वैसार्थ

ब्रह्म, ब्रह्मज्ञान व ब्रह्मसाधना या तीन्हीसाठी ‘परमार्थ’ हा शब्द संत वापरतात. परम म्हणजे सर्वश्रेष्ठ व अर्थ म्हणजे ज्ञेय वस्तू. म्हणून अनंत ज्ञेय वस्तूंमधील सर्वोत्कृष्ट वस्तू शोधून काढणे हाच परमार्थ. ब्रह्म किंवा आत्मा ही सर्वोत्कृष्ट वस्तू आहे म्हणून त्याचे ज्ञान म्हणजेच परमार्थ (दासबोध दशक १ समास ९). ब्रह्म कधी न ढळणारे अनंत, स्थिर आहे. ते कल्पनारहित आहे. ब्रह्मांडात ब्रह्मासारखे दुसरे काही नाही. केवळ सद्गुरूपदेशाने त्याचे ज्ञान होते व ते अनुभवावे लागते, वर्णन करिता येत नाही. (दासबोध दशक ७ समास २)
आत्म्याच्या प्रथम संकल्पनेसाठी ब्रह्म ही कल्पना प्रथम वैदिक काळात रुजू झाली. ब्रह्मांत जी शक्ती आहे ती वाणीची आहे. वाणी प्राणांत आहे (दुकानांत नाही) म्हणून प्राण हेच ब्रह्म असा विचार उपनिषदांत वारंवार आढळतो. प्राण आत्मस्वरूप आहे अशा साखळीने ब्रह्म व आत्मा या संकल्पना उद्भवल्या असाव्यात. यासाठी जुने ईषावास्योपनिषद व ऐतरेयोपनिषद पाहा. त्यानुसार आत्मा पंचमहाभूतरूप असतो. तो अन्न व अन्नाद (म्हणजे अन्न खाणारे) अशा स्वख्यात दिसतो. (ऐतरेय आरण्यक २/३/१) उपनिषदांत आत्म्याला नकारात्मक विशेषणे आहेत. उदा : अस्थूल, अवायु, अनाकाश इत्यादि.
शरीर + आत्मा = सजीव असे समीकरण रुजले. आत्म्यांचा स्रोत म्हणजे परमात्मा अथवा ईश्वर असा समज दृढ होत गेला. अंतिम सत्य म्हणजेच परमात्मा. त्याच्या प्राप्तीसाठी निर्गुण भक्ति अपेक्षित. साधकांसाठी पहिली पायरी सगुण भक्ति व नंतर निर्गुण भक्ति अशी कल्पना दृढ झाली.
संतवाङ्मयाचा परामर्श घेता स्थूलपणे सगुण भक्तीकडे जास्त कल, कारण ती सामान्यांस भावते. ज्ञानेश्वरांनी आणि इतर काही संतांनी निर्गुण भक्ति पण उपयोजिली आहे. नामदेव विठोबाचे भक्त. त्यांची व ज्ञानेश्वरांची खास मैत्री होती. सगुण भक्तीने नामदेवांस विठोबाची प्राप्ती झाली. त्यांनी विठोबाचे आदेशाखातर विसोबांकडून गुरूपदेश घेतला पण त्यांचे मन आत्मज्ञानात रमेना. संत नामदेव म्हणतात : (नामदेवगाथा १५८४–८५)
कोण होईल आत्मज्ञानी जो बा राहे त्याच्या ध्यानीं
मज तो चरणांची आवडी जन्मोजन्मीं मी न सोडीं
होईल सिद्धीचा साधक त्यासी देई सर्व सुख
कोण होईल देहातीत त्यासी करी संगरहित
नामा म्हणे जीवेसाठी तुज मज जन्मे पडली गांठी
ब्रह्म अविनाश आनंदघन त्याहुनी चरण गोड तुझे
प्रचलित ज्ञानप्रकाशात:
प्राणी व वनस्पती हे अनेकविध पेशींचे समुच्चय आहेत. प्रत्येक पेशी स्वयंपूर्ण सजीव आहे. परंतु त्यांची चयापचय क्रिया (जन्ममृत्यू) चालूच असते. परंतु सजीवांच्या शरीररचनेतील काही दुवे ढासळल्यास तो मृत होऊ शकतो. प्रत्येक पेशीचा व किडामुंगीचा पण आत्मा असतो का?
