व्यक्ती विरुद्ध नागरिक

आधुनिक काळात जगातील सर्व सुसंस्कृत समाजांनी शिक्षणाची आवश्यकता स्वीकारलेली आहे. अनेक मान्यवर विद्वानांना हे म्हणणे मान्य नाही. त्यांच्या मते जे उद्देश्य गाठण्याचा दावा शिक्षण करते ते गाठण्यास ते असमर्थ ठरलेले आहे. ह्या मताचा खरेखोटेपणा तपासण्याआधी शिक्षणामुळे काय साध्य व्हावे असे आपल्याला वाटते ह्याचा विचार करायला हवा. शिक्षणाच्या हेतूबद्दल एकवाक्यता नसणे स्वाभाविक आहे पण एका मुद्द्यावर मात्र विरोधकांमध्ये दोन कट्टर गट पडल्यासारखे दिसतात — शिक्षणाचा विचार व्यक्तीच्या संदर्भात करणारे आणि शिक्षणाचा विचार समाजाच्या संदर्भात करणारे.

शिक्षणामध्ये व्यक्तीला घडवण्याची क्षमता असते असे जर मानले तर असा प्र न उद्भवतो की शिक्षणाने माणसाला चांगली व्यक्ती म्हणून घडवावे की चांगला नागरिक म्हणून? काही जण म्हणतील की चांगली व्यक्ती आणि चांगला नागरिक ह्यांच्यात फरक नसतोच. ह्या मताचे मंडन अथवा खंडन करण्याची माझी इच्छा नाही पण दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये विद्यार्थ्याचा व्यक्ती म्हणून विचार कस्न बेतलेले शिक्षण आणि त्याचा भावी नागरिक म्हणून विचार करून बेतलेले शिक्षण ह्यात मोठा फरक आहे. व्यक्तीच्या मनाची मशागत करणारे शिक्षण वेगळे आणि व्यक्तीचे उपयोगी नागरिकात स्पांतर करणारे शिक्षण वेगळे.

व्यक्तीचे चांगलेपण कशात असते? ह्या प्र नाचे माझे उत्तर मी देतो. त्याच्याशी सगळे सहमत असतील असे मला म्हणायचे नाही.

प्रथम आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीमध्ये जगाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. का? ह्या प्र नाचे उत्तर मला देता येणार नाही पण ज्ञान आणि विविध गोष्टींचा समावेश करण्याची क्षमता हे माणसाचे वैभवशाली गुण आहेत. अवकाशाची खोली, सूर्य आणि ग्रहांची उत्क्रांती, पृथ्वीची भूगर्भशास्त्रीय युगे, मानवजातीचा संक्षिप्त इतिहास, हे सर्व ज्ञान ज्याच्या विचारांमध्ये केंद्रित होऊन झळाळते आहे तो माणूस माणूसपणाची वैशिष्ट्ये घेऊन जगतो आहे आणि विविधतेने नटलेल्या निसर्गामध्ये महत्त्वाचे योगदान करतो आहे असे मला वाटते. पुढेमागे भौतिकशास्त्राने ‘अवकाशाची खोली’ आणि ‘गतकाळाचे अंधारे विवर’ ह्या फक्त गणितज्ञाच्या समीकरणातील गुणक संख्या आहेत असे सिद्ध केले तरी माझे हे मत मी बदलणार नाही कारण त्यामुळे माणसाचे सध्याचे ज्ञान खोटे ठरले तरी त्याच्या प्रतिभाशाली कल्पनाशक्तीचे कौतुक करावेच लागेल.

पण व्यक्तीमध्ये फक्त जग प्रतिबिंबित होऊन चालणार नाही, ते भावनेसहित प्रतिबिंबित झाले पाहिजे. एखाद्या गोष्टीमुळे निर्माण होणाऱ्या विशिष्ट भावनेबरोबरच ज्ञान ग्रहण करण्याच्या क्रियेतच असलेला सामान्य आनंदही प्रतिबिंबित झाला पाहिजे. पण केवळ ज्ञान आणि भावना माणसाला परिपूर्ण बनवत नाहीत. हे जग सतत बदलते आणि प्रवाही आहे. ह्या बदलांमागच्या कारणांना माणूसही जबाबदार आहे. आपण कारण आहोत ही जाणीव माणसाला स्वतःच्या इच्छाशक्तीचा वापर करायला प्रवृत्त करते आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव करून देते. माणसाला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी ज्ञान, भावना आणि सामर्थ्य ह्या तिन्हीचाही पूर्ण विकास होणे आवश्यक आहे.

