संपादकीय

समाजात सतत बदल होत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्यापरीने असे बदल निरखत-नोंदत असतो, त्यांचे बरे वाईट असे मूल्यमापन करत असतो आणि हे सारे इतरांच्या निरीक्षण-मूल्यमापनाशी ताडून पाहत असतो. बहुतेक माणसांना ‘माझेच खरे’ असा गर्व नसतो. आपले विचार मांडणे, इतरांचे विचार समजून घेणे, नव्या भूमिका घडवणे, असे सारे व्यवहार आपण सतत करत असतो. ‘आता मी काय करू?’ ह्या प्र नाचे उत्तर आपण अशा विचारांच्या देवाणघेवाणीच्या पायावर उभे राहूनच देऊ शकतो. हे सारे करणाऱ्यांच्या विचारांत आणि कृतीमध्ये फार अंतर पडत नाही. पण ‘माझेच’ खरे ही वृत्ती बळावली तर त्यातून ‘अंतस्थ हेतू’, ‘हिडन अजेंडे’, असे सारे घडून कथणी आणि करणीतले अंतर वाढत जाते. भारतातल्या औपचारिक शिक्षणव्यवस्थेकडे त्रयस्थपणे पाहिलेतर मात्र स्वातंत्र्या-नंतर धोरणे, कृती आणि परिणाम यांच्यात मोठाल्या दऱ्या पडलेल्या दिसतात. यावर उपाय शोधायचा झाला तर शिक्षण देण्याघेण्यामागचे वेगवेगळ्या गटांचे हेतू, त्यांच्यात कधी साठमाऱ्या होणे तर कधी एकरूपता दिसणे, असे प्रकार तपासायला हवेत. यातूनच एक ‘आदर्श’ घडवायचा विचार करता येतो. सध्याची लोकप्रिय ‘किमान समान कार्यक्रमा’ची भाषा सोडून काही ‘कमाल’ करायला हवी. हा आदर्श-कमाल कार्यक्रम विचारांमध्ये स्पष्ट झाला की मगच प्रत्यक्ष स्थितीपासून आदर्शाकडे कसे जायचे ते ठरवायला सुरुवात करता येईल.
‘शिक्षणामागील हेतू’ स्पष्ट करायच्या विनंतीला मान देऊन लिहिणारे सारे जण —- आणि त्याबद्दलच्या विशेषांकाची आखणी आणि संपादन करणाऱ्या संजीवनी कुलकर्णी —- हे विचारपूर्वक, सजगपणे शिकवणारे लोक
आहेत. त्यांच्या विचारांना कृति आणि निरीक्षणाचा एक सबळ ‘कणा’ आहे. त्या कोणाला ‘वेदांचा तो अर्थ, आम्हासची ठावा’ असा गर्वही नाही, त्यामुळे ह्या विशेषांकाने चर्चेलाही चालना मिळेल अशी आशा आहे.
संपादक
सूचना
या अंकासाठी आलेला संजय संगवई यांचा लेख “संकोच स्थलकालाचा : आणखी कशाकशाचा?’, हा पृष्ठमर्यादेमुळे पुढील अंकात प्रकाशित केला जाईल.
संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.