मानवताशून्य मूलतत्त्ववादाकडून नव्या राष्ट्रवादाकडे!

“गुजरातचा प्रयोग हा अत्यंत यशस्वी प्रयोग असून आम्हाला त्याची पुनरावृत्ती भारतभर करावयाची आहे”, अशा आशयाचे उद्गार विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. अशोक सिंघल यांनी काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. (इंडियन एक्सप्रेस/५ सप्टें. ०२) यावेळी ते पुढे म्हणाले की, “गेल्या एक हजार वर्षांच्या इतिहासात हिंदूंनी दिलेली ही पहिली सकारात्मक प्रतिक्रिया आहे. २७ तारखेला गोध्रा घडले आणि दुसऱ्या दिवशी ५० लाख हिंदू रस्त्यावर होते.” गुजरातमधील गावागावांतून मुस्लिमांना हाकलून त्यांना शरणार्थी शिबिरात दाखल करण्यात आले, याचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. केंद्रामध्ये भाजपचे सरकार नसते तर गुजरातमधील अमानुष हत्याकांडाचा गौरव करण्याचे धैर्य अशोक सिंघल यांनी दाखवले असते असे वाटत नाही. परंतु प्र न तो नाही. स्वतःला हिंदूधर्माचा प्रवक्त म्हणवून घेणाऱ्या संघपरिवाराला तसा अधिकार कोणी दिला? आणि १९२५ पासून हिंदू संघटन करणाऱ्या संघपरिवाराला खरे हिंदुत्व अद्याप उमगले आहे का, हा खरा प्र न आहे.
संघपरिवार स्वतःला राष्ट्रवादी म्हणवितो परंतु त्याच्या प्रत्यक्ष कृतीने मात्र भारतीय समाजाचा एकजिनसीपणा नाहीसा होतो. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यकांमध्ये अलगतेची, वेगळेपणाची भावना जिवंत ठेवण्याचे श्रेय बहुतांशी संघपरिवाराला आहे. मुस्लिम समाजामध्ये समाजसुधारणा आणि धर्मचिकित्सा याचे प्रमाण हिंदूंच्या तुलनेत अत्यल्प आहे. परंतु हमीद दलवाई, डॉ. रफिक झकेरिया, असगर अली इंजिनिअर, सय्यदभाई, मशरुल हसन यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी मुसलमान आपली ताकद एकवटतो आहे. ११ सप्टेंबरच्या घटनेनंतर दिल्लीतील जामा मशिदीच्या धर्मगुरूंनी सर्व मुसलमानांना अमेरिकेच्या विरुद्ध एक होण्याचे आवाहन केले आणि पर्यायाने ओसामा बिन लादेनला समर्थन दिले. त्यावेळी या मुस्लिम धर्मगुरूंना उघड विरोध करण्याचे धैर्य मशरुल हसन यांनी दाखविले. शबाना आझमीनेही ते दाखविले. मुस्लिम धर्मगुरूंनी तिची संभावना ‘नाचने गानेवाली लडकी’ अशी केली. हसन यांनी आपल्या वृत्तपत्रीय लिखाणातून धर्मगुरूंचा कडक समाचार घेतला. या साऱ्या घटना म्हणजे मुस्लिम समाजात उमटणारी आधुनिकतेची प्रसादचिन्हे आहेत. परंतु गुजरातमधील घटनेने आणि त्यानंतर तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या वक्तव्याने ही प्रसादचिन्हे पुसली जाण्याची भीती निर्माण केली आहे. आणि पुरोगामी मुसलमानांना अल्पसंख्यकांमधील अल्पसंख्यक बनवून एकाकी पाडण्याचे क्रांतिकारक कार्य संघपरिवाराने केले आहे. या संदर्भात स. ह. देशपांडे यांचे मत विचार करण्याजोगे आहे. ‘धार्मिक प्रतीकांचा धोका’ या उपशीर्षकाखाली ते लिहितात, “धार्मिक अभिमान क्रिया प्रतिक्रियात्मक असतो. मुसलमानांचा कडवेपणा हिंदूंमध्ये कडवेपणा निर्माण करतो. हिंदूंचा धार्मिक कडवेपणा वाढला तर मुसलमान अधिक कडवे होतील, हेही खरे आहे. तरीही धार्मिक प्रतीके वापरण्याकडे हिंदुत्ववाद्यांचा ओढा आहेच. याचे एक कारण असे की, मुसलमानांचा धर्माभिमान त्यांना बळ देतो म्हणून आपणही तसेच करायला हवे, असे त्यांना वाटते, हे योग्य नाही.” (सावरकर ते भाजप–हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख–स. ह. देशपांडे/पृष्ठ २१२) या निकषावर रामजन्मभूमीचे अवघे आंदोलनच चुकीचे ठरते, हे वेगळे सांगायला नको. १९९२ मधील मुंबईची दंगल आणि आताचे गुजरातचे हत्याकांड रामजन्मभूमी प्र नाचे दुर्देवी परिणाम आहेत. ‘हिंदू’ कोणाला म्हणावयाचे?
