‘एक होती बाय’

नित्यनव्या घडणाऱ्या प्रसंगांच्या गुंफणीमधून चित्रपट वा टी. व्ही. मालिका वेधक बनतात. आपल्याला खेचून घेतात. तीच ताकद ‘एक होती बाय’ ह्या पुस्तकात आहे. गेली सुमारे चाळीस वर्षे हॉलंडमध्ये स्थायिक झालेल्या श्री. सुरेन आपटे यांनी त्यांच्या सत्तरीत लिहिलेली ही सत्यकथा. फक्त त्यांच्या जन्मापूर्वीचा, अजाण वयातला आणि दूरदेशीच्या वास्तव्याचा काळ यातील हकिकती ऐकीव माहितीतून आल्या आहेत. जगावेगळ्या आईची आणि मुलाची जोडकथा, असे हे मराठीतले एकमेव पुस्तक असावे.
पेणजवळच्या हातोंडे या खेड्यातले एक ज्यू कुटुंब. त्यात १९१० च्या आसपास जन्मलेली बाय. वडिलांचा अकाली मृत्यू होतो. स्नेहाचे मुखवटे चढवलेल्या मतलबी परिचितांकडून फसवणूक होते. त्यातून ओढवलेल्या गरिबीशी बाय, तिच्या पाठच्या बहिणी याकोव्हेत व लिली आणि आई शेगुल्ला/इम्मा झगडतात, तेथून ते बाय च्या मृत्यूपर्यंतचा म्हणजे १९७०–१९७५ पर्यंतचा हा कालखंड आहे.
१९३० मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ब्राह्मणकन्येत’ ज्यू समाजाचे चित्रण आहे—-अल्पसंख्यकांना समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर जुळवून घ्यायचे असते. आणि त्याच-बरोबर स्वतःची वैशिष्ट्ये व वेगळे अस्तित्व जपत जपत तगून राहायचे असते हे केतकर दाखवतात. या नंतरची ज्यूंची स्थिती येथे आली आहे. बायची बहीण याकोव्हेत लग्नानंतर भायखळ्याच्या गरीब गिरणीमजूर ज्यू वस्तीत राहायला येते. तिला मुले वाढवण्यात—घरकामात—मदत करायला इम्मापण तिच्याकडे राहते. एकमेकांना धस्न राहणाऱ्या या चाळकरी ज्यूंची मानसिकता, इस्राएलच्या स्थापनेनंतर नाइलाजापोटी तिकडे स्थलांतर करणे, तेथल्या नवख्या परिस्थितीशी, वेगळ्या वातावरणाशी जुळवून घेण्याची धडपड, भारताची न संपणारी ओढ अन् प्रेम, होणारी कुतर ओढ, येणारे ताणतणाव याची झलक हे सारे मराठी कादंबरीत प्रथमच आलेले असावे. पण बाय मात्र इथल्या समाजात मिळून जाऊ बघतेय.
माणसाला धर्माचा आणि स्वधर्मीयांचा भक्कम पाठिंबा असण्याची निकड भासवणारा त्यावेळचा समाज आहे. महाभारताने ‘परधर्मो भयावहः’ हे वास्तव अश्वत्थामा, कर्ण इत्यादींच्या बाबत मांडले आहे. बुद्धिमान्, गुणवान्, विद्यापारंगत असणाऱ्या या नरपुंगवांना (केवळ वर्णानुसार न वागल्याने वाट्याला आलेली) अरत्र ना परत्र अशी त्रिशंकू अवस्थेतली ससेहोलपट सोसवत नाही. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गोरा’ व ना. सी. फडक्यांच्या ‘माझा धर्म’ कादंबरीत स्वतःच्या धर्माबाबतचे सत्य समजल्यावर पावलांखालची जमीन सरकल्याच्या अनुभवाने उन्मळून सैरभैर हतबुद्ध, झालेले नायक दिसतात. अल्पसंख्यकांच्या समाजात जोडीदाराच्या निवडीला किंवा कर्तृत्वाला वाव किंवा संधी मिळणे दुरापास्त आहे. म्हणून आपण जर समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झालो तरच काही करता येईल, तगून राहता येईल ही आतून आलेली जाणीवच बायच्या जगण्या-वागण्याची प्रेरणा आहे.
