भारत, एक ‘उभरती’ सत्ता

स्टीफन कोहेन यांचे इंडिया, अॅन इमर्जिंग पॉवर हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. ‘११ सप्टेंबर’च्या आधी लिहिले गेल्यामुळे यात बदलत्या राजकीय समीकरणांचे उल्लेख नाहीत, पण भरपूर मेहेनत, संदर्भ, वेगळा दृष्टिकोन आणि मुख्य म्हणजे त्रयस्थ भाव यामुळे हा ग्रंथ उल्लेखनीय झाला आहे. कोहेन हे ‘भारतज्ञ’ म्हणून नावाजले गेले आहेत. त्यांनी पूर्वी ‘इंडिया, अॅन इमर्जिंग पावर?’ नावाचे पुस्तक लिहिले होते —- यावेळी प्र नचिन्ह निघून गेले आहे. त्यांचे म्हणणे मी थोडक्यात सांगणार आहे.
भारताच्या शेजाऱ्यांसाठी भारत ही नेहेमीच मोठी सत्ता राहिली आहे. त्यांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक व्यवहारांसोबत त्यांच्या ‘ओळखीवर’ही (identity) भारताचा मोठा प्रभाव असतो. याला फक्त पाकिस्तान आव्हान देत असतो. पाकिस्तानला भारतीय प्रभावाची चिंता वाटते. चीन, बहुतेक पा चात्त्य देश, जपान, एशिअन देश यांच्या लेखी मात्र भारत प्रमुख देशांमध्ये धरला जात नाही.
अमेरिकन आडाख्यांत भारताला फारतर दुय्यम दर्जाचे स्थान आहे. १९६२ नंतर शीतयुद्धाच्या काळात भारत चीन संघर्ष हे मुख्य शीतयुद्धातील एक उपांग होते. अमेरिकेला भारत हे बिगर-कम्युनिस्ट राष्ट्रांमध्ये विकासाचे एक उत्तम उदाहरण पुरवू शकला असता. पण हा उत्साह १९६५ मध्ये विरला. भारताची सोव्हिएत यूनियन-सोबतची ‘अर्धयुती’ अमेरिकेला चिंतेची बाब वाटे, त्यामुळे भारत-अमेरिका संबंध नेहमीच आकर्षण आणि भ्रमनिरास यांच्यात हेलकावत राहिले.
मग भारत ही नेहमीच ‘उद्याची सत्ता’ राहणार का? काहींच्या मते लोकसंख्या, वीस भाषा, पन्नास हजार जाती यांतून भारताचे विघटन व पतन होईल. उलट काहींना भारताने यांतील काही अडथळे ओलांडले असल्याचे जाणवते. त्यांना भारताचा आर्थिक, सांस्कृतिक आणि सैनिकी प्रभाव वाढताना दिसतो. यात अनिवासी भारतीय हा महत्त्वाचा दुवा आहे. भारताकडे दुर्लक्ष केल्याने अमेरिकेला नव्वदीत दोनदा ‘शॉक’ बसला, अणुस्फोट करविण्यात आणि ‘आय.टी.’त भारतीयांनी बाजी मारली तेव्हा. भारतीय मुळाच्या लोकांना अमेरिकेत राजकीय महत्त्व आले. यातून २००० साली दोन्हीकडून राष्ट्र- प्रमुखांच्या भेटीही झाल्या. पण या दोन ‘प्रभावी’ बाबींसोबतच ‘नॉन–प्रॉलिफरेशन’ कराराला विरोध केल्याने भारत ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब ठरली. यात भारत-चीन अण्वस्त्र-युद्धाची धास्तीही आहे. आणीबाणीचा अपवाद वगळता भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही राहिली आहे, कामचलाऊ, पण टिकाऊ. सामाजिक, आर्थिक, प्रादेशिक भिन्नता असूनही लोकशाही वृद्धिंगत होत आहे. इथे अनेक देशांत न आढळणारी राजकीय समावेशकता आहे.
भारत केव्हा व कसा जागतिक सत्ता बनेल ते भारतीयांच्याच हाती आहे. यात अमेरिकेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, आणि याची जाण अमेरिकन धोरण ठरविणाऱ्यांना असणे आवश्यक आहे.