मूलद्रव्यांची विशिष्ट प्रकारे गुंफण झाल्यावर अमायनो अॅसिड्स तयार होतात. त्यांची विशिष्ट क्रमाने गुंफण झाल्यावर सजीवांचा रेणू तयार होतो. अशा रेणूंच्या विशिष्ट गुंतवणुकीने एक मूलभूत सजीव पेशी तयार होते. ही साखळी क्रिया पुढे चालत राहून कालमानाने उत्क्रांती होऊन सजीवांचे विश्व निर्माण होते. हीच मूलद्रव्ये अशा ठराविक प्रकारे गुंफली गेली नाहीत तर त्यांपासून निर्जीव पदार्थ तयार होतो. थोडक्यात सांगायचे तर ‘रन् लागला तर रमी, नाही तर डबल पॅक’ (पुढील कविता पाहा).
रमी
रन लागला तर रमी, नाहीतर डबल पॅक! एकूण सारी पाने बावन, दगड असो अथवा जीवन!
कर्ब हैड्रो नत्र प्राण रन् लागला तर सप्राण
नाही तर दगड निष्प्राण वाघ सिंह कुत्रा माणूस गुलाब आंबा शेवाळ कणीस दगड गोटे माती परीस मातीत तर मुक्ति अखेरीस
जे काही माहीत नाही त्यास आपण ‘क्ष’ मानू मग त्याचे उत्तर काढून
अमूर्तास का देव मानू? रन् लागला तर रमी, नाही तर डबलपॅक!
{वैचारिक बैठक: रमीचा डाव सजीव निर्जीव यांच्या नवीन संकल्पनेस दृष्टान्त म्हणून दिला आहे. रन् (क्रमवार रचना) लागला तर रमी लागते (सजीव), अन्यथा निर्जीव (डबल पॅक). कार्बन, हैड्रोजन, नत्र, प्राणवायू या मूलद्रव्यांची क्रमवार रचना (रन्) झाली तरच सजीव अन्यथा निर्जीव (दगड) निर्माण होतो.
वनस्पती, प्राणी सर्व सजीवाचे मरणोपरांत मातीत रूपांतर होते. त्यातच खरी मुक्ती आहे. पारमार्थिक कल्पना बहुतांशी काल्पनिक आहेत. जे माहीत नाही त्यास ‘क्ष’ मानून देवाची जागा दिली आहे. हे शास्त्रीय विचारधारेस अनुकूल नाही.}
म्हणून वस्तुतः सजीव व निर्जीव यांत फरक नाही. दोहोंमध्ये तीच मूलद्रव्ये असतात पण त्यांची गुंफण वेगवेगळ्या प्रकारे झालेली असते. म्हणूनच सजीव-निर्जीव असे वर्गीकरण न करिता क्रियाशील (Active) व क्रियाहीन (Inactive) असे वर्गीकरण करावे. मूलद्रव्यांचा समुच्चय क्रियाशील बनल्यावर क्रिया चालू रहाण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ऊर्जा न मिळाल्यास हा समुच्चय क्रियाहीन (मृत) होऊ शकतो व त्याचे विघटन होऊन माती बनते. शरीर व जीवात्मा असे क्रियाशीलांचे घटक नाहीत याचे हे विवरण. किंबहुना क्रिया (आत्मा?) ही क्रियाशीलाची घटक नसून त्याचे ते केवळ लक्षण आहे. म्हणूनच आत्मा सजीवाचा घटक नसून ते केवळ त्याचे लक्षण अथवा गुणधर्म आहे. म्हणूनच शरीर + आत्मा = सजीव हे समीकरण अयोग्य असून आत्मा ही एक काल्पनिक समजूत आहे. म्हणून पूर्वीच्या काळी शास्त्रीय ज्ञानाच्या अभावाने घडलेली आत्म्याची कल्पना नवीन प्रकाशात लोप पावते. बटाटेवड्याची ‘चव’ हा त्याचा ‘आत्मा’ आहे पण चव वड्यामधून वेगळी काढता येत नाही कारण ती वड्याचा केवळ गुणधर्म आहे.
