भारतीय संस्कृती व स्टेम सेल्स

भारतीय संस्कृती आणि स्टेम सेल्स या सकृद्दर्शनी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी शीर्षकात एकत्र गुंफल्या आहेत. “ वा, युवा, मघवा” प्रमाणेच हे वाटेल, पण मी काही ‘पाणिनी’ असल्याचा दावा करीत नाही. त्यामुळे या दोन्हीमधील ‘अ-व्याकरणीय’ संबंध सिद्ध करण्याची जबाबदारी मी अर्थातच स्वीकारतो. पण त्यापूर्वी या दोन्ही गोष्टींच्या मला अभिप्रेत असलेल्या व्याख्या किंवा अर्थ स्पष्ट करणे योग्य ठरेल.

भारतीय संस्कृती :– माणूस या जगात कसा वागतो, कसा बोलतो, कसा विचार करतो याला एकत्रितपणे मानवी वर्तणूक किंवा वागणूक (Human Behaviour) असे म्हणतात. मानवी वर्तणूक ही दोनच गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आनुवंशिक (जनुकांद्वारे मिळालेले) गुणधर्म. यांनाच जैविक प्रेरणा किंवा सहज प्रवृत्ती असे म्हणता येईल. आहार, निद्रा, भय, मैथुन, अपत्यप्रेम, नातेवाइकांबद्दलचे प्रेम, समूहनिष्ठा, आक्रमकता, कुतूहल वगैरे अनेक मानसिक गुणधर्म आपल्याला आनुवंशिक-रीत्या वारशाने आई-वडिलांकडून मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे पर्यावरणाचा परिणाम होऊन व्यक्तीने मिळवलेले गुणधर्म. गर्भ तयार झाल्यापासून त्याच्यावर मातेच्या गर्भाशयात व जन्मानंतर व्यक्तीवर विविध भौतिक व मानवी पर्यावरणीय परिणाम होत असतात. भौतिक पर्यावरणात तापमान, पोषण, आवाज, विविध प्रकारचा किरणोत्सर्ग, रसायने, औषधे, अंतःस्राव, सूक्ष्मजीव (जंतू, व्हायरसेस, फंगस, एकपेशीय प्राणी) व मोठ्या वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो. मानवी पर्यावरणात आईवडील, कुटुंबीय व इतर सर्व समाज यांचा समावेश होतो. हे सर्व मानवी घटक जाणता-अजाणता, सामान्य व्यवहारातून किंवा औपचारिक–अनौपचारिक शिक्षणातून व रूढी, परंपरा, सण, वाङ्मय, वृत्तपत्रे, रेडिओ, दूरदर्शन सिनेमा वगैरे विविध माध्यमांतून मानवावर जन्मापासून मरेपर्यंत संस्कार करीत असतात. या मानवी पर्यावरणामुळे मानवावर होणाऱ्या एकत्रित संस्कारांना ‘मानवी संस्कृती’ असे मी म्हणतो, हीच संस्कृतीची व्याख्या असे मी मानतो.

परिस्थिती, धर्म, जीवनविषयक तत्त्वज्ञान भिन्नभिन्न असल्याने त्यात्या समाजातील मुलांवर होणारे संस्कार वेगळे वेगळे असतात व त्यामुळे त्या त्या समाजाची विशेष अशी संस्कृती तयार होते. भारतात वस्ती करणाऱ्यांची ती भारतीय संस्कृती असे म्हणता येते. स्टेम–सेल्स : बी पासून पूर्ण वृक्ष तयार होतो. गर्भापासून पूर्ण प्राणी तयार होतो हे आपल्याला माहीत आहेच. वनस्पतींची पाने, फुले, पाकळ्या, देठ यांपासून (सहसा) नवीन झाड तयार होऊ शकत नाही. त्यांतील पेशींनी नवीन झाड तयार करण्याची क्षमता गमावलेली असते. पण वनस्पतींच्या खोडापासून मुळे, पाने, फुले—-म्हणजे नवीन स्वतंत्र झाडच तयार होऊ शकते. म्हणून विविध प्रकारच्या पेशी तयार करण्याची सुप्त-क्षमता न गमावलेल्या पेशींना खोडपेशी किंवा ‘स्टेमसेल्स’ हा राष्ट्र वापरतात व प्राणिशरीरातील सुप्तक्षमता न गमावलेल्या पेशींनाही ‘स्टेम सेल्स’ हाच शब्द वापरतात.

