संपादकीय राष्ट्र वाद, विवेकवाद आणि थोडे इतर काही

ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. रवीन्द्र द. खडपेकर ह्यांचे एक पत्र संक्षेपाने प्रकाशित होत आहे. त्याचा परामर्श येथे घ्यावयाचा आहे. स्थलाभावामुळे मूळ पूर्ण पत्र प्रकाशित करू शकलो नाही.
खडपेकरांनी दूरदर्शनवर पाहिलेल्या जाहिरातीची दखल मिळून साऱ्याजणींनी घेतली आहे (मार्च २००२). खडपेकरांशी मी सहमत आहे, मात्र त्यांच्या माझ्या सहमतीची कारणे मात्र अगदी वेगळी आहेत. कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा व्यभिचार हे घटस्फोटाचे कारण होऊ नये असे माझे मत आहे. त्याविषयी मी आजचा सुधारक मधूनच वेळोवेळी अनेक लेख लिहिले आहेत म्हणून त्याच्यामागील सर्व कारणांची पुनरुक्ती करीत नाही. फक्त एक गोष्ट येथे नोंदवितो. खडपेकरांच्या मताप्रमाणे कोणत्याही स्त्रीच्या व्यभिचाराचा उल्लेख एकूणच स्त्रीजातीची बदनामी करणारा ठरतो; तर माझे मत स्त्रीचे कोणतेही वर्तन व्यभिचार म्हणून गणले जाऊ नये, कोणाशी रत व्हावे हे ठरविण्याचा तिला पूर्ण अधिकार असावा, असे आहे.
त्यांच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याविषयी मात्र थोडे विस्तारपूर्वक लिहिणे आवश्यक आहे. अर्थात् मी खाली मांडत असलेले मत माझे व्यक्तिगत मत आहे.
कोणताही विवेकी माणूस राष्ट्रवाद मानू शकत नाही असे मला वाटते. एक उदाहरण देतो. बघा ते येथे कितपत चपखल बसते ते. विवेकी माणूस धर्म मानत नाही. कारण धर्म मानल्याबरोबर धर्म वेगवेगळे असू शकतात—आणि ते असतात—आहेत. त्यांपैकी एक धर्म दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ असावा लागतो. मग प्रत्येकाला आपापल्या धर्माचा अभिमान धरावा लागतो. तुम्ही स्वतःला हिंदु म्हणविले की तुम्हाला इतर धर्मांतले—विशेषतः शेजारच्या इस्लाममधले—दोष टोचू लागतात. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असे अभिमानपूर्वक म्हणावे लागते. एकदा कोणत्याही धर्माचे अनुयायी म्हणविल्यानंतर हे सारे अपरिहार्यपणे स्वीकारावे लागते. आपल्या धर्माची इतर धर्मांशी सतत तुलना करीत राहून आपला धर्मच कसा श्रेष्ठ ते स्वतःला आणि इतरांना पटवून द्यावे लागते. कोणी आपल्या धर्मातून बाहेर पडला तर त्याचे दुःख मानावे लागते. परधर्मीयांनी आपला धर्म स्वीकारल्यानंतर हर्षभरित व्हावयाचे असते.
भाषेच्या संबंधीही वाद असू शकतो. आपण ज्या वादांची यादी दिली आहे —- राष्ट्रवाद, मानवतावाद, हिंदुत्ववाद, भांडवलवाद, साम्यवाद अध्यात्मवाद, समन्वयवाद, साहसवाद — तीत भाषावादाचाही समावेश करता येईल. ज्या विचार-सरणीचा आम्ही अभिमान धरतो तिला ‘वाद’ म्हणण्यास हरकत नसावी. भाषेचे उदाहरण अशासाठी घेतले की भाषा जोपर्यंत विचारविनिमयाचे साधन म्हणून वापरली जाते तोपर्यंत ती लवचीक असते. तिच्या अमक्याच स्पाविषयी अभिमान आम्ही बाळगू लागलो की भाषावाद निर्माण होतो. भाषेमध्ये जर नवनवीन शब्दांची भर पडत गेली, दुसऱ्या, निरनिराळ्या बोली भाषांमधून, तसेच अजिबात परक्या असलेल्या भाषांमधून शब्दांची आवक सुरू राहिली तर ती वाढते. ती इतर भाषांचा तिरस्कार करते तेव्हा तिने विवेकाची कास सोडली आणि ती पिंजऱ्यात अडकली असे म्हणावे लागते.
कोणताही धर्म किंवा वाद मग तो प्रत्यक्ष राष्ट्रवाद का असेना, एक विचाराचा पिंजरा असतो. तो तुरंाच असतो. तुरुंगाच्या आतले ते आपले आणि दुसऱ्या तुरुंगातले ते परके असा तो सारा प्रकार आहे असे मला वाटते. माणसाला कसल्या ना कसल्या विचारांच्या तुरुंगात राहण्याचीच सवय झालेली असल्यामुळे, तीच स्थिती त्याच्या अंग वळणी पडलेली असल्यामुळे श्री. खडपेकरांनी उपस्थित केलेले प्र न बिनतोड आहेत असे त्यांना वाटते.
