संकलक आणि गुराखी जीवनपद्धती

सामाजिक शास्त्रांमध्ये एखाद्या समाजाचा आदिमानवी स्थितीपासून किती विकास झाला आहे हे तपासायला एक निकष वापरतात. त्या समाजात वस्तूंचे उत्पादन करण्याची प्रक्रिया, तिच्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि उत्पादन करणाऱ्यांचे एकमेकांशी संबंध, हा त्या समाजाचा पाया समजतात. या संरचनेला मार्क्सने पायाभूत संरचना, infrastructure, असे नाव दिले. समाजाचे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक वगैरे व्यवहार म्हणजे या पायावरची इमारत किंवा Superstructure. पायाच अखेर इमारत कशी असेल ते ठरवतो, ही मार्क्सची मांडणी. ती सर्वमान्य नाही.

राज्यव्यवस्था आणि तिच्यातील सत्तेसाठीचा संघर्ष यांना पुरेसे वजन दिलेले नाही, ही एक टीका, प्रामुख्याने मार्क्सच्या अनुयायांकडून होणारी. बिगर-मासिस्टांच्या मते पायाच्या(च) विचारातून धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक, असे बारकावे स्पष्ट होत नाहीत, हीही एक त्रुटी. गाडगीळ आणि गुहांना हे आक्षेप अपुरे वाटतात. भूक्षेत्र, त्यातल्या मातीचा पोत (कस), त्यात मिळणारी खनिजे, त्यावर उगवणाऱ्या वनस्पती, त्यावर वावरणारे प्राणी, या सर्व घटकांनाही उत्पादनप्रक्रियेसोबतच महत्त्व द्यायला हवे, असे लेखकद्वयाचे मत. नुसत्या उत्पादनप्रक्रियेऐवजी (mode of production) या सर्व संसाधनांचा वापर कसा होतो (mode of resource use) ही संकल्पना त्यांना जास्त उपयोगी वाटते.

उत्पादनप्रक्रियेच्या निकषावर समाजजीवनाच्या तीन स्थितींचे मार्क्सने वर्णन केले—-अनघड (primitive) साम्यवाद, सामंतशाही आणि भांडवलशाही—-या त्या तीन स्थिती. कुठेकुठे एका टोळीने इतर टोळ्यांमधून ‘गुलाम’ घेऊन त्यांना उत्पादनात वापरूप घेणेही इतिहासात दिसते.
संसाधन-वापराचा विचार करता जीवनशैलीचे चार प्रकार दिसतात. पाने-फळे-मुळे गोळा करणे, प्राण्यांची शिकार करणे आणि थोडीफार फिरती किंवा भटकी शेती (Shifting agriculture) करणे, ही पहिली स्थिती, ‘संकलक’ समाजाची. चराईसाठी कुरणे शोधत गुरांच्या कळपांसोबत फिरणे, ही गुराखी (pastoral) स्थिती. एकाच भूक्षेत्रात शेती करत राहणे, ही स्थिर–शेतीची (settled agriculture) स्थिती. आणि शेवटी औद्योगिक उत्पादनाची (industrial) स्थिती. संसाधन-वापराच्या दृष्टीने या चारही जीवनपद्धतींचा अभ्यास पाच अंगानी करता येतो.

एक म्हणजे तंत्रज्ञान, निसर्गातून वस्तू कोणत्या ऊर्जेच्या वापराने ‘कमावल्या’ जातात, त्यासाठी कोणता ज्ञानसाठा लागतो, हे अंग. वस्तू जिथे उपजतात तिथून कुठेकुठे जातात, संसाधने कशी ‘वाहतात’, हे अर्थशास्त्रीय अंग.

समाजात व्यक्तींची संख्या किती असते, त्यात काय प्रकारचे श्रमविभाजन असते, संसाधने कोणी, किती आणि कशी वापरायची याबद्दल काय यंत्रणा मान्य केली जाते, या सामाजिक बाबी.
हे सारे काहीतरी विचारप्रणालीनुसार होते. माणसे आणि निसर्ग यांच्या संबंधा-बद्दल काही धारणा (belief systems) असतात. वापर-गैरवापर यासंबंधी धारणा असतात. हे सारे वैचारिक, ideological अंग.

आणि शेवटी प्रत्येक जीवनपद्धती पर्यावरणावर नेमका काय परिणाम करते, हे पर्यावरणीय, ecological अंग.

