शिक्षण नकोच —- प्रत्यक्ष करणे आवश्यक

मी शिक्षणाला विरोध करतो. कृतिशील आयुष्यापासून वेगळे काढलेले शिक्षण आणि धमक्या, भीती, लोभ, लाच यांच्या दबावाखाली घडवून आणलेले शिक्षण यापेक्षा प्रत्यक्ष (काम) करणे उपयुक्त. स्वतः दिशा ठरवलेले, हेतुपूर्ण आणि अर्थपूर्ण आयुष्यासाठी केलेले काम.
आज जगभर शिक्षणाला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला आहे—-काही लोकांनी स्वतःच्या भल्यासाठी दुसऱ्यांना वळण लावणे, त्यांना आकार देणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्यांना शिकायला लावणे—-असा. मी त्याचा विरोधक आहे. हे शिक्षण प्रभावी, कार्यक्षम, मानवी कसे करता येईल यावर वेळ घालवण्यात अर्थच नाही. ते आता नव्याने मानवी करता येणार नाही कारण त्याचा हेतू मानवी नाही.
जगण्याच्या हक्काइतकाच मूलभूत मानवी हक्क म्हणजे स्वतःच्या विचारांवर ताबा असणे. आपण जग कसे समजून घ्यावे, स्वतःच्या व इतरांच्या अनुभवाचा अर्थ कसा लावावा, स्वतःच्या आयुष्याला अर्थ कसा द्यावा याचाच तो हक्क आहे. हा हक्क शिक्षण देणारे काढून घेतात. तो आपल्या अस्तित्वावरचाच घाला आहे. ते असे सांगतात की आपण (स्वतंत्र) विचार करण्याच्या लायकीचे नाही. आपल्याला आपल्या आयुष्याचा अर्थ, या जगाचा अर्थ, दुसऱ्याने सांगायला हवा. आपला स्वतःचा अनुभव कुचकामी आहे. हे शिक्षण—-या सक्तीच्या स्पर्धात्मक शाळा, त्यातले मार्क-पदव्या-शिक्षा-बक्षिसे—हा मानवी इतिहासातला सर्वांत धोकादायक शोध आहे. जगभर आलेल्या (मानसिक) गुलामगिरीचा तो पाया आहे.
कुणी कुणाला काही सांगूच नये असे मला म्हणायचे नाही. आपण एकमेकां-बरोबर राहतो, काम करतो तेव्हा एकमेकांच्या विचारावर परिणाम करतच असतो. आपल्या वास्तवाबद्दलच्या संकल्पना आपण इतरांबरोबर वाटून घेत असतो. पण सगळ्यांना आपल्यासारखेच वाटले पाहिजे हा आग्रह बरोबर नाही. इतरांच्या कल्पना घेण्याचा किंवा न घेण्याचा हक्क अबाधित ठेवायला हवा. जेव्हा एखादी कल्पना नाकारण्याची पूर्ण मुभा असते तेव्हाच ती अंगीकारण्यालाही अर्थ असतो. शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष (काम) करणे महत्त्वाचे आहे. त्यात शारीरिक आणि बौद्धिक दोन्ही अंगे येतात. या गोष्टी वेगळ्या काढणे योग्यच नाही. त्या एकत्रितच काम करतात. म्हणजे काम करण्यात बोलणे–ऐकणे–लिहिणे– वाचणे-विचार करणे अन् स्वप्ने पाहणे देखील आले. काय बोलायचे, काय करायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायचे. स्वतःच्या हेतूंसाठी ठरवायचे. हेतू समानही असू शकतील पण ते बाहेरून लादलेले नसावेत.
(माझ्या कल्पनेतल्या) समाजात कोणत्याही वयाचे कोणत्याही वंशाचे स्त्री-पुरुष त्यांना हवी ती वेगवेगळी कामे करू शकतील. जी त्यांना करायला आवडतात, चांगली करता येतात, जी करण्यात अभिमान वाटतो, ज्यांच्या हेतूंची व परिणामांची त्यांना समज आहे, त्याबद्दल आदर आहे, अशी कामे. त्यामुळे आपण समाजाचा अर्थपूर्ण भाग आहोत, आपल्या कामाला, आपल्या राजकारणाला अर्थ आहे असे समाधान त्यांना असेल. इथे त्यांनी निवडलेले अधिकारी जनतेचे सेवक असतील, त्या त्या साम्राज्याचे राजे नसतील. इथे कोणी शिक्षणाची काळजी करणार नाहीत. ज्यात रस आहे, त्या गोष्टी करतानाच लोकांना कौशल्य, शहाणपण येईल.
पण असा समाज अस्तित्वात नाही. तो नव्यानेच घडवावा लागेल. अशा नव्या घडवण्याबद्दल विचार करण्याऐवजी जुन्याच समाजाचा विकास, कार्यक्षमता, प्रगती ह्यांबद्दल आणि त्यासाठी मनुष्यबळ कसे निवडावे, कसे प्रशिक्षित करावे आणि कशी कार्यवाही करावी ह्यांबद्दलच बोलले जाते.
