धिस फिशर्ड लँड : लेख ३

शेती आणि उद्योग

जमिनीच्या एखाद्या तुकड्यावर थोड्याच जातींच्या वनस्पतींपासून बरेच उत्पादन घेत राहिल्यास त्या जमिनीतील अनेक द्रव्ये शोषून घेतली जाऊन जमिनीचा कस उतरतो. यावर एक उपाय म्हणजे जमिनीला काही काळ न वापरणे, ज्यामुळे तिच्यावर नैसर्गिक झाडोरा येऊन द्रव्यांची साठवण होते. हे झाले फिरत्या शेतीचे तंत्र. जर कस उतरलेल्या जमिनीला गाळ, खते वगैरेंमधून पोषक द्रव्यांचा पुरवठा केला, तर मात्र एकाच भूभागावर वर्षानुवर्षे पिके घेता येतात. फिरती शेती करताना बऱ्याच जमिनीवर थोडीशीच माणसे जगू शकतात, तर स्थिरावलेल्या शेतीवर जास्त माणसे जगू शकतात.
स्थिर शेतीसाठी जमिनीची सक्रिय मशागत करावी लागते. ह्यासाठी आणि खतांसाठीही शेतीसोबत गुरे पाळणे उपयोगी ठरते. दहाएक हजार वर्षांपूर्वी मध्यपूर्वेत माणसांनी गहू-बार्लीसारखी पिके आणि गाईगुरे जवळपास एकाच काळी ‘माणसाळवली’, आणि स्थिर शेतीची जीवनपद्धती उपजली. या तंत्रासाठी आवश्यक असा पिकांचा आणि गुरांबाबतचा ज्ञानसाठा माणसांनी घडवला. ऊर्जा मात्र प्रामुख्याने माणसांच्या आणि प्राण्यांच्या स्नायूंचीच असे. खनिज इंधने वापरता यायला लागेपर्यंत ऊर्जास्रोत हेच राहिले. अपवाद एकच, की कुठेकुठे पाणी देण्यासाठी प्रवाही सिंचन केले जाई, म्हणजे उतारांचा वापर करून पाणी पुरवण्याची ऊर्जा ‘कमावली’ जाई. पिकांची आणि गुरांची तपशीलवार माहिती आणि हे थोडेसे ऊर्जास्रोत, ही स्थिर शेतीच्या तंत्रज्ञानाची व्याप्ती आहे.
एकदा जनावरांची ऊर्जा माणसाळवली, की वस्तूंची दूरदूरपर्यंत वाहतूक शक्य होते. या दृष्टीने स्थिर शेतीचे अर्थव्यवहार संकलक जीवनपद्धतीपेक्षा व्यापक आणि गुराखी तंत्राच्या जवळचे असतात. आता माणसे शेतांशी जखडलेली नसतात, आणि खेडी, नगरे अशा वस्त्यांमध्ये राहूनही शेती करता येते. अगदी थेट संसाधन वापरात न गुंतलेल्या व्यक्ती ‘नागर’ होऊ शकतात, व होतात. बहुतेक लोक अगदी प्राथमिक गरजा भागवत, हातातोंडाची गाठ घालतच जगतात. काही थोडे लोक मात्र चैनीच्या वस्तूंसोबत शस्त्रास्त्रे, घोडे व हत्तींसारखे दमनाला उपयुक्त प्राणी, अशांचाही वापर करतात.
उत्पादनक्षेत्रांपासून नागर समाजाकडे वाहणारा वस्तूंचा प्रवाह पूर्णपणे एकतर्फी असतो. तंत्रज्ञान सुधारते तसतसा हा प्रवाह मोठा होत जातो. अगदी खनिज इंधने, शेतीची यंत्रे वगैरे घडेपर्यंत स्थिर शेतीकडून नागर समाज वस्तू फक्त घेतच राहिले आहेत. नंतर मात्र यंत्रे-इंधने नगरांपासून शेतांकडे वाहू लागली आहेत. मोठाले वस्तू-व्यवहार होऊनही शेती स्थळाच्या आणि काळाच्या बदलांबाबत हळवीच राहिली आहे. यामुळे दरेक भूभागातील शेती ही ‘खास’ तिथली, इतर भागातील शेतीपेक्षा वेगळी, अशीच असते. स्थिर शेतीला बरीच मानवी ऊर्जा लागते. यामुळे शेती करणारे समाज बहुधा नातेसंबंधांनी बांधलेलेच असतात. कुटुंबे ही अशा समाजांचे प्रमुख घटक असतात. अशा कुटुंबांना अनेक कामे सहकार्याने करावी लागतात, आणि समाजांची वीण यामुळे दाट असते. प्रत्येक गाव-खेडे हे अशा विणलेल्या कुटुंबांच्या समूहासारखे असते. हा समूह शेतीखालील आणि शेतीबाहेरील जमीनही सामाईकपणे सांभाळत असतो.
