धिस फिशर्ड लँड : लेख ६

जाती आणि निसर्गाचे दोहन

भारताच्या सर्वच भागांमध्ये संकलक जीवनशैलीला ‘संपवून’ स्थिर शेतीची शैली घडली नाही. गंगेच्या तीरावर पुरांचा धोका, पूर्व घाट आणि सह्याद्रीच्या आसपास समतल जमिनीचा अभाव, तराई भाग डासांनी आणि दलदलींनी ग्रस्त, काही क्षेत्रांत पाऊस बिनभरवशाचा, अशा अनेक अडचणींमुळे या ‘कठिण’ क्षेत्रांमध्ये संकलन-पशुपालन करणारे समाज तगून राहिले. इतर भागांत मात्र शेती स्थिरावली.
शेतीचा प्रसार होत असताना संसाधनांच्या वापरात ‘शहाणपण’ खूपसे ‘वरून’ येत असे. जैन आणि बौद्ध धर्मांच्या अहिंसेला राजाश्रय मिळत होता. नव्याने संकलनाकडून शेतीत येणाऱ्यांना निसर्गावर आघात न करता जगण्याची सवय होतीच. हत्तींच्या पैदाशीसाठी वने राखली जात होती. अशा अनेक कारणांमुळे खांडववन जाळण्यासारखी निसर्गावर आघात करणारी वृत्ती मंदावत होती.
पण इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत हे चित्र बदलत गेले. या काळात हवामान काहीसे कोरडे होते आणि खतांचा वापर कमी असल्याने जमिनीचा कस उतरत होता असे मानायला पुरावे आहेत, पण ते निर्णायक स्वरूपाचे नाहीत. निदान काही क्षेत्रांत तरी शेतकरी लोकसंख्येची दाटी वाढली, असे मानायला जागा आहे. कानपुराजवळ गुप्तकाळाच्या आधीच्या हजारेक वर्षांत दर चौरस किलोमीटरातील वस्ती २.३५ माणसांवरून १२.८२ वर गेली (माणशी जमिनीची उपलब्धता ४२.५ हेक्टरांवरून ७.८ इतकी कमी झाली). हेक्टरी उत्पादकता घटती
आणि माणसांची दाटी वाढती अशा एका संपृक्त, कुंठित अवस्थेत भारतीय समाज पोचला.
समाजाचा प्रमुख भाग जातींमध्ये विभागलेला होता, आणि त्यांच्याशी देवघेव करत जगणारे संकलक पशुपालक जमातींमध्ये वाटलेले होते. या दोन्ही एककांमध्ये गटांतर्गत न्यायदान जातपंचायती करीत, आणि दोन्हीकडे सीमारेषा रोटीबेटीव्यवहाराने आखलेल्या असत. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचे फरक आहेत. जमातीच्या भूक्षेत्रात इतर जमातींना शिरकाव नसतो. जातींमध्ये मात्र भूक्षेत्र मर्यादित असले तरी एका क्षेत्रात अनेक जाती राहतात. या एका क्षेत्रातील जातींमध्ये पेशेवार परस्परावलंबनाचे सूत्र असते. जमाती मात्र श्रमविभाजन न करताच जगतात. जातिव्यवस्थेचे भौगोलिक एकक गाव किंवा खेडे हे असते, टोळी नव्हे. सुटी जात तगत नाही, जमात तगते.
जातींचे न्यायनिवाडे जात-पंचायती करतात आणि दोन जातींमधले गावातले वाद गाव-पंचायत सोडवते. या साऱ्यांचे गरजेपलिकडचे अतिरिक्त उत्पादन भोगणारे ‘सरकार’ही गावाच्या अंतर्गत वादांमध्ये पडत नाही व नसे. पण मुळात चौथ्या ते दहाव्या (इसवी) शतकांमध्ये अतिरिक्त उत्पन्नच क्षीण होते, आणि यामुळे व्यापार आणि नागरीकरणही मंदावलेलेच होते.
निसर्गातली संसाधने वापरण्याबद्दल जातींप्रमाणे विभागलेले हक्क असत. कर्नाटकातील एका नदीच्या मुखाजवळील मसूर-लुक्केरी बेटाचे उदाहरण हे स्पष्ट करते. या चार चौरस किलोमीटरच्या बेटावर तेरा जाती राहतात. या जाती मच्छीमारी, शेती, बागा, कलावंत-करमणूक, सेवा (न्हावी, धोबी इ.), कारागिरी (सोनार, लोहार इ.) आणि व्यापार, अशा सात गटांमध्ये विभागता येतात. यापैकी बागांवर उत्पन्न कमावणारी हविक (ब्राह्मण) जात वगळता सर्व जाती मांस-मासे खातात, पण तीन जाती शिकार-मच्छीमारी करत नाहीत. उरलेल्या नऊ जातींपैकी एकीलाच जाळ्यांनी मासे पकडायचा हक्क आहे, आणि दुसऱ्या एकीलाच उजेडाने माशांना आकृष्ट करून पकडायची परवानगी आहे. हे ‘विशेषीकरण’ अशा थराला जाते की चटया विणणाऱ्या दोन जातीही वेगवेगळ्या वनस्पतींपासून चटया बनवतात.