हातोंड्यात राहून भागणार नाही हे उमजून नवी वाट शोधायला षोडशी बाय घराबाहेर पडते. अत्यंत देखण्या बायला बाहेरच्या जगात अनू-पांडुरंगसारखी सच्छील माणसे भेटणे हे तिचे सुदैव आहे. नानाच्या प्रेमात पडणे ही तिची मोहवशता वयानुरूप आहे. या अजाण मुलीवर अकल्पितपणे अविवाहित मातृत्व कोसळते. सामान्यतः कुणी सहजीच गर्भपाताचा किंवा आत्महत्येचा मार्ग पत्करला असता. पण बाय स्वतःच्या हिंमतीवर बाळाला वाढवण्याचा निर्णय घेते. पांडुरंग-अनू तिच्या नर्सिंगच्या प्रशिक्षणाची, जागेची सोय करतात. बि-हाड मांडायला वस्तू-पैसे पुरवतात. भावनिक आधार देतात. वर्षभराच्या प्रशिक्षणकाळात मध्ये आलेल्या बाळंतपणासकट बाय उत्तम यश मिळवते. तिथे काम करणाऱ्या डॉक्टर्सना तिची गुणवत्ता व कसब कौतुकास्पद वाटते.
नाना बाळाचे पितृत्व नाकारत नाही. त्याच्या कुटुंबीयांनी ज्यू बायशी लग्न करायला विरोध करणे स्थळकाळाला धरून आहे. देवेनच्या जन्मानंतरच्या काही वर्षांमधले नानाचे व बायचे संबंध अशा परिस्थितील्यांच्यापेक्षा फार वेगळे आणि माणूसपणाच्या जवळ जाणारे आहेत. ती नानात फार, फार गुंतलेली आहे. त्याच्या शारीर प्रेमाची गरज तिला आहेच. तरी ती म्हणते, “नाना, जन्मभर मी तुझी रखेल म्हणून राहणार नाही. . . लक्षात घे नाना, माझं बाळ, आपलं नव्हे—-येईल. त्याच्यासाठी मला माझ्या पायावर उभं राहायचंय. स्वतंत्र व्हायचंय. आता तू बरोबर नको. . . बाळाला भेटलास तरी चालेल. पण त्याचा बाप तू आहेस हे त्याला सांगायचं नाही. माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाहीस . . . हे माझं घर आहे. आता तुझा माझा संबंध संपलाय. मला आवडणारा पुरुष भेटला, त्यानं देवेनला स्वीकारलं तर मी त्याच्याशी लग्न करेन. . . .”
डॉ. शहांसारख्या उच्चशिक्षित तज्ञाचे सहकार्य बायला मिळते. तिच्या कामाचे पुरेपूर मोल ते पैशातून देतात. शिवाय बायला स्वतंत्र पॅक्टिसचे बस्तान बसवायला साधनसामुग्री, रेकॉर्डस् ठेवण्याची (वा नष्ट करण्याची, न ठेवण्याची) पद्धत, कामाची शिस्त, हिशेब, व्यवस्थापन, कायद्याच्या बाजू असे भरीव साहाय्य देऊन संधी पुरवतात हे बायचे नशीब आणि लाभलेल्या संधीचे स्वतःच्या अफाट परिश्रमाने, कुशलतेने सोने करणे हे बायचे कर्तृत्व आहे. खेडवळ उच्चार सुधारण्यापासून ती स्वतःला घडवत जाते. स्वतःचे नवे जग घडवते. पेशंटस्ची ती केवळ उपचारक/सुईण राहत नाही तर विश्वासू मैत्रीण बनते. अल्पकाळात मलबारहिलचे श्रीमंती राहणीमान प्राप्त करते. ___डॉ. शहांच्या मृत्यूनंतर पॅक्टीस बंद करते. त्यांनी सोपवलेल्या रघूची यथाशक्ति जबाबदारी उचलते. प्रभाकरशी परिचय कस्न घेऊन चित्रपट-अभिनयाच्या नव्या क्षेत्रात पाऊल ठेवते. येसूबाईची भूमिका समर्थपणे पेलते. ते पाहून प्रभाकर तिला नाट्यमन्वंतर-मध्ये बोलावतो. चित्रपटात रिटेकची तरतूद असते. नाट्याभिनयाची आव्हाने त्याहून फार वेगळी . . . ‘बायचे पाठांतर व संवेदनक्षम अभिनय पाहून तालमी घेणारे केशव, नारायण थक्क झाले’ . . . इथे हुशार, व्यासंगी, प्रयोगशील मंडळींच्या चर्चा-गप्पांचे संस्कार बायवर झाले . . . ‘बायचे नव्या व्यक्तिमत्त्वात स्पांतर होत होते!’ . . . नारायणमुळे तिची गजूशी ओळख होते. आजवर स्पवती बाय अनेक पुरुषांना आवडली आहे. पण धर्माची व घरच्यांची पत्रास न ठेवता तिच्याशी लग्नाला तयार होणारा गजू हा असा एकटाच पुरुष तिला भेटतो. लग्न ही समाजात तिला व देवेनला स्वीकारार्ह बनवणारी निकड असणार. गजूच्या अकाली मृत्यूपर्यंतचे बायचे पाच वर्षांचे वैवाहिक जीवन तिच्या साऱ्या अपेक्षा फोल ठरवते. गजू देवेनला पित्याचे प्रेम देत नाही. स्वतःचे नाव देत नाही. त्याचा सदैव रागराग करतो. त्याने दिलेल्या अमानुष वागणुकीपायी येणाऱ्या मानसिक ताणातून देवेनला दम्यासारखा आजार होतो. गजूच्या हट्टी, दुराग्रही स्वभावापोटी करियर सोडून घरात बसावे लागलेल्या बायची केवढी गळचेपी, तगमग झाली असेल?