श्रमविभाजनात लिंगभेद महत्त्वाचे असतात. कमी वेळात जास्त ऊर्जा वापरणारी कामे पुरुष करतात, उदा. नांगरण; तर निंदण, रोपणी वगैरेसारखी चिकाटीची कामे स्त्रिया करतात. स्त्रियांच्या कामांमध्ये चारा आणि सर्पण गोळा करणेही येते. प्रत्यक्ष शेतजमीन एकेक कुटुंब सांभाळते, तर चराई, पाणी, सर्पण या बाबी सामाईक मालकीच्या असतात. थेट शेतीत गुंतलेल्यांची संख्या कमी असते आणि अनेक माणसे शेतमालाच्या प्रक्रियेत गुंतलेली असतात, जसे, तेली, विणकर, वाहतूकदार, ज्ञानसंवर्धन (पंचांग पाहणे!) व प्रशासन (दमनसंस्था!) करणारे, इत्यादी. या संस्था प्रामुख्याने पुरुषप्रधान असतात. शेतजमीन आणि इतर जमीन यांच्यातील विभागणी संकलक व्यवस्थेपेक्षा काटेकोर असते. मालकी हक्क आणि नियंत्रणाचे हक्क जास्त रेखीव असतात. तंत्रज्ञानातील वाढीसोबतच बिगर-शेती पेशांचे महत्त्व (आणि दमनशक्ती!) वाढत जातात. नव्याने लागवडीखाली आलेली जमीन किंवा नव्याने उपलब्ध झालेले सिंचन, अशा परिस्थितीत दरडोई संसाधनांचे प्रमाण वाढते. मग माणसे बहुप्रसू आर-वर्गी त-हेने वागतात. सर्वच संसाधने समतोलात असलेले समाज लोकसंख्येबाबतही स्थिर असतात. अशा वेळी दरेक समाज-घटक आपापले स्थान टिकवत, पूर्ण सहकार्याने व्यवस्था सांभाळत जगत असतो. युरोपीय वसाहतीकरणाआधीचे चिनी, भारतीय आणि इतर आशियाई समाज बहुधा असे होते. वाढत्या संसाधनांच्या स्थितीतले समाज जास्त प्रवाही, बदल करण्याला उत्सुक, असे असतात. अमेरिकेत गेलेले युरोपीय वसाहतकार असे असावे.
घटत्या संसाधनांच्या स्थितीत मात्र समाजबंधने गळून पडून स्थलकालाला न जुमानणारी स्थिती उद्भवते. गेल्या काही वर्षांत काही भारतीय समाज अशा स्थितीमुळे विघटित झाले आहेत.
शेतकरी समाज संकलकांसारखे पूर्णपणे निसर्गाच्या ताब्यात नसतात. काही नैसर्गिक क्रिया आपल्या लाभासाठी घडवून आणणे शेतकऱ्यांना जमते. सर्वच नैसर्गिक आपत्तींपासून सुटका झाली नाही तरी थोडेफार स्वातंत्र्य शेतकरी कमावतात. याचा परिणाम असा होतो की काही प्रमाणात तरी शेतकरी स्वतःकडे निसर्गातील संसाधनांचे ‘चालकत्व’ आहे, असे मानू लागतात. अनेक नैसर्गिक घटकांपैकी एक—-पण थोडेफार स्वामित्व कमावलेला, अशी शेतकऱ्यांची स्वतःबाबतची कल्पना असते. संसाधने टिकवून ठेवण्याकडे कल असतो, पण सुबत्तेच्या अवस्थेत स्वामित्वाची भावना बळावते. एकूण वृत्ती संसाधनांपासून जास्त फायदा कमावण्याची नसते, तर संभाव्य तोटे टाळण्याची असते. पिकांचे मिश्रण, क्रमवारी, सिंचन, सारे बहुतेक वेळी सामाईकपणे वापरले जाते, तेही अशा बचावात्मक भावनेनेच. ही भावना बिगर शेती क्षेत्रातही लागू पडते. संसाधने टिकवून धरण्याची सर्व संकलक तंत्रे शेतकरी समाजही राबवतात. सामाजिक दबाव, त्यातून घडलेल्या वहिवाटी आणि परंपरा, साऱ्याला धार्मिकतेची डूब देणे, ह्या बाबतींमध्ये शेतकरी समाज गुराख्यांपेक्षा संकलकांना जवळ असतात.
