प्रार्थना . . .

[या शब्दाला शाळेच्या संदर्भात एक खास वेगळा अर्थ आहे. शाळेचा दिवस सर्वांनी एकत्र जमून प्रार्थना म्हणून सुरू होतो. काही शाळांमध्ये रोज किंवा विशिष्ट दिवशी शाळासमाप्तीच्या वेळीही प्रार्थना म्हणण्याचा प्रघात आहे.
प्रार्थना या शब्दात ती कोणाला तरी केलेली विनंती असल्याचे जाणवते. पण प्रार्थना सर्वांनी म्हणताना मुलामुलींच्या मनात नेमके काय येत असेल? एका त-हेने प्रार्थना सर्वांनी म्हटलेले, वृंदगान किंवा समूहगान असते. संगीतात भावनांना उत्तेजित करण्याचे कौशल्य असते. एकत्रपणे संगीत गाता-ऐकताना त्याचा काही एक परिणाम मनांवर होणे साहजिक आहे. राष्ट्रगीताने किंवा स्फूर्तिगीतांनी देश-प्रेमाची भावना मनात भरून आल्याचा अनुभव अनेकांनी—-कदाचित सर्वांनी—-घेतला असेल. शाळेत म्हटली जाणारी प्रार्थना नेमका काय अर्थ गाणाऱ्या ऐकणाऱ्यांच्या मनात आणत असेल? सर्वांनी एकत्र म्हणण्यामधून एकत्रपणा वाटत असेल का? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यामधून मुले काय शिकत असतील, हा विचार सामान्यपणे दुर्लक्षित आहे. त्याबद्दल दिल्ली विश्वविद्यालयातील प्राध्यापक श्री. कृष्णकुमार यांनी परखड वि लेषण केलेले आहे, त्याचे हे संक्षिप्त रूपांतर. त्यांनी नोंदवलेली उदाहरणे हिन्दीभाषिक प्रांतातली आहेत. आपल्याला आपल्या अनुभवातील मराठी उदाहरणेही आठवतील.
हा लेख आपल्या वाचनात आणण्यामागचे प्रयोजन असे आहे की ‘शाळा’ या व्यवस्थेचे अविभाज्य भाग म्हणून अनेक गोष्टी निमूटपणे स्वीकारल्या जातात, त्या तपासून पाहण्याची निकड जाणवावी. त्या दृष्टीने प्रार्थना हे फक्त एक प्रारुप आहे. शिक्षणव्यवस्थेच्या विविध अंगांची अशी शास्त्रीय छाननी व्हायला हवी. ह्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न आहे.
भारतीय जीवनात प्रार्थनेचे स्थान शाळेच्या तुलनेत खूपच पुरातन आहे. आपल्या समाजात, ग्रामीण जीवनात ‘शाळा’ याला काही विशेष स्थान नाही पण ‘प्रार्थना’ याला मात्र निर्विवाद मान्यता आहे. प्रार्थनेची मानसिकता आणि स्वरूप शाळांनी आपलेसे करून टाकले आहे.
प्रार्थना रोज, प्रत्येक शाळेत होते. हा एक महत्त्वाचा उपचार आहे. ‘मुलांचे शिक्षण’ या जगड्व्याळ रचनेचा अविभाज्य भाग म्हणून जशा शाळा सुरू आहेत तशाच शाळांतील प्रार्थनाही. दोन्ही बाबतीत ‘उपयोग काय?’ असा प्र न कधीच विचारला जात नाही. शिक्षणक्षेत्रातील लोकांकडूनही नाही. ते इतके पवित्र कर्तव्य आहे की त्याला कोणतीही कसोटी लावता येत नाही. एखाद्या धर्म-संप्रदायाच्या किंवा पैशाच्या तालावर चालणाऱ्या शाळेत प्रार्थना का असेल ते समजू शकते पण लक्षावधी सरकारी, पालिकांच्या शाळांतूनही प्रार्थना केली जाते. यात कोणाची पूजा केली जाते? कोणत्या मूल्यांची कास धरली जाते? आपण स्वीकारलेल्या राष्ट्रीय मूल्यांचा बालशिक्षणावर कुठपर्यंत प्रभाव पडला आहे ते आपल्याला यातून दिसेल.
