भाषा शिक्षण कशासाठी?

भाषेची गोष्ट ‘अति परिचयात् . . .’ अशी आहे. एक तरी भाषा प्रत्येकाला अवगत असते. म्हणून तिच्याबद्दल कोणी स्वतंत्रपणे विचारच करत नाही. भाषा ही गोष्ट आपल्या अवयवांसारखी आपण गृहीत धरतो. आपल्याला हात असतात, पाय असतात, तशी आपली एक भाषा असते. भाषाक्षमता उपजत असते, पण भाषा उपजत नसते. पहिली भाषा माणूस सहज शिकतो, इतकी सहज, की आपण ती प्रयत्नपूर्वक शिकलो आहोत, हेच त्याला जाणवत नाही. भाषा, विशेषतः स्वभाषा किंवा मातृभाषा आपल्याला ‘आपोआप’ येते, अशी एक समजूत असल्यामुळे पुढे ‘मातृभाषा कशाला शिकायची?’ ‘मातृभाषेचे कोश कशाला पाहिजेत?’ असे प्र न माणसाला पडतात. भाषेत शिकण्यासारखे खूप काही आहे, याचीच आधी नव्याने जाणीव करून घ्यायला पाहिजे.
‘भाषा शिकणे’, म्हणजे केवळ शब्द, व्याकरण शिकणे, असा अर्थ होत नाही. किंवा भाषा शिकणे, म्हणजे त्या भाषेतले ललित साहित्य शिकणे किंवा साहित्याचा अभ्यास करणे, असाही होत नाही.
आपण एकदा थोड्या अंतरावरून भाषेकडे बघितले तर आपल्या लक्षात येते, की ‘भाषा’ हातापायांसारखी जन्मतः आपल्याला ‘असत’ नाही, तर ती शिकावी लागते. आपण जर स्वतःला प्र न केले, की खरेच, भाषा म्हणजे काय, एखादी भाषा येणे म्हणजे काय, भाषेचे प्रयोजन काय, तर यातून प्र नांची एक साखळीच निर्माण होते.
आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे (Information Technology) आणि संज्ञापनाचे (Communication) आहे. भाषा हे माहिती-तंत्रज्ञानासाठी एक साधन आणि संज्ञापनासाठी सर्वांत प्रभावी आणि अत्यंत लवचीक असे माध्यम आहे. ह्या साधनाचा आणि माध्यमाचा आपण किती हुशारीने उपयोग करू शकतो, यावर आपले यश आज बहुतांशी अवलंबून असते.
माणसाच्या यशाची मुख्य मेख माणसाच्या भाषाक्षमतेतच आहे. आज भाषेखेरीज विचार करणे विचार मांडणे, ते अभिव्यक्त करणे, हे अशक्य वाटते. माणसाने आपली भाषाक्षमता विकसित केली आणि भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्ती आणि विचारांची देवाणघेवाण केली, त्यातूनच माणसाचे इतर प्राणिमात्रांहून वेगळेपण स्पष्ट झाले आणि त्यातूनच माणसासाठी सर्वांगीण विकास साध्य झाला.
भाषेला आपल्या आयुष्यात खरोखर अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाचा भूतकाळ, वर्तमान, एवढेच नव्हे, तर भविष्यकाळही भाषेने व्याप्त आहे. जे ‘आहे’ ते सर्व, पण जे “नाही ‘आहे’ “, तेही आपण भाषेत पकडले आहे. त्याला शब्दरूप दिले आहे. ज्याला ज्याला आपण शब्दरूप दिले, ते ते सर्व वास्तवात किंवा अवास्तवात, प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात ‘आहे’. कारण आपण शब्दांनी त्या त्या कल्पनेला, संकल्पनेला अस्तित्व प्राप्त करून दिले आहे. जे शब्दांकित नाही त्याची आपल्याला जाणीव आणि माहितीच नाही, म्हणून ते ‘नाही’. जेव्हा ते आपल्याला माहीत होईल, तेव्हा त्याला एक नाव दिले जाईल, जेणेकरून त्याला अस्तित्व प्राप्त होईल. हम्बोल्ट ह्या भाषातत्त्ववेत्त्याने पूर्वीच म्हटल्याप्रमाणे, “तुमच्या भाषेची मर्यादा, तीच तुमच्या जगाची, आयुष्याची मर्यादा!” आपण जरा इकडे तिकडे बघितले, तर लक्षात येईल, की स्वभोवताली दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आपण एक नाव दिले आहे. ‘ॐकारा’मधून जग निर्माण झाले, असे आपण म्हणतो. बायबलच्या सुरुवातीला म्हटले आहे, “आधी शब्द निर्माण झाला. मग त्यातून जग निर्माण झाले.” अशी ही भाषेची महती आहे आणि त्याची प्रचीती माणसाला येत आहे.