पर्यावरणावरील परिणामाबाबतही शेतकरी जीवनपद्धती संकलक आणि गुराखी यांच्या मध्ये कोठेतरी बसते. पण लोकसंख्येत वाढ होत असतेच आणि जमिनीचे शेतीखाली आणि कुरणांखाली येणारे क्षेत्रही वाढत असतेच. नव्याने जंगले नष्ट करून शेती करू लागणाऱ्या समाजांमध्ये तर हे परिणाम तीव्रच असतात.
जर संकलकांचा ऊर्जावापर निष्क्रिय (passive) मानला आणि स्थिर शेती करणारे सक्रियपणे (actively) ऊर्जा वापरतात असे मानले, तर त्यांच्या नंतर आलेली औद्योगिक जीवनशैली ऊर्जेचे दोहन करणारी (extractive) मानायला हवी. खनिज इंधने, त्यांच्यापासून थेट ऊर्जा कमावणे, विजेत रूपांतर केलेली ऊर्जा वापरणे, आणि अणुऊर्जेसारखी नवीच ऊर्जा वापरणे ही औद्योगिक जीवनशैली वापरणाऱ्यांची पद्धत. खाणकाम, जलऊर्जेसाठी पाण्याची नियंत्रित साठवण, ही औद्योगिक ऊर्जेची मुळे आहेत.
ऊर्जेसोबतच औद्योगिक जीवनशैली नवनवे पदार्थ घडवत आणि वापरत असते. दगड आणि लाकडाऐवजी धातू, प्लास्टिक्स, रासायनिक खते आणि कीटकनाशके, कुंभारकामातून उपजणारे पदार्थ, असे सारे करत आज सिलिकन चिप्सपर्यंत नवे पदार्थ घडून वापरात आले आहेत. जुन्या पदार्थांच्या साठवणीत आणि वाहतुकीतही औद्योगिक जीवनशैलीची क्षमता आधीच्या पद्धतींच्या कैक योजने पुढे आहे. यामुळे काही माणसे तरी जगभरातले कोणतेही संसाधन कुठेही नेऊन आणि त्यावर प्रक्रिया करून उपभोगत आहेत. अशा माणसांची संख्या एकूण मानवजातीच्या मानाने थोडीशीच आहे, पण त्यांचा जगावरचा प्रभाव मात्र आजवर कोणाचाही आणि कोठेही नव्हता तेवढा जास्त आहे.
ही माणसे नैसर्गिक चढउतार आणि आपत्तींपासून जवळपास मुक्त होऊन खऱ्या अर्थाने ‘जागतिक’ झाली आहेत, पण त्यांच्या संसाधनांच्या भुकेने अनेक निसर्गाच्या जीवनपद्धती नामशेष झाल्या आहेत.
माणसांना वापरण्याजोग्या वाटणाऱ्या वस्तूंची यादी गेली तीन शतके वाढतच आहे. आधुनिक विज्ञानाची प्रगती, आणि त्या ज्ञानाचा व्यवहारी वापर यातून नवे ऊर्जासाठे, नवे वस्तूंचे प्रकार, त्यांची वाढती वाहतूक, या वाहतुकीचा वाढता वेग, अशा प्रकारे संसाधन-वापराची तीव्रता सतत वाढतच आहे. अशा तीव्र वापराने एखादे संसाधन संपले की त्याला पर्यायी आणि ऊर्जेच्या दृष्टीने महाग असे संसाधन वापरात येते. इंधन म्हणून लाकूड कमी पडू लागले आणि महागले, तसा कोळसा जळू लागला. घोड्यांच्या चाऱ्याचा तुटवडा भासला तशी आगगाडी धावू लागली. [उत्तम दगडी कोळसा कमी पडू लागल्यावर भारतात ‘हलका’ कोळसा वापरून ‘सुपर थर्मल’ वीज-संयंत्रे वापरली जाऊ लागली, हा तर गेल्या पाव शतकातला प्रकार.]