गर्भ सुरुवातीला एकपेशीय असतो. नंतर पुनःपुन्हा विभाजन होऊन दोन, चार, आठ, सोळा अशी पेशींची संख्या वाढत जाते. पण सुरुवातीच्या काही द्विभाजनांनंतरही प्रत्येक पेशीमध्ये स्वतंत्र्यपणे पूर्ण प्राणी तयार करण्याची क्षमता टिकून असते. नैसर्गिकरीत्या, अपघाताने किंवा मुद्दाम जर सुरुवातीच्या गर्भाचे दोन तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून पूर्ण प्राणी तयार होतो. म्हणून तर एकसारखी जुळी (युनिओव्ह्युलर किंवा मोनोझायगोटिक ट्विन्स) होऊ शकतात. विशिष्ट कालावधीनंतर गर्भातील पेशींचे अवयवविशिष्ट पेशींमध्ये रूपांतर होते—-काही पेशी मज्जासंस्था बनवतात, काही पचनसंस्था, काही त्वचा, तर काही स्नायू बनवतात. अवयवविशिष्ट पेशींनी आपली पूर्ण गर्भ बनवण्याची क्षमता गमावलेली असते, पण त्या त्या अवयवातील विविध प्रकारच्या पेशी बनवण्याची त्यांची क्षमता टिकून असते. आणखी विशेषीकरण झाल्यावर त्या पेशींना अवयवांपैकी विशिष्ट प्रकारच्याच पेशी बनता येते– –पण संख्यावाढीची त्यांची क्षमता शिल्लक असते. मेंदू, हृदय यांच्या अति-विशिष्ट पेशींनी आपली संख्यावाढीची क्षमतादेखील गमावलेली असते. ही अति–विशिष्टीकरणाची क्रिया धोक्याची असते, कारण त्यामुळे त्या त्या इंद्रियाची बरे होण्याची क्रिया जवळपास नष्ट होते, म्हणूनच अर्धांगवायू, हृदयविकार यांतून पूर्णपणे बरे होणे शक्य नसते.

मानवाचे सामाजिकीकरण व व्यक्तींचे विशेषीकरण:
मानवी समुदायाच्या सुरुवातीपासून (बहुधा) ते आजतागायत लहानांत लहान युनिट कुटुंब (स्त्री-पुरुष, मुले, नातवंडे) हे राहिले. सुरुवातीला प्रत्येक कुटुंब स्वतःचे अन्नपाणी मिळवणे व टिकवणे, घर बांधणे, संरक्षण करणे, स्वच्छता करणे याबाबत स्वयंपूर्ण–सर्व क्षमता असणारे असे. जशा वस्त्या वसल्या व वाढल्या, खेडेगावे, गावे, शहरे वसली, तसे श्रमविभागणीने फायदा होतो हे लक्षात आले व शेती, सुतारकाम, लोहारकाम, शिंपीकाम, वस्त्रे विणणे, गवंडीकाम, शिक्षण, धार्मिक क्रियाकर्म, असे विविध व्यवसाय सुरू झाले व त्याबरोबरच माणसाची स्वतःचा व्यवसाय सोडून इतर कामे करण्याची क्षमता कमी झाली. श्रमविभागणीमुळे कार्यक्षमता वाढली, प्रगती झाली, सहकार्य वाढले व आवश्यक झाले. बहुतेक सर्व समाजांमधील व्यक्तींनी आपला व्यवसाय वगळता इतर व्यवसाय करण्याच्या क्षमता कमी प्रमाणात का होईना पण वापरात ठेवल्या किंवा सुप्त स्वरूपात तरी राखून ठेवल्या. म्हणजेच व्यक्ती स्टेम सेल्सच्या स्वरूपात राहिल्या व त्यामुळे त्या समाजांच्या संकटसमयी, बदलांना तोंड देताना व्यक्तींच्या सुप्त क्षमतांचा विकास होऊ शकला व व्यक्त बदलत्या गरजा निभावून नेऊ शकल्या, स्वतः बरोबरच समाजाचा विकास त्या व्यक्ती
घडवू शकल्या.

