साधु-असाधु आणि विहित-निषिद्ध

गेल्या महिन्याच्या (नोव्हेंबर २००२) आ.सु.मधील ‘नीतीची भाषा’ या लेखात म्हटल्याप्रमाणे नैतिक वाक्ये जर सत्य/असत्य असू शकत नसतील, तर उद्भवणाऱ्या ‘मग नैतिक वाक्यांत युक्त अयुक्त किंवा स्वीकरणीय/त्याज्य असे काही असत नाही काय?’ या प्र नाला काय उत्तर आहे हे सांगणे बऱ्याच विस्ताराचे असल्यामुळे ते पुढील अंकापर्यंत रोखले होते. ते आता सांगितले पाहिजे.
नैतिक वाक्ये सत्य/असत्य असू शकत नाहीत हे मत बरेच अलीकडचे आहे. त्यापूर्वी सामान्यपणे असे मानले जाई की ‘अमुक गोष्ट चांगली/वाईट आहे’, किंवा ‘सत्य बोलावे’, ‘स्वार्थी आचरण टाकून द्यावे’ ही वाक्ये सत्य किंवा असत्य आहेत, किंवा ती विषयिनिरपेक्ष आहेत. विसाव्या शतकाच्या आरंभी जी. ई. मूर, एच. ए. प्रिचर्ड, डब्ल्यू. डी. रॉस इ. नीतिमीमांसकांच्या मते साधुत्व हा गुण शुभ्रत्व किंवा वर्तुळाकारत्व ह्या गुणांसारखाच आहे. त्यात फरक एवढाच की नैतिक गुण नैसर्गिक नसून ननैसर्गिक आहेत. ते डोळा, कान इत्यादींनी अनुभवास येणारे नैसर्गिक गुण नसल्यामुळे आपल्या ज्ञानेंद्रियांच्या आटोक्यात येत नाहीत. पण त्यांची जाणीव पंचज्ञानेंद्रियांना जशी साक्षात् होते तशीच ‘intuition’ नावाच्या ननेंद्रिय साक्षात्काराने साक्षात् होते. प्रिचर्डचे मत असे होते की ‘तव्य’ (ought किंवा ‘obligation’) हेही आपल्याला साक्षात् कळते. रॉसचेही मत सामान्यपणे असेच होते.
पण या मतात अडचण अशी होती की ननेंद्रिय साक्षात्कार नावाचे एक ज्ञानसाधन असून त्याने ननेंद्रिय गुणांचे साक्षात् ज्ञान होते असे त्याचे प्रतिपादन होते. पण असे एक ज्ञानसाधन आहे आणि त्याने ननेंद्रिय गुणांचा अनुभव येतो हे मत चिकित्सक तत्त्वज्ञांना पटेना, शिवाय ननेंद्रिय साक्षात्कार मानायचा तर त्यात ज्ञात होणारे गुण भिन्न लोकांना भिन्न दिसतात. उदा. प्रिचर्डला तव्य साक्षात् दिसते, तर मूर म्हणतो की तव्य हे ‘साधु’च्या साह्याने वि िलष्ट करता येते. हे दोन भिन्न अनुभव साक्षात् येतात असे दोघेही म्हणतात. त्यामुळे ननेंद्रिय साक्षात्काराची
कल्पना चिकित्सक तत्त्वज्ञांना मान्य झाली नाही. म्हणून साधुत्व आणि तव्यत्व या गोष्टी विषयिनिरपेक्षपणे वास्तव जगाचा भाग आहेत असे आपण मानू शकत नाही.
पण साधुत्व आणि तव्यत्व हे गुण विषयिनिरपेक्ष जगाचा भाग नसतील तर ते विषयिसापेक्ष असले पाहिजेत असे निष्पन्न होते. हे जर बरोबर असेल तर नैतिक कल्पनांचे स्वरूप काय हा प्र न उद्भवतो. त्याचे उत्तर काय असावे?
नैतिक वाक्ये विषयिनिरपेक्षपणे युक्त अयुक्त असू शकत नसतील, पण ती विषयिसापेक्षपणे तरी युक्त अयुक्त असू शकतात काय? येथे ‘objective’ या शब्दाचा विषयिनिरपेक्ष या अर्थाहून एक वेगळा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. हा अर्थ म्हणजे विशिष्टविषयिनिरपेक्ष नसून सामान्यविषयिनिरपेक्ष असणे. उदाहरणाने ही कल्पना अशी स्पष्ट करता येईल, भौतिक विज्ञानांत असे एक सुप्रतिष्ठित मत असे आहे की इंद्रियगोचर गुण वस्तुतः वस्तूंत नसतात, ते आपल्या इंद्रियांना भासतात. उदा. सोन्याचा पिवळा रंग सोन्यात वस्तुतः नसतो. सोने पाहणारा डोळा जर नसेल तर सोन्यात तो रंग दिसणार नाही. पण सोन्यात पिवळ्याखेरीज असा एक अदृश्य गुण असतो की जो डोळा त्याच्या संपर्कात आला की त्याला वस्तूत पिवळा रंग भासतो, पण हा अदृश्य गुण कुणा एक डोळ्याचा नसून कोणत्याही डोळ्याचा आहे. म्हणजे रंग हा विषयिसापेक्ष गुण आहे, पण तो कोणा एका डोळ्याचा गुण नसून कोणत्याही डोळ्याचा गुण असतो. अशा कुणाही विषयीला भासू शकणाऱ्या गुणाला आपण सामान्यविषयिसापेक्ष असे नाव देऊ आणि कुणा एका विषयीच्या अपेक्षेने असणाऱ्या गुणाला विशिष्टविषयिसापेक्ष हे नाव देऊ, म्हणजे रंग हा सामान्यविषयिसापेक्ष गुण आहे. वरील विवेचन पुढील सुटसुटीत आराखड्यात असे दाखविता येईल.
