खादी–ग्रामोद्योग–स्वावलंबन संकल्पनासमूह

खादी हा एक स्वीकार्य अर्थव्यवहार असू शकत नाही या विचाराची मोहनींची मांडणी व्यवस्थित आहे. रोजगार केवळ निर्वाहापुरता असला तर ती एक प्रकारची गुलामगिरीच आहे. कमी श्रमांत जास्त उपभोग मिळवण्याची इच्छा, रिकामा वेळ उपलब्ध करून घेणे व त्याचा वैयक्तिक आनंदासाठी (उपभोगासाठी) वापर, कला, विद्या, शास्त्रे यांची आवश्यकता वाटणे–त्यांत रस वाटणे, इत्यादि माणसाच्या प्रवृत्ती नैसर्गिक आहेत हे मान्य केले म्हणजे खादी–ग्रामोद्योग–स्वावलंबन हा संकल्पनासमूह आता कालबाह्य झाला आहे, त्याचे वैचारिक किंवा भावाध्यात्मिक (spiritual) समर्थन होत असले तरी ते ‘काप गेले–भोके राहिली’ या सदरातले आहे, नवीन आर्थिक संकल्पनांच्या विचारांमध्ये त्याला थारा द्यायची आवश्यकता दिसत नाही.
परस्परावलंबन:
नवीन अर्थव्यवहाराला मोहनींनी परस्परावलंबन हा शब्द वापरला आहे. पूर्ण परस्परावलंबन शक्य आहे आणि त्यामुळे समता स्थापित होईल असा त्यांचा दावा आहे.
या परस्परावलंबनाचे घटक कोणते त्यांची यादी साधारणपणे अशी आहे:-
१. संपन्नता —- बुद्धीच्या वापराने कमी श्रमांत जास्त उपभोग उपलब्ध करणे
२. समता —- उपभोग्य वस्तूंची विपुलता निर्माण करणे त्यांचा उपभोग घेण्याची ऐपत नसणाऱ्यांच्या ठिकाणी ती निर्माण करणे
३. वितरण —- पैसा गावात राहिल्याने श्रीमंती येत नाही. ती दुसऱ्याला श्रम करायला लावून येते; सार्वजनिक वस्तूंच्या जास्तीत जास्त वापरामुळे येते; कारखान्यांत तयार झालेल्या मालाच्या नीट वितरणामुळे येते.
४. रोजगार —- पूर्ण समाजाच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार समाजोपयोगी श्रमांची संधी उपलब्ध करणे.
हा परस्परावलंबी समाज निर्माण कसा होतो किंवा निर्माण करण्याची पद्धत काय, याची फारशी चर्चा झालेली नाही. अशा एका समाजाचे—‘स्वीडन”चे—वर्णन आलेले आहे. पण अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परस्परावलंबन पद्धतींची नोंद व्हायला हवी होती.
“राष्ट्र’ या संकल्पनेचा या संदर्भात विचार करावा. “ज्या जनसमूहाने परस्परसहकार्याने आपली उन्नती/प्रगती करून घ्यायचे ठरवले आहे अशा नागरिकांनी आपापसात केलेला करार’ म्हणजे राष्ट्र असे म्हणायला प्रत्यवाय नसावा.
युरोपातल्या लोकशाही राष्ट्रांमध्ये परस्परावलंबनाची ही प्रक्रिया काही शतके होत राहिली आणि आता पुरेशी स्थिर लोकशाही राष्ट्रे झाली आहेत. अमेरिका (U.S.) हे राष्ट्र त्यामानाने नवीन आहे. Multinationals ला जन्म देणारे राष्ट्र या नात्याने त्याचा वेगळा विचारही शक्य आहे.
कम्युनिस्ट रशियातला परस्परावलंबनाचा प्रयत्न फसला असे म्हणायचे का? रशियाच्या सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन “I told you so” अशा जिभल्या चाटत चाटत न करता परस्परावलंबनातले कुठले घटक कमी पडल्यामुळे किंवा पूर्णतः कोसळल्या-मुळे घडले ते तटस्थपणे केल्याची माहिती नाही. चिनी माओवाद किंवा भारतीय लोकशाही ही अगदी आताची उदाहरणे आहेत. या पद्धतींचे फायदे आणि तोटे यांची विस्तृत चर्चा व्हावयास हवी.
