भांडवलशाहीच्या शिखरावरील विरळ हवा

आजचा सुधारकच्या नोव्हेंबर २००२ मध्ये संपादकांनी व्यवस्थापन-क्षेत्रातील दोन तज्ज्ञांनी (सी. के. प्रह्लाद व एस. एल. हार्ट) ह्यांनी लिहिलेल्या ‘द फॉर्म्युन ॲट द बॉटम ऑफ द पिरॅमिड’ ह्या लेखाचा संक्षेप केला. त्या लेखात जे विविध दृष्टिकोण त्या तज्ज्ञांनी व्यक्त केले व जी विधाने केली आहेत ती फारच उदबोधक, विवाद्य आणि मनोरंजकही आहेत. आज भांडवलशाहीत जी मंदी आणि मरगळ आली आहे ती झटकण्याचे काम स्वतः उद्योजक व्यवस्थापक करू शकत नाहीत. खरे म्हणजे उद्योजक/व्यवस्थापक ती मरगळ झटकण्याचे कार्य करून थकले आहेत. त्यामुळे डॉ. प्रह्लाद सारख्या व्यवस्थापन-क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ‘गुरूं’ना ते करावे लागते. आणि निदान भांडवलशाहीत व्यवस्थापन-क्षेत्रातील गुरूंना एकच काम असते ते म्हणजे स्वतःला सर्वज्ञ समजणाऱ्या उद्योजक/व्यवस्थापकांना शिकविणे आणि नवी दिशा दाखविल्यासारखे करणे.
वर संदर्भ दिलेल्या लेखात डॉ. प्रह्लाद व प्रा. हार्ट काय म्हणतात, तर असे की जगात बहुतांश लोक गरीब आणि तळागाळात आहेत; मोठ्या (बहुराष्ट्रीय) कंपन्यांनी मोजक्या श्रीमंत लोकांकरता उत्पादनावर समाधान मानू नये कारण त्यांच्या गरजा वाढत्या नसतात म्हणून त्यातून नफाही जास्त मिळू शकत नाही; उलट बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तळागाळाच्या लोकांची मागणी पूर्ण करून त्यातून आपला नफा कमवावा व त्यासाठी कंपन्यांची धोरणे, तंत्रज्ञान, व्यवस्थापन प्रणाली इत्यादींमध्ये उचित असे बदल करावेत; अशा भांडवलशाहीला नफा मिळविण्यासोबतच मानवी दुःखे कमी करता येतील; तळागाळातील लोकांनाही भांडवलशाही व्यवस्थेत सामावून घेतले जावे; अशा समावेशक भांडवलशाहीतून सर्वांपर्यंत सुबत्ता पोचवणे हेच आज मानवजातीचे सर्वांत उदात्त ध्येय असू शकते; इत्यादी.
अगदी हेच काम विसाव्या शतकाच्या चवथ्या दशकात म्हणजे आजपासून ६६ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये जॉन मेनार्ड केन्स ह्यांनी १९३६ मध्ये ‘जनरल थियरी ऑफ एम्प्लॉयमेंट, मनी अँड इंटरेस्ट’ (म्हणजे रोजगार, पैसा व व्याज ह्यांचा सार्वत्रिक सिद्धान्त) हा ग्रंथ प्रकाशित करून केले. त्या ग्रंथाच्या तथाकथित क्रांतिकारकतेमुळे त्यांना लॉर्ड हा किताब-सुद्धा मिळाला. ते काय म्हणाले? पहिले महायुद्ध संपल्यावर तेजी संपली आणि वाढणाऱ्या उत्पादनासाठी मागणी वाढत नसल्यामुळे दर अडीच तीन वर्षांनी मंदी येते व सावरते. ती १९२९ पासून इतकी गहिरी झाली की अमेरिकन अर्थव्यवस्था सावरू शकली नाही. मंदी अमेरिकेत सर्व क्षेत्रांत खोल होत गेली आणि जगातील इतर देशांत व्यापाराच्या किंमतींद्वारा पसरत गेली. इंग्लंडचा विशेष संदर्भ देत केन्स म्हणाले होते की आर्थिक भराभराटीच्या (विकसित) देशांमध्ये उच्च उत्पन्नाच्या लोकांच्या सर्व प्रकारच्या गरजा इतक्या भागलेल्या असतात की त्यांना मिळणारे जास्तीचे उत्पन्न उपभोगावर खर्च न होता बचत केली जाते. त्यामुळे समाजात (श्रीमंत लोकांकडून होणारी व एकूण) मागणी कमी होते. त्यामुळे उत्पादकांना आधीच तयार केलेले (आक्रमक आकांक्षामधून वाढते) उत्पादन प्रत्यक्षात कमी किंमतीत विकावे लागते व परिणामी नफ्याचा दर कमी होतो. ही मंदी अनियंत्रित राहिली तर—-(पोहणे माहीत नसलेला) बुडणारा माणूस जसे स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दुसऱ्या पोहू न शकणाऱ्या माणसास गच्च धरून तगण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्षात दोघेही बुडतात, तशाच–कंपन्याही बुडतात. संपन्न अर्थव्यवस्थेत नफ्याचा दर कमी होण्याच्या स्थितीला ह्या लेखाच्या शीर्षकातील विरळ हवेचे रूपक वापरले आहे.