आता १२ वर्षांचा देवेन, ३ वर्षांचा इंद्र (गजू व बायचा मुलगा) यांना सांभाळायचे आव्हान तिशीतल्या, निष्कांचन, विधवा बायला पेलायचे आहे. या वळणावर परिचारिकेऐवजी ती अभिनयाचे क्षेत्र निवडते—-तिथल्या अनि िचततेसकट. ती तिच्यातल्या कलावंताची अनावर ओढ असेल . . . “दुसऱ्या व्यक्तीची भूमिका करायची. किती थरारक अनुभव! . . .’ या दुनियेत तिची ‘राजें’शी गाठ पडते. इतर पुरुषांना दूर ठेवायला त्यांचा उपयोग होतो. ते तिचे व्यवस्थापक बनतात. अत्यंत अरेरावीने वागतात. बायला कस्पटासमान लेखतात. तिच्या घरात तिच्या जिवावर जगतात तरीही तिच्या मुला-सुनांचा रागराग करतात. वीस वर्षांहून अधिक काळ ते दोघे एकत्र राहतात.
देवेनच्या वाट्याला नाकारलेपण येते. वेगळ्या आडनावाचे दोघे भाऊ म्हणून शाळकरी वयात आजूबाजूच्यांकडूनही भली वागणूक मिळत नसावी. लाड करणारी व पैसे पुरवणारी आई एवढीच जमेची बाजू. नाना हे वडील असल्याचे आणि याकोव्हेत ही खरी मावशी असल्याचे त्याच्यापासून बाय लपवते. देवेन मुंबईला कॉलेजशिक्षणासाठी येतो. मैत्रीण मिळते आणि त्यापायी अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन नापास होतो. पुण्याला बायकडे येतो. सुशीलेच्या प्रेमात पडतो. लग्न करतो. सरोजचा जन्म होतो. त्या दोघींची जबाबदारी बायवर टाकून पुन्हा मुंबईला मेडिकल कॉलेजला जातो. फर्स्ट एम्.बी.बी.एस्. ला पास होतो. पण सेकंड एम्.बी.बी.एस्. ला पेपर्स कोरे टाकून कोर्स सोडून देऊन पुण्याला परततो कारण सुशीलेने फसवलेले आहे हे कळते. ती निघून जाते. देवेन कृषिपदवीधर होतो. शिकवायला लागतो. तिथे भेटलेल्या अनाथ देवकीविषयी कणव वाटून तिच्यात गुंतत जातो. तिच्याशी लग्न करतो. ललितागौरीचा जन्म होतो. त्या दोघी व सरोजला बायवर सोपवून उच्च शिक्षणासाठी हॉलंडला जातो. नंतर पी.एच्.डी.साठी संधी मिळते म्हणून त्याचा मुक्काम लांबतो. तिथे एलनच्या प्रेमात पडतो. देवकीला घटस्फोट देऊन एलनशी लग्न करतो. घाना, अमेरिका येथे नोकऱ्या करतो. हॉलंडमध्ये स्थायिक होतो.
कल्पित कादंबरीचे निकष इथे गैरलागू आहेत. असे असे सारे घडले हे वास्तव वाचकाला मान्य करायचे आहे. (उदाहरणार्थ, सुसूत्रता राखली न गेल्याने आलेले विस्कळीत स्वरूप; आईचे ज्यू असणे व वडील कोण ते देवेनला दीर्घकाळ माहीत नसणे असे तपशील स्वीकारायचे आहेत.)
