“पुरुष अजूनी भूतकाळात राहात आहेत म्हणून पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे’ असे विधान माझ्या लेखात आहे (जाने. २००२). त्याला आशा ब्रह्म यांच्या लेखातल्या विधानांना जोडून भ. पां. पाटणकर यांनी एक (? विनोदी) निष्कर्ष काढला आहे “स्त्रिया (? उपय) नैतिक मूल्यांच्या मागे लागल्या आहेत.’ पा चात्त्य स्त्रिया ज्या मूल्यांचा पुरस्कार करत आहेत त्यांची थोडक्यात यादी लिहिते.
पती व पत्नी दोघेही नोकऱ्या करत असताना (अ) दोघांनी घरकामाची व मुलांची समान प्रमाणात जबाबदारी घ्यावी. (ब) पतीच्या करिअरएवढेच पत्नीच्या करिअरला महत्त्व असावे (क) दोघांच्या नातेवाईकांना सम प्रमाणात घरात स्थान मिळावे. पाटणकर म्हणतात, “स्त्रिया ही मूल्ये पुरुषांवर लादत आहेत.’ ‘लादत आहेत’ हा शब्दप्रयोग बरोबर नाही. त्या म्हणत आहेत, “तुम्हाला (पतीला) ही मूल्ये अमान्य असतील तर आम्ही घटस्फोट घेणार.” ही मूल्य योग्य का अयोग्य, जैविक का अजैविक (? उपरी) हे वाचकांनीच ठरवावे.
“माता-पिता-मुले या सगळ्यांच्याच हिताच्या दृष्टीने’ पाटणकर यांनी मांडलेल्या ‘propositions’ ना मला पुरुषप्रधान विचारसरणीचा वास येतो.
१. स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक जैविक भूमिका लक्षात घेतल्या तर बालकांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्याचे काम स्त्रियांकडे येते, हे पाटणकरांचे विधान मला अमान्य आहे. समाज आता नैसर्गिक अवस्थेत राहात नाही. मूळच्या नैसर्गिक अवस्थेवर कुटुंब, धर्म, परंपरा, संस्कृती, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था असे अनेक थर बसलेले आहेत. स्त्री पुरुषाप्रमाणे घराबाहेर नोकऱ्या करते. ते नैसर्गिक आहे का? पुरुषांच्या नोकऱ्या नैसर्गिक आहेत का? पुरुष सकाळी उठून शिकारीला जातात का? इतिहासात (व आधुनिक काळात) माता एकदा जन्म दिल्यावर मुलांचे संगोपन करत होत्याच अशीही परिस्थिती नाही. (त्याची उदाहरणे माझ्या जाने. २००२ मधल्या लेखात आहेत.)
सध्याच्या काळात नैसर्गिकतेचे स्तोम केवळ पुरुषप्रधान संस्कृतीची सोय म्हणून माता व मुलांच संगोपन या बाबतीत केले जाते. नैसर्गिक म्हटले की जबाबदारी टाळणे सोपे जाते. शिवाय स्त्रिया मुलांना संभाळण्यात गुंतल्या की त्यांना राजकारण, अर्थव्यवस्था व इतर महत्त्वाच्या क्षेत्रात भाग घेऊन उच्च स्थान मिळवणे कठीण होते. पुरुषप्रधान संस्कृती टिकण्यास मदत होते. (खरी समता समाजात येईल तेव्हा सर्व क्षेत्रांत स्त्री-पुरुषांची संख्या साधारण सम प्रमाणात असेल.)
२. ते काम (मुलांच्या संगोपनाचे) स्त्रीने केले तर मुलांसाठी इष्ट काय हे ठरवण्याचा हक्क सर्वस्वी त्यांचा होत नाही, असे पाटणकर म्हणतात, तेही मला अमान्य आहे. जबाबदारी व हक्क ही जोडी आहे. आईवडील या दोघांनीही जबाबदारी घेतली तर तो हक्क त्या दोघांचा होईल. (जबाबदारीत मी आर्थिक, भावनिक, शैक्षणिक ह्या सर्वांचा सामावेश करते).
३. पाटणकर परंपरेपासून दूर हटणे हे कृत्रिम आहे असे म्हणतात. परंपरा सतत बदलत असतात. ब्राह्मण पुरुषांची शेंडी, संध्या, सती, विधवांचे केशवपन ह्या परंपरा आपण सोडल्याच ना? सोळा संस्कारांचे आता काय झाले आहे ? पहिल्या विधानात पाटणकरांनी नैसर्गिकतेला दिलेले महत्त्व व तिसऱ्या विधानातले परंपरेचे महत्त्व हे परस्पर विरोधी आहे. (नैसर्गिक परिस्थिती निसर्गनिर्मित असते, परंपरा मानवनिर्मित असतात.)
४. कुटुंबव्यवस्थेत एकतर्फी निर्णय कुणाचाच नसावा, असे पाटणकर लिहितात. स्त्रियांना त्यांच्या जीवनाचे निर्णय घेऊ देत, मग ते एकतर्फी असतील तरी चालेल, अशी माझी भूमिका आहे. कारण आपली कुटुंबे स्त्रीच्या दुय्यम स्थानावर आधारलेली आहेत. तिने स्वार्थत्याग करावा अशी अपेक्षा असते. तिच्याबद्दल कुणी न्याय्य निर्णय घेईल ह्याची मला खात्री नाही.
हा लेख वाचणाऱ्या सर्व पुरुषांनी मी करिअर सोडून मुलांसाठी घरी बसेन का?, हा प्र न स्वतःला विचारावा. (प्रत्यक्षात असे मी दोन वडील पाहिले आहेत. एक भारतात व एक अमेरिकेत.) माझ्या मते स्त्रियांच्या कष्टांवर, पिळवणुकीवर आधारित, पुरुषकेंद्रित (पुरुषांच्या सोयीची–फायद्याची) यंत्रणा बदललीच पाहिजे.
हा बदल घडताना समाजात उलथापालथ होईलही; कुटुंबव्यवस्थेची घडी मोडेलही. हरकत नाही. या घडामोडीतून साकारलेले कुटुंब माता, पिता व मुले यांच्या दृष्टीने न्याय्य व विकसनशील असेल असा माझा विश्वास आहे.
जर समाजाने, स्त्रीपुरुषांनी स्त्रियांच्या बाबतीत आपली वागणूक काळाची पावले ओळखून बदलली तर उलथापालथ होणारही नाही. अशी समतोल भारतीय व अभारतीय कुटुंबे मी बघतेही आहे. पती व पत्नी हसतखेळत एकमेकांना मदत करतात. पण त्यांचे प्रमाण कमी आहे. ते वाढावे म्हणून ही धडपड. पहिल्या परिच्छेदात भ. पां. पाटणकर माझी व (? आशा ब्रह्म यांची) खिल्ली उडवत आहेत अशी मला शंका येते. तशा रीतीने मलाही लिहिता येते. परंतु आजचा सुधारकमध्ये तरी सर्व विषयांची गांभीर्याने चर्चा व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून मी तसे लिहीत नाही.
स्त्रियांचे समाजातले स्थान, त्यांचे हक्क, मुलांच संगोपन याबद्दल मी परत परत तेच तेच आजच्या सुधारकमध्ये लिहिते आहे. यापुढे माझ्याकडूनच मी ही चर्चा बंद करते. फार जरूरी वाटली तरच मी या विषयावर लिहीन. इतरांनी ही चर्चा जरूर चालू ठेवावी.
65, Oxford Road,
Newton, MA 02459, U.S.A.