ह्या सर्व चर्चेमध्ये माणसाचा विचार व्यक्ती म्हणून केला आहे. बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मांनी, गूढवाद्यांनी माणसाचा विचार व्यक्ती म्हणूनच केला. पण आपल्या चित्रातील आदर्श व्यक्तीमध्ये असलेले ज्ञान आणि भावनेचे घटक हे सामाजिक घटक मानता येणार नाहीत. आपली इच्छाशक्ती आणि सामर्थ्य ह्यांचा वापर करूनच माणूस समाजाचा उपयोगी सदस्य बनू शकतो. पण प्रबळ इच्छाशक्तीमुळे माणसाचे स्पांतर हुकूमशहात होण्याचा धोका आहे. दैवी इच्छेप्रमाणेच व्यक्तींची इच्छाही “हे असे होवो’ अशा आदेशांमध्ये परिणत होऊ शकते. नागरिकाची वृत्ती वेगळी असते. आपली इच्छा ही जगातल्या अनेकांच्या इच्छांपैकी एक आहे. ह्याची त्याला–जाणीव असते आणि समाजातील परस्परविरोधी इच्छांमध्ये समन्वय साधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. व्यक्ती ही प्रामुख्याने स्वयंपूर्ण (स्वयं-निर्वाही—- self – subsistent) असते. नागरिकावर मात्र आपल्या शेजाऱ्यांचा विचार करण्याचे बंधन असते. ह्या अर्थाने आपण सर्व नागरिक आहोत आणि ह्या वस्तुस्थितीचा विचार शिक्षणात व्हायला हवा. नागरिकाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे त्याच्यात असलेली सहकार्याची भावना. पण ज्या कार्यात सहभाग द्यायचा ते कार्य सुरू करण्याएवढे कर्तृत्व सामान्य नागरिकांमध्ये नसते, त्यासाठी असामान्य प्रतिभेच्या व्यक्ती लागतात. नागरिकत्वाचा हा सर्जनशील प्रकार क्वचितच पहायला मिळतो. आणि नागरिकांसाठी आखलेल्या शिक्षणप्रणालीतून तो निर्माण होण्याचा संभव नाही. सरकारला लायक वाटणारे नागरिक ‘जैसे थे’ (status quo) परिस्थितीला पाठिंबा देणारे असतात. असे नागरिक निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करते. पण आ चर्य म्हणजे सत्तेवर असलेले सर्व लोक ज्या माणसांची आदर्श म्हणून पूजा करतात ते कधीच ‘जैसे थे’चा पुरस्कार करणारे नव्हते. जॉर्ज वॉशिंग्टन आणि जेफर्सनचे कौतुक करणाऱ्या अमेरिकेत त्यांच्यासारखीच राजकीय मते असणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते. संपूर्ण पा चात्त्य जग आज येशू ख्रिस्ताचा गौरव करते पण ख्रिस्त जर आज अवतरला तर पाश्चात्य सरकारे त्याच्याकडे संशयानेच पाहतील. ह्यावरून हे लक्षात येईल की नागरिकत्व हे आदर्श म्हणून अपुरे आहे कारण त्यात सर्जनशीलतेचा अभाव आहे आणि सत्ताधारी वर्गाचे आदेश निमूटपणे पाळायची वृत्ती आहे. हे महान व्यक्तींचे लक्षण नाही. ह्याच्या अतिरेकाने सामान्य माणसांमध्ये असलेली निर्मिति क्षमतासुद्धा खुरटली जाते.