आपल्या व्यावसायिक व अन्य क्षमता सुप्त वा दृश्य स्वरूपात राखून ठेवलेल्या व्यक्तींना ‘समाज पुरुषाच्या शरीरातील स्टेम सेल्स’ असे म्हणता येईल, व या स्टेम सेल्सचे समाजातील प्रमाण जितके अधिक तितका तो समाज निरोगी, संकटांवर मात करणारा व विकासक्षम असतो. स्टेमसेल्सचे समाजातील प्रमाण हे त्या त्या समाजाच्या संस्कृतीवर अवलंबून असते असे मला म्हणावयाचे आहे. तसेच भारतीय संस्कृतीमुळे भारतीय नागरिक आपल्या सुप्त -दृश्य क्षमता गमावतात, लवचीकता हरवून बसतात, विचार-शक्ती, निर्धाराने निर्णय राबवण्याची शक्ती गमावून बसतात, म्हणजेच समाजातील स्टेम सेल्सचे प्रमाण कमी होते असे मला दाखवून द्यावयाचे आहे.

भारतीय व्यक्तींचे अतिविशेषीकरण
भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असे की तिच्या परिणामस्वरूप भारतीय व्यक्तींनी व्यवसाय–विशेषीकरणाचे टोक गाठले. व्यवसायाची जातीशी घट्ट गाठ मारण्यात आली. विशिष्ट व्यवसाय हा त्या जातीचा धर्म मानण्यात आला. ‘स्वधर्मे निधनं श्रेयः’ असा दंडक घालून अन्य व्यवसाय करणे निषिद्ध मानण्यात आले. निषिद्ध व्यवहार करणाऱ्याला जातीबाहेर काढल्याने त्याच्या मुला-मुलींची लग्ने जमणे अवघड होत असे—-नव्हे अजून होते. व्यवसायांचे बारीक बारीक पोटविभाग केले–जसे फासेपारधी, जाळेपारधी, हरिण पारधी, ससेपारधी व प्रत्येक पोट-व्यवसायाची स्वतंत्र पोटजात निर्माण झाली. एक जात दुसऱ्या जातीच्या व्यवसायावर अतिक्रमण करणार नाही व ही शिस्त स्वधर्म म्हणून, त्यावर अन्य कोणी देखरेख करण्याची गरज नाही. त्यामुळे स्पर्धा नष्ट झाली व एक प्रकारची नि िचंती आली, सुस्ती आली. स्पर्धा नसल्याने आपापल्या व्यवसायात सुधारणा करण्याची, कौशल्य निर्माण करण्याची, ज्ञान मिळवण्याची व ज्ञान निर्माण करण्याची गरज राहिली नाही व गरज नसल्याने ती वृत्तीही जवळपास नष्ट झाली. आपली अंगभूत आवड म्हणून व्यवसाय निवडण्याची मुभाच नव्हती. जातीने नेमून दिलेले काम पूर्वजन्मीच्या कर्माचे फल म्हणून विनातक्रार स्वीकारावयाचे व जन्मभर प्रगतीची अपेक्षा न करता पार पाडावयाचे. आवड म्हणून अन्य व्यवसायात डोकावयाचे नाही. याला अपवाद अर्थात् असणारच, पण अपवादांना शिक्षा होत असे, अजून होते.
