नीतीची भाषा

आपला जागेपणीचा सर्व काळ भाषेचा उपयोग करण्यात व्यतीत होतो. आपण दररोज शेकडो, नव्हे हजारो, वाक्ये सहजपणे उच्चारतो. त्यांपैकी काही वाक्ये श्रोत्याला/ना काही माहिती देण्याकरिता असतात. काही आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण वापरतो, तर काही नको असलेली गोष्ट दूर करण्याकरिता. एखादे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, ते उच्चारणाऱ्या व्यक्तीचा ते उच्चारण्याचा उद्देश काय आहे, इत्यादि गोष्टी आपल्याला वाक्याच्या रचनेवरून कळतात. उदा. केवळ माहिती देणे एवढाच हेतू असलेल्या वाक्यरचनेला indicative (कथनात्मक, वर्णनपर) रचना म्हणतात. एखादी गोष्ट करवून घेण्याकरिता वापरलेल्या रचनेला आज्ञार्थी किंवा विज्ञाप-नार्थी रचना म्हणतात. वाक्यरचनेचा तिसरा प्रकार आपल्या मनातील एखादी भावना उत्स्फूर्तपणे प्रकट होते, तिचे वर्णन आपण करीत नाही, असे दर्शविणाऱ्या वाक्यांचा. त्यांना केवलप्रयोगी रचनेची वाक्ये किवा उद्गार म्हणतात.
हे सर्व बाळबोध आहे. ते सर्वांना माहीत असते. पण या भिन्न रचनांचे विशेष गुणही अतिशय भिन्न असतात ही गोष्ट मात्र बाळबोध नाही. त्या विशेषांसंबंधी काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.
सर्वांत महत्त्वाचा विशेष हा की कथनात्मक वाक्यांत यथार्थ आणि अयथार्थ हा भेद असतो. कथनात्मक वाक्यांचा दावा आपण सत्य आहोत हा असतो. कथनात्मक वाक्यांचा हा विशेष आहे. कथनात्मक वाक्य एक तर सत्य किंवा असत्य असते. मात्र ते सत्यही आहे आणि असत्यही आहे हे अशक्य आहे. तसेच ते सत्यही नाही आणि असत्यही नाही हेही अशक्य आहे. कथनात्मक वाक्य सत्य आहे याचा अर्थ त्यात वर्णिलेली स्थिती वर्णनाबरहुकूम आहे. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ या वाक्यात ‘पृथ्वी’ नावाच्या पदार्थाचा आकार काय आहे हे सांगितले आहे. तो जर वस्तुतः तसा असेल तर वाक्य सत्य, आणि तो जर तसा नसेल तर वाक्य असत्य.
सत्य किंवा असत्य असणे हा कथनात्मक वाक्यांचा विशेष आहे असे वर म्हटले आहे. हा गुण अन्य प्रकारच्या कोणत्याही वाक्यांत नसतो. उदा. प्र नार्थी वाक्य सत्य किंवा असत्य नसते. तसेच ‘खरे बोला’ किंवा ‘निरपराध्यांना त्रास देऊ नका’ हे आदेशपर वाक्यही खरे किंवा खोटे असू शकत नाही. बसलेल्या मुलाला ‘खाली बस’ हा आदेश खोटा आहे असे कोणी म्हणेल, पण ते चुकीचे होईल. तो अयुक्त आहे असे म्हणता येईल. पण अयुक्त असणे म्हणजे असत्य असणे नव्हे. तीच गोष्ट प्र नार्थी वाक्यविषयीही खरी आहे. बसलेल्याला ‘बस’ म्हणणे निरर्थक आहे. तशीच केवलप्रयोगी वाक्येही खरीखोटी असत नाहीत. ‘अहाहा, काय सुंदर सकाळ ही!’ हा सहजोद्गार सत्य किंवा असत्य असू शकत नाही. प्रातःकाळाचे वर्णन करण्याकरिता नव्हे, तर आनंदप्रदर्शन करण्यासाठी तो उद्गार आहे.
/असत्य हा भेद पुढील प्रकारे स्पष्ट करता येईल. कथनात्मक वाक्य सत्य किंवा असत्य आहे याचा अर्थ त्यात वर्णिलेली वस्तू किंवा अवस्था (situation) जशी वर्णिली आहे तशी असणे. ‘यथार्थ’ म्हणजे ‘जसा अर्थ (म्हणजे वस्तू) आहे तशी’. म्हणजे वस्तुस्थिती आणि तिचे वर्णन संवादी असणे. त्या दृष्टीने पाहिल्यास ‘सत्य’ हा शब्द वस्तुस्थिती आणि तिचे वर्णन यांच्यातील संवाद किंवा विसंवाद यांचा वाचक आहे.
अशा प्रकारचे द्वैध किंवा द्वैत प्र न, आदेश किंवा उत्स्फूर्त उद्गार यांत नसल्यामुळे त्या प्रकारची वाक्ये सत्य किंवा असत्य असू शकत नाहीत.