ह्याचा अर्थ मी बंडाचा पुरस्कार करतो असा नाही, बंड किंवा परिस्थितिशरणता ह्यांचे मूल्यमापन व्यक्तीच्या लहरीप्रमाणे करता येत नाही, ते बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. कशाच्या विरोधात बंड आहे ह्याचा विचार करून त्याची स्तुती किंवा निंदा करता येते. पण वेळ पडली तर बंड करण्याची क्षमता टिकून राहायला हवी; कडक, शिस्तबद्ध शिक्षणातून येणारे आंधळे आज्ञापालन नको. आणि ह्या दोन्हीपेक्षा नवीन दिशा शोधण्याची सर्जकता जिवंत ठेवणे महत्त्वाचे आहे.

माणसाचे व्यक्तिमत्त्व आणि नागरिकत्व ह्यातील वाद शिक्षण, राजकारण, नीतिशास्त्र आणि तत्त्वमीमांसा (metaphysics) अशा अनेक क्षेत्रांत महत्त्वाचा ठरला आहे. इतर क्षेत्रांपेक्षा शिक्षणक्षेत्रात त्याची व्यावहारिक बाजू सोपी आहे कारण ती तात्त्विक मुद्द्यांपासून अलग करता येते. समाजातील तरुण पिढीचे शिक्षण ही खर्चाची बाब आहे त्यामुळे आपोआपच ती सरकारची जबाबदारी ठरते. सरकारचा हेतू शिक्षणाचा वापर नागरिक घडवण्यासाठी करण्याचा असतो पण अनेक ऐतिहासिक घटनांमुळे आणि धार्मिक प्रभावामुळे हा हेतू उग्र न राहता मवाळ झाला आहे.

तरुणांच्या शिक्षणात रस असलेली दुसरी संस्था म्हणजे चर्च. मध्ययुगात शिक्षण हे फक्त धर्मगुरु होण्यासाठीच असे. प्रबोधनाच्या काळापासून आत्ता आत्तापर्यंत शिक्षण हे सभ्य, पांढरपेशा, अभिजन वर्गापुरतेच मर्यादित होते. नंतर आलेल्या लोकशाहीमध्ये अभिजन असण्यापेक्षा तसे दिसणे महत्त्वाचे मानले गेले त्यामुळे असे ‘दिखाऊ अभिजन नागरिक’ घडवण्यासाठी शिक्षण घेतले गेले आणि नागरिकांकरिता निरुपयोगी असणाऱ्या अनेक गोष्टींचा शिक्षणात प्रवेश झाला. मध्ययुगापासून चालत आलेल्या चर्चसंबंधातील परंपरांशी निगडित असे काही घटक शिक्षणात टिकून होतेच—-उदा. ईश्वरनिष्ठा आणि सभ्यता. हे व्यक्तीचे गुणविशेष आहेत, नागरिकाचे नाहीत. सामान्यपणे ख्रिश्च धर्म हा व्यक्तीचा धर्म आहे. राजकीय सत्तेपासून वंचित असलेल्या समाजातच त्याचा उद्भव झाला. माणसाचे देवाशी असलेले नाते ह्याला त्या धर्मात महत्त्व आहे, माणसाच्या शेजाऱ्यांशी असलेल्या संबंधांचा विचारही माणसाच्या भावनांच्या दृष्टिकोणातून केला आहे, सामाजिक दृष्टिकोणातून नाही. कॉन्स्टंटाईनने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिश्चन धर्मात राजकारणाचा प्रवेश झाला. तोपर्यंत सत्तेवर असलेल्यांशी असहकाराचे धोरण हेच ख्रिश्चन व्यक्तीचे कर्तव्य होते. त्यानंतर मात्र सामान्यपणे सत्ताधाऱ्यांच्या आदेशांचे पालन हे ख्रिश्चनांचे कर्तव्य राहिले आहे. पण ख्रिश्चन धर्माच्या उगमाशी असलेली अराजकता मधून मधून उफाळून येते आणि अधिकाराच्या विरोधात बंड पुकारले जाते. प्रॉटेस्टंट पंथाचा उदय असाच झाला.

