सत्य जाणण्याचे विज्ञानाहून अन्य मार्ग आहेत काय?

विज्ञान आपल्याला सत्य सांगते का? विज्ञान आणि विज्ञान नसलेल्या गोष्टी यातील फरक कसा सांगता येईल? जर वैज्ञानिकांच्या एका गटाने आपणाला जैविक प्रक्रिया केलेले अन्न (genetically modified foods) धोकादायक नसते असे सांगितले, व दुसऱ्या वैज्ञानिकांच्या गटाने सांगितले की असे अन्न धोकादायक असते; तर कोणावर विश्वास ठेवायचा? या प्र नांची उत्तरे देण्यासाठी आपणाला वैज्ञानिक एखाद्या निष्कर्षाप्रत कसे पोहचतात, हे पाहिले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून निष्कर्ष कसा काढला जातो हे पाहिले पाहिजे.
चांगले विज्ञान हे जाहीरपणे केले जाते. त्यामध्ये काही लपवाछपवी केली जात नाही. वैज्ञानिक आपले निष्कर्ष जाहीर करतात व इतर वैज्ञानिकांना त्याची तपासणी करू देतात. इतर वैज्ञानिक पूर्वीच्या निष्कर्षाची छाननी करून तो चुकीचा आहे की बरोबर आहे ते ठरवतात. आपल्या सभोवतालच्या जगाबद्दलचे स्पष्टीकरण करण्यात विज्ञानाला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे याबद्दल दुमत नाही.
प्रत्येकाचे समाधान होईल अशा रीतीने विज्ञानाची व्याख्या अजूनपर्यंत तरी कोणी करू शकलेला नाही. निसर्गातील नियमांचा अंतिम पडताळा विज्ञान देऊ शकत नाही, याचे कारण म्हणजे जरी आपण विज्ञानातील कल्पनांची चाचणी पुनःपुन्हा करू शकत असलो तरी नियमास अपवाद नसेलच ह्याविषयीची खात्री आपण देऊ शकत नाही. विज्ञान आपणाला अंतिम सत्य देऊ शकणार नाही. विज्ञान अंतिम सत्य का देऊ शकणार नाही, हे पाहण्यासाठी आपल्याला विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची तपासणी करण्याची गरज आहे. विज्ञानाच्या तत्त्वज्ञानाची तपासणी म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीविषयी विचार करणे—-गृहीतके, माहिती व निष्कर्ष ह्या गोष्टींची एकेक करून चिकित्सा करणे. विज्ञानाचे तत्त्वज्ञान वैज्ञानिक पद्धतीची चिकित्सा करते. विज्ञान हे अनुभवजन्य ज्ञाना-बद्दल चर्चा करते. अनुभववाद कॉमन-सेन्स सारखाच वाटेल, परंतु जगाविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेण्याची ती अगदी अलीकडील पद्धत आहे. गॅलिलिओ गॅलिली, रॉबर्ट बॉइल, आयमॅक न्यूटन आणि इतर वैज्ञानिकांनी असे दाखवून दिले की आनुभविक निरीक्षणा-तून (पंचज्ञानेंद्रियाद्वारे) कळलेल्या वस्तुस्थितीमुळे आपण कल्पिलेल्या जगाविषयीच्या चित्राचा संपूर्ण कायापालट होऊ शकतो. ह्या वैज्ञानिकांनी लावलेल्या शोधांमुळे १६ व्या व १७ व्या शतकात वैज्ञानिक क्रांती झाली. विज्ञानाने जादूची साथ सोडल्याचा हा काळ होता. विज्ञानामध्ये निरीक्षणांची पुनःप्रतीति असते आणि खुलेपणाने संशोधन प्रसिद्ध होत असते. गुप्त वा गूढ मजकूर असा प्रकार विज्ञानात नसतो. जेव्हा प्रयोग फसतो तेव्हा आपण स्वर्गाला किंवा प्रयोगकर्त्याच्या ‘पावित्र्याला’ दोष देत नाही.
