उत्क्रांती: परोपजीवींनी दुस्साहसी बनवलेल्या घुशी

[EVOLUTION : Parasites make Scaredy-rats foolhardy या Science या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या २८ जुलाय २००० च्या अंकातील कार्ल झिमरच्या लेखाचे हे भाषांतर. झिमरचे ‘Parasite Rex’ (राजा परोपजीवी) हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.ट
‘एक्स–फाईल्स’ हा अधिसामान्य (paranormal) घटनांवर आधारित कार्यक्रम लोकप्रिय व्हायच्या बऱ्याच आधी रॉबर्ट हाईनलाईनने परग्रहांवरून आलेले परोपजीवी माणसांची मने बदलू शकण्याबाबत विज्ञान कथा लिहिली होती. त्याच्या १९५५ सालच्या ‘द पपेट मास्टर्ज’ या कादंबरीत अळ्यांसारखे परोपजीवी माणसांच्या कण्यांना चिकटून आपला वंश वाढवणाऱ्या क्रिया करायला माणसांना भाग पाडतात. हाईनलाईन कट्टर कम्युनिस्ट विरोधक होता, आणि त्याच्या कादंबरीच्या हेतूत हे लाल-विरोधाचे अंग जीवशास्त्रापेक्षा जास्त होते. पण आता तो ‘द्रष्टा’ ठरत आहे. काही परोपजीवी आपल्या यजमानांची वागणूक बदलू शकतात, आणि हे ‘त्यांच्या’ भल्यासाठी घडते.
रॉयल सोसायटी ऑफ लंडन (ए) च्या ७ ऑगस्टच्या अंकात ऑक्सफर्डच्या काही संशोधकांनी टॉक्झोप्लाज्मा गाँडिआय (Toxoplasma gondii) या एकपेशीय परोपजीवीची ही क्षमता दाखवून दिली आहे. टॉक्झोप्लाज्मा जीवांचे मुख्य आणि अंतिम यजमान मांजर हे आहे (त्यांची वाढ आणि त्यांचे प्रजनन मांजरांच्या शरीरांमध्ये होते). पण मांजरांकडे जाण्याच्या वाटेवर ते घुशींमध्येही काही काळ कंठतात. आणि अशा काळात घुशींची मांजरांबद्दलची भीती कमी होते. घुशींच्या ‘स्वभावा’तले हे बदल नेमके असतात, आणि या बदलांमुळे टॉक्झोंचे जीवनक्रम पूर्णत्वाला जायला मदत होते.
ह्या कहाणीला महत्त्व देण्याचे एक कारण म्हणजे टॉक्झो परोपजीव माणसां-मध्येही अनेकदा सापडतात. बहुधा पृथ्वीवरील अर्ध्या माणसांच्या मेंदूंमध्ये टॉक्झोंच्या पुटी (मद्यद्म) सापडतात. यांचे बाह्य परिणाम मात्र दिसत नाहीत. ज्या लोकांची प्रतिरक्षाव्यवस्था (immune system) कमकुवत असते अशा लोकांमध्ये (उदा. एड्जचे रोगी, भ्रूण) मात्र या पुटी मेंदूला इजा करून मृत्यूही घडवू शकतात. ताजे संशोधन दाखवते की पुटींच्या स्पातले टॉक्झोही यजमानांच्या व्यक्तिमत्त्वात नाजुक बदल करू शकतात.
साधारणपणे टॉक्झो मांजरांच्या पचनसंस्थेत अंड्यांसारख्या पुटी बनवतात, आणि त्या मांजरांच्या विष्ठेसोबत बाहेर पडून वर्षानुवर्षे मातीत तगून राहतात. घुशी, पक्षी, उष्ण रक्त असलेले सस्तन प्राणी, अशांचा या मातीशी संपर्क आला की या अंडपुटी या तात्पुरत्या यजमानांमध्ये जाऊन त्यांच्या पेशींमध्ये घुसून प्रजनन घडते. शरीरांच्या प्रतिरक्षाव्यवस्थेपासून वाचायला या पुटी चिवट कवच घडवून सुस्त पडून राहतात. या अधल्यामधल्या यजमानांना टॉक्झो फारशी इजा करत नाहीत. मांजरांच्या खाण्यात जर असे यजमान (पक्षी, घुशी इ.) आले, तर मात्र या पुटी ‘बहरू लागतात. उत्क्रांतीच्या दृष्टीने मध्यस्थ-यजमानांना इजा न करणेही योग्य आहे, कारण मांजरे मेलेले प्राणी सहसा खात नाहीत. (म्हणजे मध्यस्थांना मारणारे टॉक्झो मांजरांमध्ये पोचायची शक्यता कमी आहे.)
पण १९६० नंतर झालेले परोपजीवींवरचे संशोधन दाखवते की अनेक वेगवेगळ्या प्रकारांनी परोपजीवींमुळे यजमानांची वागणूक परोपजीवींना लाभदायक ठरणाऱ्या दिशांनी बदलू शकते. टॉक्झो असे करतात का हे तपासायला ऑक्स्फर्डच्या मॅन्युएल बॅर्डाय आणि जोअॅन वेब्स्टर यांनी एक प्रयोग आखला.