आजच्या विज्ञानयुगामध्ये कला, मानव्य आणि भाषा शाखांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असा बऱ्याच जणांचा सर्वसामान्यपणे समज झालेला दिसतो. पण माणसातला माणूसपणा, त्याची बरे-वाईट ठरवण्याची क्षमता या शाखांच्या अभ्यासातून जोपासली जाऊ शकते आणि विकसित होते. म्हणून त्यांना नजरेआड करून माणसाचे चालण्यासारखे नाही. संज्ञापनयुगात भाषेचे महत्त्व वाढतच राहणार आहे. भाषा हे एक साधन आहे आणि ते यशस्वी रीतीने वापरण्याचे कौशल्य आत्मसात् करणे आणि वाढवणे ही प्रयत्नपूर्वक साध्य होण्यासारखी गोष्ट आहे.
भाषा शिकणे आणि ती प्रभावीपणे वापरणे म्हणजे काय? व्याकरणाच्या दृष्टीने वाक्य अचूक बनवणे म्हणजे भाषा शिकणे नव्हे, तर भाषेचे परिस्थित्यनुरूप योग्य उपयोजन करणे म्हणजे भाषा शिकणे. भाषा ‘येणे’ आणि भाषेचे योग्य उपयोजन करणे यामध्ये अंतर आहे. हे अंतर प्रयत्नपूर्वक आणि सरावाने पार करणे शक्य आणि आवश्यक आहे.
संज्ञापनशास्त्रामध्ये बोलणारा काय बोलतो, यापेक्षाही ऐकणारा ती गोष्ट कशी ऐकतो, ती कशी decode करतो हे जास्त महत्त्वाचे ठरते. थोडक्यात म्हणजे आपण काय बोलतो, यापेक्षा आपण बोललो ते दुसऱ्यापर्यंत कसे पोचते, हे महत्त्वाचे ठरते. आपल्याला अभिप्रेत असा परिणाम आपल्या बोलण्यातून ऐकणाऱ्याच्या मनावर झाला का, आपल्याला अभिप्रेत अशी त्याची प्रतिक्रिया आपण साधू शकलो का, हा यशस्वी संज्ञापनामध्ये कळीचा मुद्दा ठरतो.
भाषावैज्ञानिकांनी भाषेकडे अनेक बाजूंनी आणि कोनांतून बघण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक अंगांनी भाषेविषयी विवेचन केले आहे. ‘वाक्+कृती सिद्धान्ताचे’ प्रणेते म्हणतात, ‘प्रत्येक बोलणे किंवा उद्गार हे सहेतुक असते. प्रत्येक बोलणे किंवा उद्गार म्हणजे एक वाक्+कृती असते’. आपला हेतू दुसऱ्यापर्यंत पोचवून त्याची अपेक्षित प्रतिक्रिया मिळवणे, हे प्रत्येक उद्गाराचे किंवा बोलण्याचे प्रयोजन असते. एक वाक्+कृती पूर्ण—-आणि यशस्वीपणे पूर्ण झाली की नाही, हे त्यावर अवलंबून असते. भाषेमध्ये किती सामर्थ्य आणि शक्ती आहे, भाषेतून आपण काय साधू शकतो, याविषयी लोक इतके उदासीन असतात, याचे आ चर्य वाटते. विषय कोणताही असो—- अगदी संगणकापासून सूक्ष्मजीवशास्त्रापासून, ललित साहित्य किंवा इतिहासापर्यंत—त्या त्या क्षेत्रात विचार करणे, ते कौशल्यपूर्ण, प्रभावीपणे, अस्खलित रीतीने मांडणे, हे बहुतांशी भाषाप्रभुत्वावर अवलंबून राहते.
आजच्या प्रसारमाध्यमांच्या युगात एखादा राजकीय पुढारी, अर्थशास्त्रज्ञ, संगणकतज्ज्ञ आपले विचार कसे, किती अस्खलितपणे, प्रभावीपणे मांडतो, यावरून त्याच्याविषयी मत बनवले जाते. राजकीय प्रन हे ‘संवादातून’ सोडवण्यावर विशेष भर दिला जातो. कोणत्याही पातळीवर यशस्वी ‘बोलणी’ करण्यात भाषाकौशल्याचा सिंहाचा वाटा असतो, हे विसरून चालणार नाही.