यात भर पडली ती बलुतेदारीची. बलुत्याच्या पद्धतीमुळे बलुतेदाराला काम नसले तरी बलुते मिळत असे. कौशल्य असो, नसो, कामात सफाई, कार्यक्षमता असो नसो, पोट भरण्याची सोय झाली. आपल्या व्यवसायात सुधारणा करणे, त्यातील ज्ञान मिळवणे, नवीन तंत्र–शोध लावणे याची गरजच राहिली नाही. अपवाद म्हणून एखाद्या व्यक्तीने काही तांत्रिक सुधारणा केली, नवीन शोध लावला तरी त्याला शिष्य म्हणून फक्त त्याचा मुलगाच मिळणार व ती तंत्र–शोध–सुधारणा त्या कुटुंबापुरतीच मर्यादित राहणार व कालांतराने काही पिढ्यानंतर नष्ट होणार. ते तंत्र ती सुधारणा आसपासच्या गावात देखील पोचणे अवघड, मग भारतभर पसरणे तर दूरच! पूर्वीच्या काळी मृत्युदर भरपूर होता व शतकानुशतके लोकसंख्या स्थिर राहत असे. याचा अर्थ एका सुताराचे दोन मुलगे मोठे होऊन त्याने मिळवलेले नवीन तंत्र पसरवण्याची जितकी शक्यता होती, तितकीच एकही मुलगा मोठा होईपर्यंत न जगल्याने त्याचा निर्वंश होण्याची व त्याने लावलेला शोध नष्ट होण्याची शक्यता होती. आपल्याकडे व्यावसायिक संमेलने, व्यावसायिक ‘गिल्ड्स’ किंवा रॉयल सोसायट्या असल्याचे उल्लेख नाहीत. जात पंचायती किंवा उत्सवाच्या निमित्ताने जातीचे लोक एकत्र येत, पण त्यांमध्ये व्यावसायिक ज्ञानाची फारशी देवघेव होत नसावी.

किंबहुना ही सर्व व्यवस्था लोकसंख्येच्या स्थिरतेवर अवलंबून होती, व लोकसंख्यावाढीबरोबर कोलमडून पडायला निसर्गतःच हवी होती. पण तसे झाले नाही कारण अत्यंत चिवट अशा जाति–संस्थेबरोबर व्यवसायांची गाठ घातली आहे. आजही अनेक भारतीय व्यक्ती गरिबी व उपासमार पत्करतील पण निषिद्ध मानलेला व्यवसाय करणार नाहीत, व जातीने नेमून दिलेला व्यवसाय त्याने पोट भरत नसले तरी सोडणार नाहीत.

या आत्यंतिक व्यावसायिक विशेषीकरणामुळे भारतीय माणसाच्या स्वतःचा व्यवसाय वगळता इतर सर्व क्षमतांचा हास तर झालाच, पण स्वतःच्या व्यवसायातील ज्ञानाला, संशोधनाला व तांत्रिक प्रगतीला देखील चांगलीच मर्यादा पडली—-प्रगती थांबली! म्हणजे एकीकडे समाजातील स्टेमसेल्स नष्टप्राय झाले, तर दुसरीकडे श्रमविभागणीचे, विशेषीकरणाचे जे फायदे मिळायला हवे होते तेही मिळाले नाहीत.

