अशरीरी आत्मा (?)

दहा वर्षांपूर्वी आम्ही सूझन ब्लॉकमोअरला तिच्या ससेक्स परगण्यातल्या ‘पेअरट्री कॉटेज’मध्ये भेटलो. त्यावेळी शरीरबाह्य अनुभव (out of body experiences उर्फ OBE) या क्षेत्रात संशोधन करणारी ती बहुधा जगातली एकुलती एक परामानस शास्त्रज्ञ (Parapsychologist) होती.
शरीरबाह्य अनुभव म्हणजे आपण आपल्या शरीरबाहेरून शरीराकडे पाहत असल्याचा अनुभव. यासारखाच एक प्रकार म्हणजे मृत्यूच्या निकटचे (near death) अनुभव, किंवा NDE. वैद्यकीयदृष्ट्या मृत शरीराबाहेर आपण एका अंधाऱ्या बोगद्यातून जात आहोत, आणि मृत शरीराचे ‘पुनरुज्जीवन’ होताच आपण परत शरीरात ओढले जात आहोत, अशा धर्तीचे हे NDE अनुभव असतात. OBE आणि NDE अनुभवांच्या अनेक वर्णनांमधून अशरीरी आत्मा (Spiritual self) आणि तारकांच्या पातळीवरील शरीर (astral body) या कल्पना घडल्या. एका तलम चंदेरी धाग्याने शरीरांना जोडलेल्या या रचना शरीरांबाहेर वावरू शकतात, असे सांगितले जाऊ लागले. OBE आणि NDE संबंधातील पुस्तके आणि चित्रपट यांना अफाट लोकप्रियता मिळू लागली, हेही अपेक्षितच होते.
ब्लॉकमोअरचे ‘परासामान्य’ अनुभवांना सामान्य मानसशास्त्राच्या कक्षेत ओढण्याचे प्रयत्नही मुख्य विचारधारेतील इतर वैज्ञानिकांना मोहवत नसत, हेही तसे अपेक्षितच घडले. पण गेल्या दहा वर्षांमधील मज्जासंस्थेच्या अभ्यासातून OBE – NDE च नव्हे, तर इतरही तशा अनुभवांभोवतीचे व जाणिवांभोवतीचे गूढतेचे वलय भेदले जाऊ लागले आहे. आपल्या अस्तित्वाची जाण, एका प्रचंड बुद्धिमत्तेच्या सान्निध्यात असण्याचे मिस्टिकल अनुभव, रंगांचे ‘वास’ आणि ध्वनींचे ‘रंग’ जाणवणे, अशा अनुभवांवर आता प्रकाश पडू लागला आहे. नुकत्याच ‘नेचर’ या ख्यातनाम विज्ञानिवषयक मासिकात प्रसिद्ध झालेल्या स्विस वैज्ञानिकांच्या संशोधनाचे उदाहरण घेऊ. OBE, ‘साध्या’ व्यवहारात दैवी हस्तक्षेप होणे, परग्रहावरील जीवांकडून ‘पकडले’ जाणे, असे सारे जिनीव्हा विद्यापीठाच्या इस्पितळात डॉ. ओलाफ ब्लॅक एका त्रेचाळीस वर्षे वयाच्या मिरगीच्या (Epilepsy) रोगाने ग्रस्त स्त्रीवर इलाज करत होते. उजव्या कानामागील ‘ॲग्युलर गायरस’ (angular gyrus) या मेंदूच्या भागाला सौम्य विजेचा प्रवाह जोडला गेला की त्या स्त्रीला शरीराबाहेर तरंगत आपले शरीर पाहत असल्याचा अनुभव येई.
अकरा वर्षे मिरगी भोगणाऱ्या या अज्ञात स्त्रीच्या मेंदूत अनेक जागी विजेच्या तारा जोडून तिच्या ‘झटक्यांचे’ मूळ शोधायचा प्रयत्न केला जात होता. मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याआधी ही अशा तारांच्या वापरातून मेंदूच्या महत्त्वाच्या भागांच्या कार्यांचे ‘नकाशे’ काढले जातात. पण डॉ. ब्लॅक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाच नव्हे तर रोगी स्त्रीलाही अनपेक्षितपणे त्यांना OBE अनुभव ‘भेटला’. या अनपेक्षितपणामुळेच वैज्ञानिक संशोधनाच्या शिस्तीचा भंग झाला. इथे ना ‘कंट्रोल ग्रूप्स’चे नियंत्रण होते, ना प्रयोगाचे व्हिडिओचित्रण. हा सुटा, एकाच व्यक्तीवर झालेला प्रयोग आहे, त्यामुळे त्यातून, OBE चे ठोस स्पष्टीकरण देता येत नाही, हे डॉक्टरच नोंदतात.
डॉक्टर हेही नोंदतात, की रोगी स्त्रीला अनुभव विचित्र वाटूनही ती घाबरली नाही. बरे, तिच्या मेंदूत शंभरेक तारा होत्या, आणि कोणत्या तारेला वीज पुरवली जाते आहे ते तिला माहीत नव्हते – म्हणजे इथे फसवणुकीची शक्यता नाही. पण ॲग्युलर गायरसला जेव्हा-जेव्हा वीज पुरवली गेली तेव्हा-तेव्हा पलंगापासून छतापर्यंत तरंगत जाण्याचा अनुभव आला, हे मात्र खरे.
[वरील टिपण हे टाइम्स ऑफ इंडियाच्या १३ ऑक्टोबर २००२ च्या अंका-तील ‘आऊट ऑफ बॉडी एक्सपीरिअन्सेस आर इन द माईंड’ या लेखाचे शब्दश: भाषांतर आहे.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.