राज्यरचना कुठलीही असली तरी शेवटी प्रत्येक राष्ट्राला welfare state हा रोल अदा करावाच लागतो. जातीयता किंवा धर्मांधता यांचा संबंध न आणता धर्माधिष्ठित राष्ट्र (विशेषतः Islamic राष्ट्र) परस्परावलंबन अंगीकारतील का/अंगीकारतात का? आणि कुठल्या स्वरूपात, याचाही विचार व्हायला हवा. कल्याणकारी राज्य “स्वीडन’:
मोहनींनी त्यांना अपेक्षित कल्याणकारी राज्याचे उदाहरण म्हणून “स्वीडन’ निवडले आहे. अशा कल्याणकारी राज्याची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितली आहेत. ३६/४० तासांचा श्रम आठवडा; ६० दिवसांच्या पगारी सुट्ट्या–वर्षातून; प्रत्येक २०/२५ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक; अंदाजे अर्धावेळ रिकामपणा; सेवाक्षेत्रात सर्वांत जास्त रोजगार– त्याखालोखाल कारखान्यांमध्ये व सर्वात कमी शेतीत; फक्त मध्यमवर्ग व संपन्न वर्ग; उत्पादक श्रमकर्मीची घटणारी संख्या; प्रजाजनांपैकी प्रत्येकाला उत्पादक रोजगार देण्यापेक्षा त्याचा इतरांच्या बरोबरीने राहण्याचा हक्क मान्य वगैरे वगैरे. या (किंवा अशा) राज्याची घडण कशी झाली (किंवा व्हावयास हवी) त्याचा मोहनींनी वेगवेगळ्या स्थळी केलेला विचार असे दर्शवतो की —- यंत्राचा वापर आणि यंत्रनिर्मितीची बुद्धी; उत्पादक शक्ती वाढती ठेवणे; मानवी श्रमांचे प्रमाण कमी करणे; रिकाम्या वेळाचा सांस्कृतिक समृद्धतेसाठी वापर; पूर्ण समाजाची श्रीमंती प्रथम, त्यानंतर बुद्धिमंतांची श्रीमंती, विज्ञानाची आणि वैज्ञानिक दृष्टीची वाढ.
या सर्व गोष्टींचा स्वीकार करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये तयार होणे आवश्यक आहे. हे काम समाजाचे कोणते घटक करू शकतात व ते कसे करावे याचाही विचार आवश्यक आहे.
आपण “आपल्यापुरते पाहणारे” आहोत. आम्ही भारतीय पूर्ण मनःस्वास्थ्य असले तर आळशी बनतो तसेच अतिशय विवंचना असेल तरीही आळशी बनतो. देहदंड आम्हाला नैतिक समाधान देतो. उपभोग या शब्दाबद्दलच आमच्या मनांमध्ये एक पापभावना (guilt complex) आहे तेव्हा उपभोग : श्रम यांचे वाढते गुणोत्तर कसे स्वीकारायचे? पण त्याचबरोबर आपण मुलाच्या लग्नात हुंडा घेतो, पैशासाठी सुनांचा छळ करतो, वाटणीसाठी शेताच्या बांधावर भावाच्या डोक्यात कु-हाड घालतो, भरपूर पगार खाऊन किरकोळ कामांसाठी लाच घेतो अशा आमच्यामधून विवेकी, दुसऱ्याबद्दल बंधुभाव (goodwill) असलेला, स्वतःच्या श्रमांतून निर्वाहाची व्यवस्था करण्याची इच्छा असलेला, दुसऱ्याच्या श्रमांचा फक्त स्वेच्छाविनिमयानेच वापर करणारा असा नागरिक बनणे ही पहिली आवश्यकता आहे. यासाठी केव्हातरी नजीकच्या भविष्यकाळात पाटी कोरी पुसून त्यावर नवीन मानसिकतेचा जाहिरनामा लिहावा लागणार आहे.