इतर क्षमतांचा हास झाल्यामुळे भारतीय शेतकऱ्याला अडल्या कामापुरतीही स्वतःच्या अवजारांची दुरुस्ती करता येत नाही. प्राथमिक गवंडीकाम, सुतारकाम, लोहारकाम काही त्याला येणार नाही, मग वाचन, लेखन, हिशेब तर लांबच! बलुते तर द्यावे लागणारच आहे, मग फुकाचा त्रास कशाला करून घ्या? इतर व्यवसायांबद्दलचे आणि त्या बरोबर सृष्टीबद्दलचे, निसर्गाबद्दलचे कुतूहलदेखील नष्ट झाले. निरुद्देश कुतूहल हा मानवी बुद्धीचा एक अत्युच्च आविष्कार होय. कुतूहल/जिज्ञासा ही सर्व शास्त्रीय संशोधना-मागची प्रेरणा आहे. हे कुतूहल नष्ट झाले हा मोठा तोटा या आत्यंतिक विशेषीकरणामुळे झाला. सर्वसाधारण भारतीय माणसाला नेहमीच्या ८-१० वृक्षांपलीकडे इतर झाडांची नावे माहीत असणार नाहीत. एखादे वेगळेच झाड किंवा फूल नजरेस पडले ते त्याला दिसणारच नाही—-तो त्याची दखलच घेणार नाही—-मग त्याचे नाव व इतर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे लांबच राहिले. जी गोष्ट झाडांची तीच पक्षी, फुलपाखरे, प्राणी, आकाशातील तारे, जमिनीवरील विविध प्रकारचे खडक किंवा कीटक किंवा साप यांची. पण धनगरांना गवताचे प्रकार व झाडांची नावे माहीत असतात, शिकारी लोकांना जनावरांची व पक्ष्यांची नावे, सवयी, जागा यांची माहिती असते, सुताराला लाकडांचे प्रकार माहीत असतात, गारुड्यांना सापाचे प्रकार माहीत असतात. पण सर्व ज्ञान व्यवसायाने ठरवलेले. त्या पलिकडे कुतूहल नाही!

भारतातील पक्ष्यांची यादी करणे व माहिती जमवणे, वृक्षवल्लींची माहिती जमवणे, भौगोलिक माहिती जमवणे व नकाशे तयार करणे, गौरीशंकरची उंची मोजणे, हिवताप व पटकी, प्लेग व देवी यांची कारणे शोधणे—-या व अशा अनेक गोष्टी परकीयांनी केल्या—-भारतीयांनी नाही—-काही सन्माननीय अपवाद वगळता. इतकेच काय भारतातील वनवासी, आदिवासी यांची दखल प्रथम परकीयांनीच घेतली. वेदांचे पाठांतर आम्ही केले, अध्ययन अभ्यास परकीयांनी केला!
अनेकांना आजही असे वाटते की प्रत्येकाने आपल्याला व्यवसाय (विहित-कर्म) प्रामाणिकपणे, कार्यक्षमतेने केला की त्याची (प्रत्येकाची) जबाबदारी संपली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत सर्वच आघाड्यांवर आपण जागरूक व किमान-माहिती-संपन्न असायला पाहिजे व आपल्या सर्वच क्षमता शाबूत ठेवल्या पाहिजेत व वेळप्रसंगी वापरल्या पाहिजेत, तरच आपण एक जबाबदार नागरिक होऊ, असे सहसा कोणाला वाटत नाही. शहराच्या स्वच्छतेचे काम एकदा नगरपालिकेकडे बलुतेदारीने दिले व सहामाहीला कर भरला की माझे काम संपले असे मला वाटते. नगरपालिका आपले काम बरोबर करते की नाही, कराद्वारे गोळा केलेला पैसा योग्य कारणासाठी वापरते की अयोग्यरीत्या उधळते, की खाते, यांवर देखरेख करण्याचे काम माझे नाही असे मला वाटते. आमच्या संडासातील मैला भुयारी गटारांद्वारे नेऊन, आमच्या नजरेआड, कोणतीही प्रक्रिया न करता नदीत नेऊन सोडला तरी ती आम्हाला सर्वांत स्वच्छ, सर्वांत योग्य व्यवस्था वाटणार! नगर पालिकेला आम्ही स्वच्छतेचे काम करण्यासाठी नोकर म्हणून नेमले आहे, पण नोकरांवर देखरेख करण्याचीही क्षमता आम्ही गमावली आहे. अशी क्षमता आपल्यात असली पाहिजे हेही आम्ही विसरलो आहो. म्हणून आमचे सेवक आमचे राजे बनले आहेत!