राष्ट्र म्हणजे काय ह्याचाही थोडा विचार करणे आवश्यक आहे. पुस्तकांमध्ये त्यांच्या पुष्कळ व्याख्या दिलेल्या आहेत. पण त्यांच्याकडे न वळता येथे राष्ट्राची काही लक्षणे नोंदवीत आहे. एका राष्ट्रात अनेक धर्म नांदू शकत नाहीत. एका राष्ट्रात अनेक भाषा नांदू शकत नाहीत. एका राष्ट्रात अनेक राजे वा राजघराणी नांदू शकत नाहीत—- राष्ट्राच्या भौगोलिक सीमा स्पष्ट असावयाला हव्यात. त्या वाढत्या असल्या तर आपले राष्ट्र प्रगतिपर—-कोणत्याही परिस्थितीत आपण आपली भूमी गमावता कामा नये. माणसे गमावली तर चालेल पण भूमि गमावून चालत नाही. आपल्याला ज्याचा अभिमान धरता येईल असे जे सर्व नागरिकांना सामान्य असलेले अमूर्त तत्त्व ते राष्ट्र होय. ज्याच्याविषयी अव्यभिचारी निष्ठा धारण करता येते आणि ज्याच्याविषयी अभिमान धरून इतरांपेक्षा वेगळेपणातून श्रेष्ठत्वाचा भाव सामूहिकपणे बाळगता येतो त्याला एकराष्ट्रभाव म्हणावयाला हरकत नसावी. एका समाजगटाला एकत्वाची जाणीव होणे हे राष्ट्रभावनेसाठी आवश्यक होय—-ही एकत्वाची जाण आपल्या इतिहास परंपरांमधून किंवा कल्पित पुराणकथांमधून झाली तरी चालते. परंतु ह्या सगळ्या अटी सगळ्या राष्ट्रांना लागू पडत नाही.
राष्ट्रभावना फार जुनी नाही. दोन शतकांपूर्वी युरोपात निर्माण झालेली ती भावना आहे. युरोपातील भिन्नभिन्न एकभाषिक समुदायांना बांधणारी भावना एकराष्ट्रीयत्वाची म्हणून ओळखली जाऊ लागली. ती एकत्वाची भावना परक्या समूहांच्या मुख्यतः राजकीय आक्रमणापासून स्वसंरक्षण करण्यास आणि त्या समूहांना आपली साम्राज्ये वाढविण्यास उपयुक्त ठरली. युद्धप्रसंगी आणि दुसऱ्या देशांची आर्थिक कोंडी करण्यासाठी मागच्या शतकात उपयोगी पडलेल्या भावनेची आज गरज आहे असे मला वाटत नाही.
राष्ट्रभावनेचा मूळ हेतू आपल्या देशावर होणाऱ्या दुसऱ्या देशाच्या आक्रमणा-पासून स्वतःचे रक्षण करणे किंवा दुसऱ्या देशावर आपण स्वतः आक्रमण करणे इतकाच असला पाहिजे. ज्या देशांना परकीयांच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी संघटन करण्याची पाळी आली नाही, त्याचप्रमाणे ज्यांना मुलुखगिरी करून आपले साम्राज्य वाढविण्याची गरज पडली नाही, तशी आकांक्षा ज्यांच्या ठिकाणी निर्माण झाली नाही अशा कोणत्याच देशात राष्ट्रभावना निर्माण झाल्याचे मला दिसत नाही. आफ्रिकेमधले अनेक देश — मुख्यतः सहारा वाळवंटाच्या दक्षिणेचे, तसेच दक्षिण अमेरिकेमधले — हे युरोपीयांच्या कपटी कारवायांना बळी पडले ते त्यांच्या ठिकाणी केवळ राष्ट्रभावना नव्हती म्हणून नाही तर युरोपीयांचे कपट समजू शकले नाहीत आणि तंत्रविद्येत ते फार मागे होते म्हणून. आजही तेथे युरोपीय देशांसारखी राष्ट्रभावना असलेली दिसत नाही. युरोपीयांनी १९ व्या शतकात साम्राज्ये वाढविली आणि गेल्या शतकात दोन महायुद्धे जगावर लादली. ज्यांना देश नव्हता तरी ज्या समाजाच्या ठिकाणी राष्ट्रभावना होती ती मुख्यतः ज्यूधर्मीयांच्या. पण तीदेखील फक्त युरोपातल्या ज्यूंच्या ठिकाणी. आपल्या भारतात अंदाजे दीडदोन हजार वर्षांपूर्वी आलेले व येथे स्थायिक झालेले बेने इस्रायल आणि केरळीय ज्यू ह्यांना वेगळ्या राष्ट्राची आकांक्षा नव्हती, कारण त्यांचा आपल्या युरोपीय बांधवांप्रमाणे छळ झालेला नव्हता.
राष्ट्रभावनेचा वापर मुख्यतः वसाहतवाद निर्माण करण्यासाठी झाला. आणि वसाहतवाद आपले राहणीमान वाढविण्यासाठी झाला. राहणीमान वाढविण्यासाठी आणि ते वाढते ठेवण्यासाठी इतरांचे शोषण करणे आवश्यक आहे असा आजवरचा समज आहे. त्या समजाच्या पायावरच आजच्या राजकारणाचा, अर्थकारणाचा आणि अर्थात् राष्ट्रवादाचा पाया रचलेला आहे. येत्या शतकामध्ये शोषणाची गरज कमी होत जाईल अशी शक्यता आहे. दुसऱ्याला न लुबाडता संपत्ती निर्माण करण्याच्या पद्धती मानवाला ज्ञात होतील तसतसा राष्ट्रवादाच्या संकल्पनेमध्ये फरक पडेल. आज तसे होऊ शकत नाही ह्याचे कारण आम्ही आमच्या पूर्वसंस्कारांतून मुक्त होऊ शकत नाही हे आहे.