आपल्या पहिल्या ग्रंथात लेखक दोन गट नोंदतो. एक होता भारताची वकिली करणारा, ज्यांच्याकडे अमेरिकेचे शीतयुद्धात अडकलेले आणि सांस्कृतिक दृष्ट्या संकुचित लोक दुर्लक्ष करत. भारतीय ‘लॉबी’ने भारतीय कला, संस्कृती, इतिहास यांबद्दल अमेरिकनांचे प्रबोधन करण्याची गरज होती.
दुसरा गट भारताच्या मोडकळीस आलेल्या, ‘चेहेरा’ नसलेल्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाची जाण देत असे. कॅथरीन मेयोंच्या मदर इंडिया या पुस्तकाच्या प्रभावाखालील अमेरिकन पिढ्यांपैकी हे लोक. गांधींनी या पुस्तकाचे वर्णन ‘अ गटर-इन्स्पेक्टर्स डायरी’ असे केले होते. हे विचारवंत चवीने भारतीय स्त्रीच्या दुर्दैवी स्थिती-बद्दल, अस्पृश्यतेबद्दल आणि एकंदर अस्वच्छतेबद्दल बोलत. त्यांच्या मते भारतीय स्वराज्य कमावण्यास व चांगले सरकार निर्माण करण्यास अपात्र होते. यांच्या मते जातिसंघर्ष, सामाजिक विद्वेष आणि गरिबी यांत बुडालेला भारत हा ‘कसाबसा’ देश आहे —- जिवंत राहिला तरी खूप झाले, ‘मोठे’पणा दूरच राहिला! त्याला खड्ड्यातून वर काढण्यास अमेरिका फारतर हात देऊ शकते, डावपेचांत स्थान मात्र नक्कीच देऊ नये.
भारताबद्दलच्या अमेरिकन मानसातील प्रतिमेत या दोन दृष्टिकोनांचा एक विचित्र संगमच नेहमी दिसतो. काही संतुलित अभ्यासकांनीही लेखन केले आहे. यात भारत-पाक संबंधाबाबत सल्ले आहेत. काही संशोधने विशिष्ट मुद्द्यांवर आहेत (जसे, अण्वस्त्रसज्जता) पण हे गट अमेरिकनांना भारतांच्या भोळेपणा व खुजेपणा बद्दल संतुलित नजरेने पाहणे अवघड जाते, हेच दाखवतात. बहुतांश लोकांच्या मते भारताची प्रतिमा ही महात्मा गांधी, मदर टेरेसा, (खलनायकी) कृष्णमेनन, (ड्रेगन लेडी) इंदिरा गांधी, भगवी वस्त्रे घातलेले बाबरी मशीद तोडणारे, किंवा विष्ठेने लडबडलेले अस्पृश्य, अशी आहे.
कोहेन यांच्या पुस्तकात हे नोंदून भारताच्या परराष्ट्रातील प्रतिमेचा वेध घेऊन मूल्यमापन केलेले आहे व अमेरिकेने या साऱ्याकडे पाहताना काय भूमिका घ्यावी याचे विवेचन आहे.
२७ फेब्रुवारी २००२ ला अमेरिकेचे भारतातील राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल यांनी एक भाषण केले. कोहेन यांनी मांडलेली भारताच्या वाढत्या बळाची लक्षणे त्यात दिसतात, आणि भारताची भूमिका जास्त अमेरिकाधार्जिणी होते आहे हेही दिसते. कदाचित हे भारत-अमेरिका यांना जोडणारे ‘दहशतवादविरोधी’ सूत्र असेल. दुसरी शक्यता अशी की सोव्हियत संघाच्या पतनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा हा भारतीय प्रयत्न असेल. तिसरे म्हणजे अमेरिकेचा हा चीनला पर्याय शोधण्याचा प्रयत्न असेल. काहींच्या मते ही नैसर्गिक मैत्री अमेरिकेची उद्दिष्टे साध्य झाल्यावर विरून जाईल. अमेरिकेचा इतिहास पाहता हे नवलाचे नाही. इतर राजकारणी संबंधांसारखेच आंतरराष्ट्रीय संबंधही काळानुसार बदलतात.