कायदारक्षणाची जबाबदारी पोलिसांवर टाकून आम्ही ती जबाबदारी पूर्णपणे अंगाबाहेर टाकली! न्यायदानाची जबाबदारी कोर्टावर टाकली की नर्मदा-धरणग्रस्तांना किंवा अरुंधती रॉयला न्याय मिळाला का याचा विचारही करण्याची जबाबदारी आमची नाही. आमच्या मुलांना शिकवण्याची जबाबदारी आम्ही शाळांवर टाकली आहे, पाणी पुरवण्याची, अन्न पुरवण्याची, आरोग्याची व उपचारांची अशा अनेक जबाबदाऱ्या शासन-यंत्रणेवर टाकल्या आहेत, पण एक जबाबदार नागरिक म्हणून ही सर्व कामे नीट होतात की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम मात्र आम्ही करत नाही. तीही जबाबदारी घेण्यास कोणी मिळाले तर बरे होईल!

न वापरल्याने माणसाचे शेपूट नष्ट झाले तसे आमचे विचार करण्याचे इंद्रियही नष्ट होऊ लागले आहे—-की झालेच आहे! विचार करण्याची गरजच काय? वेद-उपनिषदे, गीता–ज्ञाने वरी—संतवाङ्मय यांमधून सर्व विचार केलाच आहे. आम्ही फक्त त्या ग्रंथांचे पठण करावयाचे. श्रीकृष्णाने गीता सांगितली. ज्ञाने वरांनी ती मराठीत आणली. ज्ञाने वरी समजावून सांगण्यासाठी डझनावारी ‘टीका’ मराठीत लिहिल्या गेल्या. पण “मी या सर्व योद्ध्यांना आधीच मारले आहे, तू फक्त निमित्तमात्र आहेस” असे सांगून युद्धात होणाऱ्या हिंसा-हानीच्या नैतिक जबाबदारीतून अर्जुनाला मुक्त करणारे—-म्हणजे सर्व कर्त्यांना त्यांच्या कृत्याच्या नैतिक जबाबदारीतून मुक्त करणारे हे तत्त्वज्ञान मला मान्य नाही, श्रीकृष्ण सांगतो ते चूक आहे असे सांगणारा (ना. ग., गोरे वगळता) एकही महाभाग निघू नये? ग्रंथप्रामाण्याने बुद्धीला इतके झाकून टाकावे?

भारतीय माणसाला वेदांबद्दल आदर वाटतो व भारतीय संस्कृति वेदांवर आधारित आहे असे वाटते’. पण वेदांमध्ये काय दिले आहे हे ढोबळ मानाने सुद्धा हजारांत एकालाही माहीत नसते! तिरुपतीला वेदपाठशाला आहे—- अक्षरश: पाठ-शाला आहे. मुले १४ वर्षे वेद पाठ करतात. १४ वर्षे शिक्षण घेऊन पोपट बाहेर पडतात. त्यांना वेदातील एका शब्दाचाही अर्थ सांगता येत नाही! कोकणात साखरप्याजवळ देवरूख येथे चाळीस लाख रुपये खर्च करून पोपट तयार करण्याची आणखी एक वेद-पाठ-शाला बांधण्याचे काम चालू झाले आहे! ज्ञान मिळवण्याची केवढी ही धडपड! विचार करण्याची, ज्ञान तयार करण्याची जबाबदारी आमच्या समाजाने ब्राह्मणांवर हजारो वर्षे टाकली, व त्यामुळे इतर सर्व समाजाचे विचाराचे इंद्रियच खुरटले! व ज्या ब्राह्मणांवर ही जबाबदारी टाकली त्यांनी निर्बुद्ध पाठांतर म्हणजेच ज्ञान टिकवणे, विचार करणे, ज्ञान वाढवणे अशी समजूत करून घेतली! त्यांनीही विचाराचे इंद्रिय गमावले!