या नवीन विचारधारेसाठी मूलभूत दृष्टिकोनात बदल करण्याची आवश्यकता आहे (Paradigm Shift). वस्तुतः प्राणिमात्राची मरणोपरांत माती बनते. प्रत्येकजण या जगांत फक्त एका वापरासाठी उद्भवतो व नंतर मातीत सामावतो. आत्म्याची कल्पना गळून पडल्यावर आपोआप पुनर्जन्म, मोक्ष, पाप पुण्य, पूर्वसंचित वगैरे आनुषंगिक कल्पना आपोआप विरघळून जातात. ‘मी’ पणा नाहीसा होतो व या जन्मी नाही तर पुढील जन्मी श्रीमंताघरी जन्म घेण्याची आस पण मावळते.
हल्लीच्या जगाकडे पाहता पापपुण्याच्या संकल्पनेची बडगा/बक्षीस या उपयोगासाठी सांगड घालण्याचे खास प्रयोजन नाही. चांगले काम करणारे ते करीतच राहतात व वाईट काम करणारे कुकर्म सोडीत नाहीत. वाल्याचा वाल्मिकी बनणे अगदीच विरळा.
देवाची संकल्पना:
अंतिम सत्याचे ज्ञान म्हणजे ईश्वरप्राप्ती असे परंपरागत गृहीत आहे. अंतिम सत्य, विश्वरचनेचे गूढ हे शास्त्रज्ञांच्या विचाराधीन आहे. एखादी वस्तू डब्यात आहे, डबा घरात आहे, घर जगात आहे ही शृंखला, किंवा Russel’s Paradox व अनेक कूटप्र न अनुत्तरित किंवा अल्पोत्तरित आहेत. किंबहुना कोणत्याही घटनेचे कारण शोधून काढणे आवश्यक आहे. त्याचे उत्तर ‘क्ष’ मानून गप्प बसणे व ‘क्ष’ ला देवाचे रूप देणे हा ज्ञानसाधनेस काटशह आहे. आकलनातील उणीवा तर्कशून्य श्रद्धांनी भरून काढणे योग्य नाही. त्यांचा पाठपुरावा करणारे शोध प्रगतीचे उद्गगाते ठरतील.
पंचमहाभूतांस म्हणजेच निसर्गास तसेच ऐतिहासिक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे म्हणजे राम, कृष्ण, शिवाजी वगैरे यांस देवत्व द्यावे. परंतु ती केवळ डोळस सगुण भक्ती असावी. कारण त्यांची भक्ती केवळ त्यांची पूजा नसून त्यांच्या आचरणाचे अनुकरण अपेक्षित आहे. केवळ तंत्राच्या आहारी न जाता मंत्र जाणून केलेली भक्ती हीच डोळस सगुण भक्ती आहे. हाच धडा पुढे गिरवून असे म्हणता येईल की देव ही एक मनोबैज्ञानिक गरज आहे. मानसिक पाठबळासाठी डोळस सगुण भक्ती आवश्यक आहे. हाच विचार पुढील ‘अंतिम सत्य’ या कवितेत प्रकाशित होतो. अंतिम सत्य अंतिम सत्य दूर राहू दे मोक्षाचे आरक्षण कशाला?
काय करायची वेदवाणी? जगायला हवी, पोटाला भाकरी प्यायला पाणी हेच नाही का देवावाणी? गणपति बाप्पा मोरया वीतभर मूर्ति दीड दिवस रहा सगुणाचे मोदक खा
निर्गुणाचा ध्यास कशाला? मॅच तर जिंकायचीच
गोल कसा करायचा? वाः फुलबॅक श्रीगणेशा!
पुरी होणार नक्कीच मनीषा!! अंतिम सत्य दूर राहू दे मोक्षाचे आरक्षण कशाला?