अर्थात विज्ञानातील अनुभववाद याही तत्त्वज्ञानात्मक समस्या निर्माण करतो. एखाद्या गोष्टीच्या निरीक्षणावस्न कळलेल्या वस्तुस्थितीची सिद्धान्ताकडे वाटचाल कशी होते? झाडावस्न सफरचंद खाली पडते, हे पाहिल्यानंतर त्याचा पडताळा ‘हातातून जरी सफरचंद टाकले तरी ते खाली पडते’, किंवा ‘एखाद्या उंच इमारतीवरून टाकले तरी ते खाली पडते’, अशा रीतीने घेतल्यानंतर आपण असे म्हणतो की या गोष्टीस मूलभूत नियम कारणीभूत आहे. आपण ह्या नियमास ‘गुरुत्वाकर्षणाचा नियम’ असे म्हणतो. या नियमा-नुसार आपण जेव्हा सफरचंद किंवा कोणतीही तशा प्रकारची वस्तू अधांतरी सोडली तर ती जमिनीवर पडेल, असे आपण भाकीत करतो. ‘सफरचंद जमिनीवर पडले’ यासारख्या पूर्वीच्या अनुभवावरून आपण एका सार्वत्रिक विधानाद्वारे असे अनुमान करतो की, ‘भविष्यातही सर्व सफरचंदे जमिनीवरच पडतील!’ अशा प्रकारे निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीस उद्गामी अनुमान (Inductive reasoning) असे म्हणतात.
उद्गामी अनुमान ही पद्धत जरी आपल्या व्यावहारिक ज्ञानप्रक्रियेस (common sense) पटत असली तरी त्यामध्ये तात्त्विक दृष्ट्या काही त्रुटी आहेत. डेव्हिड ह्यूम (१७११-७६) ह्या तत्त्वज्ञाने नजरेस आणून दिले की भूतकाळातील घटनांचा भविष्यातील घटनांबरोबर तार्किक संबंध लावता येत नाही. भूतकाळात एखादी घटना अनेक वेळा घडली याचा अर्थ भविष्यातही तसे घडेल असे म्हणता येत नाही. कार्ल पॉपर (१९२४-९४) ह्या तत्त्वज्ञाने ‘वैज्ञानिक पडताळ्याने काहीही सिद्ध होत नाही’ हे निदर्शनास आणले. आपण कितीही वेळा पांढरे हंस पाहिले तरी ‘सर्व हंस पांढरे असतात’ असे सार्वत्रिक विधान त्यावरून करता येत नाही. विज्ञान एखाद्या विधानाच्या खरेपणाची पडताळणी करून नव्हे, तर ते खोटे आहे हे सिद्ध करून सत्य शोधत असते. जेव्हा आपणाला प्रथम काळा हंस पाहायला मिळेल तेव्हा ‘सर्व हंस पांढरे असतात’ हे विधान खात्रीने चुकीचे आहे असे आपण म्हणू शकू.
ह्या प्रकारे विचार करण्याने अंतर्ज्ञानास छेद दिला जातो व वैज्ञानिक ह्या शक्तीचा चांगला उपयोग करतात. पॉपरने म्हटले आहे की गृहीतकांची चाचणी घेऊनच विज्ञानाची प्रगती होत असते. एखादा वैज्ञानिक एखादे गृहीतक चाचणीसाठी मांडतो. नंतर त्या गृहीतकाची प्रयोगाद्वारे चाचणी करून ते चुकीचे कसे आहे किंवा नाही हे दाखवले जाते. पुनःपुन्हा केलेल्या चाचणीतून जर गृहीतक सिद्ध झाले तर ते वैज्ञानिक सत्य म्हणून स्वीकारले जाते. पॉपरच्या कल्पना आपणास सिद्धान्त आणि प्रयोग यातील संबंध स्पष्ट करतात. गृहीतकांची चाचणी कितीही वेळा होवो, परंतु सत्य म्हणून त्याचा तत्त्वज्ञानात्मक पुरावा (philosophical proof) आपणाला कधीही मिळणार नाही. यामुळे खंडनीकरण (falsification) हे विज्ञानाच्या केंद्रस्थानी आपल्याला मानावे लागते. वैज्ञानिकाचा व्यवहार तर्कशुद्ध असला पाहिजे. कोणत्या प्रायोगिक निरीक्षणांनी गृहीतक असिद्ध (खोटे) होईल हे त्याने अगोदर सांगितले पाहिजे. आणि असे असिद्ध ठरलेले संशोधन जर प्रयोगातून पुढे आले तर त्याने ते मोकळेपणाने मान्य केले पाहिजे. आजचे बहुतांश वैज्ञानिक खंडनीकरणाच्या कल्पनेशी सहमत आहेत. परंतु पॉपरची ही कल्पना विज्ञान आणि मिथ्या-विज्ञान यांतला भेद स्पष्ट करण्यास पुरेशी नाही. ‘काळवीट उडू शकणार नाही’ हे गृहीतक प्रसिद्ध आहे. हा निष्कर्ष कोणीही वैज्ञानिक काळविटांच्या कळपाचे व उंच शिखर याचे निरीक्षण करून काढू शकेल. परंतु हे गृहीतक वैज्ञानिक आहे असे कोणीही म्हणणार नाही.