ह्या पाच अंगांनी जीवनशैली तपासताना लेखकद्वय एक महत्त्वाची पर्यावरण-शास्त्रीय कल्पना वापरते, ती म्हणजे एकूण संसाधनांच्या उपलब्धतेप्रमाणे वागणुकीत होणारे फरक. पर्यावरणशास्त्रात जीवांचे दोन वर्ग मानले जातात. एक वर्ग असा असतो की दर जनकाला खूपशी पिल्ले होतात, पण या पिल्लांच्या वाढीत किंवा विकासात जनक काहीही भाग घेत नाही. एका गव्हाच्या दाण्याला एक लोंबी लागते, पण त्या काहीशे दाण्यांना जनक–दाणा काहीच ‘मदत’ करत नाही. धान्ये, कीटक, गवत, या अशा बहुप्रसू–जनकांच्या जाती. यांना ‘आर-वर्गी’ (type r) जीव म्हणतात. याउ लट वाघसिंह, गोरिला वगैरे जीवांना पिल्ले थोडीशीच होतात, पण त्या पिल्लांचा बराच काळ पालकांच्या देखरेखीखाली जातो. इथे नुसते ‘जनक’ नसतात, तर ‘पालक’ असतात. यांना ‘के-वर्गी’ (type k) जीव म्हणतात. गाडगीळ-गुहा आवर्जून नोंदतात, की संसाधने किती प्रमाणात उपलब्ध आहेत याप्रमाणे मानवी समाजही आर-वर्गी किंवा के-वर्गी त-हेने वागतात.

तीन जीवनशैली, पाच अंगे, संसाधनांच्या उपलब्धीनुसार होणारे फरक, हे सारे तपासायला लेखकद्वय अनेक शोधनिबंधांचा आधार घेते, आणि ते नोंदते. आपण मात्र त्या तपशिलात न जाता अखेर दिसणारे चित्रच नोंदू.

संकलक जीवनपद्धती : माणसाच्या इतिहासाचा सर्वात जास्त काळ या संसाधन-वापराच्या पद्धतीने व्यापला आहे. आजही काही हजार माणसे या पद्धतीने जगतात. माणसांच्या स्नायूंची ऊर्जा, हे संकलनाचे ‘एंजिन’. अन्न शिजवायला इंधन म्हणून लाकूड वापरले जाते, आणि तेही स्नायू वापस्न गोळा केले जाते. वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य वस्तू, जुजबी दगडी–लाकडी हत्यारे, हे सारे भोवतालचा परिसर पुरवतो. अशा वस्तू साठवण्याची आणि दूरवर वाहून नेण्याची क्षमता नसते. गरजही नसते, कारण माणसेच भटकी असतात. भूप्रदेश उष्णकटिबंधातल्यासारखा खूप उपजाऊ असला तर टोळ्यांचे क्षेत्र लहानसे असते. खडतर परिस्थितीत जगणाऱ्यांना दूरवर भटकावे लागते. वापरातल्या वस्तूंमधली विविधता वरकरणी भरपूर असते. उदाहरणार्थ, ॲमेझॉनच्या खोऱ्यातील काही टोळ्या काही शे वनस्पती आणि प्राणी खातात. त्यांच्या भाषेत पाचशे ते आठशे जीवजातींची नावे आहेत. पण हे सारे एकाच क्षेत्रातले असल्याने ‘एकूण’ विविधता मर्यादित असते. जुजबी ख्यातली टोळ्यांमधली देवाणघेवाण सोडता सर्व ‘अर्थव्यवहार’ टोळीतल्या टोळीतच होतात.
समाजांचे आकार लहान असतात. नातेसंबंधाने जोडलेली काही शे माणसे, ही टोळीची, जमातीची मर्यादा असते. इतर टोळ्यांशी संबंध कमी असतो, आणि फारदा तो क्षेत्राबाबतच्या संघर्षाचा असतो. श्रमविभाजन मुख्यतः वय आणि लिंग याप्रमाणे घडते. दुय्यम स्तरावर ज्ञान आणि नेतृत्वगुण यांचा श्रमविभागणीवर परिणाम होतो, जसे, उपलब्ध माहितीची जुळणी कस्न कोणत्या दिशेला सरकायचे ते पुरुष ठरवतात. सुट्या माणसांना मालमत्तेचे हक्क नसतात. कोणीही कोणतेही संसाधन हाताळू शकतो/शकते, पण ते श्रमविभाजनाच्या मर्यादांमध्येच.