राजकारणाशी निगडित असलेले धर्म आणि व्यक्तीच्या आत्म्याशी संबंधित असलेले धर्म अशी धर्मांची विभागणी करता येते.

कन्फ्यूशिपॅनिझम हा प्रामुख्याने राजकीय धर्म आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून प्रवास करताना कन्फ्यूशियसला राज्य करण्यातल्या अडचणी जाणवल्या आणि राज्य चांगले चालवण्यासाठी आवश्यक असलेले गुण त्याच्या धर्माचे घटक बनले. बौद्ध धर्म हा जरी सुरुवातीपासून राजांनी स्वीकारलेला धर्म असला तरी तो राजकीय नव्हता. अलिकडे तिबेट, जपान ह्या देशांमध्ये त्यात राजकारण शिरले असले तरी खरा बौद्धधर्मी आपल्या धर्माला प्रामुख्याने व्यक्तिनिष्ठ मानतो. याउलट इस्लाम हा सुरुवातीपासूनच राजकीय धर्म होता. इस्लामी नेत्यांना धार्मिक आणि पारलौकिक दोन्ही जगाचे नेतृत्व करण्याचे अधिकार होते जे ख्रिश्चन धर्मात नव्हते. सध्या रशियामध्ये विकसित झालेला साम्यवाद हा इस्लामसारखाच राजकीय धर्म आहे.

धर्माचा ऐतिहासिक आढावा अशासाठी घेतला की सध्या शिक्षणामध्ये असलेले व्यक्तिनिष्ठ संस्कृतीचे घटक हे प्रामुख्याने त्या परंपरेतून आलेले आहेत हे लक्षात यावे. पण लवकरच ह्या व्यक्तिनिष्ठ शिक्षणाची जागा नागरिकत्वाचे शिक्षण घेईल. त्या शिक्षणात जर दूरदर्शित्वाचा अभाव असेल तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास खुंटेल आणि राज्यकर्त्यांच्या वापराकरता साधन म्हणून व्यक्तीचा उपयोग केला जाईल. नागरिकत्वाच्या आदर्शाचा जेव्हा संकुचित वृत्तीतून विचार होतो तेव्हा कोणते धोके उद्भवू शकतात ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. व्यक्तिनिष्ठ संस्कृतीचा उपयोग नागरिकत्वासाठीच झाला पाहिजे ह्याची सखोल जाणीव व्यक्तिनिष्ठ संस्कृतीवर पोसलेल्या व्यक्तींनाच असू शकते. दुर्दैवाने सध्या अशा माणसांची जागा कार्यकारी अधिकारी किंवा शुद्ध राजकारणी लोक घेऊ लागले आहेत.

चांगले नागरिक निर्माण करण्याच्या हेतूने आखलेले शिक्षण दोन भिन्न प्रकारचे असते. प्रस्थापित प्रणालीला पाठिंबा देणारे किंवा ती उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणारे. शिक्षणाची आर्थिक बाजू सरकारच्या ताब्यात असल्यामुळे सामान्यपणे शिक्षण हे ‘जैसे थे’ प्रकाराला पाठिंबा देणारे असायला हवे—-पण तसे नेहेमीच होत नाही. समाजवादी विचारांचा जिथे पगडा आहे त्या देशांमध्येही धर्माच्या आणि मध्यमवर्गाच्या प्रभावामुळे शिक्षण खूपसे प्रतिगामी आहे. फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांतीच्या पूर्वीसुद्धा—-जेव्हा शिक्षणाचा प्रसार अगदी मर्यादित होता—- शिक्षण प्रामुख्याने सरकारविरोधीच होते. पण एकंदरीत विचार केला तर आधुनिक काळात शिक्षण ही एक प्रतिगामी शक्ति आहे—-सरकार रुढीप्रिय असेल तर पाठिंबा देणारी आणि प्रगतिशील असेल तेव्हा विरोध करणारी.

