेरंगी तन्हांनी वापरली जाणारी निसर्गसंपदा आज अनेक अंगांनी ‘ताणली’ जात आहे. भूशिरी (नर्मदेच्या दक्षिणेचा peninsular भाग) भागात बहुतेक मेंढपाळांनी कुरणांअभावी मेंढ्या पाळणे थांबवले आहे. ईशान्येकडची फिरती शेती पंधरा वर्षांच्या अंतराने लागवडीखाली आणायची परंपरा होती —- आज जमिनीला पाचच वर्षे ‘आराम’ दिला जातो. इंधनाच्या तुटवड्यामुळे गोवऱ्यांचा वापर, आणि यामुळे शेणखताचा तुटवडा, हा तर सार्वत्रिक प्रकार आहे. भूजल झपाट्याने खाली जात आहे. सर्वच शहरांमध्ये आवास, पाणी, इंधन, ऊर्जा आणि वाहतूकव्यवस्थेचा तुटवडा आहे.
या तुटवड्यांवर इलाज म्हणून समजूतदार तडजोडी, संगनमते, संघर्ष, असल्या अनेक चित्रविचित्र गोष्टी या प्राचीन देशात वापरल्या जातात. पण तरीही जाणवते की आपण नैसर्गिक संपदेसंबंधात उधारीवर जगत आहोत. जमीन, पाणी, वनस्पती, प्राणी यांच्या वापराचा वेग सतत वाढता आहे—-आणि हा भांडवली खर्च आहे—-महसुली, किंवा नव्या उत्पन्नातून केलेला खर्च नाही. आपण ही विनाशाची वाट चालतच राहणार, की आपण आजही निसर्गाला झेपेलशा संपदा-वापराकडे वळू शकतो?
बरे, सर्वच संसाधने संपण्याच्या वाटेवर आहेत असे नाही, पण ती यादी वाढती आहेच. गढवालमधील गोपेश्वर या गावाजवळ ओक आणि इतर रंद पानांच्या झाडांची एक राई आहे. गावकरी या राईतून कायकाय घ्यायचे याबद्दलची पारंपारिक बंधने कसोशीने पाळतात. राई टिकून आहे, पण तिच्यातून मिळणाऱ्या वस्तू गावाला पुरत नसल्याने राईबाहेरचा भाग मात्र नागवला गेला आहे. आणि साकल्याने पाहता मानवी इतिहासभर ही विवेक (prudence) आणि उधळपट्टी (profligacy) यांची गोधडी भेटते. संसाधनांचा वापर कधी ‘अंथरूण पाहून’ केला जातो, तर कधी कफल्लकपणाकडे नेणारी उधळपट्टी दिसते. सध्याच्या भारतात उधळेपणा हिशेबीपणापेक्षा बराच जास्त दिसतो —- पण नेहेमीच ही तणावाची स्थिती नव्हती.
सध्या संसाधनांचा तुटवडा सामाजिक संघर्षांना जन्म देत आहे. आपल्या आणि आपल्या भूमीच्या जीवनावर याचे दूरगामी परिणाम होत आहेत. श्रीमंत आणि सत्तेवरील लोकांना निसर्गसंपदेच्या या वापर-गैरवापराची पुसटशीच जाणीव असते. आपण मात्र गैरवापराचे परिणाम सतत भोगत असतो. माणसे आणि निसर्गसंपदा यांच्या परस्परसंबंधांचा पर्यावरणशास्त्रीय इतिहास तपासणे यामुळे महत्त्वाचे ठरते. उदाहरण भारताचे घेतले आहे, पण या प्र नांचे महत्त्व एखादा देश किंवा एखादा खंड यांच्यापुरते मर्यादित राहत नाही. त्यांचे धोगेदोरे जगभर पोचतात.
कोणत्या परिस्थितीत, कोणत्या घटकांमुळे माणसांना संसाधनांचा विवेकी वापर करायची इच्छा होते? संसाधनांच्या वापराला नेहेमीच दोन अंगे असतात. एखाद्या काळातली तंत्रे आणि मालमत्तेबाबतचे नियम म्हणजे उत्पादनाच्या क्रियेची चौकट किंवा ‘हार्डवेअर’. माणसा-माणसांमधले संबंध आणि माणूस आणि निसर्गामधले संबंध यांबद्दल माणसांच्या काही धारणा असतात. धर्म, परंपरा, विज्ञान, अशा स्पांमध्ये या धारणा व्यक्त होत असतात. हे झाले संसाधन-वापराचे ‘सॉफ्टवेअर’. ही अंगे आणि त्यांचे संबंधही तपासायला हवेत. संसाधनांच्या वापरातून सामाजिक संघर्ष कसे उपजतात? या तणावांमध्ये काळानुसार कायकाय बदल झाले आहेत? आणि शेवटी वापराच्या पद्धतीतल्या आणि त्यातून उपजलेल्या तणावांमधल्या बदलांमुळे निसर्गसंपदेवर काय परिणाम झाले आहेत? थोडक्यात म्हणजे विवेकी वापरापासून ते उधळपट्टीपर्यंतचा प्रवास आपण तपासायला हवा.
