तंट्या भिल्लाचे इंग्रजांस पत्र

मे. हुजूर जनाब डिप्टी कमिशनर साहेब, निमाड इलाका,खंडवा.
अर्जदार तंट्या वलद भावसिंग भील, रा. पोखर, जि. निमाड सरकार चरणी अर्ज पेश करतो, की सरकार आम्हा गरिबाच्या जिवावर उठले आहे. जंगलातल्या लोकांना हुसकावून लावण्याचा सरकारचा इरादा चांगला नाही. आतापर्यंत कोणत्याही मायबाप सरकारनी डोंगरातल्या आम्हा लोकांना हात लावला नाही, की त्यांची खोड काढली नाही. होळकर सरकार, असीरगड–बु-हाणपूरच्या सरकार आणि इतर रियासतीने या जंगलातल्या माणसाला सांभाळून घेतले आहे. मग गोऱ्या सरकारलाच ह्या जंगलाच्या वाट्याला का जावे वाटले? आतापर्यंत पाटील, पटवारी, सावकारांनी ह्या आम्हा लोकांना पिळले–लुबाडले; पण अडचणीच्या वेळी त्यांनीच मदतही केली आहे; परंतु आता तुमच्या हुकुमावरून त्यांनी जास्ती पिळवणूक सुरू केली आहे. हे सगळे थांबावे, म्हणून हा तंट्या तुम्हाला–मायबाप सरकारला अर्ज करतो आहे.
मायबाप सरकारने या उपरही ऐकले नाही, तर ह्या निमाडच्या डोंगर–जंगलातली माणसे तुम्हाला इंगा दाखविल्याबिगर राहणार नाहीत. आणि होणाऱ्या परिणामाची सगळी जिम्मेदारी तुमची समजावी. याकरिता हा अर्ज सरकारच्या पायी सादर करीत आहे.
अर्जदार तंट्या वलद भावसिंग भील, जंगलाचा राजा,हल्ली मुक्काम सिवना. निशाणी अंगठा

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.