ग्रामीण रोजगाराचा नागरी स्रोत

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाडी नावाचे एक लहानसे गाव आहे. गाव म्हणायचे एवढ्याचसाठी की गेल्या १२-१३ वर्षात या गावाची लोकसंख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे, त्या आधी ते खेडेच होते. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात पसरलेली खार जमीन बघावयाला आम्ही गेलो होतो. नदी/खाडी काठा वर वसलेल्या गावच्या अनेक शेतजमिनी, नारळी पोफळीच्या बागा असलेल्या जमिनी उन्हाळ्यात भरतीच्या वेळी येणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या पुरामुळे नापीक होतात. या जमिनी वाचविण्यासाठी बंधारे बांधून काढण्याची परंपरा कोकणात जुनी आहे. अशा जमिनी मासे आणि आधुनिक कोलंबी संवर्धनासाठी आदर्श असतात. कोकणात असे प्रकल्प उभारण्यासाठी माहितीचा आणि उद्यमशीलतेचा तसेच भांडवलाचाही अभाव आहे ही वस्तुस्थिती.
पण हाडी या गावात मात्र असा एक प्रकल्प एका माणसाने सुरू केला. गावातल्या तरुणांना हाताशी घेऊन, माहिती देऊन त्याने रोजगार पुरविला. हा माणूस मुसलमान होता पण त्याचा काही मासेमारीचा वा कोळ्याचा पारंपारिक व्यवसाय नव्हता. दुसरीकडे उंच पण मुरमाड खडकाळ जमिनीवर मोठे खड्डे करून अनेक ठिकाणी आंबे आणि काजू यांची गेल्या ७-८ वर्षांतच सुरू झालेली मोठ्या प्रमाणावरची लागवड डोळ्यांत भरत होती. एकंदरीत ८ १० वर्षांत हाडी गावात बरेच काही बदल घडत असलेले दिसले. देवळात सरपंच आणि काही ग्रामवासी यांच्याबरोबर सभा झाली. गावात बालवाडी, महिलांसाठी शिवणक्लास, शिवणयंत्रे याबरोबरच शाळा काढण्यात गावकऱ्यांनी बराच मोठा पुढाकार घेतलेला दिसला. राजकीय पाठिंबा वा सत्ताधारी लोकांचे हस्तक्षेप निकराने दूर ठेवून गावकरी कामाला लागलेले दिसते. त्यांचा आत्मविश्वासही नव्यानेच मिळालेला दिसत होता. सरपंच तरुण होते; पण त्यांचे सहकारी मात्र निवृत्तिवयाचे दिसत होते. १९८१ ते ९१ मध्येच या गावाची लोकसंख्या ३००० पासून ८००० वर गेली होती. आणि त्याच सुमारास हे गाव बदल करावयाला लागलेले दिसले. साहजिकच आ चर्य आणि कुतूहल होते. अधिक चौकशीतून याचा उलगडा होत गेला. सभेला आलेल्या लोकांमध्ये विशेषतः पन्नाशीपुढील पुरुष हे मुंबईच्या गिरणी संपानंतर गावी परत आल्याचे लक्षात आले. त्यांच्याच बरोबर, त्यांचे कुटुंबीयही परत खेड्यात आलेले दिसले. या लोकांनी गिरणी संपानंतर मुंबईचा निरोप घेतला. बरोबर गाठीला जमा केलेला थोडा फार पैसा तर होताच पण बरोबर ‘मुंबई’तून मिळविलेला आधुनिक नागरी संस्कृतीचा ठेवा होता त्यात शहरात राहून मिळविलेला आत्मविश्वास उद्योजकता आणि प्रयोगशीलता, आधुनिक शिक्षण आणि आधुनिक सामाजिक दृष्टीची शिदोरी हा महत्त्वाचा पण पैशासारखा न मोजता येणारा, मौल्यवान साठा होता. या सर्वांच्या मदतीने लहानमोठ्या पडीक जमिनी, लागवडीखाली आणावयाची कृती घडत होती. जीप, टॅकर–त्यावर टाकी–याची सोय करून पाणी देऊन माळरानावर बागायत उभी राहत होती. मत्स्यशेतीसाठी पुढाकार घेणारा माणूस दुबईहून मिळकत करून आलेला होता. सोबत हे नवे तंत्रज्ञान त्याने शिकून घेतले. थोडेसे यश दिसताच अधिक गिरणीकामगार मुंबईहून येऊन आपल्या जमिनींची देखभाल, नावीन्यपूर्ण पिके, बागायती यांचा विचार करावयाला लागले. ह्या सर्वांचा संबंध विकासाची ऊर्मी, थोडेसे भांडवल, बँकव्यवहाराची माहिती याच्याशी दिसतो. हे सर्व मुंबईच्या गिरणी-धंद्याच्या निमित्ताने अनुभवातून आलेले ज्ञान होते. हे सहज लक्षात आले. आणि मुंबई पासून ६०० कि. मि. दूर असलेल्या या गावाची मुंबईशी असलेली मानवी जवळीक, कोकण रेल्वे, सुधारित रस्ते, आणि टी. व्ही. सारखी साधने यामधून सातत्याने राखली गेली होती; असे दिसले.