संसाधन-वापराच्या पद्धती आणि त्यांच्यावरील बंधने यांचा विचार इतिहास आणि संस्कृती ह्यांच्या कोंदणात होत असतो. सामाजिक (मानव्य) शास्त्रांची परंपरा अशी, की समाजांचा अभ्यास उत्पादनपद्धतींप्रमाणे व्हावा. याला संसाधन-वापराच्या पद्धतींची पुस्ती जोडली, की इतिहास आणि पर्यावरणशास्त्राची सांगड घालता येते. पुस्तकाच्या ह्या भागाला ‘पर्यावरणीय इतिहासाची मूलतत्त्वे’ हे नाव दिले आहे.
ब्रिटिशपूर्व काळात संसाधन-वापरातून संस्कृती व पर्यावरणाचे संबंध कसे घडले, हा पुस्तकाचा दुसरा भाग. पुराव्यांच्या तुटकपणामुळे ही मांडणी फक्त ‘एक संभाव्य घटनाक्रम’, अशा ख्याचीच आहे.
ब्रिटिशांच्या आगमनाने संसाधन-वापरांच्या पद्धतीत प्रचंड उलथापालथ झाली. एका गतिमान आणि प्रगत तंत्रसंस्कृतीच्या संपर्काने समाजाच्या सर्व पातळ्यांचे व्यवहार ढवळले गेले. भारतीय इतिहासकारांनी वसाहतवादाचे कठोर वि लेषण केले, पण ते पर्यावरणीय अंगांबद्दल उदासीनच राहिले. इथे मात्र वसाहतवादाने केलेले सामाजिक आणि पर्यावरणीय बदलच अधोरेखित केले आहेत. हा पुस्तकाचा तिसरा भाग. इथे हेही उमजते की वसाहतवादाने भारतावर केलेले परिणाम अमेरिकेवर (‘न्यू वर्ल्ड’) केलेल्या परिणामांपेक्षा फार वेगळे होते.
इंग्रजांच्या तपशिलात व्यवहार नोंदण्याच्या पद्धतीमुळे पुस्तकाच्या ह्या भागाला पुराव्यांचा पुरवठा भरपूर आहे. लेखकांना जाणवलेला कळीचा मुद्दा म्हणजे वनखात्या-मार्फत सरकारने जंगलांच्या मालकीचा आणि व्यवस्थापनाचा ताबा घेणे, हा होय. एकूण जमिनीच्या वीस टक्क्यांचे मालक-चालक म्हणजे वनखाते. आणि कृषिप्रधान समाजाचे वन उत्पादनांशी दाट संबंध असतात. स्वतंत्र भारताने ब्रिटिश वनखात्याचा सांगाडा वारशाने मिळवलेला आहे, त्यामुळे आर्थिक विकास आणि पर्यावरण यांचे संबंध त्या खात्याशी आजही निगडित आहेत.
एका महत्त्वाच्या तिसऱ्या जगातल्या’ देशाची ही कहाणी एकूण उष्ण—-कटिबंधातल्या जंगलांच्या हासावरही प्रकाश टाकते.
ह्या प्रचंड आवाक्याच्या पुस्तकात ‘अंतिम’ उत्तरे नाहीत, याची लेखकांना पूर्ण जाणीव आहे. पण त्यासोबतच भारतीय समाजाच्या इतिहासाच्या आकलनाला एक नवीन आणि पर्यायी चौकट आपण पुरवीत आहोत, याचेही भान इथे दिसते. हा मुद्दा ठसवताना लेखक मार्क ब्लॉक या फ्रेंच शेतीच्या अभ्यासकाचे म्हणणे उद्धृत करतात, ते असे —-
“साधारणपणे विषयांच्या विकासात वि लेषक अभ्यास महत्त्वाचे असतात. पण कधीकधी मात्र अशा ढीगभर अभ्यासांपेक्षा अपुऱ्या माहितीवर आगाऊपणे (premature) बेतलेली सं लेषणे विषयांना जास्त सक्षमतेने पुढे नेतात. असे म्हणा की प्र नांची मांडणी काही टप्प्यांवर उत्तरांपेक्षा जास्त निकडीची असते. . . . मी दूरदृष्टीला मर्यादा पाडणाऱ्या जंगलात शिरण्याआधी क्षितिजाचे एक वेगवान सर्वेक्षण करणाऱ्या प्रवासी-संशोधकासारखा आहे. माझ्या अभ्यासात मोठाल्या त्रुटी असतील, आणि मी त्या उघड करायचा प्रयत्न कसोशीने केला आहे. . . . जेव्हा माझ्या या कामाला मागे टाकणारे नवे सखोल अभ्यास केले जातील तेव्हा माझ्या चुकीच्या अनुमानांपासून इतिहास सत्याकडे गेला, या जाणिवेने मला कृतकृत्य वाटेल.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.