संपादकीय

सप्टेंबर अंकामध्ये डॉ. उषा गडकरी ह्यांचा डॉ. सत्यरंजन साठे ह्यांच्या लेखावर तीव्र टीका करणारा लेख प्रकाशित झाला. त्याला डॉ. साठे ह्यांजकडून उत्तर दिले गेलेच आहे. ते उत्तर व्यक्तिशः दिले गेले आहे. पण ह्या प्रकरणी विवेकवादी नियतकालिकाची भूमिका विशद करण्यासाठी लिहीत आहे.
त्याच अंकामध्ये श्री. गंगाधर गलांडे ह्यांचे एक पत्र प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये त्यांनी काही प्र न उपस्थित केले आहेत. त्यांना उत्तरे देण्याचा कार्यकारी संपादकांनी प्रयत्न केला आहे. त्या उत्तरांनी श्री. गलांड्यांचे समाधान झालेले नाही. डॉ. गडकरींचेही डॉ. साठ्यांच्या लेखाने समाधान झाले नसावे. आमचे विवेकवाद म्हणजे काय ह्याविषयीचे प्रतिपादन त्याचप्रमाणे विवेकवादाची भूमिका गेल्या बारा वर्षांत सांगून-मांडून झालेली आहे. ती काही प्रमाणात सिद्धान्तवजा आहे. प्रत्येक महत्त्वाच्या घटनेच्या वेळी विवेकवादाचा अनुप्रयोग (application) कसा करावा हा भाग अजून पुरेसा हाताळला गेला नाही. तेवढ्यासाठी हा विषय आज पुन्हा उकरून काढीत आहोत. त्यासाठी थोडा इतिहास पाहू.
आमच्या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. ते अंदाजे हजार वर्षांपासून तसे राहत आले आहेत. केरळमध्ये राहावयास आलेले सीरियन ख्रिस्ती आणि मुंबईच्या जवळपास राहणारे बेने इस्रायल हे यहुदी त्याही पूर्वीपासून येथे आले असावेत. केरळमधले यहुदी आणि ख्रिस्ती भारतात कधी आले ते नक्की माहीत नाही. १९६१ साली तेथल्या २.२ कोटींच्या एकूण लोकसंख्येमध्ये २६ लाख ख्रिस्ती होते. हे बहुतेक सगळे ख्रिस्ती तेथले राज्यकर्ते ख्रिस्ती नसताना झाले आहेत. तसेच तेथे त्याच वेळी असलेल्या सुन्नी मुसलमानांची संख्या ३० लाखांवर होती. ही मुसलमान धर्माची प्रजा देखील हिंदु राजांच्या अंमलाखालील प्रजा होय. भारतातील बाकीच्या प्रदेशांतील धर्मान्तरित प्रजा त्या त्या धर्माच्या राज्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे झालेली आहे. केरळात तसे घडल्याचे दिसत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे धर्मान्तरितांचे प्रमाण नगण्य आहे. मुसलमानांचे धर्मान्तरण जवळ-जवळ थांबले आहे. ख्रिस्त्यांचे चालू आहे. आणि ते पुष्कळसे अशिक्षितांमध्ये आणि फार क्वचित् अल्पशिक्षितांमध्ये आहे. आपल्या देशातली बहुतेक सारी धर्मान्तरे नीच जातीमधून उच्च जातीत शिरण्यासाठी असलेला एकमेव उपलब्ध मार्ग म्हणून झाली असण्याची शक्यता आहे. ज्यांना आम्ही हिंदुधर्माचे पंथ म्हणतो अशा पंथांचेहि प्रवर्तन जातींमधील उच्चनीचभाव नष्ट करण्यासाठीच प्रामुख्याने झाले असे मानण्यास पुष्कळ जागा आहे. आपला पूर्वीचा पंथ सोडून देऊन शीख, लिंगायत, आर्यसमाजी इतकेच नव्हे तर जैन आणि बौद्ध बनण्यामागची प्रेरणा मला आपल्या जातीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा हीच मुख्यत्वे दिसते.
जातीमुळे काहींच्या ठिकाणी स्पृश्यास्पृश्य-भाव निर्माण होतो इतकेच नाही तर तुम्ही कोणत्या आर्थिक गटात पडणार हेही कोणत्या जातीत तुमचा जन्म झाला त्यामुळेच ठरते.