स्थिरावलेल्या शेतीशैलीत बहुसंख्य जाती गावांत वसलेल्या असतात, पण काही जाती अंशकाळ किंवा पूर्णकाळ भटकतही असतात. अशा जातींच्या शिकारीच्या तंत्रांमध्ये, सावजांमध्ये आणि भटकण्याच्या क्षेत्रांमध्येही नियमन केले जाते.
जसे, गावांच्या हद्दीतल्या बिगरशेती जमिनींवर शिकार करण्याचे हक्क प िचम महाराष्ट्रात तीन जातींना दिले गेले आहेत. यापैकी तिरुमल नंदीवाले नंदी ‘फिरवणे’ आणि फुटकळ व्यापारही करतात. कुटुंबामागे पाचेक शिकारी कुत्रे पाळून ते तरस, रानमांजर, रानडुक्कर, अशा ‘मोठ्या’ सावजांची शिकार करतात. जडीबुटी विकणारे वैदू कुत्रे कमी पाळतात, आणि सापळे लावून ऊदमांजर, मुंगूस, पाळीव मांजरे(!) वगैरेंची शिकार करतात. तिरुमल नंदीवाल्यांचा अर्ध्यावर मांसाहार मोठ्या सावजांवर चालतो तर वैदूंचा अर्धाएक मांसाहार लहान जनावरांवर. दोन्ही जाती पंधरा ते पंचवीस टक्के मांस माशांपासून कमावतात. तिसरी फासेपारध्यांची जात मात्र पाऊण भाग हरणे काळविटांना फासांनी पकडून कमावतात आणि जलचरांना खात नाहीत.
भूभागाचे नियमन नंदीवाल्यांच्या बाबतीत दिसते. तिरुमल आणि फुलमाळी या दोन्ही उपजाती आंध्रातून आल्या, तिरुमल आठेकशे वर्षांपूर्वी, तर फुलमाळी तीनेकशे वर्षांपूर्वी. तिरुमल नंदीवाले पुणे जिल्ह्यातल्या वाडापुरी गावात पावसाळा काढतात आणि इतर वेळी ठाणे, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि या जिल्ह्यांच्या दक्षिणेच्या जिल्ह्यांमध्ये वावरतात. फुलमाळी नंदीवाले नाशिक, नगर, बीड, परभणी, यवतमाळ आणि त्यांच्या उत्तरेकडच्या भागातच वावरतात. या परंपरांमुळे सारख्याच कौशल्यांच्या जातींमधली स्पर्धा तर टाळली जातेच, पण निसर्गाचे दोहनही सौम्य होते.
आजच्या या परंपरा पहिल्या इसवी सहस्रकाच्या काळापासूनच्या परंपरांच्या ‘वारस’ आहेत! आमच्या (गाडगीळ–गुहांच्या) मते हा परंपरांचा संच भारतीय समाजाच्या निसर्गाशी अनुरूप होण्याच्या सांस्कृतिक प्रयत्नांमधून घडलेला आहे. इसवी सनाच्या चौथ्या ते दहाव्या दशकात घडलेल्या आणि रेखीव झालेल्या जातिव्यवस्थेचा हा परिपाक आहे. त्या काळात जैन व बौद्ध धर्मांचा प्रभाव मंदावून बौद्ध धर्म भारताबाहेर ढकलला गेला. शेतकऱ्यांचे पंचमहाभूतांवर आधारलेले देव आणि स्थानिक झाडे-डोंगर दऱ्यांचे देव यांची सरमिसळ झाली. शिवाच्या रूपात लिंगपूजा, नंदीवर बसलेला पशुपतिनाथ, हत्तीचे गणपती हे रूप, मातृदेवतेचे पार्वती हे रूप आणि यांच्या अनेक स्थानिक आवृत्त्या घडल्या. बळी, यज्ञ, हे मंदावलेल्या रूपात तगून राहिले.
नंतर यात भक्तिसंप्रदायाचीही भर पडली. देवराया, देवटाकी, पिंपळ-वड-उंबर आणि माकडांची पूजा, अशा साऱ्यांतून निसर्ग-दोहनाचे नियमन होऊ लागले. काही जातींना (बैगा, आगारिया) शेती करण्यास मनाई होती. फासेपारध्यांना गर्भवती हरिणी मारता येत नसत. या साऱ्याला जरी धार्मिक रूप दिले जाई तरी मुळात या सामाजिक रूढी किंवा परंपराच होत्या. यांचा एकत्रित परिणाम असा की जातींची तुलना जीवशास्त्रीय जीवजातींशी करता येते. अर्थात, जीवजातींमध्ये एकमेकांपासून प्रजोत्पादन होत नाही, तर मानवी जातींमध्ये आंतरविवाह प्रजोत्पादक असतात हा फार महत्त्वाचा फरक गौतम बुद्धाने नोंदला आहेच. साम्यस्थळ हे, की प्रत्येक जीवजातीचा गरजांचा, आहाराचा असा एक स्वतंत्र कोनाडा (niche) असतो, आणि भारतीय जातिव्यवस्थेने असे एकमेकांवर अतिक्रमण न करणारे संसाधनांचे कोनाडे दरेक जातीला नेमून दिले.
