गणेशजन्मात विज्ञानाची प्रतिष्ठापना

लोकसत्तेच्या दि. १५-९-२००२ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. अभय दि. कानेटकरांचा “गणेशजन्मात विज्ञानाची प्रतिष्ठापना” हा लेख मुखपृष्ठावर व अंतिम पृष्ठावर ठळकपणे छापण्यात आला आहे. सश्रद्ध, भाविक तथा देवभोळ्या भक्तसमुदा-यांसाठी या लेखाचे प्रयोजन असावे. अन्यथा विवेक जागृत असलेल्या व विज्ञानाची तोंडओळख असलेल्या कोणत्याही इसमास डॉ. कानेटकरांची विधाने (त्यांच्या समुदायास मान्य असलेल्या सांस्कृतिक परंपरेला आदर्श मानणाऱ्या इसमांना सोडून) स्वप्नात असंबद्ध बडबड करणाऱ्या भ्रमिष्ट माणसांची कपोलकल्पित विधाने असावीत असा भ्रम झाल्या शिवाय राहणार नाही. त्यांची विधाने अशी . . .
१. गणेशजन्म हे अध्यात्म व विज्ञान अशा दोन्ही शास्त्रांना आजपर्यंत न सुटलेले कोडे आहे. गणेशाचे वर्णन करताना “विद्येची देवता’ असेच केले जाते. (तसेच कलेचा प्रारंभ करतानाही)
२. कम्प्यूटरसमोर असलेला माऊस म्हणजेच गणपतीसमोरील उंदीरच होय. इथपर्यंत वर्णन सध्या बुद्धिमंतांकडून लिहिलेले वाचावयास मिळते.
३. जगात हिंदू धर्माबाहेरही अनेक धार्मिक देशांत गणेशपूजा करतात. म्हणजे बुद्धीच्या, कलेच्या व आध्यात्मिक जगतात गणपतीचे जागतिकीकीकरण झालेलेच आहे. यापुढे जशी कोणत्याही कलेची व शास्त्राची सुरुवात गणेशपूजनाने होते तशी तिसऱ्या सहस्रकातील धार्मिक जागतिकीकरणाची सुरुवातसुद्धा गणेशाच्या जागतिकीकरणाने होईल असे भविष्याचा वेध घेता प्रकर्षाने जाणवते.
४. सर्व संशोधनकाळात गणेशजन्म हे कोडेच मानावे लागेल. कारण गणेश-जन्म पार्वतीमातेच्या पेशीपासून क्लोन करून झाला, असा तर्क पुढे आल्यास नवल नाही. प्रचलित जन्मकथेनुसार माता पार्वतीने घामापासून (मातेच्या पेशीपासून) क्लोन करून श्रींना जन्माला घातले. यात दोन विचारसरणींची प्रेरणा दडलेली आहे. एक म्हणजे पेशीपासून क्लोन करण्याची प्रक्रिया व दुसरी म्हणजे पुरुषाविना जीवनिर्मिती शक्य आहे का, याचा विचार.
५. डॉलीमध्ये काही व्याधी निर्माण झाल्या हे लक्षात घेता मानवाच्या क्लोनिंग नंतरही हा धोका संभवतो. पण श्री गणेश मात्र क्लोनिंगने जन्मले असे गृहीत धरले तरीही त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते विकृतीविना जगले. इतकेच नव्हे तर ते बुद्धीची देवता ठरले. त्या काळात फक्त स्त्रीपासून बनलेला क्लोन्ड गणेश बौद्धिक व मानसिक दृष्ट्या परिपूर्ण, सर्वोत्कृष्ट व पूजनीय ठरला. हे आव्हान तिसऱ्या सहस्रकात विज्ञानही स्वीकारील.
६. अजूनही मेंदूरोपण एक स्वप्नच आहे. पण गणेश-जन्मकथेत मात्र शिशु-मानवाला मेंदूचे रोपण केले आहे. तेही मानवाचे नाही तर सफेद हत्तीचे! पूर्वी या सर्व भाकडकथा वाटायच्या पण आता वैज्ञानिक क्रांतीने हे सर्व स्वप्न नसून सत्य असू शकते हे दाखवून दिले आहे.
७. तत्त्वचिंतकांनी कल्पना करावयाची व ऋषींनी त्या साकार करायच्या ही पुरातन रीत होती. आजही विज्ञान युगात प्रज्ञावंत, बुद्धिमंत कल्पना करतात व शास्त्रज्ञ ते स्वप्न सत्यात उतरवतात.