शिक्षणासंदर्भात विचार करताना गरिबी, निष्क्रियता, विषमता, पिळवणूक, नाश आणि वेदना याबद्दल चर्चा करू नये. हे शाळेचे वा शिक्षणाचे विषय नाहीत. शाळांमध्ये काहीही केले किंवा केले नाही तरी यांचे उत्तर सापडणार नाही. हे समजून घेऊन जास्तीतजास्त सरळपणे, अक्कलहुशारीने आणि वास्तवाला धरून त्याचे उत्तर काढावे लागेल. शाळांमध्ये मुलांना शिकवताना—- त्यांना धमक्या देणे, लाच देणे, अपमान करणे थांबवले, —-ज्या स्पर्धात थोडेसे जिंकणार आणि बरेचसे हरणार अशा स्पर्धात एकमेकां-विरुद्ध सतत भाग घ्यायला लावले नाही. —-त्यांना सारखे अगतिक, मूर्ख, अविश्वासू, अपराधी वाटणार नाही याची काळजी घेतली, —-त्यांच्या आवडी, उत्साह, काळज्या यांकडे दुर्लक्ष केले नाही, रागराग केला नाही, —-त्यांना एकमेकांबरोबर काम करायला, एकमेकांपासून शिकायला, आवडीच्या गोष्टींबद्दल बोलायला, विचार करायला परवानगी दिली, तर ती चांगले शिकतील, जास्त चांगले जगतील, जगाला तोंड देतील असे ज्यांना वाटते त्या अल्पसंख्य पालक शिक्षक-विद्यार्थ्यांसाठी मी लिहितो आहे. थोडक्यात—-मुलांना त्यांचे आयुष्य घडवू द्या, त्यांच्या स्वतःच्या मार्गाने या जगाचा अभ्यास करू द्या. त्यांना ते करायचे असते आणि त्यांना ते येते.
शाळा आणि शिक्षण ह्यांमुळे खरेच काय घडते हे डोळे उघडून पाहा. ‘हवे तर हे शिक्षण सक्तीचे ठेवा—-पण त्यावर लावलेल्या लेबलला फसू नका’ हे तरी आपण म्हणायला हवे. ज्यांना मानवी स्वातंत्र्य आणि सन्मान मोलाचा वाटतो त्यांच्यासाठी एक धोक्याची सूचना द्यायला हवी—जर काही लोकांना इतरांनी काय शिकावे हे ठरवण्याचा अधिकार दिला किंवा काही लोक इतरांपेक्षा जास्त किंमतीचे असतात असे म्हणण्याचा हक्क दिला तर—-प्रत्येक व्यक्ती एकमेव आहे, महत्त्वाची आहे, तिचे स्वातंत्र्य आणि सन्मान अबाधित राहायला हवे—-हे शक्य होणार नाही. —- प्रत्यक्ष करणे —-
मी शिकण्यापेक्षा करण्याबद्दल बोलतो याचे अनेकांना आ चर्य वाटते. त्यांना शिकणे हे जगण्यापेक्षा वेगळे वाटते. त्यासाठी शाळा व शिक्षक आवश्यकच आहेत आणि शिकणे हे कंटाळवाणे आणि दुःखद असणारच असेही वाटते. खरे तर ते स्वतः बऱ्याच गोष्टी शाळेबाहेरच शिकले आहेत.
मी स्वतः केवळ शिकण्यासाठी काहीही करत नाही. मला मैफलींना जायला, तालमींना जाऊन ऐकायला आवडते. त्यातून मी संगीत शिकलो. तिथे जाऊन ऐकण्याने मला आनंद मिळतो म्हणून मी तिथे जातो, शिकण्यासाठी नाही. तसेच प्रवासातही अनेक गोष्टी माहीत झाल्या. तेही मी शिकण्यासाठी केले नव्हते. गेली दोन वर्षे मी माझ्या शहरातल्या (बॉस्टन) एका वाईट अन् विचित्र अशा ‘नागरी विकास कार्यक्रमा’ विरुद्ध लढतो आहे. त्यातून या शहराचे अर्थशास्त्र, राजकारण तसेच नगरपालिका व राज्यशासन आणि कायदा याबद्दल मी शिकलो. पण ही लढाई शिकण्यासाठी नव्हती. माझ्या शहराचे नुकसान होऊ नये, ते नष्ट होऊ नये म्हणून होती. अनेक मासिके, पुस्तके मी वाचतो, ते त्यात काही चांगले, उपयुक्त, आवडण्यासारखे असते म्हणून. माझे सर्वांत जास्त शिक्षण एका बोटीवर झाले, कोणत्याही शाळा-महाविद्यालयात नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आम्ही सगळ्यांनी मिळून एक कठीण कामगिरी, महायुद्ध जिंकण्याची, पार पडली. ती करत असताना आम्ही आमचे अनुभव आणि कौशल्ये यांची देवाणघेवाण केली. त्यातून खूप काही शिकलो.