निसर्गात लहानलहान कोनाडे (संसाधनांचे छोटे छोटे संच) कसे घडतात याचा अभ्यास झाला आहे. वृत्तीय परिसरांमध्ये असा छोट्या कोनाड्यांचा प्रकार बहुप्रसव आणि काळासोबत न बदलणाऱ्या जीवजातींमध्ये प्रामुख्याने आढळतो. जातींनी बांधल्या गेलेल्या भारतीय समाजातही शतकानुशतके बांबूपासून विणकाम करत जगणारे बुरूड किंवा ताडाच्या झाडांपासून ताडी करणारे भंडारी अशा जाती घडल्या. प्रत्येक जात एका ‘विशेषज्ञ’तेच्या आत्यंतिक पातळीला पोचलेली, आणि काळासोबत नगण्य प्रमाणात बदलणारी, अशी झाली. आणि अशा थोडक्याच संसाधनांवर जगणाऱ्या आणि संख्येने लहान पण सांस्कृतिक अंगाने ‘घट्ट’ विणीच्या जाती निसर्गाचा संयमी वापर करतात.
मुसलमानांच्या आगमनापर्यंत भारतात ही कमी व्यापाराची गावे आणि गावसमूह ‘आपापल्यापुरती’ संसाधने वापरणारी, ग्रामीण पाया असलेली, लहान लहान ‘राज्यांमध्ये विभागलेली स्थिती रुजली. अशी स्थिती बदलायला हवामान तरी सुधारावे लागते, तंत्रज्ञान (विशेषतः वाहतुकीची तंत्रे) तरी सुधारावे लागते, नाहीतर खूप भूभागातून थोडेसेच अतिरिक्त उत्पादन ‘काबीज’ करणारी साम्राज्ये तरी घडावी लागतात. भारतात हवामान सुधारल्याचा ठोस पुरावा नाही. तंत्रे आणि दमनशक्ती वाढली, हे मात्र निर्विवाद.
इसवी ९०० ते १२०० या काळात तामिळनाडूत देवळांना केंद्रस्थान देऊन सिंचन तलाव घडले. हे तंत्रज्ञान वापरून ब्राह्मणांनी देवस्थानाच्या जमिनी कमावल्या. घोडेस्वारी, दारुगोळा वगैरे तंत्रे वायव्येकडून भारतात आली. चोला, विजयनगर आणि मुगल साम्राज्ये घडली.
ही साम्राज्ये करभाराच्या रूपाने अतिरिक्त उत्पन्ने ‘साठवू’ लागली. मुगलांच्या करांच्या रचनेचे बरेच तपशील उपलब्ध आहेत. मुख्य भर धान्याच्या उत्पादनावर असे, आणि थोडासा जनावरांवरील कराच्या रूपात असे. फळबागा, मासेमारी, मेंढीपालन आणि वनांची उत्पादने संपूर्णपणे करमुक्त असत. काश्मीरच्या मुगल सुभेदाराने मेंढ्यांवर कर लावताच तीव्र विरोध झाला. अनेक उपयोग असलेली खेजडीची झाडे राजस्थानात बिष्णोई या जातीच्या संरक्षणात असतात. लोणारी कोळशासाठी ही झाडे तोडायचा प्रयत्न १६५० या सुमारास जोधपूरच्या राजाने केला, तेव्हाही बिष्णोईंनी आपले प्राण गमावून झाडे राखायचा प्रयत्न केला. म्हणजे जातिव्यवस्थेने दिलेली संयमी निसर्ग-दोहनाची शिकवण मुगलांनीही कायम ठेवली. जगभर जुन्या जीवनशैलीच्या विनाशातूनच नव्या जीवनशैली प्रस्थापित झाल्या. भारतात मात्र जुन्या जीवनशैलींना सामावून घेत आणि जातिव्यवस्थेत स्थान देत शेती स्थिरावली. एकेश्वरी धर्मांमध्ये शक्य नसलेली ही घटना समावेशक हिंदू धर्मात घडली. भूतकाळापर्यंत हे हिंदूंचे सहिष्णु रूप दिसत असे—-आता हे बदलत आहे.
[t sted dere “Hinduism has (at least until recently) relied more heavily on inclusive Framework that tries to incorporate rather than reject or convert apparrently hostile sects and world views’ याचे लघुरूप आहे.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.