पण ह्या क्रमशः संपत जाणाऱ्या संसाधनांच्या याद्या आणि वाढत जाणारी एकूण संसाधनांची यादी, यांच्यासाठी संकलक आणि शेतकरी समाजांच्या भूक्षेत्रांची गरज पडते. आपली ऊर्जा आणि संसाधनांची गरज आपलीच शेती आणि जंगले पुरवू शकत नाहीत हे उमजताच युरोपीय समाज वसाहती घडवू लागला. जरी आज वसाहतवादाचा ‘औपचारिक अंत’ झाला आहे तरी इतर जगातील संसाधने शोषून घेण्याची औद्योगिक समाजांची (‘पहिले’ जग!) क्रिया सुरूच आहे.
ह्या साऱ्या एकतर्फीपणामुळे माणसांच्या वस्त्यांचेही दोन प्रकार घडतात. एक निसर्गाशी पूर्णपणे फटकून, दुरावून राहणारा, तर दुसरा संसाधने दोहण्याचे प्रत्यक्ष काम करत औद्योगिकपूर्व जीवनशैलीने जगत सारे अतिरिक्त उत्पादन थोड्याशा औद्योगिक उत्पादनांच्या बदल्यात देऊन टाकणारा. फारदा ह्या तिसऱ्या’ जगाला पहिल्या जगाने निरुपयोगी म्हणून टाकून दिलेल्या वस्तू पाणसाठे आणि वातावरणांमधील प्रदूषणाच्या रूपात भोगत राहाव्या लागतात.
औद्योगिक जीवनशैलीच्या आधीच्या समाजव्यवस्था नातीगोती आणि भौगोलिक जवळिकीवर बेतलेली असे. उद्योग सुरू झाल्यावर मात्र सर्वच उत्पादनाच्या प्रक्रिया खूप गुंतागुंतीच्या आणि अनेक वेगवेगळी कौशल्ये एकत्रितपणे वापरणाऱ्या होत गेल्या. अनेक प्रक्रियांमध्ये एकमेकांना कधीच न भेटणाऱ्या माणसांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकाच प्रक्रियेत भाग घेणे गरजेचे झाले. मालमत्ता, जबाबदाऱ्या, अधिकार वगैरेंचे नियम शब्दबद्ध, ‘कायद्यां’च्या रूपात नोंदणे आवश्यक ठरू लागले. नातेसंबंध, एकाच प्रांतातील असणे वगैरे बंधने जाऊन व्यवसाय संबंध दाट झाले. श्रमविभाजनाचे हे नवेच रूप होते (आणि असते). खरे तर ‘व्यवसायसंबंध’ दोन पातळ्यांवर असतात; एक म्हणजे एकाच प्रकारची कौशल्ये वापरणारे, जसे, यंत्रज्ञ. यांचे संबंध दाट असतात. एकाच प्रक्रियेत भाग घेणारे पण वेगवेगळ्या प्रकारची कामे करणारे मात्र जुळत्या-तुटत्या संबंधात येतात. कामापुरते जुळते घेऊन, इतर वेळी सुटे राहणारे हे संबंध.
अशा विभाजित संबंधांमध्येही एक ‘गुण’ मात्र दिसतोच. पुरुष विशेष कौशल्याच्या आणि सन्मानाच्या जागा धरून ठेवतात तर स्त्रियांवर तोचतोपणा असलेली रटाळ कामे सोपवली जातात.
सुट्या व्यक्तींना या जीवनशैलीत खास महत्त्व प्राप्त होते. पण याचीच दुसरी बाजू म्हणजे व्यवहारांच्या नियंत्रणासाठी लागणारी प्रशासन–राज्यशासनाची व्यवस्थाही जास्त जास्त प्रबळ होत जाते. एखाद्या संसाधनाचा तुटवडा असतो तेव्हा शासन त्याच्या वापरावर आपले नियंत्रण ठेवते. उपलब्धता वाढल्यावर हेच नियंत्रण कमकुवत होते. [भारतात सीमेंट, लोखंड, अन्नधान्य यांबाबत हे घडले.]