शिक्षणक्षेत्रातील बहुसंख्य लोक प्रार्थनेला शिक्षणाचा अविभाज्य भागच मानतात. त्यांच्या मानसिकतेत शिक्षण हा अजूनही एक प्रकारचा धार्मिक संस्कार आहे. तो धर्मनिरपेक्ष झालेला नाही. धर्मातील सर्वांत मूलभूत संकल्पना आहे ‘समर्पणाची’. भारतीय शिक्षणपद्धतीत हेच सर्वाधिक लोकप्रिय मूल्य आहे. मुलांमध्ये ‘समर्पणभावना’ रुजवणे हे शिक्षकांचे महत्त्वाचे ईप्सित आहे. त्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले जातात त्याचाच प्रार्थना हा एक भाग आहे. त्यातून परमेश्वर, देश आणि प्रशासक यांच्याप्रति श्रद्धा दाखवली जाते. प्रार्थनांच्या माध्यमातून मुलांची मानसिकता कशी घडवली जाते ते इथे पाहू.
१. प्रार्थना-व्यवस्था व प्रयोजन
शालेय संस्कृतीमध्ये शिस्त म्हणजे समर्पण असे साधे सरळ समीकरण असते. शाळेची इयत्तावार रचना, शिक्षकांचे प्रतिष्ठेचे स्थान, घंटा, प्रार्थना ही शिस्त प्रस्थापित करण्याची अप्रत्यक्ष साधने आहेत. शिक्षा हे प्रत्यक्ष साधन. प्रार्थनेच्या वेळी मुले रांगेत उभी—-काही शिक्षक छडी घेऊन भोवती फिरताहेत—-चुळबुळ करणाऱ्यांना फटके देताहेत—-हे दृश्य अपरिचित नाही. प्रार्थनेसाठी जाणाऱ्या, हात जोडून डोळे मिटून प्रार्थना करणाऱ्या मुलाला आपली इयत्ता/रांग विसरण्याचे स्वातंत्र्य नसते. कडक उन्हात मुलांच्या पलटणी, अध्यापक मात्र सावलीत. आरोग्य अन् स्वातंत्र्य यांपेक्षा शिस्त-व्यवस्थापनाला महत्त्व देणारी ही व्यवस्था अमानुष आहे. प्रार्थनेच्या निमित्ताने सर्व मुले आणि शिक्षक यांनी एकत्र येणे अनेकांना महत्त्वाचे वाटते. मुख्याध्यापकांना सूचना द्यायला, उपस्थितीचा अंदाज घ्यायला ते सोयीचे असते—-पण या कारणासाठी प्रार्थना महत्त्वाची ठरते का? एकाच वेळी नीटनेटका गणवेश घालून शिस्तीत उभी राहिलेली मुले पाहिली की काहींचा अभिमानाने ऊर भरून येतो. पण याचा संबंध सैनिकी प्रशिक्षण–शिस्त याच्याशी संबंधित मानसिक धारणांशी आहे. प्रार्थनेच्या उपयुक्ततेशी नाही!
२. कर्मकांड की माध्यम
रोज म्हणत असूनही अनेकांना प्रार्थना पाठ नसते कारण त्यांना ती आवडत नाही. रोज म्हणून म्हणून मुले त्याच्या अर्थाशी नाते जोडायचा प्रयत्न करायचे विसरून जातात असेही म्हटले जाते. थोडक्यात प्रार्थनेतील शब्दांना स्वतःचे काही महत्त्व नसते ते फक्त समर्पणापर्यंत पोचण्याचे माध्यम असतात. शब्द बदलले तरी अंतिम हेतू कायम राहतात. असे जर असेल तर प्रार्थना सतत एकच राहायला हवी. पण प्रत्यक्षात प्रार्थना बदलत जातात, त्यावर सामाजिक परिस्थितीचा प्रभाव असतो.
३. आराध्यांचे वि लेषण
परमेश्वराची आराधना ही प्रार्थनेची परंपरागत पार्श्वभूमी आहे. कधी ईश्वरा स्वरूप निराकार तर कधी शुद्ध हिंदू अवतारवादी असते. निराकार रूपातही ते हिंदू किंवा इतर धर्मांशी अनुकूल असते. ताकद आणि प्रभाव यांच्या संदर्भातून परमेश्वर म्हणजे राजस वैभवाचा पुतळाच वाटतो. त्याचा प्रभाव निसर्ग ते मानव सर्वत्र आहे. ब्रह्मांडाचा तो प्रभावी शासक आहे.