एका भुलभुलैया (maze) असलेल्या पिंजऱ्याच्या चार कोपऱ्यांमध्ये चार वासांच्या द्रवाचे थेंब टाकले—- गवत, घुशी, ससे आणि मांजरे, अशी ही ‘सुगंधी द्रव्ये’ होती.
निरोगी घुशी मांजरांचा वास असलेला कोपरा गाठल्यावर दूर पळत, आणि रात्री त्या भागात जाणे टाळत. टॉक्झोंनी ‘ग्रस्त’ घुशी मात्र मांजरांच्या वासाच्या कोपऱ्यात इतर कोपऱ्यांइतक्याच सहजपणे जात. हे ‘शौर्य’ सोडले तर टॉक्झो असलेल्या आणि नसलेल्या घुशींमध्ये काहीच फरक संशोधकांना आढळला नाही. अन्न कमावणे, जोडीदार प्राप्त करणे, टोळीच्या श्रेणीत आपली जागा ‘टिकवणे’, सर्व बाबतीत टॉक्झो असलेल्या घुशी निरोगी घुशींसारख्याच होत्या—-फक्त मांजरांची भीती त्यांना ‘तितकीशी’ नव्हती. त्यांना वासच येत नव्हते असे नाही. दोन्ही प्रकारच्या घुशी सशांच्या वासापेक्षा घुशींच्या वासात राहणे पसंत करायच्या. बॅर्डायच्या मते मेंदूच्या पेशींमधली धोका टाळायला लावणारी रसायने टॉक्झोंमुळे रोधली जात होती. हिलरी हर्ड ही संशोधक म्हणते की हा प्रयोग अजून पूर्णत्वाला गेलेला नाही. मांजरांच्या भक्ष्यात टॉक्झोग्रस्त घुशी आणि ‘साध्या’ घुशींची प्रमाणे तपासून मगच निष्कर्ष काढता येतील. ती म्हणते, “कुतूहल चाळवले जाते, पण ही खरे तर
सुस्वात आहे.” माणसांमध्ये टॉक्झो अनेक तहांनी शिरू शकतो. मांजरांच्या घाण करायच्या जागा स्वच्छ करताना, कमी शिजवलेले मांस खाताना, बागकाम करताना माणसांमध्ये टॉक्झो पुटी शिरतात. टॉक्झोंच्या दृष्टीने हा मृत्यू असतो,
कारण मांजरे माणसांना खात नाहीत. पण टॉक्झो-पुटींमुळे माणसांची वागणूक बदलते, असे मानायला जागा आहे.
प्राग विद्यापीठाच्या यारोस्लाव्ह फ्लेग्रने (Jaroslav Flegr) टॉक्झोग्रस्त आणि टॉक्झोमुक्त माणसांना काही मानसशास्त्रीय अभ्यासाच्या प्रश्नपत्रिका दिल्या. एक थोडासा पण सांख्यिकीचे दृष्टीने लक्षणीय भाग फ्लेग्रला आढळला. टॉक्झोग्रस्त माणसांत काही प्रमाणात असुरक्षिततेची आणि स्वतःला दोष देण्याची भावना आढळते. एक विरोधा-भास असा की टॉक्झोग्रस्त स्त्रिया जास्त मोकळ्या आणि सहृदय असण्याकडे कल असतो, तर पुरुष मात्र
शंकेखोर आणि हेकेखोर असण्याकडे कल दिसतो. फ्लेग्रला असेही आढळले आहे की जास्त काळ टॉक्झोग्रस्त असलेल्या लोकांमध्ये हे कल जास्त स्पष्ट होतात. ह्या संशोधनाबद्दल अनेक जण अजून साशंक आहेत. डेलवेअर विद्यापीठातला (न्यूअर्क, अमेरिका) रॉबर्ट सायमन हा मानसशास्त्री म्हणतो की हे संशोधन आणि निष्कर्ष ‘धाडसी’ आहेत, पण ठामपणे मान्य करण्याजोगे नाहीत. “मला याचा खरा अर्थ सुचत नाही आहे. आणखी अनेक लोकांनी हे सांख्यिकीय संबंध तपासायला हवे आहेत.” जरी हे बदल खरे असले तरी टॉक्झोग्रस्त माणसे काही वाघसिंहांपुढे उड्या घेणार नाहीत. पण फ्लेग्रच्या संशोधनातून परोपजीवी आपल्या जीवनक्रमांना आणि नियतीला कसे जुळते होतात याचे एक आपल्याशी संलग्न स्य दिसते.
इपृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी नाही. माणूस इतर प्राण्यांसारखाच उत्क्रांतीतून घडला. आपल्या विचारांचा आणि भावनांचा खूपसा भाग आपल्याच बौद्धिक ‘टप्प्या पलिकडे’ आहे. आणि परोपजीवींच्या अंड्यांमुळेही आपले स्वभाव बदलू शकतात!
देवादिकांना न मानताही स्वतःचे विश्वातले स्थान नगण्य आहे असा गर्वहरण करणारा भाव उपजू शकतो. हा ‘नम्र’ भाव पूर्ण इहवादी विचारांमधून येतो. त्याला ‘होईन मी कुरवंडी, कुरवंडी होईन’ ची गरज नसते! —- संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.