आम्ही आमच्या धर्मांना आणि अर्थकारणविषयक संकल्पनांना जोपर्यंत चिकटून राहू, तोपर्यंत आमच्यावर हिंसा आणि राष्ट्रवाद वर्चस्व गाजवतील अशी माझी समजूत आहे. आणि ह्या सर्वांचे पर्यवसान ह्या जगातले दु:ख वाढविण्यामध्ये होणार आहे. जितका राष्ट्रवाद तीव्र, तितका आपपरभाव अधिक आणि साहजिकच दुःख वाढणार! शोषणविरहित जग निर्माण करण्याच्या कांक्षेतून राष्ट्रवादाची कास धरली जाते पण परिणाम अगदी उलट होतो. परराष्ट्रिकांचे आणि त्याबरोबर परधर्मीयांचे शोषण करण्याचा सदरपरवानाच आम्हाला राष्ट्रवाद स्वीकारल्यामुळे प्राप्त होतो.
“बुद्धीच्या बळावर कोणताही मोठा बदल घडून येत नाही. बदल घडविण्यासाठी माणसाच्या भावनांना आवाहन केल्याशिवाय गत्यन्तर नाही. आपल्या ह्या हिन्दुस्थानाचा उत्कर्ष साधावयाचा असेल, आपल्या देशाला त्याचे गौरवशाली पूर्ववैभव प्राप्त करून द्यावयाचे असेल तर पहिल्याने जातिभेद मिटवावे लागतील आणि त्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या भावना चेतवाव्या लागतील; श्रद्धा जागवाव्या लागतील. जास्त उदात्त ध्येये त्यांच्या नजरेसमोर ठेवावी लागतील—-आपल्या उज्ज्वल परंपरा, आपल्या धर्मांचे प्राचीनत्व, त्यांचे सनातनत्व, त्याचे अन्य धर्मांपेक्षा असलेले श्रेष्ठत्व, त्यामधले वैविध्य, त्याची सर्वसमावेशक आणि सहिष्णु वृत्ती आम्हाला स्वतःला नीट समजून घ्यावी लागेल. आणि सर्व जगाला समजावून द्यावी लागेल. हा जनमानसामध्ये घडवून आणावयाचा प्रचंड बदल ही एक प्रकारची क्रान्तीच आहे. ही क्रान्ती घडवून आणताना क्वचित कोठे दोन संप्रदायां-मध्ये संघर्ष झाला, थोडाफार रक्तपात झाला तर तो क्षम्य आहे; नव्हे तो अत्यावश्यक आहे; कारण आजवरच्या इतिहासात कोणतीही क्रान्ती रक्तपातावाचून घडलेली नाही.” असा काहीसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोण आहे असे मला जाणवते. गेली सत्तर पंचाहत्तर वर्षे—-संघाच्या प्रारंभकाळापासून—-ह्या दृष्टिकोणापासून संघ रतिमात्र ढळलेला मला दिसत नाही. किंबहुना त्यामध्ये उत्तरोत्तर उग्रता आणण्याचे कार्य अर्वाचीन बौद्धिक-प्रमुखांनी केलेले आहे.
आपल्या धर्माचे श्रेष्ठत्व पटवून द्यावयाचे म्हणजे हिंदुधर्माची इस्लामशी, ख्रिस्ती-धर्माशी तुलना करावी लागते. त्या धर्मांमधली वैगुण्ये दाखवावी लागतात. तसे करण्या-साठी त्यांच्याशी भांडणे उकरून काढावी लागतात. मंदिरमशिदींचा विवाद निर्माण करावा लागतो. त्यांच्या धर्मातील कुफ्र आणि जेहाद ह्या संकल्पनांचा वारंवार उल्लेख करून त्यांच्याविषयी जाब मागावा लागतो. धर्माची व्याख्या फिरवून घ्यावी लागते. ती व्याख्या करताना कोलांटउड्या माराव्या लागतात. धर्म हा religion पेक्षा वेगळा आहे हे पुन्हा पुन्हा सांगावे लागते. राम-शिलापूजन करावे लागते—-रथयात्रा काढाव्या लागतात. हे सर्व श्रद्धेच्या आधारावर करावे लागते. “संघाला मुसलमानांशी संघर्ष नको आहे. मुसलमानांची कुरापत त्याला काढा-वयाचीच नाही. समस्त हिंदुमात्राने आत्मविश्वासपूर्वक हुंकार द्यावा, आणि त्या योगाने अन्यधर्मीयांना त्यांची जागा दाखवून द्यावी एवढीच त्यांची माफक इच्छा आहे.”