‘मुझको वनस्पति से बृहस्पति
तू बना सकता अहो!’
परमेश्वर एक अतीव दयाळू राजा आहे. त्याचे दातृत्व अगाध आहे. त्याच्याच कृपाप्रसादामुळे लोक जिवंत आहेत.
‘पेडों से फल तूने लगाए गल्ले सब तूने उपजाए जो इस दुनिया में आते हैं तेरा ही दिया खाते हैं।’
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक शाळांतील प्रार्थनात परमेश्वराच्या स्तुतीला जोडून स्थानिक राजा-महाराजांच्या स्तुतिपर ओळी जोडलेल्या असत. साहजिकच अखिल विश्वाच्या स्वामींच्या आसनावर या राजांचे स्थानांतर मुलांच्या मनात होत असे. परमेश्वराप्रतीची नम्रता, शासक/अधिकारी व्यक्तीबद्दलच्या नम्रतेत परावर्तित व्हावी अशी अपेक्षा असे. प्रार्थनांमध्ये निसर्गसुद्धा परमेश्वरमय असतो. सूक्ष्म वर्णनापेक्षा ढोबळ वर्णन करणाऱ्या प्रार्थना विविधताविरोधी परमेश्वराचे स्वरूप सफलतापूर्वक प्रस्थापित करतात.
‘आकाश में मनमोहिनी किसने बनाई तारिका वन में मधुर स्वर से अहो किसने घुलाई सारिका . . .’
थोडक्यात प्रार्थनांमधला निसर्ग एखाद्या मशीनप्रमाणे परमेश्वराने नियंत्रित केलेला असतो. त्याच्या कृपेवर किंवा क्रोधावर विविधता अवलंबून असते.
४. राष्ट्रीयता
स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रार्थनांमध्ये राष्ट्रीयता भावनात्मक होती. स्वातंत्र्योत्तर काळात या राष्ट्रीयतेचे स्वरूप नाटकी असते, बेगडी असते. स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीयतेला सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात विवक्षित, महत्त्वाचे स्थान होते. राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल आदरपूर्ण प्रेमाची भावना होती. त्यांच्यात आपल्या आकांक्षांचे प्रतिबिंब लोक पाहत होते. स्वातंत्र्याबद्दलची आसक्ती वर्गीय भेदांपलीकडे सर्वांसाठी समान होती. स्वातंत्र्य मिळाल्या-नंतर त्या लक्ष्याची जागा भरून काढणारा पर्याय निर्माण न झाल्यामुळे तो सर्वसमावेशक राष्ट्रवाद विसविशीत झाला. राष्ट्रातील भूमिहीन, हरिजन, छोटा शेतकरी, मजूर . . यांच्या दबल्या आशा-आकांक्षा या राजकारणाचे मुख्य सूत्र झाल्या नाहीत. सर्वांचा विकास ही अवधारणा विकृत स्वरूपात पुढे आली. त्यामुळे राष्ट्रीयता ही घोषणाबाजीचे स्थान बनली पण जनसामान्यांना प्रेरक असे तिचे रूप आपल्यासमोर नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात जाज्वल्य देशाभिमानाने भरलेल्या प्रार्थना विदेशी शासनाच्या दबावामुळे बंद पडत आणि परमेश्वराची आराधना सुरू होत असे. स्वतंत्र भारतात चिनी आक्रमणासारख्या राष्ट्रीय संकटाच्या काळात ‘तू गगन है विस्तीर्ण, तो मैं एक तारा क्षुद्र हूँ’ सारख्या गूढ प्रार्थना एकदम नाकाम ठरल्या. त्यांची जागा प्रत्यक्ष परमेश्वराच्या आराधनेने घेतली होती, ‘ऐसी शक्ति हमें दो दयानिधे’. कदाचित आपल्या भारतीय मानसाला संकटकाळात राष्ट्रभावनेमुळे आज तेवढा आधार मिळत नाही जेवढा स्वातंत्र्यपूर्व काळात मिळत असे. स्वतंत्र भारताच्या स्तुतीमधून परतंत्र आणि स्वतंत्र भारतातला फरक मुलांना समजत नाही. ही स्तुती एकतर मातृभूमी नावाच्या देवतेची असते किंवा भारताच्या शाश्वत समजल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वारशाची. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रार्थनांमधून ज्याप्रमाणे समकालीन वास्तवाचे दर्शन होत असे, तसे आज होत नाही. त्यामुळे या प्रार्थनांना राष्ट्रीय म्हणणे कठीण आहे. केवळ राष्ट्र म्हटल्याने भावना राष्ट्रीय होत नाहीत. मुलांना तर त्या तशा वाटणे अवघडच आहे.