ही जीवनशैली उद्भवली आणि विकसित झाली तो बहुतांश काळ संसाधनांच्या विपुलतेचा होता. अशी सुबत्ता नेहेमीच बहुप्रसू आर-वर्गी वागणुकीला जन्म देते. भरपूर प्रजोत्पादनाकडे कल असतो. संकलकांची संयत, काटकसरी वृत्ती ठामपणे नाकारली जाते. माणूस आता निसर्गाचा घटक मानला जात नाही. शेतकरी समाजांसारखा निसर्गाचा राखणदार-चालकही मानला जात नाही. निसर्गात आता काहीच ‘पवित्र’ मानले जात नाही—-ते पावित्र्य बहाल केले जाते बाजारपेठांना! संसाधनांच्या वाटपाची क्रिया बाजारपेठा ठरवतात, असे मानले जाते. हे होते भांडवलशाही समाजांत. जर समाज समाजवाद मानत असेल तर ‘क्ष-वर्षीय केंद्रीय योजने’ला पावित्र्य बहाल होते—-कारण अशा योजना बाजारपेठांपेक्षा जास्त कार्यक्षम मानल्या जातात. निसर्गाचे पावित्र्य मात्र ना भांडवलशाही मानत, ना समाजवाद. आता माणूस निसर्गापेक्षा पूर्णपणे वेगळा, स्वतःच्या भल्यासाठी निसर्गाचा हवा तसा उपभोग घेऊ शकणारा मानला जाऊ लागतो. ही औद्योगिक जीवनशैलीची संसाधन-वापराबाबतची विचारप्रणाली असते.
‘निसर्गावर मात करण्याची’ भाषा वापरणारी ही विचारप्रणाली जगाचा चेहेराच बदलून टाकते. कुठेकुठे नैसर्गिक रचनांची मूळ व्यवस्था बहाल करण्याचा प्रकारही दिसतो, पण बहुतेक वेळा हे बहु-उपभोगी समाजांकडून आपल्या शेजारच्या क्षेत्रातच केले जाते—-आणि जरा दूरची क्षेत्रे बिघडवणे हा याचा अपरिहार्य भागही असतोच [ही ‘माझा’ परिसर टिकवून शेजारी घाण करण्याची वृत्ती अमेरिकन बोलीत NIMBY, not in my backyard, या नावाने ओळखली जाते.]
संसाधनांचे पुनर्जनन करणे सोपे व्हावे, उजाड क्षेत्रे नव्याने संसाधनांच्या लागवडीखाली आणावी, अशा क्रियांसाठी वैज्ञानिक अभ्यासांमधून कमावलेले ज्ञान वापरले जाते. पूर्वी संयोजनाचे सूत्र धर्म हे असे, तर आता विज्ञान ती जागा घेते. पूर्वी विशिष्ट संसाधनांच्या वापरांवर धार्मिक निर्बंध असत, तर आज वैज्ञानिक कारणांमुळे निर्बंध लादले जातात. पण एकूण कल संसाधन-वापराची तीव्रता वाढवण्याकडे असतो, आणि वैज्ञानिक माहिती परिपूर्ण नसते. परिणामी विज्ञानाधिष्ठित संसाधन-व्यवस्थापनाचे प्रयोग फसतात. एकूण सजीव सृष्टीच्या अपार गुंतागुंतीत ढवळाढवळ करण्याची, पण संसाधने राखून ठेवण्याची क्षमता विज्ञान आज तरी पुरवू शकत नाही.
काही मोठाले संसाधन-साठे असावे की बरेचसे लहानसहान साठे? एखाद्या भूभागावर किती माणसे जगू शकतील, आणि वर्षानुवर्षे तगू शकतील? या आणि असल्या प्र नांवरचे गरमागरम वाद वैज्ञानिक व्यवस्थापनाच्या मर्यादा अधोरेखित करतात.
एक मात्र निर्विवाद, की औद्योगिक समाजांची संसाधनांची बकासुरी भूक, आणि उद्योगांची प्रचंड प्रदूषण (विष्ठा!) करण्याची क्षमता, यांचे पर्यावरणावर होणारे परिणाम गंभीर आहेत—-आणि हे परिणाम सौम्य करण्याइतपत खात्रीलायक वैज्ञानिक तंत्रे आज उपलब्ध नाहीत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.