शैक्षणिक अनुभवांबद्दल बोलायला लागले की लोकांना वाटते की अनुभव हे दोन प्रकारचे असतात—- शैक्षणिक आणि अशैक्षणिक. असे नसते. वाट्याला येणाऱ्या प्रत्येकच अनुभवातून आपण काही ना काही शिकतो. मात्र जे अनुभव आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि आवडीच्या गोष्टींशी जोडलेले नसतात त्यातून चांगले काहीही शिकणे दुरापास्त असते. जिथे आपुलकी असेल, खरी गरज असेल तिथे कुतूहल निर्माण होते. मुद्दाम दिलेले अनुभव तितकेसे उपयुक्त नसतात. आपल्या अनुभवातून मिळणारा (किंवा हुकणाराही) आनंद, उत्साह, समाधान यावर आपण त्यातून काय शिकणार ते अवलंबून असते. जेव्हा मुलाला अपमानास्पद, दुःखद, भीतिदायक वाटत असते तेव्हा शिकवली जाणारी गोष्ट विसरली जाते. जेव्हा माणसे आत्मविश्वासाने, उत्साहाने, धडाक्याने अनुभवांना सामोरी जातात, तेव्हाच त्यांतून शिकतात. —- करणे म्हणजेच शिकणे —- ‘शिकणे’ या शब्दामागची आणखी एक चुकीची कल्पना म्हणजे शिकणे व काम करणे या वेगळ्या गोष्टी असल्याची. काही वर्षांपूर्वी मी (Cello) वाजवायला सुरुवात केली. मला हे वाद्य आवडते. मी तासन्तास ते वाजवतो, त्यावर कष्ट घेतो. एक दिवस ते मला वाजवता येईल. बरेच जण म्हणतील—-मी ते वाजवायला शिकत आहे. त्यातून असे वाटेल की या दोन वेगळ्या प्रक्रिया असतात (१) चेलो वाजवायला शिकणे आणि (२) चेलो वाजवणे. आधी शिकण्याची क्रिया पूर्ण करायला हवी, त्यानंतर वाजवण्याची क्रिया सुरू करता येईल. खरे तर हे काही बरोबर नाही—-या दोन्ही मिळून एकच प्रक्रिया आहे. कुठलीही गोष्ट करत असतानाच आपण शिकतो.
बाळ बोलायला किंवा चालायला शिकते तेव्हा आधी त्यासाठीची कौशल्ये शिकून घेऊन मग बोलायला किंवा चालायला ती वापरत नाही. ते बोलायलाच शिकते. पहिले अडखळते पाऊल ते टाकते तेव्हा ते सराव किंवा तयारी करत नसते. त्याला तेव्हा चालायचे असते म्हणून ते चालते. त्याचे मनात ठरलेले आहे, कसे चालायचे त्याबद्दल विचार झाला आहे, आपण चालू असा विश्वास आहे म्हणून ते तेव्हा चालते. आपण कृतीपासून कौशल्ये वेगळी काढतो तेव्हा मोठी चूक करतो. बोलणे ही कृती आहे, त्यामागे काही हेतू आहे. मूल बोलायला शिकते, त्याआधी त्याला कळलेले असते की मोठ्यांच्या कृतीशी बोलण्याचा, त्या शब्दांचा संबंध असतो. मुलालाही त्याच्या बोलण्यानुसार कृती घडवायची आहे म्हणून ते बोलते. तसेच वाचणे. भोवताली लिहिलेले शब्द आहेत, मोठी माणसे त्याचा वापर करताहेत, त्यामुळे काही घडते आहे. एक दिवस मुलाला त्याचा अर्थ शोधावासा वाटतो. आपण तशी संधी त्याला दिली तर मूल वाचायला लागते.
अर्थात् सुरुवातीला त्याला हे जमणार नाही. पण त्याला ते करू दिले, त्याचे काम आपण काढून घेतले नाही, तो विचारेल तेवढेच त्याला सांगितले, तुला हे येणार नाही असे त्याला पटवले नाही, दुसरेच बारीकसारीक निरर्थक काहीतरी करायला लावले नाही तर ते नक्की वाचायला लागेल.
आपली सर्वांत कार्यक्षम, वेगवान, दूरगामी, उपयुक्त आणि कायमस्वरूपी शिकण्याची पद्धत ही आपण स्वतः शिकायचे ठरवण्यातून येते. त्यासाठी जवळ जवळ काहीच मदत बाहेरून लागत नाही.
अनुवाद —- नीलिमा सहस्रबुद्धे John Holt च्या Instead of Education मधून साभार.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.