तिसऱ्या संस्कृतीचा उदय

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध इंग्रजी लेखक, वैज्ञानिक व टेक्नोक्रॅट सी. पी. स्नो यांनी रीड व्याख्यानमालेत भाषण करताना कलावंत व साहित्यिक यांना अभिप्रेत असलेली मानव्य (ह्युमॅनिटी) संस्कृती व तत्कालीन वैज्ञानिकांना अभिप्रेत असलेली विज्ञान-संस्कृती यावर भाष्य केले होते. याच व्याख्यानाच्या विषयाच्या आधारे स्नो यांनी ‘दि टू कल्चर्स’ हे पुस्तक लिहिले होते. व त्यात दोन्ही संस्कृतींविषयी अनेक मुद्दे उपस्थित केले होते. स्नो यांच्या मते कला व साहित्य यांना उच्च स्थान देणारे बुद्धिमंत स्वप्नात मनोरे बांधत असून वास्तव परिस्थितीचे त्यांना भान नाही. शेक्सपीयर, मोझार्ट, होमर, अरिस्टॉटल, जॉर्ज बर्नार्ड शॉ इत्यादींच्या अजरामर कलाकृतींचा अभ्यास व त्या विषयातील प्रभुत्व म्हणजेच संस्कृती हा समज चुकीचा असून उच्चभ्रू वर्गाने वास्तव परिस्थितीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे, असे स्नो यांना वाटत होते. कला, काव्य, नाट्य, संगीत, शिल्प इत्यादींतून भूक, उपासमार, दारिद्र्य, दुःख, विषमता, गुलामगिरी इत्यादी गोष्टी थांबवता येत नाहीत. चांदण्या रात्रीतला चंद्रसुद्धा भुकेल्याला भाकरीच्या तुकड्यासारखा दिसतो, हे विसरून चालणार नाही. व हा चंद्र किंवा चांदणे व त्यांची रसभरित वर्णने भूक भागवू शकत नाही हे सत्य लक्षात घ्यायला हवे. भूक भागवण्यासाठी वैज्ञानिकांच्या संशोधनातच आपल्याला उत्तर शोधावे लागेल, असे विधान स्नो यांनी केले होते.
सी. पी. स्नो यांच्या या प्रकारच्या वक्तव्यामुळे त्या काळी अनेकांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. परंतु गेल्या ३–४ दशकांत स्नो यांची मते समाजाला पटलेली असून जगभरच्या शैक्षणिक क्षेत्रात तरी विज्ञान संस्कृतीला मान्यता मिळाली आहे. एके काळी होमर, शेक्सपीयर, इलियट, टॉलस्टॉय, डिकन्स इत्यादींच्या अभिजात साहित्यकृतींचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यावर दबाव आणला जात असे. विज्ञान हा ऐच्छिक विषय म्हणूनच काही मोजके विद्यार्थी अभ्यास करत होते. विज्ञानशाखेकडे जाणाऱ्यांची संख्या तुलनेने फार कमी असे. परंतु ही परिस्थिती बदलत गेली. आज विज्ञान हा विषय अनिवार्य असून सर्व विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्राथमिक माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, हे आधुनिक समाजाला पटू लागले. विज्ञान-संस्कृती ही काळाची गरज असून त्याला पर्याय नाही. हे जाणवू लागले.
खरे पाहता मानव्य व विज्ञान-संस्कृती ह्यांमधील दरी कमी करण्याचाच प्रयत्न स्नो करत होते. विज्ञान-तंत्रज्ञान यांच्या विकासामुळे भौतिक सुख-साधनामध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे याचा अंदाज स्नो यांना होता. व ही भरभराट श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी वाढवणार याची त्यांना भीती होती. तंत्रज्ञानातील विकासामुळे उत्पादन व्यवस्थेला प्रचंड वेग आलेला असून विज्ञान-तंत्रज्ञानांचा पुनर्विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे (त्या काळीसुद्धा!) स्नो यांना जाणवत होते. याला पर्याय म्हणून रेण्वीय जीवशास्त्रातील संकल्पनांचा उपयोग होईल, असा स्नो यांचा कयास होता. विज्ञानातील इतर अनेक शास्त्रप्रकारांपेक्षा रेण्वीय जीवशास्त्राविषयी स्नो यांना अधिक आस्था होती. डार्बिनच्या उत्क्रांतीनंतरचा हा एक मोठा टप्पा आहे, असे ते मानत होते. या जीव-शास्त्राचा अभ्यास व अभ्यासाप चात् मिळणाऱ्या ज्ञानापासून मानवी समाजाला बरेच काही शिकण्यासारखे असून समाजाची घडी नीट बसवण्यासाठी या ज्ञानाचा नक्कीच उपयोगी होईल अशी स्नो यांना खात्री होती.