जातींच्या आणि धर्मांच्या बाबतीत आमचे जे सामुदायिक वर्तन घडते ते पूर्णपणे उपार्जित (acquired) आहे. आमचा धर्माविषयीचा अभिमान, आमचे जातींविषयीचे पूर्व-ग्रह हे सारे आम्ही आमच्या बाळपणापासून निरनिराळ्या प्रसंगांतून, घरांतल्या वडीलधाऱ्यांच्या उद्गारांतून शिकत असतो. क्वचित् पुस्तकांतून वाचून आम्ही आमचे ग्रह बनवितो. आमचे बहुतेक सारे आमच्या देवाधर्माच्या विषयीचे ज्ञान आणि माहिती ही आम्ही इतरांकडून, स्वतः ती न तपासता स्वीकारतो. देवाधर्माविषयीचा अभिमान, त्याविषयीची आमची श्रद्धा सतत बलवत्तर होत जावी असा आमच्या समाजाचा म्हणजे ज्यांना समाजधुरीण म्हणतात त्यांचा प्रयत्न असतो. त्यांचे आयुष्य पूर्णपणे त्यांनी त्याप्रकारे घालविलेले असते आणि त्याच प्रकारे वागण्यात त्यांना सुरक्षित वाटते. आपल्या मुलांनी वेगळ्या वाटेने जावे हे त्यांना आवडत नाही. सर्व समाज त्या बाबतीत एका मताचा असतो. विवेकवादी ह्या परिस्थितीला शरण जाणाऱ्या वर्तनाला गतानुगतिकत्व असे म्हणतात. पूर्वजांचा आणि साहजिकच इतिहासातील आपल्या धर्माची थोरवी सिद्ध करणाऱ्या घटनांचा अभिमान बाळगणे, इतिहासाचा गौरव करणे, व्यक्तिपूजा करणे–एकचालकानुवर्तित्व मान्य करणे — परमेश्वरी कृपाप्रसाद होऊ शकतो आणि त्या प्रसादास काही अगदी मोजके लोकच पात्र असू शकतात असे समजणे– देवाच्या अनुग्रहाची कामना करणे — देवाचा अंश राजाच्या वा गुरूच्या किंवा दोघांच्याही ठिकाणी आहे असे समजून त्यांच्या ठायी पावित्र्याची कल्पना करणे किंवा त्यांच्या ठिकाणी दैवी शक्ती आहे, ती असतेच असे मानून केलेले वर्तन सर्वमान्य असते. कधी आम्ही स्थानमाहात्म्य ही मानतो. (असे मानल्यामुळे आमच्यासाठी काही विशिष्ट स्थाने अन्य स्थानांपेक्षा अधिक पवित्र ठरतात.) ज्याला कोठलाही पुरावा नाही, जी विधाने तपासून पाहण्याची सोय नाही ती आम्ही सत्य मानून चालतो. उदा. मृत्यूनंतरचे आत्म्याचे अस्तित्व. पूर्वजन्म –पुनर्जन्म–(जे धर्म ईश्वर मानत नाहीत तेसुद्धा पुनर्जन्माच्या तावडीतून सुटलेले नाहीत. उदा. बौद्ध धर्म. इस्लाम ‘कयामत का दिन’ मानतो ह्याचा अर्थच असा की त्याला शरीराबाहेरही आत्मा राहू शकतो हे मान्य आहे.) सगळ्या धर्मांची रचना जी तपासता येत नाहीत अश्या गृहीतकांवर झालेली आहे. अशा गृहीतकांना आप्तवचन असे म्हणण्याचा प्रघात आहे.
विवेकवादाला धर्माचे वावडे आहे कारण धर्म पूर्णपणे आप्तवाक्यावर आधारलेला आहे; त्यावर अवलंबून आहे आणि विवेक हा कधीही आप्तवाक्यप्रमाण मानू शकत नाही. आप्तवाक्याचे किंवा आप्तवचनाचे विवेकाला वावडे आहे. देवाचे अस्तित्व मान्य करण्यासाठी पुरेसा पुरावा मिळालेला नाही. तो (ईश्वर) देखील आप्तवचनाच्या आधारावरच मान्य करावा लागतो. त्याचे ज्ञान पंचज्ञानेन्द्रियांनी होणाऱ्या ज्ञानापेक्षा वेगळ्या पद्धतीने होते असा युक्तिवाद नेहमीच करण्यात येतो. पण ती पद्धतदेखील पूर्वसंस्कारांवरच ठरते असे लक्षात आले आहे. (येथे अमरावती जिल्ह्यातील माधानच्या गुलाबराव महाराजांचे उदाहरण अभ्यासण्यासारखे आहे. ते अगदी बाळपणी अंध झाले—- इतक्या लवकर की त्यांना जन्मांध म्हणावयास हरकत नाही—-तरी त्यांच्या ठिकाणी डोळसांना दिपवून टाकणारी विद्वत्ता होती. त्यांनी पुष्कळ ग्रंथ लिहिले. अध्यात्माच्या क्षेत्रात त्यांचा अधिकार मोठा मानला जातो. त्यांना चर्मचक्षु नव्हते. त्यांना दिव्यदृष्टि होती असे मानत आणि म्हणून त्यांना प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज असे म्हणत. इतके सारे असून त्यांना