‘बाबरी’ मशिदीवरून घातला गेलेला ‘घोळ’ हे तो हुंकार हिंदुसमाजाकडून उमटावा ह्यासाठी घेतलेले निमित्त आहे. मंदिर ‘वहीं’ बनाएंगे ही हिंदूंचे पौरुष जागविण्यासाठी वापरावयाची घोषणामात्र आहे. मंदिर होणे हे महत्त्वाचे नाही. अखिल हिंदुमात्राने एकत्र येणे महत्त्वाचे आहे. मंदिर हे अंतिम साध्य नाही. हिंदूंच्या ऐक्याचे साधनमात्र आहे. म्हणून मंदिर बनविण्याची संघपरिवाराला घाई नाही. उलट त्यात जितका उशीर होईल तितका हवा आहे. ‘वहीं’ चा आग्रह नाही. हिंदु एकत्र येण्याचा अप्रत्यक्ष लाभ, अतिरिक्त लाभ म्हणून सत्तेचा उपभोग घ्यावयाला त्याची हरकत नाही. अंतिम साध्य काय तर अखिल हिंदुजनांचे एकीकरण! हिंदूंची संघटना! संघटनेसाठी संघटना! जाता जाता सत्तालाभ झाल्यास त्याचाही एकीकरणासाठी उपयोग. ही संघाची उद्दिष्टे. भाजपाची नव्हेत. भाजपा हा राजकीय पक्ष. तो संघविचाराच्या अधीन राहून राजकारणातल्या सर्व तडजोडी करीत असतो. ‘विश्व हिंदु परिषद’ हा संघाचा अवयव आहे. त्या परिषदेचे काम धर्मांच्या शिळ्या कढीला ऊत आणण्याचे आहे. पण हे थोडेसे विषयांतर झाले. ते विषय समजण्या-साठी उपयोगी पडावे ह्यासाठी केले.
आपल्या समाजाच्या अभ्युदयासाठी जसे धर्मैक्य उपयोगी तसेच राष्ट्रैक्यही उपयोगी—एकधर्मीयत्व हे एकराष्ट्रीयत्वाला पूरकच नाही तर अत्यावश्यक आहे असे देखील संघाची विचारसरणी मानते. एकधर्मीयत्वाचा मूलाधार एकसारख्या श्रद्धा, एकाच प्रकारच्या निष्ठा ह्या आहेत असेही संघाची विचारसरणी मानते. (आणि एकूणच हिंदूधर्मांच्या अमूर्त, तेजोमेघसदृश, स्वरूपाचे गुणगान चालू ठेवून त्याला किताबी मजहब करण्याचा प्रयत्न सुरू आहे.) ही जशी त्यांची गृहीतके आहेत तसेच त्यांचे आणखी एक अत्यन्त महत्त्वाचे गृहीतक भावनावेग निर्माण केल्याशिवाय माणसे कार्यप्रवृत्त होऊ शकत नाहीत हे आहे. ही सगळीच गृहीतके अतिशय विवादास्पद आहेत आणि विवेकवादाचा विरोध ह्या सगळ्याच गृहीतकांना आहे. विवेकवादाचा मूळ पायाच वेगळा आहे. विवेकवादाला श्रद्धा नको. इहवाद्याला आपल्या वर्तनाच्या नौकेचे सुकाणू श्रद्धेच्या, आप्तवाक्याच्या, अधीन ठेवावयाचे नाही. आपल्या वर्तनाच्या योग्यायोग्यतेच्या निर्णय विवेकवाद्याचा स्वतःचा आहे, आणि अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक कल्याण कशाने साधेल ही त्याच्या निर्णयाची कसोटी आहे. भावनांच्या आहारी न जाता विवेकावर आधारलेले वर्तन त्याला करता येते. अधिकाचे अधिक सुख कशाने साधेल ह्या निकषावर घासून विवेकवादी व्यक्ती आपल्या वर्तनाचे योग्या योग्यत्व ठरवीत असते. धर्माशिवाय जगणे म्हणजे नीतीने वागणे आज शक्य आहे असे त्याला वाटते. कदाचित हजार-दोनहजार वर्षांपूर्वी काही प्रदेशात जेव्हा देशांच्या सीमा स्पष्ट नव्हत्या तेव्हा ते शक्य नसेल.
आज प्रत्येकाला कोठल्या ना कोठल्या देशाचा नागरिक म्हणवावे लागते—-त्या देशाचे कायदे पाळावे लागतात, ते न पाळल्यास दंड भोगावा लागतो तसे पूर्वी काही धर्मांचे असेल. धर्म न पाळल्यास बहिष्कृत होण्याचे त्याला भय होते. आज समाज अधिक परिपक्व झालेला असल्यामुळे धर्माचे कायदे पुष्कळ शिथिल झाले आहेत. आज सामाजिक स्थिति अशी आहे की तो कोणताच विशिष्ट धर्म न पाळता स्पष्टपणे तो एखाद्या समाजात राहू शकतो. हे संपूर्ण जग विभिन्न देशांमध्ये वाटले गेले असल्यामुळे त्याला कोणत्या ना कोणत्या देशाचे नागरिकत्व घ्यावेच लागते. तो निधर्मी– धर्मनिरपेक्ष राहू शकतो पण त्याला कोणी राष्ट्रहीन राहू देत नाहीत. (राष्ट्रीयत्वासोबत राष्ट्रवाद त्याच्यावर लादला जातो.) तेवढ्यामुळेच एकराष्ट्रीयत्वासाठी एक-धर्मीयत्वाची गरज पूर्वी कधी असेल पण आज ती तशी राहिलेली नाही. एका राष्ट्रात विभिन्न धर्मी किंवा जे अजिबांतच धर्म मानत नाहीत असेही गुण्यागोविंदाने राहू शकतात. किंवा त्यांनी तसेच राहिले पाहिजे. आता धर्माची आणि राष्ट्राची सांगड घालणे म्हणजे घड्याळाचे काटे उलटे फिरविणे आहे. धर्माच्या नावावर हिंसेला प्रोत्साहन देणे—-प्रजेची धर्माच्या (किंवा जातींच्याही) आधारावर अल्पसंख्यक आणि बहुसंख्यक अशी वाटणी करणे, अल्पसंख्यकांवर बहुसंख्यकांनी सत्ता गाजविणे ह्यांची करावी तेवढी निर्भर्त्सना थोडी आहे—-हिंसेचे समर्थन ही नीचपणाची परिसीमा आहे. धर्माने अपरिवर्तनशील राहणे—-(उदा. इस्लाम) आणि राष्ट्राने धर्मांच्या आधारावर एकी साधणे हे आता इसवी शतकाच्या तिसऱ्या सहस्रकाच्या प्रारंभी आम्हा जगन्नागरिकांना मुळीच शोभा देत नाही.
