खादी: श्री. वेले ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने

श्री. दामोदर वेले ह्यांचे मे अंकातले पत्र वाचले. त्यांनी Mass Production च्या जमान्यांत खादी काळ बाह्य झाली आहे असे माझे मत म्हणून मांडले आहे. त्याबाबतीत मला त्यांचे लक्ष त्याच अंकातल्या ५०-५१ या पानवरील मजकुराकडे वेधावयाचे आहे. त्यांत मी असे म्हणतो की, आपले प्र न औद्योगिक क्रान्ती व तज्जन्य Mass Production मुळे निर्माण झाले नाहीत. ते आपल्याला यंत्रयुगाला सामोरे जाता आलेले नाही म्हणून निर्माण झाले आहेत.
यंत्रयुग मानवेतिहासांत फार पूर्वीच आलेले आहे. आणि लोकसंख्या मुळीच वाढली नाही तरी, मानवी बुद्धीच्या आटोक्यात नवीन उत्पादनपद्धती येऊ लागल्या तेव्हापासून हा फरक पडला आहे. पालख्या-मेणे खांद्यावर घेऊन जाणाऱ्या भोयांना, टांगे वाल्यांनी बेरोजगार करण्याचे कार्य यंत्रयुगाने कधीच केले आहे. आज खादी वापरणे हे भोई बेकार होतील म्हणून पालख्या खांद्यावरून वाहण्यासारखे आहे.
Mass Production मुळे ज्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यावरील उपाय आम्हाला अन्यत्र शोधावे लागतील. खादीची निर्मिती ही छंद म्हणून भरल्या पोटी करायला काही हरकत नाही. सगळ्या बेरोजगारांना पुरेसा बेरोजगार-भत्ता दिल्यानंतर त्यांनी आपला फुरसतीचा वेळ अवश्य खादी-निर्मितीत घालवावा. परंतु सूत कातणे आणि विणणे ह्यांपैकी काही कामे केल्यासच त्यांचा अन्नावरचा हक्क मान्य करणे आणि खादीच्या उत्पादनाला रोजगार म्हणणे ह्याला माझा विरोध आहे. जे काम त्यांना केवळ उदरपोषणापुरते उत्पन्न देते त्याला रोजगार समजणे व त्याचे समर्थन करणे अत्यंत अनुचित आहे; असे माझे आजवरच्या चिंतनामधून झालेले मत बदलण्याची मला गरज वाटत नाही. त्यामुळे राहत कार्य अर्थात् Relief Work म्हणून खादी ग्रामोद्योगांचा वापर करण्याला माझा तीव्र विरोध आहे.
वस्त्रस्वावलंबन कधी व्यापक होऊ शकणार नाही हे वेलेजी स्वतःच मान्य करतात. त्यामुळे त्याविषयी अधिक लिहिण्याची गरज नाही. ग्रामवस्त्रस्वावलंबनाचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकेल असे त्यांना वाटते परंतु मी ग्रामीण आणि शहरी किंवा नागर असा आमच्या नागरिकांमध्ये भेद करू इच्छित नाही. शहरी लोकांना जर वस्त्रस्वावलंबन अशक्य असेल तर ते ग्रामीणांनाही अशक्य असेच आम्ही मानले पाहिजे. उपभोक्त्याच्या क्रयशक्तीचा अभाव हाही मुद्दा त्यांनी घेतला आहे. त्याविषयीची मते देखील माझ्या लेखनातून मांडून झाली आहेत. त्यांनी विचारलेल्या चार प्र नांची उत्तरे पुढे देत आहे. विपुल उत्पादन असावे की नसावे ह्याचे उत्तर-पूर्ण देशाने त्याच्या प्रजेसाठी आवश्यक असलेले उत्पादन करावे असे आहे.
विपुल उत्पादन तारक की मारक हा प्र न माझ्या मते उद्भवतच नाही. जे प्र न आम्ही सर्वांनी म्हणून सोडवायचे ते एक एकट्याने सोडवण्याचा प्रयत्न आम्ही किती दिवस करीत राहणार? पूर्ण देशाने म्हणजे देशवासीयांनी आपले सर्वांचे कल्याण कशाने साधेल ह्याचा विचार करणे भाग आहे. प्रत्येकाने आपआपले प्र न सोडवून देशाचे प्र न सुटत नसतात हे समजण्याची वेळ आली आहे. आपल्या देशाच्या इतिहासांत सगळ्यांचे हित साधण्याच्या कृती आजवर घडल्या नाहीत. प्राचीन संस्कृत ग्रंथांमधून सुद्धा हा विचार झालेला आढळत नाही. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ वृत्ति आपणा सर्वांच्या ठिकाणी निर्माण होण्यासाठी कोणतेहि पद्धतशीर प्रयत्न (ह्यामधे त्यासाठी झालेले ग्रंथलेखनही आले.) केले गेले नाहीत.