८. गर्भावर संस्कार हा विषय श्रीकृष्ण-अभिमन्यूने मांडला. त्यावेळी ती कथा भाकडकथा वाटत होती. आज मात्र अनेक डॉक्टरांचे गर्भावरील संस्काराचे विविध प्रयोग पाहिले की विज्ञान त्या कथांमधील सत्य सिद्ध करून देत असल्याची जाणीव होते.
९. मेंदूच्या प्रत्यारोपणाची संकल्पना गणेशकथेच्या रूपातूनच प्राचीन तत्त्व-वेत्त्यांनी जगासमोर मांडली. आज इतर अवयवाचे रोपण होत असल्याने उद्या मेंदूरोपणही शक्य होईल अशी आपल्याला खात्री आहे.
१०. यापुढे जाऊन पुरातन तत्त्ववेत्त्यांनी आणखी एक स्वप्न जगासमोर ठेवले आहे. एक गर्भ मातेच्या पोटातून बाहेर काढून त्याचे शंभर भाग करून वेगवेगळ्या शंभर मडक्यांत (टेस्ट ट्यूब्स) ठेवून त्या एका गर्भापासून शंभर जीव तयार करता येतील, हेच ते महाभारतातील स्वप्न.
११. मातीच्या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंत्राने मातीच्या मूर्तीत जीव आणला जातो, तर मग तंत्राने-तंत्रज्ञानाने (टेक्नालॉजी–सायन्स) ते शक्य होणार नाही का? मग सावित्रीला यमराजाकडे जावे लागणार नाही. सावित्री जाईल शास्त्रज्ञा-कडे व सत्यवान जिवंत होईल! ही कल्पना स्वप्नरंजनात्मक वाटत असली तरीही शास्त्रज्ञ ती सत्यात आणतील, कारण त्यांना प्राणप्रतिष्ठापनेचा मार्ग प्रत्यक्ष श्रीगणेशानेच दाखवला आहे. उक्त विधानांची क्रमवार हजेरी
१. डॉ. कानेटकर म्हणतात तसे विज्ञानास गणेशाचे कोडे पडण्याचे काहीच कारण नाही, कारण विज्ञानाचा ‘गणेश’ हा कधीही विषय नव्हता व नाही व पुढेही होणार नाही. असे आज खात्रीने सांगता येते. अध्यात्मास तसे कोडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु हे अध्यात्म डॉ. कानेटकरांचे असेल तरच, अन्यथा नाही. खरे तर काही अधेमध्ये नसताना अध्यात्म हा बळेच कुठेही घुसखोरी करू शकणारा असा शब्दसमुदायांचा विचित्र असा म्होरक्या शब्द झाला आहे. शब्दांचा हा आवडता पुढारी म्हणून त्यास जगातील अध्यात्मवालेसुद्धा कबूल करतात. त्यास धर्मप्रेमींनी प्रचंड मान्यता बहाल केली आहे. एवढे असूनही शुद्ध अध्यात्मवाल्यांचा ‘गणेश’ हा विषय होऊ शकत नाही, हे त्यांना मान्य व्हावे. त्यामुळे अध्यात्म शास्त्र असले आणि नसले काय, त्यास गणेशाचे कोडे पडण्याचे कारण नाही. ब्राह्मणाळलेल्या हिंदूंशिवाय जगात कुठेही विज्ञानाचा वा कलेचा प्रारंभ गणेशाच्या माध्यमातून केला जात नाही. यास डॉ. जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञसुद्धा दुजोरा देतील अशी खात्री आहे.
२. कम्प्यूटरसमोरील माऊस म्हणजे गणपतीसमोरील उंदीर होय हे बुद्धि-मंतानी केलेले वर्णन डॉ. कानेटकरांना मान्य व्हावे अशी त्यांची व्यवाहारिक बुद्धिमत्ता आहे असे दिसते. आता तर माऊसशिवाय निवळ बोटाच्या स्पर्शानेही काम्प्यूटर वापरता येतो आहे. तेव्हा अशा बोटांना गणेशाचे बोट वा उंदराचे पाय असे जर डॉ. कानेटकर म्हणू लागले तर त्यात आ चर्य वाटायला नको. शिवाय, गणेशाचे पोट हेच कम्प्युटरचे मॉनीटर होय, असेहि ते म्हणतील.