आता त्यांच्या एका प्र नाचे उत्तर देतो. माणसाला कोठला ना कोठला ‘वाद’ अंगीकारणे भागच आहे काय असे श्री. खडपेकरांनी विचारले आहे. त्यावर उत्तर इतकेच की भांडवलवाद, साम्यवाद, अध्यात्मवाद, मानवतावाद, राष्ट्रवाद इत्यादींपैकी एक स्वीकारावयाचा आणि त्यामुळे त्याच्या विरोधात असलेले ‘वाद’ नाकारावयाचे अशी आवश्यकता नाही. सर्व वादांची गृहीतके तपासून पाहावयाचे काम सतत चालू ठेवण्याची मात्र आवश्यकता आहे. तसेच ही गृहीतके तपासणाऱ्यांची संख्या वाढती ठेवण्याचीही गरज आहे.
शेवटचा मुद्दा राहिला तो असा की साध्ये जरी चांगली असली तरी धर्मांची साधने सदोष असतात. उद्याच्या शांतीसाठी आजची हिंसा बहुतेक सर्व धर्म मान्य करतात. भलेही ते त्याला आपद्धर्म म्हणोत. परिणाम असा होतो की तो उद्या कधी उगवतच नाही. शान्ती मृगजळासारखी सतत दूर पळते.
जातीय दंगलीमध्ये जे चालते ते चोराला सोडून संन्याशाला बळी देणे किंवा वड्याचे तेल वांग्यावर काढणे हे कोणत्याही परिस्थितीत क्षम्य नाही. ‘स्वाभाविक प्रतिक्रिया’ म्हणून हिंसेचे समर्थन करणारांची निंदा जितकी करावी तितकी कमीच आहे.
गेल्या वर्षभरात खादीच्या निमित्ताने मी पुष्कळ प्रकट चिंतन केले. त्यात अनेक मुद्दे–मुख्यतः अर्थकारणविषयक घेतले. त्यावर वाचकांनी आक्षेप घ्यावे अशी अपेक्षा केली. थोडी चर्चा घडली, पण ती मुख्य मुद्द्यांवर न होता गैरमहत्त्वाच्या आणि आनुषंगिक विषयांवरच झाली. मी मुद्दा मांडला की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक युवकाला रोजगार
मिळणे गरजेचे असले तरी रोजगार शोधण्याचे काम त्या युवकावर टाकू नये. कारण त्याचे ते कामच नाही. त्याला रोजगार पुरविणे हे त्याहून वयाने मोठ्या असलेल्यांचे—-समाजधुरीणांचे काम आहे. त्यासाठी समाजाची घडी नित्य बदलत राहणे—-नव्या व्यक्तींना निर्मितीच्या वा सेवांच्या क्षेत्रात सामावून घेणे. त्याकरता समाजाने स्वतःला इष्ट प्रकारे घडविणे (mould करणे) आवश्यक आहे. ते जोवर जमत नाही तोवर ज्यांना रोजगार नाही त्यांना बेकार-भत्ता देणे हे सरकारचे—-पर्यायाने समाजाचे—-काम आहे. ___हा वरील मुद्दा मांडत असता मी एक विधान केले की रोजगार आणि उत्पादन ह्यांचा जो एकमेकांशी संबंध आहे, संदर्भ आहे तो नवीन पिढीच्या लक्षातच येत नाही की काय असे वाटण्यास जागा आहे. जातीच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये आरक्षण ठेवल्यामुळे आणि आरक्षणाला ‘उच्च’वर्णीयांकडून दलितांवर पूर्वी झालेल्या अत्याचारांच्या परिमार्जनाचे स्वरूप आलेले असल्यामुळे हा गैरसमज वाढण्यास मदत झाली आहे. आपल्या समाजात सामाजिक आणि आर्थिक समता आणण्याचे उद्दिष्ट आरक्षणामुळे दूर जात आहे. आर्थिक समता आरक्षणाने येणार नाही ती बेकारांना बेरोजगार भत्ता दिल्याने येईल. बेकारभत्ता देण्याविषयीचा माझा जो मुख्य मुद्दा होता तो डावलून—-ज्याची चिकित्सा व्हावयाची गरज होती ती न करता त्या सर्व चर्चेला निराळेच फाटे फुटले.
