धिस फिशर्ड लँड : लेख ४

संघर्ष

संसाधन-वापराच्या वेगवेगळ्या पद्धती वापरणाऱ्या दोन समाजांची गाठ पडली की खूप तणाव उत्पन्न होतो. समाजरचना वेगवेगळ्या असतात. विचारधारा आणि पर्यावरणाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असते. इतिहासात वारंवार अशा तणावांमधून तीव्र संघर्ष उपजताना दिसतात. कधीकधी तर वंशविच्छेदापर्यंत मजल जाते. अमेरिकन (रेड) इंडियन्सची संकलकपद्धती जेव्हा यूरोपीय वसाहतवाद्यांच्या शेतकरी-समाजापुढे आली तेव्हा हे घडले. महाभारतातली खांडववन जाळण्याची घटनाही मुळात संकलकांच्या आणि शेतकऱ्यांच्या संघर्षाचेच उदाहरण आहे.
युरोपात औद्योगिक जीवनशैली शेतकऱ्यांशी भिडतानाही हेच घडले. तिथे मोठे वाद उद्भवले ते नव्याने सबळ झालेल्या शासनव्यवस्थेने खेड्यांची सामायिक जमीन बळकावण्यामुळे. आधीच्या शेतकरी जीवनशैलीत चराईची कुरणे, गावसीमेतील वने आणि पाणसाठे गावाच्या सामायिक मालकीचे असत. नवी औद्योगिक ‘राजवट’ या सर्वांची मालकी गावांकडून हिसकून घेऊ लागली, आणि वादांना सुरुवात झाली. एकट्या जर्मनीतील प्रशिया क्षेत्रात १८५० साली साध्या चोऱ्या झाल्या ३५,००० तर लाकूड-चोऱ्या झाल्या,२,६५,०००! भारतातही हे घडले, आणि त्याला संगत होती वसाहतवादाची. आपण पुढे हे जास्त तपशिलात पाहणार आहोतच. इथे हेच नोंदू या की असे अनुभव आग्नेय आशिया आणि आफ्रिकेभरही आलेले आहेत.
या वादांमुळे शेतकरी जीवनशैलीतले अंतर्गत वादही तीव्र झाले असे आढळते. नगदी पिके घेणारे आणि पारंपारिक शेतकरी यांच्यातील संघर्ष औद्योगिक जीवन-शैलीतून उपजतात. आदिवासींचे शिकार-संकलनाचे अधिकारही औद्योगिक वसाहतवादी लोकांच्या शिकारीसाठी जंगले राखण्यामुळे खंडित झाले, आणि यातून उपजणारे वादही वारंवार भेटतात.
शेतकरी आणि गुराखी जीवनशैलींमध्येही अशी भांडणे घडल्याच्या नोंदी आहेत, परंतु या जीवनशैलींमध्ये काहीशी सहजीवनाची शैलीही घडताना आढळते.
आज पा चात्त्य देशांमध्ये एक नवी संघर्षाची तहा आढळते. पर्यावरणवादी चळवळी एका वेगळ्या जीवनशैलीला जन्म देऊ पाहत आहेत. वनांकडे एक दुभता संसाधनाचा स्रोत म्हणून न पाहता एक जैविक विविधतेचा साठा म्हणून पाहणारी ही जीवनशैली असेल. औद्योगिक आणि वैज्ञानिक त-हेने जंगले पोसण्याऐवजी त्यांना औद्योगिक धकाधकीपासून सुटका देणाऱ्या, आसरा देणाऱ्या क्षेत्राचे स्थान या नव्या जीवनशैलीत असेल. औद्योगिक जीवनशैलीच्या या ‘वारसा’शी आज पा चात्त्य औद्योगिक समाज झगडत आहेत. [भारतात तर एकाच वेळी या पाचही जीवनशैली (चार प्रस्थापित, तर एक जन्मू घातलेली!) तंडत आहेत. —- संपादक]
वेगवेगळ्या जीवनशैलींमधील संघर्षाबाबतच्या दोन अंगांकडे लक्ष वेधणे निकडीचे आहे. एक म्हणजे अशा संघर्षांच्या काळात पर्यावरणावर होणारे आघात एकाएकी फार तीव्र होताना आढळतात. प्रत्येक संघर्षात पहिला बळी जातो तो पर्यावरणाचा आणि जंगलांचा. एखादी जीवनशैली ‘जिंकून’ संघर्ष मंदावला की मात्र पर्यावरणाला इजा होण्याचे प्रमाणही मंदावताना दिसते.