गौण पात्रे पुरेशा तपशिलांसह रेखीवपणे आलेली आहेत. धर्मासाठी काहीही पत्करणारी आणि म्हणून याकोव्हेतला धन राहाणारी इम्मा अथपासून इतिपर्यंत सुसंगत आहे. पन्नाशीचा आयॉक बायला देवेनसह पत्करायला तयार आहे. मग बायने (एकोणीस वर्षांची आहे) आपल्या ज्यू धर्मासाठी त्याला लग्नाला होकार द्यावा असे इम्माला वाटते. आहे ती परिस्थिती निमूट मान्य करणारी मायाळू याकोव्हेत. ती देवेनला सांभाळायला नेहमी तयार आहे. त्यावेळच्या बाळबोध समाजात पांडुरंग-अनूसारखी सहृदय माणसे भेटू शकतात. स्त्री-पुरुषांच्या निकोप नात्याचे, निखळ मैत्रीचे, वासनेपासून दूर असणारे असे पत्रकार प्रभाकर आणि बायचे संबंध आहेत. बायबद्दल आकर्षण वाटूनही मध्यमवर्गीय मर्यादा ओलांडण्याचे धाडस नसणारा नारायण मदतही हात राखूनच करतो. स्वतःचे चोजले बेफिकीरपणे पुरवून घेणारा, अहंमन्य गजू हा पारंपरिक पुरुष आहे. घोडागाडीवाला इब्राहिम म्हणजे जणू सरंजामशाहीतला स्वामीनिष्ठ सेवक. आजच्या हिन्दी चित्रपटातही अशी पात्रे भेटतात. अगदी तसाच.
रघू त्याच्या वडलांच्या रागीटपणाचा, निर्दयतेचा बळी आहे. तो व बाय एकमेकांना मदत करतात. त्यांच्या मैत्रीच्या नात्याच्या छटांचे रेखाटन फार सुंदर आहे. आपली व्यावसायिक जाण बाय रघूचे मर्दपण जागवायला वापरते. त्याला पुरुष म्हणून, माणूस म्हणून, जगण्याचा आत्मविश्वास मिळवून देते.
अल्प वयात मृत्यू पावलेल्या सरोज व लिली चटका लावून जातात. देवेनला सांभाळायला, घरातले पाह्यला करायला बाय लिलीला घेऊन येते. अशक्त लिली दुखणेकरी होते हे स्वतःच्या व्यापात गर्क असणाऱ्या निष्णात परिचारिकेच्या लक्षातही येत नाही. बायचे हे वागणे केवळ अनाकलनीय वाटते. की बाय इतकी मतलबी, स्वार्थी होती?
माई (नानाची आई) स्वतःचे बाळंतपण करायला बायला हक्काने बोलावतात. हे म्हणजे उघडपणे वरच्या वर्गातल्या समाजमान्य संसारी बाईने खालच्या वर्गातल्यांना वापस्न घेणे आहे. बाय हे का करत असेल? कदाचित् यामुळे माईंचे मन पालटेल आणि त्या आपल्या लग्नाला स्कार देतील अशी आशा तिला वाटली असेलही.
स्वतःवर कोसळणाऱ्या संकटांवर मात करत राहणारी बाय याकोव्हेतच्या दरिद्री संसाराला सदैव पैसा पुरवते. तिचा गुन्हेगारीत अडकलेला मुलगा हॅनॉक याला हर प्रयत्नाने वाचवते. वाढाळू वयात देवेनला काय सोसावे-भोगावे लागले याचे फारसे उल्लेख कोठे येत नाहीत. त्यामुळे त्याचे वागणे म्हणजे लहरी, मनमानी, आईला गृहीत धरणे, बेजबाबदार-पणा, उतावळेपणा, दुसऱ्यांच्या भावना वा मानसिकता समजून घेण्याची गरजच न भासणे, आपण पत्नीवर, मुलींवर अन्याय केला आहे याची पुसटशीही जाणीव नसणे अशा स्वरूपाचे वाटते. याची कारणपरंपरा काय असू शकेल!
प्रथम भेटीत देवेन देवकीच्या प्रेमात पडतो. तिचे अनाथपण आणि त्याचेही एक त-हेचे अनाथपण याला कारणीभूत असेल? सर्वमान्य प्रथेनुसार बायने देवेन किंवा इंद्र यांच्या लग्नासाठी पुढाकार घेऊन मुली बघणे, ठरवणे असे काही केल्याचे दिसत नाही. देवकीच्या प्रेमात पडलेला देवेन सत्तावीस वर्षांचा आहे. ‘ब्राह्मणकन्या’ची नायिका कालिंदी हिला वाटते की सरळपणी आपले लग्न होणे कठीण. तशीच अडचण देवेनला, बायला जाणवत असेल का? की राजे प्रकरण आड येते? ___मागे वळून पाहणे, अंतर्मुख होऊन विचार करणे कोठेही येत नाही. पात्रांमधल्या संबंधांची व्यामिश्रता आलेली नाही. डॉक्टरेट मिळवून देशाटन केलेला, विविध अनुभवां-मधून गेलेला हा लेखक आहे. जगण्यातून सहज उगवणारे चिंतन कुठेही आलेले नाही. दीर्घ कालपट चित्रित करणारे हे लेखन केवळ वर्णनाच्या पातळीवरच राहिले आहे.
