पर्यायी विकासनीतीची ओळख

नर्मदा बचाव आंदोलनाच्या निमित्ताने चर्चिल्या गेलेल्या अनेक प्रश्नांबरोबर पर्यायी विकासनीतीचा उल्लेख बऱ्याच वेळा केला जातो. प्रचलित विकासनीतीसंबंधाच्या असमाधानातून पर्यायी विकासनीती गेली कित्येक वर्षे मांडली जात आहे. पर्यावरण-वाद्यांचे एक नवीन फॅड आहे’ ह्या मतापासून ‘पर्यायी विकासनीती’ हीच शाश्वत विकासनीती आहे आणि त्याशिवाय तरणोपाय नाही ह्या मतापर्यंत ह्या संबंधात अनेक मते मांडली जातात. पण पर्यायी विकासनीती म्हणजे काय? ह्याचे साकल्याने विवेचन अपवादात्मकच दिसून येते. श्री दिलीप कुलकर्णी ह्यांनी ही उणीव ‘वेगळ्या विकासाचे वाटाडे’ (राजहंस प्रकाशन जाने. २००१, पृष्ठसंख्या १४८, मूल्य १२०/- रु.) ह्या पुस्तकाद्वारे भरून काढली आहे.

जगातल्या अनेक विचारवंतानी वेळोवेळी शाश्वत विकासांच्या संबंधात मार्ग-दर्शन केले आहे. त्यातील महात्मा गांधी, शुमाखर, दीनदयाळ उपाध्याय, फ्रिटयॉफ काप्रा आणि हेझेल हेंडरसन ह्या पाच तत्त्ववेत्त्यांचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. स्थल-कालपरत्वे प्रत्येक तत्त्ववेत्त्यांचा भर सर्वच गोष्टीवर सारखा असणे शक्यच नाही. गांधीजींचा सामाजिक-सांस्कृतिक-नैतिक बाजूवर, तर दीनदयाळजींचा भर तत्त्वज्ञानात्मक मांडणीवर अधिक आहे. ह्या दोन्ही पौर्वात्य (भारतीय) विचार-वंतांचा दृष्टिकोन अर्थातच आध्यात्मिक आहे. शुमाखरांचा भर अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञानावर अधिक आहे. आणि ‘सानुले सुंदर’ (Small is beautiful) हे त्यांचे बोधवाक्य आहे. देकार्तच्या जगाकडे पाहण्याच्या यांत्रिक दृष्टिकोनाला पर्याय काप्राच्या दृष्टिकोनाने दिला ह्या तर हेंडरसन भाकीतशास्त्राच्या प्रणाली दृष्टिकोनातून आर्थिक-सामाजिक प्रश्नांचा विचार करतात.

प्रस्थापित विकासनीती
रेने देकार्त ह्या फ्रेंच तत्त्वज्ञाने १७ व्या शतकात हे जग जड, निर्जीव आणि उद्देशहीन आहे असे प्रतिपादन केले. विखंडनात्मक विचारसरणीद्वारा (Reductionism) त्याने जगाकडे बघण्याचा यांत्रिक दृष्टिकोन मांडला. ह्या तत्त्वज्ञानाचा फार मोठा परिणाम त्याच्यानंतर झालेल्या २-३ शतकांच्या वैज्ञानिक प्रगतीवर झालेला दिसून येतो. प्रत्येक शाखेत विखंडनात्मक पद्धतीने अभ्यासही झाला आणि यांत्रिक दृष्टिकोनाचा अवलंबही करण्यात आला. उदा. मानवी शरीर हे यंत्राप्रमाणे अनेक लहान-लहान सुट्या भागापासून बनले आहे आणि एकाद्या भागातील (अवयवातील) खराबी (रोग) हा भाग दुरुस्त करून किंवा बदलून दुरुस्त करणे शक्य आहे, हा मानवी शरीराबद्दलचा यांत्रिक दृष्टिकोन आजही कायम आहे. ह्या यांत्रिक दृष्टिकोनाचा पाया जडवादी होता. म्हणूनच आधुनिक विज्ञानाचा पाया हा जडवादी विचारसरणीत आणि जगाकडे बघण्याच्या यांत्रिक दृष्टिकोनात दिसून येतो. पुढील २–३ शतकांत झालेल्या विज्ञानाच्या प्रगतीनेच औद्योगिक क्रांतीचा पाया घातला. औद्योगिक क्रांतीने मानवी संस्कृतीत आमूलाग्र परिवर्तन केले. उत्पादन आणि अधिक उत्पादन, संपत्तीची निर्मिती आणि त्यात वाढ हे परवलीचे शब्द बनले.