आपल्याला समता पाहिजे की आरक्षण पाहिजे? आरक्षणामुळे आणि ते मुळात सुचविलेल्या अवधीपेक्षा पुष्कळ जास्त काळ चालू ठेवून समता आणण्यात आम्ही सफल झालो काय? नोकऱ्यांसाठीची लायकी उमेदवाराने कोणाच्या कुशीत जन्म घेतला ह्यावर आपण किती दिवस ठरविणार? उमेदवाराच्या मातेच्या कुशीचा आम्हास आता विसर पडावयास हवा. त्याऐवजी तिचे पुनःपुन्हा स्मरण करून देणे व त्यायोगे परस्परांतील मत्सर, हेवादावा, असूया ह्यांना खतपाणी घालणे कितपत बरोबर आहे? बेकारभत्त्यावर सगळ्या जातींचा सारखाच अधिकार ठेवल्यासच आम्ही एकमेकांची जात विसरू बेकार-भत्ता दिल्यास नोकरी न मिळाली तरी कोणी उपाशी राहणार नाही. विवाहाचे वय खाली आणणे शक्य होईल. त्यायोगे ह्या राष्ट्रातील संपत्तीवरचा (GDP) सर्वांचा हक्क मान्य केल्यासारखे होईल. संपत्तीचे समान वितरण होण्याला मदत होईल. कोणाचे पूर्वज दलित होते ते पाहण्यासाठी त्यांचे वंशवृक्ष न तपासता आज कोण दरिद्री आहेत ते पाहा. म्हणजे गोवाऱ्यांसारख्यांना मोर्चे काढण्याची आणि त्यामध्ये शहीद होण्याची पाळी यापुढे येणार नाही.
सर्व दलितांनी पूर्वीपेक्षा अधिक मानाने जगावे अशीच माझी इच्छा आहे. अमकीच्या कुशीत जन्मलेलाच दलित किंवा अन्य कोणी असे मानावयाला माझे मन तयार होत नाही. कोणालाही जातीवरून म्हणजे जन्मावरून, त्याच्या पूर्वजांवस्न दलित, मराठा, माळी, धोबी किंवा ब्राह्मण म्हणणे आणि त्याला त्यावरून एखादी नोकरी देणे वा नाकारणे– –त्याला त्याच्या आईवस्न शिवी दिल्यासारखे मला वाटते. असो. हा माझ्या मनाला अत्यन्त क्लेश देणारा विषय मी
आज येथे थांबवितो, पण ह्याउपर काही शंका असतील तर त्या निःसंकोचपणे विचाराव्या.
श्री. प्रियदर्शन पंडित ह्यांच्या पत्राची वेगळी दखल आता घेण्याची मला गरज वाटत नाही. माझ्या लेखमालेमध्ये त्यांच्या मुद्द्यांची उत्तरे देऊन झाली आहेत. डॉ. उल्हास जाजू ह्यांच्या ‘खादीचे नवसर्जन’ ह्या लेखातील काही विधानांचा परामर्श येथे घेतो. ऑगस्ट २००१ मध्ये, १६५ पानावर ते म्हणतात —- यंत्रांनी उत्पादित वस्तू बाजारात श्रममूल्य इतके खाली आणतात की श्रमजीवी कुटुंबाला दोन घास मिळणे अशक्य होऊन बसते. उद्योगवादाचा सगळा आधारच शोषणावर आहे. उत्तर—- यन्त्रयुगामध्ये पारंपरिक जातिविशिष्ट उद्योग चालू शकत नाहीत. अनेक पिढ्यांनी एकाच प्रकारचा (उदा. विणकाम) उद्योग करून प्राप्त केलेले कौशल्य यन्त्राच्या रचनेमध्ये समाविष्ट केले जाते. मानवी स्नायु किंवा जनावरांचे स्नायु ह्यांऐवजी वाफेचा किंवा विजेचा वापर सुरू झाल्यापासून यन्त्रयुग सुरू झालेले नाही. ते इंग्रजांनी आणले नाही. यन्त्रयुग आणि औद्योगिक क्रान्ती ह्या गोष्टी एक नाहीत. चाकाचा वापर सुरू झाल्यापासूनच यन्त्रयुगाचा प्रारंभ झाला असे मानले पाहिजे. तरफेचे तत्त्व, मळसूत्राचे तत्त्व ही जसजशी मानवी आकलनामध्ये आली आणि त्या तत्त्वांचा वापर करून आपले मानवी श्रम कमी करण्यास सुस्वात झाली तेव्हाच यन्त्रयुगाला प्रारंभ झाला. धान्य कुटण्यावाटण्यापेक्षा दळण्याने श्रम कमी होतात हे ज्या क्षणी सामान्य जनांच्या लक्षात आले त्या ऐतिहासिक क्षणी मानवाने यन्त्रयुगात प्रवेश केला. ठोकून पातळ करण्याऐवजी लाटून पातळ करणे हा मानवी इतिहासामधला मोठा टप्पा आहे. शेतीमध्ये जमीन खोदण्याऐवजी नागरणे सुरू झाले तेव्हाच मानवी श्रम कमी झाले—-माणसांच्या ऐवजी जनावरांना नांगरांना जुंपणे सुरू झाल्याबरोबर बेकारीचा-बेरोजगारीचा—प्र न सोडविण्याची पाळी तत्कालीन लोकांवर आली. कारण पुष्कळ माणसे रिकामी झाली.