ब्लॅकविल यांच्या भाषणातून आजचे भारत-अमेरिका संबंध किती व कोणत्या कारणाने घट्ट आहेत ते कळते. ते सुचवतात की राष्ट्राध्यक्ष होण्याआधीही जॉर्ज बुश ज्यूनियर भारताला अनुकूल होते. भारताची वाढती शक्ती, लोकशाही राष्ट्रांमध्ये भारताला असणारा मान, भारतात घडत असलेली ‘ग्लोबल’ बाजारपेठ, ही कारणे बुशच्या भूमिके-मागे आहेत. आज त्यात दहशतवादविरोधाची भर पडली आहे. ब्लॅकविल म्हणतात की अल-काईदाचा दहशतवाद आणि भारतातील सीमेपारचा दहशतवाद यांच्यात अमेरिका भेद करत नाही.
गेल्या वर्षाभरात पन्नासतरी उच्चपदस्थ अमेरिकनांनी भारताला भेट दिली आहे. कॉलिन पॉवेल व (माजी परराष्ट्रमंत्री) जसवंतसिंह यांच्यात मैत्री आहे व ती आठवडी फोनने टिकून आहे. ब्रजेश मिश्र व काँडोलीझा राईस, फर्नांडिस आणि रम्सफील्ड, अडवाणी आणि ॲशक्रॉफ्ट व म्यूलर (FBI प्रमुख), यशवंत सिन्हा व ओनील, मुरासोली मारन व झोएलिक, जनरल पद्मनाभन व जनरल मायर्स, अशा अनेक व्यक्तिात संबंधांतून ही मैत्री दृढ झाली आहे. आज भारतीय व अमेरिकन दूतावासांशी दुसऱ्या बाजूची परराष्ट्रमंत्रालये सहजपणे आणि सफलतेने भेटतात. पूर्वी असे घडत नसे. एकमेकांच्या गुप्तचरसंस्थांच्या सहकार्याचे दहशतखोरांना बराच आळा बसतो आहे. इंटरनेट दहशतीविरुद्ध आघाडी, संरक्षणसंबंध, नाविक संबंध, लष्करी सामग्रीचा मर्यादित पुरवठा, हे सारे आज सोपे झाले आहे
भारतातील आर्थिक सुधारणा, अमेरिकन निर्यात व थेट भांडवली गुंतवणूक यातून आर्थिक संबंधांना बळकटी येत आहे. पर्यावरण, खनिज तेल व इतर ऊर्जास्रोत, अंतराळ व अण्विक कार्यक्रम, आरोग्य (बहुतांशी एड्ज) या क्षेत्रांमध्येही सहमती-सहकार्य घडत आहे. राहता राहिला अमेरिका-पाकिस्तान संबंधांचा प्र न. या कळीच्या प्र नावर ब्लॅकविल म्हणतात, की अमेरिकेला भारत व पाकिस्तान दोघांशीही घनिष्ठ संबंध ठेवता येतील. मुशर्रफने बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. भारत पाकिस्तान तणाव धोकादायक आहे व भारतात होणारी घुसखोरी थांबायलाच हवी. अमेरिकेला या प्र नात मध्यस्थी करायची नाही, पण काश्मीर प्र न सुटल्यास अमेरिका-भारत संबंध खूप सुधारतील. यातून एक वेगळा अर्थही ध्वनित होतो. जो अमेरिकेच्या इतर कृतींतूनही जाणवतो. अफगाणिस्तानचा शेजारी म्हणून महत्त्व देऊन अमेरिका पाकिस्तानाला आर्थिक मदत देत आहे. मध्यस्थी न करताही अमेरिका दबाव आणून व ‘गाजर’ दाखवून छुपी मध्यस्थी करत आहेच. अमेरिकेला भारत उगवत्या आर्थिक व लष्करी बळामुळे महत्त्वाचा वाटतो, पण याचा अर्थ सर्व काही आलबेल आहे असा नव्हे.
बी ४/११०१, विकास कॉप्लेक्स, ठाणे — ४०० ६०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.