दुर्दैवाने शाळा–महाविद्यालयांमध्ये नागरिकत्वाच्या चुकीच्या घटकांवर भर दिला जातो. सर्वांत जास्त महत्त्व देशभक्तीला दिले जाते आणि ते सुद्धा लढाऊ देशभक्तीला. जमिनीच्या विशिष्ट तुकड्यावर राहाणाऱ्या लोकांबद्दल संकुचित निष्ठा बाळगणे आणि त्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी लष्करी ताकदीचा वापर करणे अशी देश भक्तीची व्याख्या केली जाते. शिवाय देशांतर्गत बाबींच्या संदर्भात नागरिकत्वाची जी कर्तव्ये शिकविली जातात त्यामुळे बरेचदा परंपरेने चालत आलेले अन्यायच चालू ठेवले जातात. इंग्लंडमध्ये झालेल्या देशव्यापी संपामध्ये सुस्थितीतील घरातील तरुण मुलांनी देशभक्तीच्या भावनेतून संपकऱ्यांच्या जागी काम केले. संपकऱ्यांची बाजूही न्याय्य असेल असे जाणवण्याइतके शिक्षण कुणाजवळच नव्हते. जिथे जिथे अन्याय असतो तिथे तिथे कायद्याचा आणि संविधानाचा आधार घेऊन त्याला पाठिंबा मिळविता येतो. सर्व देशांमध्ये शिक्षणक्षेत्रातील माणसे ही संविधानाला भिऊन वागणारी असतात आणि श्रीमंतीचा पाठपुरावा करणारी असतात—-उच्चवर्गीय होण्याकरता चाललेली त्यांची धडपड अथवा त्यांची मिळकत ह्यातून ते जाणवते. दोन्ही बाबतीत त्यांच्या शिकवण्यात कायद्याला आणि संविधानाला विशेष महत्त्व दिले जाते आणि ह्या दोन्ही गोष्टी भूतकाळाची वर्तमानावरची पकड जास्त पक्की करतात. ह्याचा अतिरेक झाला की परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा करू इच्छिणारे क्रांतिकारक निर्माण होतात आणि क्रांतिकारकाची सामाजिक कर्तव्याची कल्पनासुद्धा तितकीच संकुचित आणि धोकादायक असू शकते जेवढी कायदा आणि सुव्यवस्था ह्यांना पाठिंबा देणाऱ्याची असते.

पण ‘जैसे थे’ परिस्थितीचा पुरस्कार करणाऱ्या शिक्षणापेक्षा बदलाचा पुरस्कार करणारे शिक्षण जास्त चांगले. ओळखीच्या, सवयीच्या रस्त्याने जाणे ही माणसातील पशुसमान वृत्ती आहे. स्ढीप्रिय असण्याकरता कुठल्याही उच्च बौद्धिक व्यवहाराची गरज नसते. पण बदलाचा पुरस्कार करणाऱ्याला मात्र कल्पनाशक्तीची आवश्यकता असते कारण आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या वास्तवाची त्याला निर्मिती करायची असते. वर्तमान-काळाचा विचार मूल्यांच्या संदर्भात करण्याची क्षमताही त्याच्यात असावी लागते. समाजात प्रचलित असलेल्या अन्यायांकडे डोळेझाक करण्याची त्याला गरज नसते किंवा लोकांची दु:खे दूर न करण्यासाठी त्याला कारणे शोधावी लागत नाहीत. ‘जैसे थे’च्या विरोधातील शिक्षण बुद्धी आणि सद्भावना दडपून टाकत नाही.

पण ह्याला काही मर्यादा आहेत. ‘जैसे थे’ परिस्थितीला विरोध दोन कारणांमुळे होतो : दुर्दैवी माणसांबद्दल वाटणाऱ्या सहानुभूतीतून किंवा सुदैवी लोकांबद्दल वाटणाऱ्या तिरस्कारातून. कित्येक क्रांतिकारकांच्या मनात सामान्य माणसांच्या सुखापेक्षा ज्या उर्मट सत्ताधाऱ्यांच्या राजवटीत त्यांचा सध्या छळ होतो आहे त्यांचा सूड घेण्याची भावनाच जास्त प्रभावी असते. परिस्थिती बदलू इच्छिणाऱ्या बुद्धिवंतांच्या वर्तुळातही लहान लहान गट तयार होतात जे आपापल्या संकुचित वैचारिक परंपरांची निष्ठा कर्मठपणे जपतात, वेगळा विचार करणाऱ्यांचा तिरस्कार करतात. कर्मठपणा, मग तो कुठलाही असो, बुद्धीला घातकच असतो.