मुसलमानांना विरोध हा साऱ्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा केंद्रबिंदू आहे. परंतु प्रत्यक्ष हिंदू धर्मातील जळते वास्तव हिंदुत्ववाद्यांनी नेहमीच दुर्लक्षिले आहे. गेल्या पंचाहत्तर वर्षांत ‘हिंदू’ या शब्दाची निःसंदिग्ध, सर्वांना पटेल अशी, व्याख्या करण्यात त्यांना अपयश आले आहे. आणि त्यामुळे आज खरा हिंदू कोण याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे. हिंदू धर्मातील आत्यंतिक जातीयवादामुळे बहुजन समाज ‘हिंदू’ या नावापेक्षा जातीच्या नावावर लवकर एकत्र येतो. इथल्या बहुजन समाजाला हिंदू धर्माने जी वागणूक दिली त्यामुळे बहुजन समाजाच्या मनात हिंदू धर्माबद्दल नावड उत्पन्न झाली आहे. नुकतीच मराठा सेवा संघाने आपण हिंदू धर्म सोडत असल्याची घोषणा केली आहे. ‘गुलामी लादणाऱ्यांचा आणि गुलामांचा धर्म एक असू शकत नाही’, असे ठणकावून सांगत समाजातील एक मोठा गट मराठ्यांच्या रूपाने हिंदू धर्मातून बाहेर पडत आहे. ‘शिवधर्म’ या नव्या धर्माची स्थापना २००५ सालापर्यन्त करण्यात येणार आहे. डॉ. आ. ह. साळुखे या धर्माची तत्त्वज्ञानात्मक बाजू सांभाळणार आहेत. दुसरीकडे एस्.सी., एस्.टी., ओ.बी.सी. आणि अल्पसंख्यक यांना एकत्र बांधणारी बहुजन समाजाची चळवळ स्वतःला हिंदू म्हणवून घेणे नाकारते आहे. त्यांच्या मते हिंदुधर्म हा मूठभर ब्राह्मणांचा ब्राह्मणी धर्म आहे. आपले अल्पसंख्यकत्व झाकण्यासाठी ब्राह्मणी धर्म ‘हिंदू’ नावाचे पांघरूण घेतो आहे, असे त्यांचे म्हणणे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले ते इंग्रजांच्या गुलामगिरीतून परंतु ब्राह्मणी व्यवस्थेच्या आणि ब्राह्मणी धर्माच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बहुजन समाज नवनवी आंदोलने उभारतो आहे.
आजवर मुसलमान परकीय, आक्रमक असे उच्चरवाने सांगत ब्राह्मणी व्यवस्थेने बहुजनांना मुसलमानांविरुद्ध लढविले परंतु बहुजन समाजाची चळवळ आता नवीन वळणावर उभी आहे. येथे असलेले आर्य ब्राह्मण हे देखील परकीयच आहेत. नव्याने हाती आलेल्या डी.एन्.ए. संशोधनाने येथील उच्चवर्णीयांची गुणसूत्रे युरोपीय वंशाशी जुळतात, असे सिद्ध केले आहे. त्यामुळे इतके दिवस मुसलमानांसाठी दुय्यम नागरिकत्वाची भाषा बोलणाऱ्यांना ते देखील परकीय आहेत म्हणून या देशातून हाकलून का देऊ नये, अशी भाषा बहुजन समाजाची चळवळ करते आहे. बहुजन समाजाच्या चळवळीतून नवा ‘मूलतत्त्ववाद’ डोके वर काढू पाहत आहे. या साऱ्या सामाजिक विघटनाचा अनिष्ट परिणाम या देशाच्या भवितव्यावर होणार आहे. परंतु या साऱ्या जळजळीत सामाजिक वास्तवाकडे संघपरिवार जाणीवपूर्वक दुर्लक्ष तरी करत आहे किंवा त्यांचे आकलन तरी अपुरे ठरत आहे.
आंबेडकरांनी वारंवार आवाहन करूनही हिंदू धर्मातील जातिभेदादी दोषांकडे हिंदुत्ववाद्यांनी हिंदू महासभेच्या काळापासून दुर्लक्ष केले आहे. आज बहुजन समाजाची चळवळ जे इशारे देत आहे, तेही त्यांना उमगत नाहीत. त्यांचे खरेच जर या देशावर प्रेम असेल तर समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांवर आधारलेला राष्ट्रवाद हाच या देशाच्या उज्ज्वल भवितव्याकरिता आवश्यक आहे, हे त्यांच्या ध्यानात येईल. यासाठी सर्व जाती, पंथ आणि धर्म यांचे ‘भारतीयीकरण’ होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचा मूलाधार कोणत्याही एका धर्माचा नव्हे तर आम्हां सर्वांचा सामुदायिक सांस्कृतिक वारसा हाच असू शकतो, हे जितक्या लवकर आमच्या ध्यानात येईल तितके बरे! मानवताशून्य मूलतत्त्व-वादाकडून या नव्या राष्ट्रवादाकडे वळण्यातच साऱ्यांचे हित सामावले आहे, हे निश्चित!
श्रीरंजन, केत्तूर-२, ता. करमाळा, जि. सोलापूर — ४१३ २०६

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.