फक्त मराठी आणि संस्कृत ह्या दोनच भाषा येत. त्यांच्या दिव्यदृष्टीची कक्षा चिनी, जपानी, फ्रेन्च, जर्मन, ग्रीक, लॅटिन आणि इंग्लिश पर्यंत पोचल्याचे दिसत नाही. त्या भाषांमधून उपलब्ध असलेले तत्त्वज्ञान त्यांना ‘परिचित’ नव्हते. परमेश्वरी कृपेमुळे जर त्यांना दिव्यदृष्टि प्राप्त झाली असेल तर परमेश्वराने त्यांना स्थानिक भाषांच्या पलीकडच्या भाषांतील ज्ञानापासून वंचित का ठेवले असा प्र न आमच्यासारख्या जिज्ञासूंच्या मनांत नेहमीच निर्माण होतो. त्या प्र नाचे उत्तर त्यांच्या आसपासच्या मंडळीत त्या भाषा वाचू शकणारे वा जाणणारे कोणी नव्हते– असे द्यावे लागते. त्यांनी डोळ्यांनी जे ज्ञान मिळवावयाचे ते कानांनी प्राप्त केले होते ह्या निष्कर्षाला आम्ही येतो.) आपले परमेश्वराविषयीचे ज्ञान-जे पंचज्ञानेन्द्रियांच्या पलीकडचे आहे असे म्हणतात–तेसुद्धा ते जे इतरांकडून शिकले त्या पलीकडे जात नाहीत. ज्याला साक्षात्कार म्हणतात तो सर्वांना का बरे होऊ शकत नाही? परमेश्वर जर परमदयाळु आहे तर तो सर्वांवर सारखी कृपा का करीत नाही असे प्र न आम्हाला पडतात. हे प्र न आम्हाला सतावतात कारण आम्ही आप्तवाक्य मान्य करीत नाही.
वर वर्णन केलेल्या परिस्थितीचा परिणाम असा होतो की भाविक आणि श्रद्धाळु एका बाजूला पडतात आणि आम्ही विवेकवादी दुसऱ्या बाजूला. त्यांच्यामध्ये एक अनुल्लंघ्य दरी निर्माण होते. आता पुन्हा मूळ मुद्याकडे येतो.
मूळ मुद्दा असा की हिंदूंचे हित विवेकवादी म्हणविणाऱ्यांना समजत नाही अशी हिंदुधर्माभिमान्यांना खात्री आहे. हिंदूंवर मुसलमानांकडून सातत्याने होणारे अन्याय धर्मनिरपेक्ष म्हणिवणाऱ्यांना जाणवत नाहीत असा आम्हावर आरोप आहे.
विवेकवाद्यांच्या मतें धर्म हा आप्तवाक्यावर म्हणजेच श्रद्धेवर आणि श्रद्धा संस्कारांवर–इंग्रजी शब्द वापरावयाचा झाला तर Conditioning of Mind वर अवलंबून असल्यामुळे तो विवेकवाद्यांना नको असतो. ते ‘धर्म’शून्य आयुष्य घालवावे अशा मताचे असतात. म्हणजे त्यांना सदाचाराचे महत्त्व नसते असे नाही. धर्म ह्या शब्दाचे जे अनेक अर्थ आहेत त्यांपैकी एक सदाचरण, कर्तव्यभावना असा आहे. त्या अर्थाने ‘धर्म’ आम्हाला नको असे नाही. कर्तव्यभावना आणि सदाचरण याशिवाय मानवी जीवन चालणे अशक्य आहे असे आम्हाला वाटते. त्याचप्रमाणे जो पारखून पाहता येत नाही, जो परलोकाशी संबंधित आहे अथवा गूढ अशा अध्यात्माची चर्चा करतो, ज्याच्याविषयीच्या संकल्पना देशकालाप्रमाणे बदलतात तो religion किंवा faith असे आम्ही समजतो. हा धर्म (religion) उपार्जित असल्याकारणानेच देशकालाप्रमाणे बदलतो आणि ह्याचाच अभिमान वाटू शकतो. (गर्व से कहो हम हिंदू हैं!) कर्तव्यभावना आणि सदाचरण ही तत्त्वे सर्वत्र समान असल्यामुळे त्यांच्यामध्ये अभिमानास्पद असे काही असण्याचे कारण नाही.
आम्ही इस्लामचा वा हिंदुत्वाचा अभिमान जोपर्यंत बाळगत राहू तोपर्यंत हिंदू मुसलमानांचे दंगे चालत राहणार. तो आभिमान घालवावयाचा असेल तर आम्हाला आमच्या मनावरचे संस्कार हटवावे लागतील. आम्हाला इतिहास विसरावा लागेल. इतिहासा-पासून प्रेरणा घेणे थांबवावे लागेल. आम्ही जे शिकलो आहोत ते सगळे मनातून घालवून टाकावे लागेल, पुसावे लागेल.
आम्ही शिकण्याच्या learning आणि शिकवण्याच्या teaching पद्धती अवगत करून घेतल्या आहेत. ते पुसून टाकण्याच्या unlearning च्या पद्धती शोधून काढाव्या लागतील. एक विसरणे म्हणजे दुसरे शिकणे नव्हे. —- दिवाकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.