मग केन्सपुढे प्र न होता मागणी वाढविण्याचा. त्यासाठी ते म्हणाले होते की बाजारव्यवस्था स्वतःच्या भरवशावर सतत चालू शकत नाही (मंदीद्वारा बंद पडू लागते). त्यासाठी सरकारी सहाय्य आवश्यक आहे. म्हणून सरकारने तुटीचे अंदाजपत्रक पत्करूनही सार्वजनिक कामे काढावीत व पैसा उपभोगक्षमता असलेल्या पण बेरोजगार असलेल्या गरीब लोकांच्या खिशात जाईल असे करावे. म्हणजे जो पैसा लागलीच बाजारात जाऊन प्रथम जीवनावश्यक वस्तूंची मागणी, किंमती व नफे वाढवी नंतर ते उत्पन्न छोट्या-मध्यम उद्योजकांना मिळून त्यातून सुविधा (Luxuries) आणि नंतर चैनीच्या (Comforts) वस्तूंसाठी मागणी वाढवून अर्थव्यवस्थेला गती मिळेल व ती रुळावर चालू लागेल. केन्सच्या सिद्धान्ताचा हा सारांश काय सांगतो? तो असे सांगतो की जोपर्यंत मंदी नसेल तोपर्यंत ज्या उच्च वर्गांजवळ (उत्पादकांना नफा देण्याइतका) पैसा आहे त्यांच्याकडून घ्या (आणि पर्यायाने तळागाळाच्या लोकांकडे दुर्लक्ष करा.). पण उच्च वर्गाच्या मागणीची संपृक्त पातळी आली आणि मंदी येऊ लागली की मग तळागाळाकडून नफा मिळवण्यासाठी जे करायचे ते करा, कारण तेव्हा मागणी वाढवू शकणारा तळागाळातलाच वर्ग आहे. मोठ्या बाटल्यांमधून विकल्या जाणाऱ्या शम्पूची मागणी वाढेनाशी झाल्यावर १ रु. च्या शेम्पूच्या पाकिटाने झोपडपट्ट्यांमधून शम्पूकरता मागणी प्रचंड प्रमाणात वाढविण्याची जी किमया केली ती सर्वांना ठाऊकच आहे. मग १ रु. चे पाकिट नफ्याविना विकले गेले का? नाही. म्हणजेच तळागाळातून नफा ओढला गेला.
आता स्वयंचलित यंत्रांच्या अवाढव्य भांडवलाच्या आणि पेटंट प्रणालीत तिजोरीबंद तंत्रज्ञानाच्या मालकीच्या युगात जगातील उत्पादन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात असणार आहे. एकीकडे अतोनात उत्पादनवाढीची क्षमता आणि दुसरीकडे बहुसंख्यांना गरीब ठेवल्यामुळे मागणीतील वाढ कुंठित होणे अटळ आहे. त्यातून वारंवार मंदी येणे अपरिहार्य आहे. त्यामुळे केन्सने ६६ वर्षांपूर्वी सांगितलेले (गरिबांच्या हाती पैसा पोचवून त्यातून नफा कमविण्याचे) सूत्र आता नव्याने कोणीतरी उद्योजकांना सांगणे आवश्यक आहे. ते काम सध्याच्या युगातील डॉ. प्रह्लाद व प्रा. हार्ट ह्यांच्यासारखे ‘मॅनेजमेंट गुरु’ करीत आहेत, एवढेच. सरतेशेवटी एक मुद्दा १८४०–५० च्या दशकात मार्क्स इंग्लंडमधील मंदीचे वि लेषण करून भांडवलशाहीबद्दल आपले निष्कर्ष नमूद करीत होते व सुमारे ९० वर्षांनतर केन्स १९३०–४० च्या दशकात मंदीचे वि लेषण करून आपले निष्कर्ष मांडीत होते. मार्क्सनीही तेव्हा मांडले, केन्सने त्याची पुष्टि केली व आज आपण सर्वजण साक्षीदार आहोत, की भांडवलशाही व्यवस्थेत मंदी वारंवार येते, नंतरची मंदी अधिक प्रदीर्घ आणि गहिरी होत जाते आणि केवळ नफा मिळविण्यासाठी कार्य करणारी बाजाराधारी भांडवलशाही अर्थव्यवस्था अकार्यकारी (non-functional) होऊन जाते. त्यावर उपाय म्हणून मार्क्सने भांडवलशाहीच्या जागी समाजवादाची स्थापना करावी असे म्हटले. समानता आणि श्रमिकांचे आधिपत्य मान्य नसणाऱ्या केन्सनी भांडवलशाहीच चालू ठेवावी, फक्त ती गाळातून काढण्यासाठी तळाच्या लोकांचा आधार घ्यावा असे म्हटले!
१३, नवनिर्माण सोसायटी, प्रतापनगर, नागपूर — ४४० ०२२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.