मुंबईमध्ये गिरण्या बंद झाल्यानंतर कामगारांची झालेली वाताहत आणि परवड यांची रडकथा या हाडी गावाऱ्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर फारच वेगळ्या जाणिवा देऊन गेली. ग्रामीण भागांत रोजगारनिर्मिती कशी होऊ शकते याचाच हा एक वस्तुपाठ होता. सरकारी नोकरांनी प्रयत्न करून, प्रचंड पैसा ओतून हा विकास ‘झाला’ असता का, हा प्र न साहजिकच मनात आला. शहरातील उद्योग बंद होतात ही वस्तुस्थिती आपण बघतोच, पण त्याला ग्रामीण बाजूही असते आणि विकासाची ही सकारात्मक बाजूही असते हे लक्षात आले.
मग प्र न असा की हे जे हाडी गावी दिसते तसे इतर आजूबाजूच्या गावांत का नाही दिसले? तुरळकपणे प्रत्येक गावातच काही गिरणी कामगार मुंबई सोडून परत आले होते. पण सर्वच गावांत ही लोकसंख्यावाढ हाडी इतकी नव्हती. काही कारणाने हाडी गावचे लोक १-२ गिरण्यांत एकत्र काम करीत, मुंबईत जवळजवळ रहात होते, सणावारी गावी येत होते, गावाच्या विकासाचा विचार, देवळाचा जीर्णोद्धार यांचा विचार करीत होते, आणि त्यामुळेच गिरण्या संपाने बंद होताच त्यांनी व्यावहारिक विचार करून गावाचा रस्ता धरला. काहींनी मुंबईतील चाळीची खोली सोडून, पैसा उभा केला. काहींनी बँकेतूनही कर्ज उभारणीचे धैर्य दाखविले. याचाच अर्थ या कामगारांनी जे ‘नागरी’ संस्कृतीचे गाठोडे सोबत जोडले होते त्याचेच ‘भांडवल’ झाले होते. आणि याच भांड-वलातून हाडी गावात रोजगार वाढला होता, समृद्धी वाढली होती. नावीन्य, उद्योग, विविधता वाढलेली दिसत होती. त्याच वेळी मुंबई-कोकणाचे नवे नाते उलगडत, उमगत गेले. ३०० वर्षे मुंबईची भरभराट होत होती तेव्हा कोकणातील बंदरे, उद्योग, पारंपारिक जीवन-व्यवस्था हळूहळू मोडकळीला आली. शेतकरी, कोळी, इतर कारागीर याचे चाकरमाने झाले होते. याच काही चाकरमान्यांचे मुंबईने उद्योजकांत रूपांतर करून त्यांना परत कोकणात पाठविले होते. आणि हीच विकासाची मूलभूत प्रक्रिया असावी हे प्रकर्षाने जाणवले. माणसांची उद्यमशीलता हाच विकासाचा, समृद्धीचा स्रोत असावा. मानवी श्रम, ज्ञान, बुद्धी यांना सचेतन करणारा प्रेरणा देणारा. पण ही उद्यमशीलताच दुर्मिळ असावी. तिची वाढ, संवर्धन आणि सातत्य कसे काय टिकते, वाढते हा मात्र कळीचा प्र न आहे. शोध घेण्याजोगा.
८ संकेत अपार्टमेंटस, उदयनगर, पांचपाखाडी, ठाणे — ४०० ६०२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.