भांडवलाला आणि पर्यायाने पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आले. पुढचा आजपर्यंतचा काळ हा ह्याच मूल्यसंकल्पनेने व्यापला गेला आहे. विज्ञान तंत्रज्ञानात झालेली आणि होत असलेली अभूतपूर्व वाढ ह्यांनी मानवजातीला अनेक सुखसोई पुरविल्या, जीवनमानाचा स्तर वाढविला, संपन्नता आणली हे निर्विवादपणे खरे असले तरी काही गंभीर प्रश्नही निर्माण केले. या विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीने एका नव्या उपभोगवादी संस्कृतीला जन्म दिला. हा उपभोगवाद निरंतर वाढतच आहे. त्याला आता चंगळवादाचे स्वरूप आले आहे. विकसित तंत्रज्ञान, उपभोगवादी संस्कृती आणि उत्पादनसंबंधात झालेले बदल ह्यांनी नवीन अर्थरचनेचा पाया घातला. ही अर्थरचना उत्पादनवाढीचा विचार करणारी, संपत्तीच्या वृद्धीचा विचार करणारी, माणसाच्या उपभोगांचा विचार करणारी आहे. ह्यात भांडवलवृद्धी, उत्पादनवृद्धी (जी.डी.पी./जी.एन.पी.) ह्यासारखा विकासाच्या रेखीय प्रतिमानांचा विचार केला जातो. (मार्क्सच्या साम्यवादी आर्थिक दृष्टिकोनात आणि भांडवलवाद, अभिजात किंवा आधुनिक, ह्यात त्या दृष्टीने काहीच फरक नाही, फरक फक्त भांडवल व्यक्तीच्या मालकीचे की समाजाच्या मालकीचे इतकाच आहे). म्हणजे मूळ अर्थशास्त्रीय प्रणाली आणि रेखीय वाढीचे प्रतिमान तेच राहिले. ह्या अर्थप्रणालीमुळे व्यक्ती, समाज आणि निसर्ग ह्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. व्यक्तीव्यक्तीतील संबंधांना एक वेगळे वळण लागले आणि त्यामुळे जीवन तणावपूर्ण झाले. व्यक्तीचे अस्तित्व, त्याची ओळख ह्यांना फार मोठे आव्हान दिले गेले. व्यक्तीची ओळख यंत्रातील एक सुटा भाग एवढीच राहिली. समाजाच्या वाढत्या संपन्नतेबरोबर संपन्नतेचे जसे निराळे प्रश्न आले तसेच विषमतेचे प्रश्न अक्राळविक्राळ रूप धारण करते झाले. व्यक्तीव्यक्तीतील, समाजासमाजातील आणि देशादेशातील असमानता हा आजचा महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. न्याय, कायदा आणि सुव्यवस्था, मानवी हक्क ह्यांचे नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. निसर्गाची तर माणसाने परवडच केली आहे. तात्पुरत्या फायद्याकरता निसर्गाची भरमसाट लूट कस्न कायमचे नुकसान करून घेतले आहे. निसर्गाला गृहीत धरण्यात आले आणि त्याच्या लुटीचा हिशेबच मांडण्यात आला नाही. परिणामी पर्यावरणाचे असंख्य प्रश्न आज जगड्व्याळ त्य घेऊन उभे आहेत. विकासाचा हा जो आराखडा औद्योगिक अर्थशास्त्रीय प्रणालीतून मांडला गेला, त्याच्यातून निर्माण झालेल्या काही प्रश्नांचा विचार करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर अर्थशास्त्रज्ञांनी विकासाचे अर्थशास्त्र (Developmental Economics) नावाची नवीन शाखा काढली. पण अर्थशास्त्राच्या मूळ आराखड्यातल्या विकासाच्या संकल्पनांचा त्याग ही शाखा करू शकली नाही. उत्पादनकेंद्रित विकासाचा दृष्टिकोन बदलून मानवकेंद्रित विकासाची संकल्पना काही प्रमाणात आणली गेली खरी पण विकासाच्या मूलभूत संकल्पनेत आणि वाढीच्या रेखीय प्रतिमानात कोणताही बदल झाला नाही. आधुनिकोत्तर (Post-modern) माहिती-युगातही ह्यात काही बदल झालेला नाही. विकासामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची तीव्रता वाढतच चालली आहे. विकासाच्या संकल्पनांतून निर्माण झालेल्या समस्या ह्याच पर्यायी विकासनीतीच्या निर्मितीला कारणीभूत आहेत.