दुसरे अंग आहे संघर्षाच्या प्रदर्शनाचे. मुळात संघर्ष असतात ते संसाधन-वापराच्या पद्धतींबद्दल, पण त्यांना वैधता देण्यासाठी विचारधारांमधील संघर्षांचे चित्र उभारले जाते. शेतकरी म्हणतात की संकलकांची राहणी अकार्यक्षम आणि उधळेपणाची असते. औद्योगिक जीवनशैली शेतीवर आक्रमण करताना सांगते की धर्माची जागा ती विज्ञानाला देऊ पाहत आहे. आज पर्यावरणवादी जीवनशैली ‘आधुनिक’ आणि ‘वैज्ञानिक’ या शब्दांच्या जागी परंपरा आणि (वैश्विक) धार्मिकतेचा उदोउदो करते, हा अपघात किंवा योगायोग नव्हे.
या मानाने एकाच जीवनशैलीतले ताणतणाव आणि संघर्ष इतक्या तीव्रतेचे नसतात, आणि इतिहासातील त्यांच्या नोंदीही इतक्या भडक नसतात. ताण आणि संघर्ष मात्र असतातच. तीसेक हजार वर्षांपूर्वीपर्यंतचे मानवांचे जीवाश्म संघर्षांची नोंद करत नाहीत. त्यानंतर मात्र भूभागांसंबंधित झगड्यांच्या नोंदी जगभरचे जीवाश्म दाखवतात.
इथेही प्रत्येक जीवनशैलीच्या प्रगत अवस्थेत संघर्ष जास्त जाणवतात. एखादा सामाजिक गट आपल्या जीवनशैलीचे ‘आदर्श’ नमुने ताणून विकृत करू लागतो. कुठे सामंत आपल्या प्रजेबाबत पाळायची आचारसंहिता मोडतात, तर कुठे औद्योगिक शैलीचे वनव्यवस्थापन एकाच गटाच्या भल्यासाठी बेतलेले असते. अशा वेळी त्या जीवनशैलीची वैचारिक बैठकच कोलमडू लागते.
शेतकरी जीवनशैलीत सामंत आणि त्यांची प्रजा किंवा जमीनदार आणि त्यांची कुळे यांच्यातील संघर्ष जगभराच्या इतिहासात आढळतात. इथेही सामाजिक वने आणि कुरणे यांच्यावर सामंताने मर्यादा घालण्यातून उपजलेले वाद प्रामुख्याने दिसतात. अगदी रॉबिन हुडपासून फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत सगळीकडे सामंतांची राखीव जंगले हे वादाचे मूळ असे.
जेव्हा यावर औद्योगिक जीवनशैलींचा प्रभाव दिसू लागला तेव्हा तिच्याशी जुळते घेणारे नगदी पीकवाले शेतकरी आणि पारंपारिक शेतकरी यांच्यात संघर्ष झाले.
भांडवलावर आधारलेली औद्योगिक पद्धतही एका अर्थी दुभंगलेली दिसते. शेती व कारखाने यांच्यातील मालकी हक्कांचे स्वरूप जंगलांमधील मालकी आणि वापराच्या हक्कांपेक्षा खूपच वेगळे असते. शेत–कारखान्यात खाजगी मालमत्ता आणि वन–अरण्यांवर सरकारी मालकी, असे हे विभाजन आहे. पण मुळात सरकार जंगलांची मालकी स्वतःकडे घेते यामागील हेतू मात्र ठामपणे औद्योगिक जीवनशैलीला स्थैर्य पुरवणे हा असतो. लोकसंख्या माणसे कोणत्या परिस्थितीमध्ये व्यक्तिशः, समूहशः हित साधण्यासाठी आपले प्रजननाचे ‘दर’ नियंत्रित करतील, यावर काही विचार. संकलक समाज भोवतालच्या निसर्गाचे दोहन हलक्या हाताने करतात. जर परिस्थिती स्थिर असली, तिच्यात मोठाले बदल होत नसले, तर प्रत्येक गट किंवा टोळी आपापल्या क्षेत्राला झेपेल अशा लोकसंख्येपर्यंत पोचून स्थिरावते. शेजारी गटांमध्ये क्षेत्रांबद्दल भांडणे झालीच तर ती चांगलीच जोरदार असतात. अशा युद्धांमध्ये टिकायचे असेल तर लोकसंख्या अधूनमधून दुष्काळी परिस्थिती हाताळू शकण्याइतकी कमी हवी. आणि बहुतेक वेळा हे घडत असावे. अर्थात, इतर एखाद्या जीवनशैलीशी संबंध आला तर हे आपोआप केले जाणारे नियंत्रण कोलमडते.