अगदी कीर्तनकारांपासून, धार्मिक नेतृत्वापासून, साधुसंतांच्या वाङ्मयापर्यंत भाषेच्या बळावर विचार मांडले गेले, सभा जिंकल्या गेल्या. कित्येक नेत्यांना—-अब्राहम लिंकन म्हणा, की स्वामी विवेकानंद म्हणा—-वाग्देवता प्रसन्न होती, असे म्हटले जाते. वाग्देवतेला प्रयत्नपूर्वक प्रसन्न करून घेता येते, हे मात्र खूप लोक लक्षात घेत नाहीत.
अभिजात ग्रीक संस्कृतीमध्ये निर्माण झालेले, रुजलेले, वाढलेले rhetorics हे शास्त्र किंवा १९७०-८० मध्ये निर्माण झालेले संभाषणशास्त्राचे भाषाविज्ञानातले नवीन क्षेत्र ही कशाची द्योतक आहेत? भाषेची शक्ती माणसाने अनादिकालापासून ओळखली आहे. तिचे योग्य उपयोजन करण्यासाठी कौशल्य अंगी बाणवण्याचा विविध मार्गांनी प्रयत्न केला आहे. Rhetorics (भाषणकलाशास्त्र) काय किंवा संभाषणशास्त्र काय, भाषाकौशल्य विकसित करण्याची शास्त्रे आहेत.
आजच्या विज्ञापनाच्या किंवा जाहिरातयुगात भाषेचा चपखल उपयोग खूपच महत्त्वपूर्ण आहे. आज कोणताही पदवीधर नोकरी-धंद्यासाठी बाहेर पडल्यावर त्याचे क्षेत्रातले ज्ञान तर जोखले जातेच, पण त्याचबरोबर तो स्वतःला सादर कसा करतो, कसा वावरतो, कसा बोलतो, प्रतिक्रिया कशा देतो, मुलाखत कशी देतो, ह्या बाबीही फार महत्त्वाच्या ठरतात. आणि सर्वांगांनी स्वतःची छाप पाडण्यामध्ये भाषेवरच्या प्रभुत्वाचा आणि भाषा-कौशल्याचा भाग फार मोठा असतो.
आज आपण बघितले, तर आपल्या आसपास वावरणारी पिढी ही मातृभाषा हरवलेली पिढी आहे. मातृभाषा हरवली आहे, आणि दुसरी किंवा दुसऱ्या भाषा मावशीच्या प्रेमाच्या किंवा जवळिकीच्याही नाहीत, अशी अवस्था आहे. एकाही भाषेवर प्रभुत्व नाही, प्रत्येक वाक्य धेडगुजरी, अनेक भाषांच्या तुकड्यांनी बनलेले. बहुतांश मुले एकाही भाषेत सलग, सुसूत्र, अस्खलित विचार मांडताना, आणि मुख्य म्हणजे एका भाषेत सलग विचार करताना दिसत नाहीत. त्यातून मानसिक गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. आत्मविश्वास कमकुवत होतो. विचारांची अभिव्यक्ती वरवरच्या उथळ पातळीवर होताना दिसते. भाषा-कौशल्य आणि भाषेतला अस्खलितपणा हे व्यक्तिविकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. भाषा ही सर्व विषयांना आणि व्यवहाराच्या सर्व अंगांना व्यापून उरलेली आहे. ती सर्व ज्ञानाचा पाया आहे. ज्ञान आणि माहिती साठवली जाते, ती सरतेशेवटी केवळ मानवी भाषांमध्ये. (संगणकात साठवलेली माहितीही आपल्यापर्यंत पोचते ती इंग्रजी-मराठी अशा भाषांच्या माध्यमांतूनच.) प्रत्येक भाषा म्हणजे माहितीचा आणि ज्ञानाचा एक खजिनाच आहे. प्रत्येक नवीन भाषेबरोबर माहिती आणि ज्ञानाची नवी दालने आपल्याला खुली होतात. ज्ञानसंपादनासाठी आणि व्यावहारिक यशासाठी सर्व शैक्षणिक क्षेत्रांना पायाभूत असलेल्या भाषाभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जर्मन विभाग, परकीय भाषा विभाग, पुणे विद्यापीठ

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.