विज्ञानाची वाढ खंडनीकरण ह्या एकमेव पद्धतीने होऊ शकत नाही. पॉपरच्या खंडनीकरणाच्या कल्पनेप्रमाणे काटेकोरपणे जायचे म्हटले तर दरवेळी विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या प्रयोगांतून काढलेल्या चुकीच्या निष्कर्षामुळे रसायनशास्त्राच्या नियमांना सोडचिठ्ठी द्यावी लागेल. परंतु आपण असे करत नाही. आपण विद्यार्थ्यांनी प्रयोग करताना केलेल्या चुकांना किंवा सदोष साधनांना किंवा खराब नमुन्यांना दोष देतो. परंतु काही वेळेला असे करणे चुकीचे ठरेल. अँटार्क्टिकावर ओझोन थराला पडलेल्या छिद्राचा पुरावा प्रथम वैज्ञानिकांनी मान्य केला नव्हता. कारण त्यांना अनपेक्षित असा हा निष्कर्ष होता. त्यांना वाटले की कृत्रिम उपग्रहाने गोळा केलेल्या माहितीतच काही तरी त्रुटी असाव्यात.
आपल्या ज्ञानाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या क्रांतिकारी शोधांचे स्पष्टी-करण कसे देणार हाही एक प्र न आहे. नैसर्गिक निवडीचा उत्क्रांतीचा सिद्धान्त व सापेक्षतेचा सिद्धान्त हे काही पूर्वीच्या सिद्धान्ताच्या खंडनीकरणाचे परिणाम नाहीत.
थॉमस कुन्ह (१९२२–९६) ह्या तत्त्वज्ञाने हा प्र न सोडवायचा प्रयत्न केला. आपली समज वाढवणाऱ्या वैज्ञानिक क्रांतीस अशा सर्जनशील विचारांची आवश्यकता असते, जे जुन्या ज्ञानातून उगम पावत नाहीत असे त्याचे मत होते. त्याने पॉपरची खंडनीकरणाची कल्पना धुडकावून लावली. ऐतिहासिक विज्ञानाच्या विकासाकडे पाहिले तर असे दिसते की खंडनीकरणाची एकच पद्धत त्यातून निष्पन्न होते असे नाही. कुन्ह याने सुचवले की विज्ञान हे एकत्रित जमा झालेली तथ्ये (facts) आणि सिद्धान्त यातून विकसित होत नाही तर नाट्यमय क्रांतीतून (dramatic revolution) विकसित होते. कोपर्निकसने लावलेला शोध—पृथ्वी सूर्याभोवती फिरते; सूर्य पृथ्वीभोवती नव्हे, ऑक्सिजनचा शोध आणि आइन्स्टाइनचा सापेक्षतेचा सिद्धान्त ह्या शोधांची उदाहरणे कुन्ह देतात. काही शोध ‘सर्वसाधारण’ (normal) संशोधनामध्ये मोडतात. वैज्ञानिक माहिती गोळा करतात आणि समस्या सोडवतात. परंतु कुन्हच्या मतानुसार काही प्रकारच्या संशोधनातून निघालेले निष्कर्ष ‘सर्वसाधारण’ संशोधनात बसत नाहीत. इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात ग्रीक खगोलवैज्ञानिक टॉलेमी याने पृथ्वीकेंद्रित विश्वाची कल्पना मांडली. त्याने पृथ्वी केंद्रस्थानी मानून इतर अनेक ग्रहांच्या कक्षा निश्चित केल्या. परंतु काही काळानंतर अधिक निरीक्षणे केल्यानंतर ह्या कक्षांचा व पृथ्वीकेंद्रित विश्वाचा मेळ जुळेना. आणि त्यामुळे विज्ञानाची प्रगती खुंटली. अखेरीस कुशाग्र बुद्धीच्या कोपर्निकसने पृथ्वीकेंद्रित विश्वासास छेद दिला. त्याला असे आढळले की पृथ्वीच्या ऐवजी सूर्य केंद्र-स्थानी ठेवल्यास निरीक्षण केलेल्या ग्रहांच्या कक्षेस अर्थ प्राप्त होतो.