दमन-शोषणाच्या ऐतिहासिक उपपत्तींमध्ये आपली मने अडकलेली आहेत. आज दमन/शोषण नष्ट करण्यासाठी आजचे उपाय ठरवायला हवेत आणि या उपायांना खीळ घालणाऱ्यांची गय करू नये पण याउपर ऐतिहासिक अन्यायाची शहानिशा करण्यात व्यतीत होणारा वेळ फुकट जातो असे वाटते.
मानसिकता थोड्याफार अंशी बदलून अतिशय निकृष्ट प्रतीच्या जीवनमानात काही वर्षांच्या कालावधीत ५/७ पटीने फरक घडवून आणल्याची काही उदाहरणे अशी—
महाराष्ट्रात राळेगण-सिद्धी, हिवरे बाजार इत्यादि; राजस्थानातला राजेन्द्र-सिंहजींचा प्रकल्प. या परिवर्तनांची सुरुवात करणारी आणि परिवर्तन घडवणारी मंडळी गांधीवादी आहेत पण त्यांच्या पद्धती गांधीवादी नाहीत. अरवलीमधील सुमारे ७०० गावांच्या समूहामध्ये ७/८ वर्षांत घडून आलेला बदल फार बोलका आहे. येथे फार मोठ्या भांडवलाची जरूर लागली नाही. (पाच सहा वर्षांत सुमारे ५० कोटी) पण नैसर्गिक संपत्तीचे आधी पोषण– संवर्धन व नंतर संयमित वापर याने दुष्काळी गावे आपल्या शेतात तीनतीन पिके घेऊ लागली.
या उदाहरणांमध्ये मोहनींनी मांडलेल्या काही संकल्पनांचाही थोडाफार पाठपुरावा होतो—-उदा. वस्तूंची फुकट प्राप्ती. या प्रकल्पांमधला शेतकरी देशोधडीला लागला होता. निर्वाहासाठी निर्वासित अवस्थेत मोलमजुरी करीत होता.
त्याने परस्परावलंबन मान्य केले, आपले काम आपण करण्याची तयारी केली, योग्य नियोजनाचा स्वीकार केला, श्रमाची मात्रा तीच ठेवून उपभोग मात्र काही वर्षांमध्ये कित्येक पटीने वाढवला. हा शेतकरी पूर्वीपेक्षा संपन्न आहे आणि या संपन्नतेच्या आधारे समाजात समाजोपयोगी चांगल्या संस्था गठित करू शकला आहे. पूर्वीपेक्षा नि िचतच फार जास्त आनंदात आहे. पूर्वीपेक्षा कमी शोषित आहे. कल्याणकारी राज्यांसंबंधीच्या काही आर्थिक संकल्पना:
मोहनींनी या संकल्पना फार छान पद्धतीने मांडल्या आहेत —- १. पैसा म्हणजे केलेल्या श्रमांमुळे निर्माण झालेला उपभोगांवरील हक्क मूर्त करणारे प्रमाणपत्र.
२. श्रम—ज्यासाठी पैसा किंवा त्याच्यासोबत वस्तुरूपाने मोबदला मिळणार असतो असे समाजोपयोगी किंवा दुसऱ्यासाठी केलेले काम.
३. श्रम कमी करून उपभोग वाढवण्याचा माणसाचा स्वभाव औद्योगिक क्रांती-नंतर घडलेला नाही, तो पूर्वापार आहे. . . .
४. शोषण—केवळ निर्वाहवेतनावर श्रमिक राबत असेल तर त्याचे शोषण होते असे मानले पाहिजे.
५. चंगळवाद —- (क) निर्वाहवेतनापेक्षा अधिक उत्पन्न मिळवणे किंवा देणे व गरजा वाढवीत नेणे; (ख) उपभोग : श्रम हे गुणोत्तर वाढते ठेवणे (ग) रिकामा वेळ आनंदासाठी व्यतीत करणे याला चंगळवाद म्हणायचे का?
या सर्व संकल्पना जाणकार व्यक्तींनी आणखी विस्तृतपणे व बोधात्मक पद्धतीने मांडण्याची आवश्यकता आहे. भांडवलनिर्मिती किंवा कर्ज म्हणजे नुसतीच आकड्यांची अदलाबदल हे अजून नीटसे समजलेले नाही.