प्रार्थनांमधून जर कोणती भावना मुलांपर्यंत पोचतच असेल तर ती काहीशी न्यूनगंडाची, अपराधीपणाची ‘है यह भारतवर्ष हमारा, इसको भूल न जाऊँ मैं।’
किंवा ‘जीवनपुष्प चढा चरणोंपर
माँगू मातृभूमि से यह वर तेरा वैभव अमर रहे माँ हम दिन चार रहें न रहें।’
ज्या प्रार्थनांमधून मानसशास्त्रीय, सामाजिक किंवा आध्यात्मिक परिप्रेक्ष्यातून देशप्रेम व्यक्त होते अशा प्रार्थनांची संख्या नगण्य आहे.
भारतीय जीवनातल्या विविधतेबद्दल आपण पाठ्यपुस्तकांतून, प्रतिज्ञेतून भले गर्व प्रकट करत असू, परंतु ती आपल्या राष्ट्रीय जीवनातली विवशता आहे अशा प्रकारे सांगितली जाते.
विविधतेतील एकतेबद्दल सर्व मुलांना सतत काहीना काही सांगितले जाते त्यामुळे विविधता हे आपले सौंदर्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असे न जाणवता आपल्यावर असे बिंबवले जाते की विविधता हे एक असे वास्तव आहे, ज्याच्याबद्दल दुर्देवाने आपण काही करू शकत नाही. ‘अनेकता’ या शब्दातच जीवनाचे जे बहुआयामी चित्र अपेक्षित आहे ते समोर न मांडता आपण ‘अनेकता–एकता’ अशी समीकरणे मांडून मुलांना संकोची–सावध नागरिक बनवतो.
‘कुछ जात हो कुछ मजहब कुछ तौर तरीके हो
मिलजुलके मगर रहना हम सबको सिखायेंगे।’
ही प्रार्थना आपल्या राजकारणाचे सारच आपल्यापुढे मांडते. पहिल्या ओळीतली एक सूट देण्याची जी भावना आहे ती दुसऱ्या ओळीतील ‘मगर’ शब्द व्यवस्थित अधोरेखित करतो.
मुलांच्या दैनंदिन जीवनाशी सुसंगत अशाच कल्पना त्यांच्या राष्ट्रप्रेमाला जिवंत ठेवतील. स्वातंत्र्यप्राप्तीपासून असा अर्थ देण्यात आपण पूर्णतः अपयशी ठरलो आहोत. स्वयंपूर्णता आणि प्रत्येकाला आत्मसन्मानपूर्ण जीवन ही आपली राष्ट्रीय उद्दिष्टे आहेत असे आपण घोषित केले आहे. व्यवहारात मात्र आत्मसन्मानापेक्षा शक्तीचे पूजक होणे आपल्याला जास्त भावते. आपल्या देशातील नोकरशाही व राजकीय नेतृत्व जनतेने आपल्यापुढे सदैव नम्र असावे अशी अपेक्षा करतात. आपल्या प्रार्थनाही याच गुणांची भलावण करतात. राष्ट्रीय उन्नतीची मागणी आपण कधी परमेश्वराला करतो, कधी झेंड्याला तर कधी भारतमातेला करतो. ही सदैव याचना असते. असहाय याचकाची प्रार्थनांमध्ये ओतप्रोत भरलेली दया आणि कृपा पाहिली की वाटते असहायता हेच आपले सर्वांत महत्त्वाचे राष्ट्रीय वैशिष्ट्य आहे.
५. समाज आणि चारित्र्यविषयक संकल्पना
प्रार्थनांमधली भूमिका काही विशिष्ट मानसिकता दर्शवते. ही आहे वैराग्य, उदासीनता, सेवा, आत्ममग्न असामाजिकता आणि असहाय्यतेची. अभिव्यक्ती अतिशय विनयपूर्ण. समाजाबद्दलची अनास्था हा प्रार्थनेचा पाया.