३. तिसऱ्या सहस्रकात जागतिकीकरणाची सुरुवातसुद्धा गणेशाच्या जागतिकीकरणाने होईल असे भविष्य ते कथन करतात कारण साऱ्या बौद्धिक, कलेच्या वा आध्यात्मिक जगात गणपतीचे जागतिकीकरण झालेले आहे आणि म्हणून कोणत्याही कलेची वा शास्त्राची सुरुवात गणेश-पूजनाने होते अशी विधाने गणेशाची कावीळ झालेल्या व्यक्तीच करू शकतील. जगातील सामान्य माणूस पूजारोगाने जीवनभर त्रस्त असल्याने डॉ. कानेटकरांच्या साक्षीने काही विक्षिप्त वा भयग्रस्त वा भोंदू विदेशी मंडळी गणेशपूजनाने अध्यात्माचा प्रारंभ करू शकतीलही. जगातील शास्त्रज्ञ तसे करतील याची सुतराम शक्यता नाही. परंतु कलेची वा शास्त्राची सुरुवात गणेश-पूजनाने करण्याचा फाजीलपणा भंपकपणा हा डॉ. कानेटकरांच्या गोतावळ्याचा एकाधिकार आहे. तो अबाधित राहील यात शंका घेण्याचे कारण नाही.
४. गणेशाचा जन्म पार्वतीमातेच्या पेशीतून झाला असा तर्क कानेटकरांनी केला असता तरी समजण्यासारखे होते. परंतु पुढे ते ठाम विधान करतात की, प्रचलित जन्मकथेनुसार माता पार्वतीने घामापासून (मातेच्या पेशीपासून) क्लोन करून श्रीला जन्मास घातले. शिवाय यात पेशीपासून क्लोन करण्याची प्रक्रिया व दुसरी म्हणजे पुरुषाविना जीवनिर्मिती शक्य आहे या दोन प्रेरणा क्लोन्ड गणेशामुळे आधुनिक शास्त्रज्ञाला आपसूकच मिळाल्या. अन्यथा क्लोनविषयीचे विज्ञान पा चात्त्य शास्त्रज्ञांना कधीही प्राप्त झाले नसते असा संकेत डॉ. कानेटकरांनी दर्शविला आहे. केवढे हे शंकरपार्वती या शास्त्रज्ञांचे उपकार म्हणावे. खरे तर गणेशजन्माच्या अनेकविध कथा वेगवेगळ्या पुराणांत वेगवेगळ्या त-हेने वर्णिलेल्या आहेत. डॉ. कानेटकरांना ह्या कथा वाटत नाही. तर साक्षात् पुराण-कारांनी (तत्त्ववेत्त्यांनी—प्रज्ञावंत बुद्धिमंतानी) कल्पना केली व शंकर पार्वती या शास्त्रज्ञ द्वयाने प्रत्यक्षात आणली, असे वाटते. खरेच डॉ. कानेटकरांची आकलनशक्ती अफलातून विस्मयकारक आहे असे म्हणणे भाग आहे. त्यांची आकलनशक्ती थक्क करणारी आहे. तेव्हा शास्त्रज्ञांनी डॉ. कानेटकरांचेच क्लोन तयार करण्याची योजना आखली तर ते मानवजातीवर फार मोठे उपकार होतील.
