तंट्याच्या पत्राबाबत

‘तंट्या’ या बाबा भांडांच्या कादंबरीत (साकेत, २०००) कधीतरी १८७९ मध्ये तंट्या भिल्लाने निमाडच्या डेप्युटी कमिशनरला लिहिलेले एक पत्र भेटले.
गाडगीळ-गुहा यांचे ‘धिस फिशर्ड लँड’ पुस्तक नोंदते की इंग्रजांपूर्वीचे राजे जंगलांकडे बहुतांशी दुर्लक्षच करत असत आणि ही स्थिती इंग्रजांच्या आगमनानंतर बदलली. तंट्याचे पत्र नेमका हाच मुद्दा नोंदते, म्हणून भांडांना पत्र पाठवून पत्राची जास्त माहिती विचारली. त्यांच्या उत्तराचा संलग्न भाग असा —- “तंट्यासंबंधीचे मूळ दस्तावेज धुंडाळीत असताना निमाडच्या असिस्टंट डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडंट ऑफ पोलिसची टिपणी सापडली आहे. ती एच. पी. स्किपटन् यांनी तंट्यासंबंधीची माहिती जमवून तयार केली होती. त्याचे नाव Narrative of the Career of Tantya Bhil, Compiled from the records in the Nimar Police Office by H.P.K. Skipton असे आहे. या छापील टिपणीत तंट्याचे पूर्वायुष्य, त्याचा मालगुजारांशी झगडा, त्याची तुरुंगात रवानगी, यशोदेच्या संबंधाने त्याच्यावर घेतलेला आरोप, त्याचे खांडवा जेलमधून पलायन हे सगळे संदर्भ आहेत.
या टिपणीच्या ५ व्या परिच्छेदात पुढील मजकूर आहे. The three fugitives wandered about the country for four months, living partly by plunder and partly on the charity of their friends. Nana Chamar of Sampura gave them a sword and a knife, and made them shoes. From Siuna village in Indore territory, Tantya sent a message of insolent defiance to the Deputy Commissioner of Nimar. यातील शेवटच्या वाक्यात शिवना गावातून, जे इंदोर मुलुखात होते, तंट्याने पोलिसास न जुमानणाऱ्या, अपमान करणाऱ्या भाषेत निरोप पाठविला, असा संदर्भ आहे. तंट्याचा message मी पत्ररूपाने ललित लेखनात करून घेतला आहे.
मूळ दस्तावेजाची छायाप्रत संदर्भासाठी पाठवीत आहे. त्यावरून आपणांस कल्पना येईलच.”
तंट्याच्या ‘इन्सोलंट डिफायन्स’ चा सूर आणि त्याचे नेमके दुःख व इंग्रजांवरचा रोष जाणवून नोंदल्याबद्दल भांडांचे कौतुक करायला हवे! एकूणच सामाजिक-ऐतिहासिक-आर्थिक संदर्भ तपासून त्यांना ललित अंगाने मांडणारी ही चरित्रात्मक कादंबरी महत्त्वाची आणि वाचनीय आहे.
धिस फिशर्ड लँड’ च्या संक्षिप्त भाषांतराची लेखमाला आता तंट्या-राजाच्या निमाड जंगलात शिरत आहे! —- संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.