पुढे जाण्यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आपण वापरत असलेली भाषा आपल्याला ज्ञात एकमेव भाषा आहे असे समजू या. उदा. मराठी. पण तिच्या वापरात अनेक भेद आहेत. भाषेचा वापर विविध प्रकारचा आहे. माहिती सांगणे, प्र न विचारणे, आदेश देणे किंवा उद्गार करणे हे वेगळे प्रकार असून एखादे वाक्य वर्णनपर आहे की आदेशपर आहे, प्र नार्थी आहे की सहजोद्गार आहे हे त्यातील लक्षणांवरून ओळखता येते. ही भेदक लक्षणे मुख्यतः दोन प्रकारची आहेत. (१) काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द आणि काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्यरचना. आपल्या लेखाचा विषय नीतीची भाषा हा असल्यामुळे आता नीतिपर वाक्यांच्या दोन लक्षणांकडे आपण वळू.
(१) नीतिव्यंजक शब्द: हे मुख्यतः ‘साधु’ (चांगले), ‘असाधु’ (वाईट), आणि ‘कर्तव्य’ हे आहेत. (२) वाक्यरचना ही मुख्यतः विध्यर्थी असते. उदा. ‘ही गोष्ट चांगली आहे’, ‘चोरी करणे वाईट’ इत्यादि, ‘प्रातःकाळी लवकर उठावे’, ‘रात्री जास्त जागू नये’ इत्यादि. ‘चांगले’ ‘वाईट’ किंवा ‘कर्तव्य’ ही विधेये वापरून केलेली वाक्ये दिसायला वर्णनपर वाक्यांहून वेगळी दिसत नाहीत. ‘चोरी करणे वाईट’ हे वाक्य ‘चोरी सामान्य गोष्ट आहे’ या वाक्यासारखेच दिसते. दोन्ही वाक्यांत एक उद्देश्य आणि एक विधेय असून त्यांच्यात गुणी-गुण संबंध आहे. पण ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे. ही गोष्ट चांगली/वाईट आहे’ या वाक्यातील ‘चांगले/वाईट’ हे विशेषण ‘हे निशाण हिरवे/लाल आहे’ या वाक्यातील ‘हिरवे/लाल’ या विशेषणाहून अतिशय वेगळ्या प्रकारचे आहे हे लक्षणीय आहे. त्या दोन विशेषणांतील भेद पुढील प्रकारे स्पष्ट करता येईल. ‘हिरवे/लाल’ हे विशेषण वक्त्याच्या पूर्ण निर्विकार वृत्तीचे व्यंजक आहे. उलट ‘चांगले/वाईट’ हे विशेषण वक्त्याचा अनुकूल/प्रतिकूल भाव व्यक्त करते.
एखाद्या गोष्टीविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल भाव असणे याला त्या गोष्टीचे मूल्यन करणे म्हणतात. वर्णन केवळ विषयाचे स्वरूप दाखविणारे असते, तर मूल्यन त्याविषयी वक्त्याची अनुकूल/प्रतिकूल मनोवृत्ति व्यंजित करते.
विशेषणांचे वर्णनपर आणि मूल्यनपर प्रकार पाहिल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे वर्णनपर वाक्ये विषयरूप व्यक्त करण्याकरिता वापरली जातात, तर मूल्यनपर वाक्ये विषयाचे वर्णन करीत नाहीत, ती विषयीचे भाव व्यक्त करतात. (‘विषयी’ म्हणजे ज्याला विषय असतात तो, ज्ञाता किंवा भाषा वापरणारा. ज्याला इंग्रजीत subject म्हणतात तो. ‘विषय’ म्हणजे object.) पण हे जर खरे असेल तर एक चमत्कारिक गोष्ट मान्य करावी लागेल. ती म्हणजे मूल्यनात्मक वाक्यांना सत्य/असत्य हा भेद लागू होत नाही. पण सर्व नैतिक वाक्ये मूल्यनात्मक असल्यामुळे ती खरी किंवा खोटी असू शकत नाहीत. ‘चांगले/वाईट’ ही विशषणे विषयस्थ गुणांचे वर्णन करीत नाहीत; ती विषयीच्या अनुकूल/प्रतिकूल वृत्तीची द्योतक असतात.
पण नैतिक वाक्ये सत्य/असत्य असू शकत नाहीत, हे जर खरे असेल तर मग नैतिक वाक्यांत स्वीकरणीय आणि त्याज्य हा भेद आपण कसा करणार? नैतिक वाक्ये सर्व समान दर्जाची आहेत असे मानायचे का? पण ते बरोबर होणार नाही. आपण सामान्यपणे असे मानतो की काही नैतिक वाक्ये युक्त, स्वीकारयोग्य असतात, आणि काही स्पष्टपणे नीतिविरुद्ध असतात. स्वार्थी, दुष्ट व्यक्तींची वचने आणि निःस्वार्थी, परोपकारी व्यक्तींची वचने ही सर्व सारख्याच किंमतीची आहेत असे आपण मानत नाही. ते जर बरोबर असेल तर आपला संपूर्ण नैतिक व्यवहार भ्रमाधिष्ठित आहे हे कबूल करावे लागेल.
पण इतका अतिरेकी निष्कर्ष काढण्याची गरज नाही असे मला वाटते. नैतिक वाक्ये सारख्याच किंमतीची असतात हे मत कोणालाच मान्य होणार नाही. त्यांत युक्त अयुक्त, स्वीकारयोग्य आणि त्याज्य हा भेद आपण करतो. पण हा भेद काय आहे ते सांगावे लागेल. पण हे सर्व विवेचन बरेच मोठे असल्यामुळे ते पुढील लेखांकापर्यंत रोखून ठेवणे अवश्य आहे.
कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराजमार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.