शिक्षण कशासाठी!

त्याने आपल्या भावाला शिकवले का नाही?
“बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना त्याने कॉलेज सोडलं. एज्युकेशनची आपली सिस्टिमच अशी आहे. आयुष्यातली पंधरा वर्षं आपण निरुपयोगी काहीतरी शिकत रहातो आणि मग ते शिक्षण मोठ्या ऑफीसमध्ये साधी क्लार्कची नोकरी द्यायलाही उपयोगी पडत नाही. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे त्यामुळे तुम्ही निक्कमे होता. दुसरं काही करणं तुम्हाला जमेनासं होतं. आर्टस घेतलं की ते सांगतील तेवढेच विषय शिकावे लागतात. त्यात चॉईसच नाही. समजा बीए करताना एखाद्याला अकाऊन्टन्सीही करायची आहे तर कॉलेजमध्ये तसं चालत नाही. प्रायव्हेट क्लासला जावं लागतं. आणखी पैसा आणि आणखी वेळ खर्च करावा लागतो. कशासाठी?’ त्याचा मोबाईल वाजतो. कॉन्टॅक्ट वर येत असतो. पुढच्या दरवाजापाशी जातानाही पक्या बोलतच असतो. “तरुण पोरं तर त्या वेड्या अबू सालेमकडेही आपलं नाव घालायला तयार असतात. दाऊदलाही तो आवडत नाही. पण एक बाईक मिळते, हातात गन मिळते. ती गनही त्यांच्यासाठी भरून ठेवलेली असते. त्यांना फक्त घोडा ओढायचा असतो. सगळीकडे ते गोळ्यांचा पाऊस पाडतात. वाटेल त्याला मारतात. परत येतात तेव्हा एका खुनासाठी त्यांना पाच हजार रुपये मिळतात. माझा भाऊ आपल्या इतर धंद्याबरोबरच त्याच्या मित्राने बोलावलं की जाऊन येतो असा. पंधरा वर्षं शिकल्यानंतर तरुण पोरांना तुमच्या शिक्षणामुळे महिन्याला वीस हजार रुपये मिळणार आहेत का?”
[पिंकी विराणी यांच्या वन्स वॉज बाँबे या पुस्तकाचा मराठी अनुवाद मीना कर्णिक यांनी कैलासवासी मुंबई या नावाने केला (अक्षर, मुंबई २००१), ‘पक्या’ नावाच्या एका गुंडाच्या मुलाखतीतला हा उतारा.] पिंकी विराणी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.