बाय व देवेनमध्ये कसा संवाद होता, एकमेकांना समजून घेणे कितपत होते याचा उलगडा होत नाही. नाट्य चित्रपटात टिकून राहून सातत्याने कामे मिळवणे यासाठी द्यावा लागलेला झगडा चित्रित झालेला नाही. बायचे सगळीकडे स्वागत आणि कौतुक होते असे उल्लेख वारंवार येतात. अविवाहित मातृत्वाची वाटचाल इतकी सोपी असूच शकत नाही. तसे असते तर प्रचंड मानहानी, मुस्कटदाबी सोसत बायने गजूशी विवाह का टिकवला किंवा राजांना का सहन केले? बाणेदारपणे धडाडीने यशस्वी कारकीर्द । करियर करणाऱ्या बायची रिक्षापर्यंत नेण्यासाठी राजेंनी केलेली फरपट म्हणजे पतनाची नीच पातळी आहे. इथवरचे मधले टप्पे आलेले नाहीत. त्याची गरजच
लेखकाला कळलेली नसावी. म्हणून स्त्रीमन पुरेसे प्रकट झालेले नाही. कारण बायवरची कोणतीतरी अटळ दडपणे मुलाच्या लक्षात आलेली नाहीत.
“बाय ऑफ हातोंडे’ या मूळ इंग्रजी कादंबरीचा “एक होती बाय’ हा अनुवाद आहे. इंग्रजी भाषेत नसलेली शैली अनुवादाच्या भाषेत आहे. ते भाषांतर वाटतच नाही. मुळातले गैरवाजवी पाल्हाळिक तपशील काटछाट करून अधिक सुबकपणे मांडले आहेत. बाय आणि डॉ. शहा यांचे नाते धूसर, काहीसे अध्याहृत ठेवले आहे. ते वाचकांवर सोपवले आहे. यातील सूचकता योग्य वाटते. अविवाहित गरोदर तरुणीकडे पाहणाऱ्या बोचक नजरा, भोवतालच्यांच्या आपसुकपणे येणाऱ्या प्रतिक्रिया, अविवाहित मातेला कोणत्या अडचणीच्या प्र नांना सामोरे जावे लागत असेल, त्या अनुषंगाने बायच्या मनात उमटणारे विचार/स्वगते ही अनुवादिका श्रीमती विनया खडपेकर यांनी घातलेली भर गरजेची ठरते. सुंदर, तरुण, अनोळखी मुलीला नवरा घरी आणतो याचा सुरवातीला तरी अनूला धक्का बसणे साहजिक आहे. रघूच्या घरी जे काय घडते त्यामुळे बायच्या मनात पुन्हा ज्यू धर्मात परतण्याचा विचार येणे अटळ वाटते, हे चित्रणही अनुवादिकेचे आहे.
१९२६ ते १९७०/७५ मधल्या कमालीच्या स्थितिप्रिय आणि रुढी-परंपरांना घट्ट कवटाळून असणाऱ्या समाजात अल्पसंख्य ज्यू धर्मीय बायने अविवाहित मातृत्वाचा अवजड भार वाहत जिद्दीने व्यावसायिक यश प्राप्त केले. त्याचवेळी कौटुंबिक आघाडीवर त-हेत-हेचे वैफल्य व आघात झेलत, पडतील त्या साऱ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. अविवाहित मातृत्वाचा आणि पर्यायाने संबंधितांच्या रोषाचा बळी ठरलेल्या देवेननेसुद्धा असाधारण शैक्षणिक व व्यावसायिक यश मिळवले. (दोघे नुसतेच तगून राहिले असे नाही.) हे दोघे मायलेक आजही मराठी साहित्यातच नव्हे तर प्रत्यक्षातही अपवादात्मकच आहेत!
[“एक होती बाय”, मूळ लेखक : सुरेन आपटे, अनुवादक : विनया खडपेकर, वितरक : राजहंस प्रकाशन, मूल्य : १७५ रु., पृष्ठसंख्या ३६८] प्लॉट ६, सिद्धिविनायक सोसायटी, off चाकण रोड, तळेगाव स्टेशन — ४१० ५०७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.