वेगळ्या वाटा
प्रस्थापित विकासनीतीतून निर्माण होणाऱ्या प्रश्नाबद्दल निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या विचारवंतांनी आपली मते मांडली आहेत. प्रस्थापित विकासनीतीशी त्यांचा असलेला तात्त्विक आणि व्यावहारिक विरोध त्यांनी नोंदविला आहे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जगाकडे पाहण्याच्या जडवादी दृष्टिकोनाला विरोध अर्थातच गांधीजी आणि दीनदयाळ उपाध्याय ह्यांच्या विचारातून दिसून येतो. पाश्चात्त्य जडवादी विचार-सरणीवर वाढलेल्या विज्ञान–तंत्रज्ञानाला भुलून गेलेल्या जगापुढे त्यांनी आध्यात्मिक विचारप्रणालीचा पर्याय मांडला. उपभोगवादामागची धाव कमी करून आध्यात्मिक मूल्यांकडे वळण्याची वेळ आली आहे असे जवळ जवळ सर्वाचे मत आहे. (गांधी, दीनदयाळ, शुमाखर, हेंडरसन). देकार्तच्या विखंडनात्मक अभ्यासपद्धतीऐवजी आणि जगाकडे पाहण्याच्या यांत्रिक दृष्टिकोनाऐवजी एकात्म । दृष्टिकोनाचा आणि प्रणाली पद्धतीचा (Systems Approach) चा अवलंब काप्रा ह्यांनी पुरस्कारिला. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना त्याच्या वेगवेगळ्या भागांचा अभ्यास करण्यापेक्षा त्या गोष्टीकडे एकात्म रीतीने, सम्यक्तेने बघण्याऱ्या ह्या नव्या प्रणालीमुळे विखंडनात्मक अभ्यासपद्धतीची जागा प्रणाली पद्धतीने (Systems Approach) घेतली. ह्या मूलभूत फरकामुळे तंत्रज्ञानाच्याद्वारे उत्पादनवाढीत निसर्गाकडे आणि कधी कधी माणसाकडेही दुर्लक्ष होत आहे. ह्याकडेही लक्ष वेधले जाऊन त्या संबंधात विचार करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील उत्पादनकेंद्रित विकासाची संकल्पना बदलून मानवकेंद्रित विकासाची संकल्पना पुढे आली (शुमाखर). त्याहीपुढे पर्यावरणवाद्यांचे वैश्विक तत्त्वज्ञान जगापुढे आले. ‘ते मानवकेंद्री विचारापासून दूर जाऊन परस्परसंबद्ध अशा सजीव पृथ्वीच्या विचाराकडे नेते.’ (हेझेल हेंडरसन) आधीच्या विकासनीतीत निसर्गाला, पर्यावरणाला अभावानेच स्थान होते. ते आज मध्यवर्ती ठिकाणी आले. निसर्गाच्या लुटीचा हिशेब मांडला जाऊ लागला आहे आणि ह्या लुटीला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा म्हणून दंड बसविला जावा अशी मागणीही करण्यात येत आहे. पर्यायी विकासनीतीत पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपणाऱ्या (विनाशी) उर्जास्रोताच्या उपयोगावर आधारित उत्पादनपद्धती आणि जीवनपद्धती बदलून अविनाशी उर्जास्रोताचा (सौर ऊर्जा) उपयोग करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (हेंडरसन) Nature is Sufficient for everybody’s need; but not for anybody’s greed’ हा गांधीजींचा मूलमंत्र उच्चरवाने मांडला जात आहे. पर्यायाने उपभोगावर आधारित जीवनप्रणाली बदलून साधी राहणी अवलंबण्याची निकड लक्षात आणून देण्यात येत आहे. बहुतांकरिता उत्पादनाऐवजी बहुतांकरवी उत्पादनाची मागणी केली जात आहे. (गांधी, शुमाखर, दीनदयाळ, हेंडरसन). विकेंद्रित उत्पादनव्यवस्थेवर भर देऊन ‘स्वदेशी’ची नवी संकल्पना रुजविली जात आहे. पुरुषप्रधान संस्कृतीऐवजी स्त्री-पुरुष समानता असलेल्या नव्या समाजाकडे जाण्याचे आवाहन केले जाते आहे. (हेंडरसन, काप्रा).