एकविसाव्या शतकात पदार्पण केलेल्या या समाजाला अजून एका समस्येला सामोरे जायचे आहे. वर उल्लेख केलेल्या दोन्ही संस्कृतींना पूर्णपणे छेद देणारी आगळी वेगळी संस्कृती उदयाला आली असून या सुसंस्कृत (?) म्हणविणाऱ्या समाजाचे काय होणार आहे, असा प्र न ‘करंट सायन्स’ या नियतकालिकाचे संपादक पी. बालाराम यांनी उपस्थित केला आहे. माहितीचा विस्फोट, संगणकतंत्रज्ञानातील विकास आणि त्यामुळे वाणिज्य व आर्थिक व्यवहारांत होत असलेली प्रचंड उलाढाल यामुळे एका नवीन क्रांतीच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. मानव्य संस्कृती व विज्ञान संस्कृती या दोन्ही संस्कृतींना आक्रमकपणे बाजूला सारून ही वाणिज्य (बाजार!) संस्कृती झेप घेत आहे. व्यवस्थापन, वाणिज्यव्यवहार, बाजारपेठव्यवस्था, माहिती तंत्रज्ञान संगणकशास्त्र इत्यादींच्या अभ्यासासाठी विद्यार्थी व शिक्षक जिवाचे रान करत आहेत. ई-बिजिनेस, ई-कॉमर्स, ई-लोन, ई-इन्स्टॉलमेंटस् हे श्रीमंतीचे, सुख-समाधानाचे (व अमेरिकेत प्रवेश करण्यासाठीचे!) परवलीचे शब्द आहेत असे वाटत आहे. एका सर्वेक्षणानुसार संगणकप्रणालींचा अभ्यास करणाऱ्यांत २२ टक्के आणि बाजारपेठव्यवस्था व बाजार-संशोधन यांचा अभ्यास करणाऱ्यांत २० टक्के वाढ झाली आहे. या उलट शिक्षणशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांत १६ टक्के, वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांत १४ टक्के व समाजशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांत ११ टक्के घट झाली आहे. या आकड्यांवरून पुढील समाजाचा कल स्पष्ट होतो. शहरातील पुस्तकांची दुकाने व्यवस्थापन व संगणक या विषयांतील पुस्तकांनीच सजवली जात आहेत. संगणकाची वा व्यवस्थापनाची जुजबी माहिती देऊन भरपूर कमाई करून घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. गल्ली गल्लीतील चहाच्या दुकानांची जागा आता सायबर कॅफे घेत आहेत. माहितीच्या ठेकेदारांना माहितीचा उगम कसा होतो याची फिकीर नाही. माहितीच्या सत्यासत्यतेची चाड नाही. माहितीचा एवढा मोठा डोंगर उपसूनही जंगलात दडलेला वीरप्पन पोलिसांच्या हाती लागत नाही. अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या दऱ्या खोऱ्यात लपलेला बिन लादेन अमेरिकन सैनिकांना सळो की पळो करत आहे.
आज आपण वाणिज्य व अर्थव्यवहाराच्या पूर्णपणे आहारी गेलो आहोत. हीच संस्कृती आपल्याला तारणार असा भ्रम आपण करून घेत आहोत. काही वर्षां (दिवसां!) नंतर पाठ्यपुस्तकांतून शेक्सपीयर, अरिस्टॉटल, आइन्स्टाइन, न्यूटन, गांधी, ज्ञानेश्वर, तुकाराम यांची हकालपट्टी केली जाईल व त्यांच्याऐवजी धीरूभाई अंबानी, बिल् गेटस् नारायणमूर्ती, रतन टाटा, राहुल बजाज इत्यादी उद्योग-महर्षीच्या जीवनचरित्रांचा अभ्यास करण्याचा आग्रह धरला जाईल. सर्व संत-महंतांच्याऐवजी पीटर ड्रकर, जोसेफ जुरान, डेमिंग, इशिकावा, तागुची या व्यवस्थापनशास्त्रातील ‘गुरूं’ची आराधना केली जाईल. येऊ घातलेली ही तिसरी संस्कृती मानवी समाजाला उपयुक्त ठरेल की नाही हे आता काळच ठरवू शकेल.
D II – 18/4 आर्मामेंट इस्टेट, DRDO कॉलनी, NDA रोड, पाषाण, पुणे — ४११ ०२१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.