नागरिकाकरता आखलेली शिक्षणप्रणाली जर संकुचित असेल तर व्यक्तिनिष्ठ शिक्षणप्रणालीबरोबर एका क्षेत्रात तरी संघर्ष अटळ असतो—-ते क्षेत्र म्हणजे विवादास्पद मुद्द्यांकडे पाहण्याची वैज्ञानिक वृत्ती. विज्ञानाने विकसित केलेले तंत्र हे शोध घेण्यासाठी विकसित केले आहे म्हणजेच बदलाची शक्यता लक्षात घेऊन घडवलेले आहे. मनाची वैज्ञानिक चौकट ही शोध घेणे सुलभ व्हावे ह्या करता घडलेली आहे, प्रचलित वैज्ञानिक तत्त्वांवर माणसाने अचल श्रद्धा ठेवावी म्हणून घडलेली नाही. चांगल्या सुशिक्षित नागरिकामध्ये शोध घेण्याची क्षमता नसते कारण थोरांचा आणि श्रेष्ठांचा आदर करावा, श्रेष्ठ पूर्वजांना वंदन करावे असे संस्कार त्याच्यावर झालेले असल्याने प्रस्थापिताला विरोध करणारी, त्यात बदल करू इच्छिणारी तत्त्वे तो स्वीकारू शकत नाही. विज्ञानाच्या पायावर उभारलेल्या आधुनिक राज्यांना त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काहींना नवीन स्फोटकांचा शोध लावणारे पुरोगामी हवे असतात तर काहींना तरुणांनी आपल्या प्राचीन परंपरा जपाव्यात, रूढीप्रिय असावे असे वाटते.

आधुनिक राज्यांचे सामर्थ्य हे विज्ञानावर अवलंबून आहे, पण विज्ञानाची प्रगती मात्र अभ्यासकाच्या मानसिक अराजकतेवर, बेबंदपणावर अवलंबून आहे. आपल्या काळातील हा मोठा विरोधाभास आहे. वैज्ञानिक मन हे संशयवादीही (Sceptical) नसते आणि स्ढीवादीही (Dogmatic) नसते. सत्य शोधता येणे शक्य नाही असे संशयावाद्याला वाटते ह्याउलट ते सापडलेच आहे असा स्ढीवाद्याचा दावा असतो. विज्ञानाचा अभ्यासक मात्र मानतो की सत्य सापडले नसले तरी सापडू शकते. खरे तर सत्य शोधता येते वगैरे विचार खरा वैज्ञानिक करतच नाही. आपल्याला मिळालेले ज्ञान हे परिपूर्ण आणि अंतिम आहे असे तो मानत नाही. आपल्या संशोधनातून मिळालेले ते साधारणपणे बरोबर उत्तर (Approximation) आहे ज्याच्यामध्ये भविष्यात कदाचित फेरबदल करावा लागेल अशीच त्याची धारणा असते. अंतिमतेचा अभाव हा वैज्ञानिक वृत्तीचा गाभा आहे. वैज्ञानिकाचे विश्वास हे म्हणूनच तात्पुरते, प्रायोगिक (tentative), अनिश्चित अशा स्वरूपाचे असतात. त्याच्या संशोधनाचे ते फलित असल्यामुळे ते वैयक्तिक असतात, सामाजिक नसतात. ह्याचाच अर्थ ते त्याच्या निरीक्षणावर आणि अनुमानावर अवलंबून असतात, समाजाने चांगल्या नागरिकांकरता तयार केलेल्या योग्यायोग्यतेच्या निकषांवर अवलंबून नसतात. वैज्ञानिक वृत्ती आणि सरकार करत असलेला विज्ञानाचा वापर ह्यातील संघर्षामुळे शेवटी विज्ञानाची प्रगती खुंटेल कारण वैज्ञानिक तंत्राचा वापर समाजामध्ये सनातन वृत्ती आणि भोळसट अंधविश्वास रुजवण्या-करता केला जाईल. हे होऊ द्यावयाचे असेल तर वैज्ञानिक वृत्तीकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकत्वाचे धडे न देता मुक्त विचार करण्याचा परवाना द्यावा. परीक्षेत विशिष्ट पातळी गाठणाऱ्यांना त्यांच्या नावासमोर ‘वि. प.’ (विचार करण्याचा परवाना) अशी आद्याक्षरे लिहायला परवानगी द्यावी!