पर्यायी विकासनीती
ह्या सर्व विचारमंथनातून आपल्यापुढे पर्यायी विकासनीतीचे एक चित्र उभे राहते. ह्या विकासनीतीचा पाया आहे आध्यात्मिक. प्रणाली पद्धतीने अभ्यास आणि एकात्म दृष्टिकोन ही बैठक आहे. उपभोगवादावर आधारित संस्कृतीचा विरोध हे महत्त्वाचे धोरण आहे. पर्यावरणाला ह्या नीतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाची लूट थांबवून निसर्गाला मित्र समजून त्याला विकासातला साथीदार बनविणे हे ह्या विकासनीतीला अपेक्षित आहे. मानवी हक्कांचे रक्षण हे गृहीतकृत्य आहे. सर्व प्रकारच्या विषमतेला आणि शोषणाला (आर्थिक, सामाजिक, लैंगिक) सर्व स्तरावर (वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय) ह्या विकासनीतीचा विरोध आहे. जीवनाकडे कप्प्याकप्प्याने न पाहता एकसंधरीतीने पाहण्याची आवश्यकता ही नीती दर्शविते. विकेंद्रित उत्पादनव्यवस्था आणि बहुतांकरवी उत्पादन ह्यांचे महत्त्व ह्या विकासनीतीत आहे. नव्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाबरोबर माणूस आणि निसर्ग ह्यांचाही विचार अपेक्षित आहे. पर्यायाने विकासाच्या रेखीय प्रतिमानाऐवजी पर्यावरण-सापेक्ष मानवी जीवनमूल्यांची प्रतिमाने वापरावी लागतील. एकूण माणूस, समाज आणि निसर्ग ह्यांच्या संबंधात एक मूलभूत परिवर्तन अपेक्षित आहे.
पर्यायी विकासनीतीच्या ह्या अवलोकनानंतर ह्या वेगळ्या विकासाच्या वाटांचा अवलंब कसा आणि कोणी आणि कधी करावयाचा हा कळीचा प्रश्न शिल्लक राहतो. कारण असंख्य हितसंबंध गुंतले असलेली प्रगत पाश्चात्त्य राष्ट्र सहजासहजी मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारतील हे अवघड नव्हे, अशक्यच आहे. गांधीजीप्रणीत माणूस बदलण्याचा आणि हा बदल स्वतःपासून सुरू करण्याचा एक मार्ग आहे. ह्या मार्गातील अडचणी उघडच आहेत. जगातल्या यच्चयावत माणसांच्या नैतिकतेला आवाहन करून सर्व जगात बदल घडवून आणणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्यच आहे. दुसरा मार्ग दबावगट निर्माण करण्याचा. काही दिवसांपूर्वी अशक्यप्राय वाटणाऱ्या घटना या शतकाच्या शेवटी घटित झाल्या. बर्लिनच्या भिंतीचा पाडाव, सोव्हिएत संघ-राज्याचे विघटन ह्या त्यांपैकी महत्त्वाच्या. गेल्या वर्षी सिएटल येथे झालेल्या WTO च्या बैठकीच्या वेळी झालेली उग्र निदर्शने पाहता आणि जगभर पर्यावरणवाद्यांचा राजकीय मंचावरचा वाढता प्रभाव पाहता अशा दबावगटांचा उपयोग पर्यायी विकासनीतीच्या प्रचार, प्रसार आणि उपयोजन ह्यासाठी होणे अशक्यच नाही.

श्री. दिलीप कुळकर्णी ह्यांनी शक्यतोवर तत्त्ववेत्त्यांच्या शब्दांत त्यांचे विचार मांडले आहेत. आयुष्यभर अभ्यास केला तरी पूर्ण आलोचन होऊ शकणार नाही, अशा ह्या थोर विचारवंतांचा मराठी वाचकाकरिता त्यांनी करून दिलेला परिचय निःसंशय उपयोगी आहे.

कन्सल्टिंग सर्जन, देशमुख हॉस्पिटल, उदगीर — ४१३ ५१७, जि. लातूर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.