{वैचारिक बैठक:
साध्या माणसाला मीठभाकर हवा पाणी याची प्राप्ती म्हणजेच देवाची प्राप्ती. त्याने अंतिम सत्य मोक्ष यांच्या मागे धावू नये. जगात सगुण निर्गुण दोघांचा समन्वय आवश्यक. सगुण भक्ती नामदेवांप्रमाणे सामान्यांस प्रिय आहे.
देवाची संकल्पना ही एक मनोवैज्ञानिक पाठीराख्याची गरज भागविते. म्हणूनच गणेशाचे पाठबळ मॅच जिंकून देणार.} सूक्ष्म ऊर्जावहन :
शाप, वरदान, कुंडलिनी, रेकी व इतर अनेक सिद्धी केवळ ऊर्जा वहनाची (Energy transfer) उदाहरणे आहेत. E F G (Electro Encephalogram) मापन व इतर सूक्ष्म विद्युत्-चुंबकीय मापकांनी या व तत्सम शक्तींचा अभ्यास होत आहे.
Bionics (Biology + mechanics) ही शास्त्र शाखा याच प्रकारचा अभ्यास करीत आहे. आज बालगंधर्व हयात नसतील तरी त्यांच्या गाण्याचा आस्वाद आपण ध्वनिमुद्रिका लावून घेऊ शकतो. जवळ जवळ त्याच पद्धतीने ‘वरदानाचे’ ऊर्जाप्रसारण अभ्यासून त्याचे पुनःप्रसारण कृत्रिमरीत्या कस्न कित्येक गरजू लोकांस फायदा देता येईल याचा विश्वास वाटतो.
वैसार्थ:
या निबंधांतील विविध विचार लक्षात घेऊन नवीन परमार्थाचे नामकरण वैसार्थ असे केले आहे. हा शब्द वैज्ञानिक, सामाजिक व आर्थिक या शब्दांची आद्याक्षरे घेऊन तयार केला आहे. आजच्या कालमानास असा वैसार्थ सर्वभावे अपेक्षित आहे. स्थूलमानाने वैसार्थाची तिन्ही अंगे व तदंतर्गत कार्यक्रम यापुढे देत आहे : १. वैज्ञानिक कार्यक्रम:
विश्वरचनेचे गूढ शोधणे तत्सम गूढ प्र नांची उत्तरे अणु, रासायनिक, जैविक अस्त्रनिर्मूलन EEG व इतर सूक्ष्म ऊर्जाप्रसारणांचे मापन खाण्यापिण्याचे वैद्यकीय नियमन पर्यावरणाची (पंचमहाभूतांची) जोपासना ऊर्जासंवर्धन
वैद्यकीय उपचार • एड्स निर्मूलन. इम्यूनायझेशन वगैरे
२. सामाजिक कार्यक्रम :
चरस • धूम्रपान • मद्यपान यांतून सुटका व्यायाम • योगासने • एकाग्रता (Meditation) सामाजिक न्यायदान • ग्राहक पंचायत वडीलधाऱ्यांची देखरेख • रुण सेवा लग्नसंस्थापुनर्विचार • लोकसंख्या नियमन
३. आर्थिक कार्यक्रम:
शिक्षणप्रसार • कायदेकानू मदत • वृक्ष लागवड • पाणी अडवा पाणी जिरवा वगैरे स्वयंरोजगार • नोकरी सल्लामसलत गुंतवणूक • कर • सल्लामसलत दूध • भाजी • धान्य वगैरे सहकार चळवळ गरिबी निर्मूलन • आर्थिक गुन्हेगारी सावधानता वगैरे
वरील कार्यक्रमांत सहभागी होणे हीच वैसार्थ मधील व्रते वैकल्ये. हीच काळाची गरज आहे. म्हणून चला उठा वैसार्थी बना.
१५ मेघदूत, टिळकनगर, (जुन्या टेलिफोन एक्स्चेंज जवळ), डोंबिवली पूर्व, पिन कोड ४२१ २०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.