कुन्हचे म्हणणे होते की अशी झेप केवळ विज्ञानामध्ये कठीण समस्या निर्माण होते त्याच वेळेस घेतली जाते. वस्तूचे ज्वलन झाल्यानंतर त्यामधून फ्लॉजिस्टन नावाचा पदार्थ निघून जातो. याचे मापन अनेक वर्षे वैज्ञानिक करत होते. ऑक्सिजनच्या शोधानंतर फ्लॉजिस्टनला काही अर्थ उरला नाही. कुन्हच्या कल्पनेवर अनेकांनी टीका केली. ते म्हणतात, “कुन्ह आपल्याला सोयीस्कर तेवढीच भौतिकशास्त्रातली उदाहरणे घेतात. इतर शास्त्रांत वेगळ्या मार्गाने शोध लागले आहेत. DNA च्या रचनेच्या शोधा-मुळे जीवशास्त्राबद्दल विचार करण्याचा दृष्टिकोण पूर्णपणे बदलला. पूर्वीच्या चया-पचयावर आधारित दृष्टिकोण बदलून नवा DNA च्या रचनेवर आधारित दृष्टिकोण आला. शेवटी कुन्ह यानेही विज्ञानातील क्रांतिकारी कल्पना कुठून उगम पावतात हे सांगितले नाही.’
अपघाताने लागलेल्या शोधांचे आपल्याला नवल वाटते. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर प्लेमिंगला अपघातानेच लागला होता. परंतु पेनिसिलिनचा परिणाम फ्लेमिंगच्या लक्षात आला कारण तो सूक्ष्मजीवशास्त्रातला तज्ञ होता.
हंगेरियन तत्त्वज्ञ इम्रे लॅकॅटॉस (१९२२-७४) याने पॉपर व कुन्हच्या कल्पनां-मध्ये सुधारणा सुचवली. सर्वसाधारण आणि क्रांतिकारी विज्ञानाच्या ऐवजी त्याने प्रागतिक (वर्धिष्णु progressive) आणि (ह्रासमान degenerative) संशोधन कार्यक्रम असा भेद केला. प्रागतिक संशोधन कार्यक्रम म्हणजे पूर्वी अज्ञात असलेल्या तथ्यांचा शोध. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त हे त्याचे उदाहरण होईल. ह्या शोधामुळे हॅले या शास्त्रज्ञाला ‘हॅले’ हा धूमकेतू काही काळानंतर पुन्हा प्रगट होईल असे भाकीत करता आले. अधोगामी संशोधनात अशी भाकिते करता येत नाहीत. अडचणीची ठरणारी तथ्ये सामावून घेण्यासाठी मूळ शोधामध्येच बदल करावा लागतो.
सरतेशेवटी विज्ञान म्हणजे काय हा प्र न उरतोच. आपण पाहिलेच की पॉपरचे ‘खंडनीकरण’ हे एकमेव प्रमाण विज्ञान आणि मिथ्या-विज्ञान (pseudo-science) किंवा न-विज्ञान (non-science) यातला भेद स्पष्ट करायला पुरेसे नाही. संपूर्ण विज्ञानाच्या भव्यतेकडे पाहिले तर—-कणीय भौतिकशास्त्र ते पेशीय जीवशास्त्र ते पर्यावरण-शास्त्र ते अभियांत्रिकी—-ह्या सर्वांमध्ये एक सर्वसाधारण अशी पद्धत (common practice) आढळणे मुश्किल आहे. विज्ञानातला ‘खुलेपणा’ ही गोष्टही काही वेळेला तेथे नसते; पुष्कळसे संशोधन हे लष्करी कारणांसाठी किंवा व्यापारी कारणांसाठी गुप्त ठेवले जाते.