आपल्या क्षेत्रातील वनस्पती आणि प्राणी यांचे ज्ञान संकलक समाजांना असते, पण या क्षेत्रमर्यादेमुळे ते सुट्या माहितीच्या साठ्याच्या रूपात असते. निसर्ग लहरी आहे, आणि त्यावर माणसांचे कोणतेही नियंत्रण असू शकत नाही, ह्या धारणा सार्वत्रिक असतात. झाडे, प्राणी, दऱ्याडोंगर, नद्यानाले, यांसारखाच माणूस हाही निसर्गाचा सदस्य असतो. आणि मर्यादित क्षेत्रात वावरणारी माणसे आपल्या क्षेत्रातल्या विशिष्ट झाडा-प्राण्यांना, ओढ्या-डोंगरांना पवित्र मानताना आढळतात. टोळीच्या सदस्यांचे अशा नैसर्गिक रचनांशी सख्य आणि शत्रुत्व असते. कधीकधी सुट्या प्राण्या झाडांऐवजी पूर्ण जीवजातींना ह्या शत्रुत्व–मित्रत्वाच्या भावाने पाहिले जाते. संकलक धारणा (belief systems) आणि विचारप्रणाली (ideology), या अशा असतात.

पर्यावरणातल्या घटकांचा वापर करण्याबद्दल अनेक निबंध असतात—-जसे, काही वयाचे प्राणी शिकारीला अयोग्य मानले जातात, काही भूप्रदेशातल्या वनस्पती वापरात आणणे निषिद्ध मानले जाते, वगैरे. लेखक असे दहा नमुन्यांचे निर्बंध नोंदतात. अशा निबंधांमागे संसाधनाचा शाश्वत पुरवठा होत राहावा ही इच्छा असते, पण ती त्या ख्यातच व्यक्त केली जाते असे नाही. पण एकूण कल मात्र हिशेबी, विवेकी पद्धतीने वापरली गेलेली संसाधने पुन्हापुन्हा उपलब्ध होत राहतील याची खात्री करून घेण्या-कडे असतो.

असे नैसर्गिक वस्तूंचे पुनर्नूतनीकरण होत राहण्यासाठी वापरले जाणारे (आणि आपण वापरू शकतो असे) पाच निर्बंध लेखक नोंदतात.
(क) काही भूप्रदेशातून संसाधने मुळीच घेतली जात नाहीत.
(ख) काही महत्त्वाच्या जीवजाती इतर अनेक जीवजातींच्या जगण्या-तगण्याला मदत करत असतात. अशा ‘कळीच्या’ जीवजातींना कधीच हात न लावणे.
(ग) प्रत्येक जीवाच्या वयाचे काही टप्पे हळवे (vulnerable) असतात, उदाहरणार्थ, घरटी बांधून अंडी देण्याच्या वयातले पक्षी. संसाधनांच्या या हळव्या अवस्था संकलनातून आवर्जून वगळणे.
(घ) दर वर्षाचा काही भाग असा राखणे, की त्यात साठवणीवर जगून शिकार-संकलन पूर्णपणे बंद राहील. असे ‘चातुर्मासी’ उपासही पर्यावरणाच्या स्थैर्याला मदत करतात.
(च) कोणत्याही संसाधनाच्या वापराचे अधिकार विशिष्ट लिंगाच्या आणि वयाच्या माणसांनाच बहाल केले, तर तेही पर्यावरण राखायला उपयुक्त ठरते. इथे संकलनाचेच हक्क राखीव आहेत पण उपभोग मात्र सार्वत्रिक आहे.

संकलक समाजांमध्ये या प्रकारचे निर्बंध नेहेमीच आढळतात. अनेक जीवजातींचा वापर करत, पण तो नियंत्रित ठेवून हे समाज जगतात. यामुळे पर्यावरणाला स्थैर्य मिळते. एकूणच ही संसाधन–वापराची पद्धत पर्यावरणावर नगण्य परिणाम करते.

गुराखी (पशुपालक) जीवनपद्धती : सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी हिमयुग संपले आणि पृथ्वीच्या उष्णकटिबंधाजवळ येऊन ठेपलेले हिमनद ध्रुवांकडे सरकले. माणसांना या सुमारासच काही वनस्पती आणि प्राण्यांना माणसाळवता आले. हवामान आणि झाडोऱ्याचा प्रसार यामुळे संसाधन-वापर जास्त तीव्र झाला असणे शक्य आहे. पशुपालन आणि शेती हे असे संकलनापेक्षा तीव्र संसाधन-वापर आहेत. इतिहासात या दोन जीवनपद्धती ‘साथ-साथ’ पसरताना दिसतात. तापमान आणि पाऊस जास्त असलेल्या भागात शेतीला जास्त महत्त्व दिसते. कमी पाऊस, डोंगराळ आणि उंचावरचा प्रदेश हे पशुपालनाला उपयुक्त ठरतात. आणि याचेच एक अंग म्हणजे पशुपालन भटके असते. मध्य आशिया, मध्य आणि उत्तर आफ्रिका, या क्षेत्रांमध्ये बरीच वर्षे भटकी गुराखी जीवनपद्धतीच प्रामुख्याने प्रचलित होती.