५. क्लोन्ड डॉली ही तर व्याधियुक्त होती. परंतु फक्त स्त्रीपासून जन्मलेला गणेश मात्र बौद्धिक व मानसिक दृष्ट्या परिपूर्ण, सर्वोत्कृष्ट व पूजनीय ठरला असे डॉ. कानेटकर म्हणतात. केवढी ही वैज्ञानिक सफलता! व केवढे हे जगातील वैज्ञानिक आ चर्य! आणि तेही दोन-तीन हजार वर्षांपूर्वीच भारतीयांनी गाठलेले उच्च दर्जाचे जगातील एकमेवाद्वितीय असे वैज्ञानिक यश! खरेच डॉ. कानेटकरांचे अहोभाग्य म्हणायचे की ते या पुण्य(?)भूमीत ब्राह्मणकुळात जन्माला आले व क्लोन गणेशाची वैज्ञानिक प्रक्रिया जगापुढे मांडण्यास समर्थ झाले! ६ ते ११. गणेशाच्या कथेत शिशुमानवाला सफेद हत्तीच्या मेंदूचे रोपण केले आहे. डॉ. कानेटकरांना ही भाकडकथा न वाटता त्यांच्या मते त्या वेळचे प्रतिभावान बुद्धिमंत आजच्या अवयवरोपणाच्या वैज्ञानिक क्रांतीची प्रेरणा ठरले आहेत. डॉ. कानेटकरांनी शिशुगणेशाला केवळ पांढऱ्या हत्तीच्या मेंदूरोपणाचे एवढे एकच उदाहरण का द्यावे हे कळत नाही. कारण रावणाला दहा मानवी मेंदूरोपणाची, विष्णूला २ अधिक हातरोपणाची, दत्ताला ३ मानवी मेंदूरोपणाची, दुर्गेस ६ मानवी हातरोपणाची, तर शंकराला जादा डोळ्याचे रोपण केल्याच्या वगैरे वगैरे शेकडो कथा सांगता आल्या असत्या. त्या वेळच्या प्रज्ञावंत ऋषींनी कल्पना केल्या व शास्त्रज्ञांनी त्या प्रत्यक्षात आणल्या परंतु हे शास्त्रज्ञ कोण आणि यात विज्ञानाची कोणती प्रक्रिया अभिप्रेत आहे. हे मात्र कळू शकले नाही. गर्भावर संस्काराचे अभिमन्यूसंबंधातील त्यांचे विधान फारच अपुरे वाटते. रामायण, महा-भारतात तर डझनावारी असे गर्भसंस्कार सर्वत्र विखुरलेले सापडतील. स्त्रीपुरुषांचा संबंध न घडताही रामायण, महाभारतात व अनेक पुराणात जीव निर्माण केल्याचे शेकडो दाखले मिळतात. ब्राह्मणी गर्भसंस्कार न होताही आजसुद्धा पा चात्त्य देशांत मेधावी शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषिके मिळविलेली आहेत. कृष्ण-अभिमन्यु-प्रकरणातील गर्भसंस्कार न होताही आजसुद्धा अनेक देशांत असे मेधावी शास्त्रज्ञ जन्मास येत आहेत, याची कानेटकरांना दखल घ्यावीशी वाटली नाही, हे त्यांचे दुर्दैव होय. अभिमन्यूच्या जोडीला मात्र २००० वर्षापासून एकही असा गर्भसंस्कारित पुरुष अथवा स्त्री भारतीय ऋषींनी जन्मास घातलेली नाहीत, हे कटु सत्य आहे. पुराणकथेत प्रज्ञावंत, बुद्धिमंतांनी वर्णन केलेल्या कल्पनांचे कृत्रिम आणि बीभत्स असे टाकाऊ रोपण डॉ. कानेटकरांनी आधुनिक विज्ञानावर केले आहे. ते म्हणतात, एका गर्भाचे शंभर तुकडे करून ते शंभर मडक्यांत भरून (टेस्ट ट्यूब्स) शंभर जीव तयार केल्याचे महाभारतीय स्वप्न आज वैज्ञानिक साकारीत आहेत. धन्य ते कानेटकर! व धन्य त्यांचे गणेशविज्ञान! गणेशाच्या मातीच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करून मंत्रोच्चाराने त्यात जीव आणला जातो तर एका गर्भापासून शंभर जीवसुद्धा खुद्द गणेशाने दाखविलेल्या प्राण-प्रतिष्ठेच्या मार्गाने तयार करणे शास्त्रज्ञांना सहज शक्य होईल. हे त्यांचे विधान अत्यंत हास्यास्पद असे आहे. अखिल जगातील शास्त्रज्ञांनी आता त्यांच्या घरी किमान मातीचे गणेश उभारण्याच्या कामी लागावे व कानेटकरांनी त्यासाठी सर्व तांत्रिक व कलात्मक मदत पुरवावी म्हणजे क्लोनिंग-अवयवरोपण वगैरेंसारखे तांत्रिक/वैज्ञानिक शोध चुटकीसारखे प्राप्त होतील. मला तर हे कोडे पडले आहे की गणेश भारताचा असून वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती मात्र पा चात्त्यांनी करावी व डॉ. कानेटकरांसारख्या येथील बुद्धिमंतांनी, प्रज्ञावंतानी व शास्त्रज्ञांनी पा चात्त्यांच्या शास्त्रीय प्रगतीची निव्वळ नक्कल करावी, असे का घडावे!
१२, राजीव सहकारी गृहनिर्माण संस्था, बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा पूर्व, मुंबई — ४०० ०५१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.