अनुभववाद (Empiricism — ज्ञानेंद्रियाद्वारे मिळवलेले ज्ञान), नियंत्रित प्रयोग, निरखून पुन्हा पुनर्तपासणी करणे (peer review), असिद्ध संशोधनाबद्दल खुलेपणा ठेवणे ह्या गोष्टी चांगल्या विज्ञानाच्या द्योतक आहेत असे आपण म्हणू शकतो. जे वैज्ञानिक ह्या गुणवत्तेच्या चौकटीत काम करतात त्यांचा असा विश्वास असतो की सत्य शोधण्याची हीच पद्धत आहे. तत्त्वज्ञानात्मक दृष्ट्या जरी नाही तरी व्यावहारासाठी विज्ञान व वैचारिक गोंधळ तसेच खोटा प्रसार यातला भेद स्पष्ट होण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचे वरील गुणधर्म पुरेसे आहेत. वैज्ञानिक नियम हे नेहमीच तात्पुरत्या स्वरूपाचे असतात असे मानायला वैज्ञानिकांना कमीपणा वाटत नाही. नवीन निरीक्षणातून मिळालेल्या माहितीमुळे जुन्या नियमांत सुधारणा होऊ शकते. हा विज्ञानाचा गुण म्हणजे त्याचा कमकुवतपणा नसून तीच विज्ञानाची सर्वांत मोठी ताकद आहे.
वैज्ञानिक पद्धत १७ व्या शतकापासून विकसित होत होत ती १८ व्या शतकात पूर्ण विकसित झाली. निरीक्षण व प्रयोगाचे महत्त्व प्रतिपादणाऱ्या वैज्ञानिक पद्धतीचा पाया रेने देकार्त या तत्त्वज्ञाने व फ्रान्सिस बेकन या शास्त्रज्ञाने १७ व्या शतकाच्या सुरुवातीला घातला. परंतु पूर्णपणे विकसित व प्रत्यक्षात वापर करण्याच्या वैज्ञानिक पद्धतीचे प्रमुख स्थापत्यकार म्हणून गॅलिलिओ व न्यूटन या शास्त्रज्ञांची गणना होते. या वैज्ञानिक पद्धतीमुळे मानवाला वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली ती न्यूटनच्या काळात. न्यूटनने विवेकी विश्वाची स्थापना कस्न मानवाच्या मनाची पुनर्बाधणी केली. ज्ञान शोधण्यातील गूढता नाहीशी केली व मानवी मनाच्या चौकसबुद्धीची स्थापना केली.
सत्याच्या जवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही वैज्ञानिक पद्धत होय. आतापर्यंत विश्वासार्ह म्हणता येईल असे जे ज्ञान मानवाला प्राप्त झाले आहे ते विज्ञाना-मुळेच. वैज्ञानिक पद्धत विकसित होण्या अगोदर जे ज्ञान मिळवत ते ‘चुकत-माकत’ (trial and error) पद्धतीने मिळवत.
मिळवलेल्या ज्ञानातून ते सर्वांना लागू होईल, नवीन समस्या सोडवता येतील असे सामान्यीकरण (generalisation) कस्न निष्कर्ष वाढत नसत. व्यक्तीवर धर्माची, परंपरेची, स्ढीची, पोथीनिष्ठेची अशी अनेक बंधने होती. त्यामुळे वैज्ञानिक पद्धत विकसित होण्यापूर्वीच्या ज्ञानात गोंधळ होता, विसंगती होती, चुका होत्या, गूढता होती. वैज्ञानिक पद्धत विकसित झाल्यानंतर हा गोंधळ, ही गूढता संपली.
काही जण असे म्हणतात की सत्य जाणण्याच्या अन्यही काही पद्धती आहेत. उदाहरणादाखल ते अध्यात्म, श्रद्धा, तपस्या, ध्यानसाधना अशा पद्धती सांगतात. परंतु विज्ञानामुळे मिळालेल्या ज्ञानाची जशी असंख्य, अगणित उदाहरणे सांगता येतात तशी ह्या पद्धतींनी कोणते ज्ञान आतापर्यंत मिळवले आहे ह्याबद्दल काहीही सांगता येत नाही.
२३/७, शिंदेनगर, बावधन, पुणे — ४११ ०२१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.