पण गंभीरपणे विचार केला तर सत्याच्या संकल्पनेची नागरिकत्वाच्या आदर्शी-बरोबर सांगड घालणे कठीणच आहे. आपणही लभ्यांशवादी (pragmatists) जसे म्हणतात तसे म्हणू शकतो की सत्याच्या संकल्पनेच्या पारंपारिक ख्याला कोणतीही वैधता नाही आणि सत्य म्हणजे जे विश्वास ठेवायला सोयीचे असते ते. असे असेल तर लोकसभेच्या कायद्यानुसार सत्य काय हे ठरवता येईल. प्रसिद्ध लेखक आणि कवी ले हंट ह्याला तत्कालीन प्रिन्स रीजंट लठ्ठ आहे हे म्हणणे गैरसोयीचे वाटले कारण तसे केले असते तर त्याला तुरुंगात जावे लागले असते. त्यामुळे साहजिकच प्रिन्स रीजंट हाडकुळा आहे हे अनुमान काढणे भाग पडले. लभ्यांशवाद्याचे तत्त्वज्ञान स्वीकारणे कसे कठीण आहे ते ह्या उदाहरणावरून लक्षात येईल. कुठलेही विधान त्याच्यावर विश्वास ठेवणे सोयीचे आहे म्हणून सत्य ठरत नाही आणि कुठलेही विधान त्याचा उच्चार करणे हा गुन्हा आहे म्हणून खोटे ठरत नाही. जगातली सर्व सरकारे अशा त-हेने त्यांना गैरसोयीची वाटणारी सत्ये गुंतागुंतीच्या पद्धती वापस्न लपवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या मते अयोग्य ज्ञानाचा जनतेमध्ये प्रसार करणाऱ्या लोकांना शिक्षा करतात.
ह्या सर्व कारणांमुळे नागरिकत्वाच्या शिक्षणातील धोके लक्षात येतील पण तरीही एक सुसंगत आणि संयुक्त असा समाज निर्माण करणाऱ्या शिक्षणाची सध्या नितांत गरज आहे.

नागरी जीवनातील सुखसोयी ह्या सहकार्यावर अवलंबून असतात. औद्योगिकीकरणाचा विकास हा वाढत्या सहकार्याची मागणी करतो. चीनमध्ये भरभराटीला आवश्यक सर्व गोष्टी आहेत पण शक्तिशाली केंद्रसरकार नाही. स्पेन आणि पोर्तुगालपासून स्वतंत्र झालेला लॅटिन अमेरिका त्याच्या नागरिकांमधील अराजकतेमुळे अजूनही मागासलेला आहे. अमेरिकेची (यू.एस.ए.) समस्या ही तिच्या रहिवाशांमध्ये नागरिकत्वाची भावनाच नसणे ही आहे. आणि ही उणीव काही शिक्षणामुळे निर्माण झालेली नाही कारण शाळे-पासून विद्यापीठापर्यंत तरुणांच्या मनावर नागरिकत्वाचे महत्त्व ठसवण्याचा प्रयत्न करण्यात सगळी अमेरिकन शिक्षण यंत्रणा गुंतलेली आहे. इतके शैक्षणिक संस्कार होऊनही अमेरिकन माणसाच्या मनात एकसंध समाजाची भावना नाही, जी युरपमधल्या पुरातन देशांमध्ये आहे. ती जर निर्माण झाली नाही तर अमेरिकेतील औद्योगिक यंत्रणा मोडून पडेल.