आपल्या देशांमधली वस्त्रविद्या पुष्कळ प्रगत विद्या होती. मागांमध्ये बहुतेक यान्त्रिक सुधारणा फार पूर्वी झाल्या होत्या. सूत कातण्याच्या साधनांमध्ये मात्र फरक झालेला नव्हता. ते शोध इंग्लंडात लागले आणि आपल्याकडे ते बाहेरून आले. ते इकडे आले त्याआधीच ह्या यन्त्रांनी निर्माण केलेल्या बेकारीचा अनुभव इंग्रजांनी घेऊन झाला होता. Luddites नी तेथल्या गिरण्यांची केलेली मोडतोड ते (इंग्रज) अनुभवून चुकले होते. त्या बेरोजगारीवर त्यांनी तोडगेही शोधून काढले होते. आम्हाला मात्र बेरोजगारीचा मुकाबला करावयाचा कसा हे अजून समजलेले नाही.
यन्त्रांचा वापर आपण कोणत्याही परिस्थितीत टाळू शकत नाही. तो कधीच कमी होणार नाही, तो सतत वाढताच राहणार हे आम्ही जाणण्याची गरज आहे. श्रमाचे परिमाण सतत कमी होत राहणार. लोकसंख्येमध्ये मुळीच वाढ झाली नाही तरी काही माणसांना श्रम वाचविण्याच्या कल्पना सुचणार. ते एकूण उत्पादन वाढते ठेवून आपले श्रम कमी कसे होतील त्याच्या युक्त्या शोधून काढणार! श्रमांची गरज कमी झाली की पूर्वी त्या प्रकारच्या श्रमांत गुंतलेले लोक मोकळे होणार आणि त्यांना नवे काम शोधावे लागणार.
इंग्रज येथे येण्यापूर्वीही आपल्या देशात हे सारे घडतच होते पण ह्या बदलाची लय संथ होती. इंग्रजांनी आपल्याकडे तयार माल आणल्याबरोबर ती लय बिघडून गेली. इतकेच नाही तर ती लय आम्हाला आजपर्यंत प्राप्त करता आलेली नाही. चुकलो. नवीन गतीशी आम्हाला अजूनही जुळवून घेता आलेले नाही.
मिलच्या कापडाऐवजी सर्वांनी खादी वापरल्यामुळे आपण यन्त्रयुगाच्या प्रगतीला लगाम घालू शकत नाही. आपल्या देशात जरी नाही तरी जगभर यन्त्रयुग आपल्या स्वाभाविक गतीने प्रगत पावणार. खादी ग्रामोद्योग म्हणजे हातकागद, बैलघाणी, हाताने दळणे वगैरे साधने सगळ्यांनी स्वीकारली तर उत्पादनात आणि त्यामुळे उपभोगात कोणतीही भर पडणार नाही. उलट उपभोग झपाट्याने खाली येतील. कृत्रिम रोजगारामुळे व्यक्तिशः काही थोड्या लोकांची क्रयशक्ती वाढली असे वाटले तरी ती समूहशः घटते. कारण समाजातील एकूण उत्पादनच अतिशय घसरते. ग्रामोद्योग फार थोड्यांनी चालवा-वयाचा. जे ग्रामोद्योग चालवितील त्यांना जास्त रोजगार द्यावयाचा (म्हणजे त्यांनी फक्त कलाकुसरीच्या वस्तूच करावयाच्या) आणि बाकीच्यांनी गरजेच्या वस्तूंचे (कापड वगैरे) प्रगत साधनांनी भरपूर उत्पादन करावयाचे असे केल्यास समाज संपन्न होईल. सगळ्यांनी सूत कातल्याने आणि आपल्यापुरता कागद केल्याने समाज दरिद्री होईल.
कलाकुसरीची कामे करणाऱ्याला कत्तिनीपेक्षा जास्त वेतन मिळते कारण कत्तिन एकूण राष्ट्रीय उत्पन्नात फार थोडी भर घालते. देशामधल्या अर्ध्या लोकांनी रोज एक-दोन तास कातले तरी ते जास्तीत जास्त दहा गिरण्याइतके कातू शकतील असा माझा अंदाज आहे. गिरणीमधला एक कामगार ६०० ते ८०० चात्या ८ तास पर्यंत चालवतो. आणि गिरणी २४ तास चालते. कत्तिन जास्तीत जास्त ८ तास काम करते. म्हणजे एक गिरणी कामगार कमीत कमी २५०/३०० कत्तिनींचे काम करतो. एका गिरणीत एका पाळीत पाच हजार कामगार आहेत असे मानल्यास एक गिरणी ५०००४३ पाळ्याX६००/८००चात्या = ९०,००,०००४८ तास = ७,२०,००,००० इतक्या चात्यांचे काम एका दिवसात करते. सर्वसाधारणपणे कातण्याचे काम नागरिकाला दिवसाला तास दीड तासापेक्षा जास्त वेळ करता येणार नाही. असो.