माझ्या माहितीच्या अनेक उच्चशिक्षित व्यक्तींचे सांसारिक निर्णय (मुलाचे-मुलीचे लग्न, गाडी घेणे, प्रवास करणे, ऑपरेशन करणे वगैरे) त्यांचे ‘गुरु’, घेत असतात. किती छान, नाही? माहिती मिळवायला नको, विचार करायला नको, सर्व जबाबदारी गुरूंवर टाकलेली! विचारांची जागा श्रद्धेने घेतली की मग आनंदमय जीवन!

क्षमता गमावलेल्या पेशी आजार–दुखापत यांतून पूर्ण दुरुस्त होत नाहीत व शरीर अपंग किंवा मृत होते. ज्या समाजातील बहुसंख्य व्यक्तींनी क्षमता गमावल्या आहेत, ज्या समाजातील स्टेम सेल्सचे प्रमाण लक्षात न येण्याइतके कमी झाले आहे, तो समाज संकटांना तोंड देऊ शकत नाही, विकासक्षम असत नाही. अंतर्गत कारणांनीच तो विनाशाकडे जातो, परचक्राची गरज नसते.
भारतीय समाजाप्रमाणे आत्यंतिक विशेषीकरण होणे हा काही सामाजिक उत्क्रांतीचा नैसर्गिक नियम नाही. इतर समाजांमध्ये असे झालेले नाही. आपल्याला माहिती असलेले समाज म्हणजे ब्रिटिश व उत्तर अमेरिकन शेतकरी पूर्वीपासूनच सर्व क्षमता राखून आहे. तो “जॅक ऑफ ऑल ट्रेडस्’ असतो. बहुधा त्याच्या तळघरात वर्कशॉप असते, लेथ असते. आपल्या उपकरणांची, घराची, बुटांची तो दुरुस्ती करू शकतो. त्यामुळे त्याचे निसर्ग-विषयक कुतूहल शिल्लक आहे, इतर व्यावसायिकांना तो चटकन् जोखू शकतो व तांत्रिक गोष्टी तो चटकन् उचलू शकतो. कोणीही कोणताही व्यवसाय करू शकतो. हतबल न होता, व्यवसाय पटकन् बदलू शकतो. स्वधर्मे निधन त्यांना पसंत नसते. त्यामुळे स्पर्धा सतत असते, व स्पर्धेमुळे सर्वच व्यावसायिकांना तांत्रिक सुधारणा करावी लागते, ज्ञान मिळवावे लागते, निर्माण करावे लागते.

चर्चिलने स्वतःचा पोहण्याचा तलाव अक्षरशः स्वतः बांधला. बरेचसे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आपली हत्यारे स्वतः तयार करत किंवा आपल्या कल्पनेप्रमाणे करवून घेत. विचार करण्याचे इंद्रिय शाबूत असल्याने धर्मगुरूंच्या प्रभावातून लवकर सुटका झाली, शास्त्र, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान सर्वच क्षेत्रांत प्रगती झाली. मॅग्ना–चार्टा सादर करण्याइतके समाजातील जबाबदार नागरिकांचे प्रमाण जास्त राहिले.