श्री. दामोदर वेले ह्यांनी त्यापुढे काही इच्छाचिंतन केले आहे. आणि त्या इच्छाचिंतनाचा आधार घेऊन खादीची कृषिव्यवसायाशी घालावी लागेल, कृषि आणि वस्त्रोत्पादन हे परस्परपूरक उद्योग आहेत, कृषिव्यवसायांत बारमाही काम नसल्यामुळे जोड-व्यवसाय म्हणून चरखा स्वीकारावा असे त्यांचे मत मांडले आहे. त्यांच्या ह्या सगळ्या प्रतिपादनांत खादी हरप्रयत्नाने टिकवावयाची असा अट्टाहास दिसतो. मला इतकेच म्हणायचे आहे की गेली पन्नास वर्षे (स्वातंत्र्योत्तर काळांत) हे घडू शकलेले नाही म्हणून त्यांनी सध्याच्या आणि पूर्वीच्या परिस्थितीच्या आणि मानवी स्वभावाच्या संदर्भात आपले मुद्दे तपासून पहावे.
डॉ. पराग चोळकर ह्यांचा ‘खादी नवसमाज-निर्मितीचे प्रतीक’ ह्या नावाचा लेख आंदोलनच्या ऑगस्ट २००१ च्या अंकांत प्रकाशित झाला आहे. त्यामधल्या भांडवलाच्या मुद्याचा परामर्श ह्यापुढे घ्यावयाचा आहे. खादीच्या निर्मितीसाठी गिरण्यांच्या मानाने फार थोडे भांडवल लागेल असे ते म्हणतात. भांडवलाचे स्वरूप हे पहिल्यापासून पैशाशी कमी आणि मानवी बुद्धीशी अधिक निगडित राहिलेले आहे. अगदी प्रारंभिक परिस्थितीत ज्यावेळी पैशामध्ये विनिमय होत नव्हता आणि वस्तूंच्या साहाय्याने होत होता त्यावेळी भांडवलाचे स्वरूप कोणते होते हे तपासणे अगत्याचे आहे. ‘ज्या साधनाच्या योगाने उत्पादनात भर पडते आणि ती सतत पडते एवढेच नव्हे तर चक्रवाढ व्याजासारखी निरंतर वाढती असते. त्या साधनास भांडवल म्हणावे.’ पैसा ज्यावेळी भांडवल म्हणून मोजला जातो त्यावेळी तो नवीन यंत्रसामग्री प्राप्त करण्यासाठी वापरलेले साधनमात्र असतो. (भांडवलाची ही व्याख्या वैयक्तिक पातळीवरची नसून पूर्ण समाजाच्या पातळीवरची आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापारासाठी लागणारे भांडवल म्हणजे मालाचा साठा करून ठेवण्याला उपयोगी पडणारे पैसे येथे भांडवल म्हणून मोजले नाहीत. पूर्ण देशाच्या दृष्टीने जी साधने उत्पादन वाढीसाठी उपयोगी पडतात त्यांचीच गणना येथे भांडवल म्हणून केलेली आहे.)
भांडवलाची माझी वरील व्याख्या मान्य केल्यास एक स्वतंत्र देश आपल्या प्रजेसाठी आवश्यक असलेल्या कारखानदारीसाठी जरूर साधनसामग्री करू शकतो. आणि त्या भांडवलाचे मोजमाप पैशांत म्हणजे रुपया, येन, पाऊंड, डॉलर अशा चलनात करण्याची आवश्यकता नाही. भांडवलाची माझी व्याख्या मान्य झाल्यास भांडवलनिर्मितीसाठी शोषणाची गरज पडत नाही हेहि स्पष्ट होईल.
देशातल्या कारखानदारीच्या वाढीसाठी जर देशान्तर्गत चलन वाढवण्याची गरज असेल तर ते वाढवण्याचे सामर्थ्य त्या देशाच्या संसदेला आहेच. गांधीजींनी ज्यावेळी १९०८–९ साली ‘हिंद स्वराज्य’ हे पुस्तक लिहिले, त्यावेळी आम्ही पारतंत्र्यांत खोल बुडालेलो होतो. आणि आपल्या देशांत कारखानदारी तर राहोच पण चलन देखील आम्ही वाढवू शकत नव्हतो. अशा काळांत गांधीजींनी सुचवलेले उपाय आज आमच्या स्वातंत्र्योत्तर काळांत लागू करण्याचे कारण नाही.
मोहनी भवन, खरे टाऊन,
धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.