गुराखी बहुधा कमी उपजाऊ, जास्त अवर्षणग्रस्त भूक्षेत्रांत वावरतात. भटक्या जीवनशैलीमुळे त्यांच्या लोकसंख्येवर सांस्कृतिक नियंत्रणे नसतात. नैसर्गिक छाटणीने जे काही नियमन होईल, तेच खरे. पण यामुळे गुराख्यांची लोकसंख्या ‘दाटी’देखील संकलकांसारखी कमीच असते.
शेतकरी संसाधनांचे दोहन जास्त तीव्रतेने करतात आणि यामुळे त्यांची लोकसंख्या संकलकांपेक्षा व गुराख्यांपेक्षा दाट असते. सामान्य लोकांचा संसाधन-वापर कमीच असतो, पण शेती न करणारे अभिजन मात्र संसाधन-वापरात श्रीमंत होऊ शकतात. कमी संसाधने वापरणारे हे समाज तंत्रज्ञानाच्या विकासासोबत संख्येने (खरे तर ‘दाटीने’) वाढत जातात. त्यांना जुजबी संरक्षण देत त्यांच्यावर जगणारी शासनव्यवस्था त्यांना मोठ्या क्षेत्रीय संघर्षांपासून दूर ठेवते. इथेही संकलकांसारखाच लोकसंख्या फार वाढू न देण्याकडे कल असल्याचे दिसते. हे नियंत्रण सौम्यच असते, कारण सैनिकी कामगिरीसाठी जास्त लोकसंख्या उपयुक्त असल्याने शासनसंस्थेला नियमन नको असते. नैसर्गिक आपत्ती, रोगराई, फारशी सुबत्ता नसणे, अशामुळे जे नियमन होते, तेच भरवशाचे.
औद्योगिक जीवनशैलीच्या लोकसंख्या–दाटीचा इतिहास बदलते चित्र दाखवतो. औद्योगिक जीवनशैली आधी वसाहतवादाच्या मदतीने लोकसंख्यावाढीच्या स्फोटक स्थितीत गेली. मग गेले (एकोणिसावे) शतक संथ वाढीचे होते. आता कुठेकुठे लोकसंख्या घटतही आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःचा वस्तूंचा उपभोग वाढवायची इच्छा आपोआपच अपत्यांच्या संख्येवर मर्यादा घालते. दरडोई उपभोग वाढतच जातो, पण ‘डोया’ मात्र वाढत नाहीत.
[या लेखासोबत गाडगीळ—-गुहा यांच्या पुस्तकाचा तिनांपैकी पहिला भाग संपला. ‘हॅबिटॅट्स इन ह्यूमन हिस्टरी’ या एकाच प्रकरणाच्या या भागाचे नाव होते, ‘अ थिअरी ऑफ इकॉलॉजिकल हिस्टरी’. यानंतरचा भाग आहे ‘टूवर्डज अ कल्चरल इकॉलजी ऑफ प्री-मॉडर्न इंडिया!’ यात प्रामुख्याने ब्रिटिशांच्या आगमनापर्यंतचा काळ येतो.
क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या लेखांबद्दल बरेचदा वाचक अधेमधे शंका विचारायला किंवा मुद्दे पटले-न पटले हे मांडायला बिचकतात. या लेखमालेबद्दल मात्र असे होऊ नये, कारण लेखकद्वय शेवटी एका ताज्या लेखातून त्यांच्या आजच्या धारणा मांडणार आहे. आज पुस्तक लिहून दहा वर्षे होत आहेत. वाचकांच्या मतमतांतरांची दखल त्या लेखात घेता येईल.
— संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.