प्रार्थना करणाऱ्याचे सर्वाधिक सुसंगत चित्र म्हणजे समाजाकडून लाथाडला गेल्यावर एकटा निबिड जंगलात, किंवा जीवनसागराच्या किनाऱ्यावर उभे राहून समाजातला हलकल्लोळ ऐकणाऱ्याचे. सामूहिक प्रार्थनांतही प्रार्थना करणारी व्यक्ती ही एकटी असते. मग परमेश्वराची आवश्यकता आणखीच वाढते. पण त्याबरोबरच समाज त्या व्यक्तीचा शत्रू बनतो. सर्व जग हा स्वार्थात बुडालेल्या भावनाशून्य लोकांचा एक तुरुंग बनतो—-‘सुखके सब साथी दुखमें न कोई’.
सुखाची कांक्षा हा देखील अपराध आहे असे अनेक प्रार्थना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुचवतात. प्रार्थनांमधला परमेश्वरदेखील असहाय एकटेपणात मित्र होत नाही तर असहाय व्यक्तीला सांभाळून नेणारी महाशक्ती (super power) असतो. स्वतःचे एकटेपण, असहायपण, कष्टप्रद आयुष्यच त्याला परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ नेणार असते. लहान मुलांची शारीरिक असमर्थता हा जणु एक अपराध आहे अशी वर्णने असतात.
‘विद्या बुद्धि नही कुछ पास हमें बना लो अपने पास
हाथ जोड हम खड़े हुए हैं पैरोंपर हम पड़े हुए हैं।’ किंवा
‘करे आपसे कैसे बिनती, बस सीखे हैं अक्षर गिनती’
गुण देणे आणि अवगुणांपासून दूर राखणे ही दोन्ही परमेश्वराचीच कामे. व्यक्ती स्वतः काहीच करू शकत नाही.
‘हे प्रभु आनंददाता ज्ञान हमको दीजिए
शीघ्र सारे दुर्गुणों को दूर हमसे कीजिए।’
या प्रार्थनांमधून दाखवल्या जाणाऱ्या सद्गुण-दुर्गुणांबद्दल मुख्य आक्षेप हा आहे की ही कृत्रिम विभागणी मुख्यतः काळे नि पांढरे अशी भयंकर बटबटीत झाली आहे. हिंदी सिनेमा किंवा बालसाहित्यातील व्यक्तिरेखा ज्याप्रमाणे एकतर चांगल्या किंवा वाईट अशा दोनच भागांत विभागलेल्या असतात तद्वतच प्रार्थनांमधील व्यक्तिरेखा आणि भावनाही.
हे झाले दुर्गुणांबद्दल. गुणांबद्दल काय? गुणांमध्ये वैराग्य आणि सेवामय जीवन हे सर्वाधिक लोकप्रिय.
‘हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म हो सेवा
सदा ईमान हो सेवा, कि सेवकभर बना देना।’ याचे एकदम दुसरे टोक म्हणजे
‘मैं प्रयोग से बचूं सदाही अहंशून्यता का वर दो
दुख में हो सुखकी इच्छा हानि लाभ सब एक समान सेवक बनकर टहल बजाऊँ ऐसा वर दो हे भगवान ।’
वारंवार म्हटले जाणे हे प्रार्थनांचे अटळ भागधेय आहे. त्यामुळे त्यांतील शब्दांत एक आग्रह असणे स्वाभाविक आणि आवश्यकही होते. या शब्दांत भावना भरणे एखाद्याच संवेदनशील प्रार्थकाला शक्य होईल. त्या शब्दांचा अर्थ आता त्यांच्या निर्मात्याच्याही मनात उरलेला नसेल.
प्रार्थनांची मूढ मानसिकता आणि अवरुद्ध कल्पना हे दोन्ही प्रार्थनांतील आंतरिक विरोधाभासाचेच दोन अवतार आहेत. आणि त्याच वेळी ते प्रार्थनेच्या शैलीचे मुख्य आधारही आहेत. प्रार्थना हे कदाचित या शैलीचेच नाव आहे, कोणत्याही भावनेचे नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.