अन्न ही एकमेव गरज होती. अन्नाची गरज भागल्यावर वस्त्रे आली —- कमी श्रमांत जसे पुष्कळांचे पोट भरू लागले तशा कला, विद्या, शास्त्रे वाढू लागली. हे जवळपास “संस्कृति संवर्धना’चे वर्णन वाटते.
“कितीही नवीन ग्राहक मिळवले तरी एक दिवस असा उगवतो की उत्पादन वाढवून फायदा नसतो. अशा वेळेला उत्पादनाला आळा घालावा लागतो. ही परिस्थिती शेतमालाच्या बाबतीत लौकर येते.”
म्हणजे प्रत्येकच उत्पादनाच्या बाबतीत ही परिस्थिती केव्हाना केव्हा येणार आहे.
उत्पादन वितरणाच्या क्षेत्रातला रोजगार उत्तरोत्तर कमी होत जातो. इतकेच नव्हे तर सेवेच्या क्षेत्रांतसुद्धा अमर्याद प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नाही.
याचा अर्थ उपभोग: श्रम गुणोत्तर, एकूण उत्पादन, एकूण उपलब्ध रोजगार हे विकसनशील देशांनी वाढते ठेवायला हवेत पण विकसित देशांनी यांच्यावर मर्यादा घालावयास हवी आणि ही मर्यादा अर्थविचारातून निष्पन्न होणारी हवी. Non-renewable resources च्या वापरामुळे यावर आणखी एक अनुल्लंघ्य मर्यादा येईल.
सर्वांत शेवटी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या व्यक्तींनी शिक्षणाबद्दल व्यक्त केलेल्या काही विचारांचा परामर्श मोहनींच्या काही विधानांच्या आधारे घेण्याचा मोह टाळता येत नाही. “रोजगार फक्त निर्वाहवेतनासाठी’ ही संकल्पना अयोग्य आहे. मग “शिक्षण फक्त जीवनाभिमुखतेसाठी किंवा जगण्याचे सामर्थ्य निर्माण करण्यासाठी’ ही कल्पना अयोग्य का नाही? ज्या ठिकाणी माल अगोदर बनतो आणि नंतर ग्राहक शोधला जातो, तेथेच ग्राहकाची ऐपत वाढवणे, वाढती ठेवणे, पूर्वी ज्यांच्या ठिकाणी ऐपत नव्हती त्यांच्या ठिकाणी ती निर्माण करणे शक्य असते. शिक्षण आणि विशेषतः विज्ञान-शिक्षणाची पद्धत ज्यांच्या ठिकाणी अर्हता नव्हती त्यांच्या ठिकाणी ती निर्माण करणे व वाढती ठेवणे अशीच योग्य वाटते. अभ्यासक्रम उत्तरोत्तर पातळ-पातळ करीत कृतक-बुद्धिमंतांची निर्मिती आज होत आहे.
“जवाहरलाल नेहरूंनी शास्त्रज्ञांना Ivory Tower मधून खाली उतरून जीवनो-पयोगी विज्ञान शिकवावे” असा सल्ला दिला होता. हा फोल आहे. परस्परावलंबी समाजात प्रत्येकाने आपल्या आवडीची activity आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी करणे एवढ्याने समाजाचा परिपोष होत असतो.
फॅरॅडे या शास्त्रज्ञाने विद्युत्-भौतिकी आणि विद्युत्-रसायन या शास्त्रांचा पाया घातला. एक दिवस ब्रिटनचे Chancellor of Exchequor त्यांची प्रयोगशाळा पाहायला आले. सर्व पाहणी झाल्यावर असा संवाद झालाः
चॅन्सेलर —- हे सर्व मजेदार आहे. पण व्यवहारात याचा उपयोग काय?
फॅरॅडे —- महाशय, नवजात अर्भकाचा उपयोग काय असतो? त्याला वयात यायला वेळ लागतो. माझी खात्री आहे की एक दिवस तुम्ही या उपकरणांवर कर बसवाल.
Flat No. 8, Plot No. 44, Krishna Kunj, Sion West,
Mumbai – 400 022

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.