सध्या कुठलाही देश आंतर्गत राष्ट्रीय एकता एवढेच उद्देश्य गाठण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपली वैज्ञानिक संस्कृती जर टिकून हवी असेल तर आंतरराष्ट्रीय पातळीवरची एकता, संपूर्ण मानव जातीचा एक सहकारी घटक (Co-oprative – unit) म्हणून विचार करण्याची निकड जास्त जास्त वाढायला लागली आहे. असे टिकून राहण्यासाठी संपूर्ण जगाचे एक राज्य स्थापले जाणे ही न्यूनतम अट असेल असे मला वाटते. त्याबरोबरच एक जागतिक पातळीवरची शिक्षणयंत्रणा निर्माण करावी लागेल जिच्या माध्यमातून ह्या जागतिक राज्याबद्दल निष्ठा निर्माण केली जाईल. सुरुवातीला एक दोन शतके तरी ह्या पद्धतीतील अपक्वतेमुळे व्यक्तीच्या विकासाला विरोध होईल. पण गोंधळ आणि संस्कृतीचा नाश हेच पर्याय असतील तर ही किंमत चुकवणे परवडेल. पूर्वीपेक्षा आधुनिक समाज हे राजकीय आणि आर्थिक क्षेत्रांमध्ये जास्त जवळ आले आहेत. जगातील स्त्री-पुरुषांच्या मनात ही जागतिक (Citizen of the world) नागरिकत्वाची भावना वाढीस लागली तर ही जवळीक आणखी वाढेल. शिवाय ह्या जागतिक निष्ठेमध्ये एका देशालाच एकनिष्ठ राहिल्यामुळे निर्माण होणारा युद्धाचा धोका नाही. कदाचित ह्यामुळे बौद्धिक आणि सौंदर्यशास्त्रीय क्षेत्रांतील उत्स्फूर्ततेची गळचेपी होईल. पण तरीही मला वाटते की जगाचे नागरिक असण्याची भावना लोकांमध्ये जागवणे ही नजीकच्या भविष्यातील अतिशय महत्त्वाची गरज आहे. जग जेव्हा आर्थिक आणि राजकीय पातळीवर एक घटक म्हणून एकजीव होऊन स्थिरावेल तेव्हा वेगवेगळ्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करता येईल. पण तोपर्यंत आपली संपूर्ण मानव संस्कृतीच धोक्यात आहे. एक शाश्वत तत्त्व म्हणून विचार केला तर व्यक्तीचा विकास करणारे शिक्षण हे नागरिक घडवणाऱ्या शिक्षणापेक्षा श्रेष्ठ आहे असे मला वाटते. पण राजकीयदृष्ट्या आणि काळाची गरज म्हणून विचार केला तर नागरिकाच्या शिक्षणाला जास्त महत्त्व देणे आवश्यक ठरेल.

[प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि विचारवंत बरदँड रसेल ह्यांचे शिक्षण आणि समाज-व्यवस्था (Education and Social Order) हे पुस्तक १९३२ साली प्रसिद्ध झाले. त्यातील “व्यक्ति विरुद्ध नागरिक’ ह्या पहिल्या निबंधाचा संक्षिप्त गोषवारा इथे देत आहोत. लेख वाचताना दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले ते नोंदवीत आहे. (१) रसेल जेव्हा व्यक्तीच्या शिक्षणाबद्दल विचार मांडतात तेव्हा ती व्यक्ती एका आधीच सुशिक्षित असलेल्या समाजातील व्यक्ती आहे हे लक्षात ठेवावे लागते. (२) व्यक्ती आणि नागरिक ह्यांचे उल्लेख विरुद्ध घटक म्हणून केलेले आहेत हेही सारखे लक्षात ठेवावे लागते.

हा गोषवारा असल्याने रसेलनी दिलेली अपवादात्मक उदाहरणे आणि विधानांच्या अर्थमर्यादा स्पष्ट करणारे मुद्दे ह्यात आलेले नाहीत.

विद्यागौरी खरे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.