या संसाधन-वापरात जनावरांची ताकदही माणसांना उपलब्ध होते. वाहतूक सोपी होते. गुरांसोबत फिरण्यात अन्नसाठा नेहेमी सोबत असतो, त्यामुळे वेगवेगळ्या पर्यावरणी स्थितींचा जास्त लवचीकपणे वापर करता येतो.

संकलक समाजांपेक्षा लांब पल्ल्यांचे प्रवास गुराखी करू शकतात. जड सामान, दुर्मिळ सामान, यासोबतच गुराखी समाज माहितीचीही वाहतूक करत असतात. शेती करणाऱ्या समाजांशी त्यांची देवाणघेवाणही भरपूर असते. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे असे समाज स्थिर शेती करणाऱ्यांशी झगडण्यासाठी आपल्या हालचालींमुळे, भटक्या वृत्तीमुळे जास्त ‘तयार’ असतात. चंगीजखान आणि त्यासारख्यांनी मध्य आशियावर आणि युरोपावर वचक ठेवला, ते उगीच नव्हे. गुराखीपणाच्या उच्चीच्या काळात ते समाज खूपसे आर-वर्गी (बहुप्रसू, पालनपोषणाची पद्धत क्षीण) वृत्तीने वागताना आढळतात.

संकलक समाजांपेक्षा गुराखी समाज मोठे असतात, पण मुख्य दुवा नातेसंबंधांचाच असतो. काही हजारांचे हे समाज भटकंतीमुळे इतर समाजांशीही सारखे संपर्कात येत असतात. श्रमविभागणी वय, लिंग, नेतृत्वगुण यावर बेतलेली असते, जसे, दूध काढणे आणि जनावरांची निगा राखणे हे बायकांचे काम, तर प्रवासात गुरे सांभाळणे आणि प्रवासांची आखणी हे पुरुषांचे काम. समाजाच्या या अवस्थेत खाजगी मालमत्तेच्या कल्पनेची सुस्वात दिसते. पण गुरांचे कळप खाजगी असले तरी चराईच्या कुरणांवरचा हक्क सामाईक असतो. एकूण वृत्ती समतेची आणि सहकार्याची असते. इतर गटांशी संघर्ष करताना गटांतर्गत सहकार्य तर फारच महत्त्वाचे असते.

गुराखी आयुष्य वेगवेगळ्या परिस्थितींशी आणि भूप्रदेशांशी जुळत जाणारे असते. माणसांनी स्वतःला निसर्गापेक्षा वेगळे, निसर्गावर मात करू शकणारे असे समजण्याची सुरवात गुराखी अवस्थेत झाली असणे शक्य आहे. इतर स्थिर आणि भटक्या गटांशी झगडून संसाधनांचा काही महत्त्वाचा भाग कमावणे (बळकावणे) हे धोरण असते. यामुळे संसाधन-वापरात संयम असा फारसा नसतो. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मांमध्ये जिवंत रचनांना पावित्र्य बहाल केले जात नाही, उलट इतर समाजांना पवित्र वाटणाऱ्या रचनांचा नाश करण्याचे आवाहन असते. हे तीन्ही धर्म गुराखी समाजांमध्ये उपजलेले आहेत. देवक (totem) मानण्याची प्रथा नाही. देवांचे संच नाहीत. निसर्गाला आपल्याला धार्जिणे करून घेणे आवश्यक मानले जात नाही, कारण अभावाच्या काळात संसाधने असलेल्या क्षेत्राकडे सरकता येते. या साऱ्यामुळे गुराख्यांचे वैचारिक जीवन कर्मकांडविरहित असे असते. थोडीफार बंधने कुठेकुठे दिसतात आणि ती मुख्यतः कोणत्या जनावराने, कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या काळात चरायचे, इतपतच असतात.

गुराखी जीवनपद्धतीने अतिचराईतून भूक्षेत्रांच्या वाळवंटीकरणाला मदतच केली आहे, हे इतिहासही दाखवतो आणि सद्यःस्थितीही. व्यापार, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण हेही पर्यावरणाचा -हासच करतात. पण सर्वाधिक महत्त्वाची बाब बहुधा ही, की गुराखी जीवनपद्धती माणसाला निसर्गाचा मालक मानण्यास मदत करते, आणि हे पर्यावरणाच्या हासाचे मूळ ठरू शकते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.