आजही भारतात जन्मणाऱ्या मुलांमध्ये सर्व क्षमता असतात. पण भारतीय संस्कृतीमुळे त्यांच्या बहुतेक सर्व क्षमतांचे खच्चीकरण होते. आत्मा व पुनर्जन्म सिद्धान्त, कर्म-सिद्धान्त, मोक्ष व आत्मज्ञान यांना ऐहिक प्रगतीपेक्षा जास्त महत्त्व देण्याची वृत्ती, जातिभेद व बलुतेदारी, ज्योतिष, पत्रिका, मुहूर्त, जपजाप्य, पूजा-अर्चा, मूर्तिपूजा यांवरील वि वास, पवित्र, अपवित्र–कल्पना ही भारतीय संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे यांमुळे मुलांच्या क्षमतांचा विकास होत नाही. भारतीय संस्कृतीमधील बऱ्याच गोष्टी मोडीत काढून तिच्यात अनेक नव्या मूल्यांचा समावेश केला तरच भारतीय नव्या पिढीचे विचारांचे इंद्रिय पुन्हा वाढू लागेल, गमावलेल्या क्षमता परत मिळतील व स्टेम सेल्सचे प्रमाण वाढेल.

त्यासाठी काय केले पाहिजे? ‘भारतीय संस्कृती’ बद्दलचा खोटा अभिमान, पूज्य भाव, श्रद्धा वगैरे काढून टाकून तिची कठोर तपशीलवार पुनर्तपासणी केली पाहिजे. गेली किमान दोन हजार वर्षे या संस्कृतीमुळे भारतीय समाज गरीब, दीन, परतंत्र व अज्ञानी राहिला आहे. संस्कृतीत जाणीवपूर्वक सुधारणा केली तरच हा समाज खऱ्या अर्थाने विकास साधू शकेल. संस्कृतीत काय सुधारणा करावयाच्या हे ठरवून शिक्षणाद्वारे त्या भारतीय समाजापर्यंत पोचवाव्या लागतील. त्या कशा पोचवायच्या?

आई-वडील व समाज यांच्याकडून मिळणारे अनौपचारिक शिक्षण आपण प्रथम बदलू शकत नाही, म्हणून आपल्याला शाळेत मिळणारे औपचारिक शिक्षण व प्रसार- माध्यमांद्वारे मिळणारे अनौपचारिक शिक्षण यांवर नवीन संस्कृती मुलांपर्यंत पोचवण्यासाठी अवलंबून राहावे लागेल. शालेय शिक्षणाचा हेतू आपल्या मनांत स्पष्ट असला पाहिजे—-आपल्याला विचारशक्ती नसणारी, आज्ञाधारक, वयोवृद्धांना मान देणारी, गुरु, ग्रंथ व वरिष्ठ यांना प्रमाण मानणारी, “घोका व ओका’ यात प्रवीण असणारी मुले तयार करावयाची नसून, आपल्या पुढच्या समस्या ओळखून, समस्येमागची कारणपरंपरा शोधून, समस्या सोडवण्याचा मार्ग शोधून, त्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांची जडण घडण आपल्याला करावयाची आहे. त्यानुसार परीक्षापद्धती बदलल्यास—-म्हणजे स्मरणशक्ती तपासण्याऐवजी आकलनशक्ती, विचारशक्ती व समस्या सोडवण्याची शक्ती तपासणारी परीक्षा घेतल्यास शिक्षणक्षेत्रात लवकर बदल होतील—- त्याचबरोबर शाळांनाही अभ्यासक्रम निवडणे, पाठ्यपुस्तके निवडणे, शिक्षक निवडणे या बाबतींत पूर्ण स्वातंत्र्य द्यावे लागेल. प्रसार-माध्यमांकडेही उत्पन्नाचे एक साधन म्हणून न पाहता, शिक्षणामधील एक गुंतवणूक म्हणून पाहावे लागेल. पुरावा नसलेल्या कल्पित मूलतत्त्वांवर आधारलेली जुनी संस्कृती टाकून देऊन सत्य, वास्तव मूलतत्त्वांवर आधारलेली व पुराव्यावर आधारलेला कारण–कार्य–परिणाम–भाव स्वीकारणारी नवी भारतीय संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे.

२५, नागाळा पार्क, कोल्हापूर-४१६००३.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.