गुण विषयिनिरपेक्ष सामान्यविषयिसापेक्ष विषयिसापेक्ष विशिष्टविषयिसापेक्ष
तेव्हा साधुत्व आणि तव्यत्व हे गुण विषयिसापेक्ष असून सामान्यविषयिसापेक्ष आहेत असे म्हणता येईल.
पण एवढ्याने ते गुण काय आहेत हे सांगितले जात नाही. त्या गुणांचा आशय काय आहे या प्र नाकडे आता वळले पाहिजे.
प्रथम साधुत्व या गुणासंबंधी मला वाटते की ‘साधु’ किंवा ‘चांगला’ म्हणजे मला आवडणारी, एखादी वस्तू चांगली आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती आपल्याला आवडते असे आपल्याला म्हणायचे असते. ‘चांगला’ म्हणजे अनुकूलवेदनीय आणि ‘वाईट’ म्हणजे प्रतिकूलवेदनीय. एखादी वस्तू, उदा. लेखणी किंवा अक्षर, चित्र किंवा गाणे, मोटारगाडी किंवा विमान काहीही, ‘चांगली’ आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपला अभिप्राय असा असतो की ती आपल्या मनात अनुकूल वृत्ति निर्माण करते आणि असेच ‘वाईट’ या विशेषणाने आपल्या मनाचा प्रतिकूल भाव व्यक्त होतो. अर्थात् हा प्रयोग बोलणाऱ्याच्या मनातील भावाचा वाचक असतो. पण तो सर्वांच्या मनातील भावाचा निदर्शक असू शकतो. म्हणजे चांगला/वाईट हे गुण विशिष्टविषयिसापेक्ष असले तरी ते सामान्यविषयिसापेक्षही असू शकतात.
विषयिसापेक्ष गुणांचे सामान्यविषयिसापेक्ष आणि विशिष्टविषयिसापेक्ष हे प्रकार पाहिल्यानंतर आता आपण साधुत्व किंवा चांगलेपणा या गुणाकडे फिरून वळू. साधुत्व हा कोणत्या प्रकारचा गुण आहे? या प्र नाचे उत्तर असे दिसते की चांगलेपणा हा विषयिसापेक्ष गुण नक्कीच आहे. पण विषयिसापेक्ष गुणांच्या दोन प्रकारांपैकी तो कोणत्या प्रकारचा असावा हे ठरवावे लागेल. जेव्हा मी एखादी लेखणी चांगली आहे असे म्हणतो तेव्हा ती कोणालाही चांगली वाटेल असा माझा अभिप्राय सामान्यपणे नसतो. प्रामुख्याने ती मला आवडते असा आपला अभिप्राय असतो. म्हणजे ती विशिष्टविषयिसापेक्ष भासते. आणि काय चांगले आहे ह्या बाबतीत लोकांची भिन्न आणि परस्परविसंगत मते पाहिल्यानंतर तो गुण सामान्यविषयिसापेक्ष आहे असे म्हणता येत नाही. तेव्हा चांगलेपणा हा गुण विशिष्टविषयिसापेक्ष आहे असे म्हणावे लागते.
हा गुण कोणत्या प्रकारचा आहे हे आपण पाहिले. पण त्या गुणाचा आशय काय आहे हे सांगायचे राहिले आहे. तिकडे आता वळू.
मी वर म्हटल्याप्रमाणे ‘चांगला/ली/ले’ म्हणजे अशी वस्तू —- की जी आपल्या मनात अनुकूल भाव निर्माण करते. चांगला म्हणजे अनुकूलवेदनीय : हा गुण म्हणजे सुखदता असे म्हणणे बरोबर होईल. म्हणजे चांगला म्हणजे सुखद, वाईट म्हणजे अरुचिकर, नावड उत्पन्न करणारा. आपली सर्व कर्मे सुखार्थी किंवा दुःखनिवारणार्थ असतात.
पण हे मत अनेक (किंबहुना बहुतेक) नीतिमीमांसकांना उघडच चुकीचे वाटले. त्यांनी त्यावर अनेक आक्षेप घेतले असून ते मत थिल्लर, उथळ, मानवाचा अपमान करणारे आहे असे दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. त्यांचा विचार आणि त्यांना उत्तरे पुढील लेखांकात.
कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराज मार्ग,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.