यंत्रांनी उत्पादित वस्तु बाजारातील श्रममूल्य खाली आणतात असे श्री जाजू कशाच्या बळावर म्हणतात? वास्तवात यंत्रांनी उत्पादित वस्तू बाजारातील श्रममूल्य वाढवीत असतात. ज्या समाजात सगळ्या वस्तू यंत्रांनी बनतात (युरोप-अमेरिकेत) तेथे वस्तू स्वस्त असतात. म्हणजेच श्रम महाग असतात. प्रत्येकाला त्याच्या कमी श्रमांत पुष्कळ जास्त वस्तू मिळतात. श्रममूल्य पैशांत कितीही असो —- एकूण श्रमांच्या मोबदल्यात वस्तू स्वस्त असतात. अशा वेळी
श्रमजीवी मनुष्याला दोन घास मिळण्याची पंचाईत का पडावी? (भारतात) श्रमजीवी मनुष्याला उपास पडतात कारण येथे अन्नधान्याचे उत्पादन कमी आहे किंवा श्रमजीवीच्या श्रमांची किंमत समाजातील सगळेच कमी मानतात. त्याच्या श्रमाच्या मूल्याचा संबंध बाजारातल्या मालाशी नसतो. कितीही जास्त प्रमाणात धान्य बाजारात आले तरी त्याला उठाव नसतो. धान्य कोठारात कुजून जाते पण श्रमजीवीचे वेतन ते धान्य खरीदण्यासाठी पुरत नाही. कोणाच्या श्रमांची किंमत किती हे आम्ही आधीपासून ठरवून ठेवले आहे. हे गणित आमच्या बापजाद्यांपासून आम्ही शिकलो आहोत. त्या बाबतीत आम्ही स्वतःची अक्कल चालवीत नाही. ह्यांचा यंत्रोत्पादित मालाशी अजिबात संबंध नाही.
मनामधली पैशात सर्व उत्पादन मोजण्याची आपली सवय मोडल्याशिवाय आणि मनावरचा कोणाच्या श्रमांची किंमत किती ह्याविषयीचा संस्कार हटविल्याशिवाय माझी मांडणी समजणार नाही आणि समतेकडे आपली वाटचाल होणार नाही.
श्री. निखिल जोशी ह्यांची एक शंका फेब्रुवारी अंकामध्ये प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये ते म्हणतात की मोहनीची विश्वास आणि श्रद्धा ह्यामध्ये गल्लत झालेली दिसते. “एखाद्या गृहीतकावर आधारलेली अनुमाने चुकीची ठरत असूनही त्या गृहीतकाला कवटाळून बसणे ही अंधश्रद्धा होय. देव मानणे हे ह्या वर्गात येते. जोवर अनुमाने खोटी ठरत नाहीत तोवर ते गृहीतक खरे आहे असे मानून सावध व्यवहार करणे ही अंधश्रद्धा नाही. पैसा आहे असे गृहीत धरून केलेले आचरण जर अपेक्षित फल देत असेल तर तो कोठे आहे ? इ. प्र नांची उत्तरे नकारार्थी मिळाली तरी ती अंधश्रद्धा ठरत नाही.”
“मात्र एकदा एखाद्या बँकेचा किंवा बँकेच्या पैशातील खोटेपणा समजल्यावरही त्यावर विश्वास ठेवणे अंधश्रद्धा ठरेल.” निखिल जोशींनी मुद्दा चांगला काढला आहे.
पैसा हा साध्य क्वचित आणि साधन पुष्कळदा असा असतो. तो दोन मानवां-मधल्या व्यवहाराचे माध्यम असतो. एका बाजूला माणूस आणि दुसरीकडे जनावर अशांमधले किंवा एका देशाचा एक नागरिक आणि दुसर्या देशाचा नागरिक ह्यांच्या मधल्या व्यवहाराचे माध्यम तो होऊ शकत नाही. कारण त्याला व्यवहार करणाऱ्या दोन्ही पक्षांकडून मान्यता असावयाला पाहिजे. दोन व्यक्तींमधला व्यवहार भौतिक पातळीवरचा असतो. त्या व्यवहारात बहुधा देवाणघेवाण असते. देवाशी देवाणघेवाण होताना देव दुसरा पक्ष असतो. माध्यम नसतो. आणि व्यवहार भौतिक पातळीवरचा नसतो. एखाद्या घटनेचे कर्तृत्व आपण देवाकडे देतो त्यावेळी देवाने काहीच केलेले नसते. जेव्हा पैशाने एखादे कार्य केले असे आपण समजतो तेव्हा ते पैशाने केलेले नसते, ते दुसऱ्या पक्षाने केलेले असते. पण दोन्ही पक्ष पैशाच्या कर्तृत्वावर श्रद्धा ठेवणारे असल्यामुळे ते दुसऱ्या पक्षाने ते कार्य केले आहे असे मानत नाहीत. ते पैशामुळे त्यांचे कार्य झाले असे मानतात. कोणत्याही कारणामुळे दुसऱ्या पक्षाची मान्यता त्या माध्यमाला मिळू शकली नाही तर पैसा खोटा ठरतो. जसा वैष्णवांसाठी शिव आणि आर्यसमाजी मंडळींसाठी रामकृष्णादि अवतार हे खोटे देव. अन्य धर्मीयांचेच देव आपणासाठी खोटे असतात असे नाही, आपल्याच हिंदु धर्मातले काही देव इतरांसाठी खोटे असतात.
पैशाने जेव्हा आपले काम होते तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे योग्य आणि जेव्हा होत नाही ती अंधश्रद्धा अशापैकी ही बाब नाही. —- दिवाकर मोहनी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.