धर्म आणि लोकसंख्या

हा लेख म्हणजे एका पुस्तकाचे समीक्षण आहे. हे पुस्तक श्रिया अय्यर यांनी लिहून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या छापखान्याने २००२ मध्ये प्रसिद्ध केलेले आहे. त्यात २६६ पाने आहेत व त्याची किंमत ५९५ रुपये आहे. ह्या पुस्तकाचे नाव ‘Demography and Religion’ असे आहे. थोडक्यात धर्म व लोकसंख्येबाबतचे प्र न असे त्याचे स्वरूप आहे. धर्म व लोकसंख्या नियंत्रण हा विषय १९५० पासूनच चर्चेला येत असे. १९५३ साली मी एक शस्त्रक्रिया शिबिर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव खेडेगावात आयोजिले होते. त्या अनुषंगाने एक शोधनिबंध मी लिहिला व कलकत्त्याच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन व पब्लिक हेल्थ या संस्थेत वाचला. हा विषय त्यावेळी अगदीच नवीन होता. त्यावेळी मला जे प्र न विचारले गेले त्यात अगदी अग्रस्थानी असलेला प्र न म्हणजे धर्माचा होता. “अशा शस्त्रक्रिया-शिबिरांना धर्माची साथ मिळेल की विरोध होईल? वा त्याला आपण कसे तोंड देऊ’ हा त्याचा गाभा होता. अनवधानाने मी उत्तर दिले : “आमचा धर्म हा अत्यन्त लवचीक स्वरूपाचा आहे व त्यात शस्त्रक्रियेला सहज सामावून घेतले जाईल एवढेच नव्हे—-१६ संस्कारामध्ये आणखी एक संस्कार म्हणजे सतरावा संस्कार म्हणून शस्त्रक्रिया जर मानली गेली तर मला आ चर्य वाटणार नाही.”
खरोखर मी चुकले. मला भारत हा देश बहुधर्मी आहे व नाना धर्मांची साथ ही एकच नसू शकेल हे मी पूर्णतया विसरले होते. ह्या काळानंतर भारतभर अनेक लोक-समूहांची पहाणी केली गेली व त्यात जवळजवळ नित्यनियमाने मुसलमानांची लोकसंख्या-नियमनाला मिळणारी साथ हिंदूंप्रमाणे नसल्याचे आढळले. श्रिया अय्यरनी कर्नाटकातील ग्रामीण भागात बहुधर्मीय लोकांचे निरीक्षण केल्यानंतर मुसलमानांची जननक्षमता हिंदू व ख्रिस्त्यांपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले. परंतु त्यांच्या मते भारतातील बहुतेकांचे निरीक्षण मुसलमानांची जननक्षमता जास्त असल्याचे नोंदवून तेथेच थांबते, हे तितकेसे बरोबर नाही. गेल्या पन्नास वर्षांत हा जननक्षमतेतील फरक सामाजिक व आर्थिक कारणानेही असावा की केवळ धर्मभिन्नतेने, हेही बघितले गेले आहे. अर्थात श्रिया अयरनी २००२ साली हेच बघण्याची खटपट केली आहे व ते अत्यन्त उपयुक्त आहे. विशेषतः त्यांच्या खोलात जाऊन मल्टीव्हेरिएट रिग्रेशन अॅनॅलिसिसने [एखादा परिणाम अनेक वेगवेगळ्या कारणांच्या ‘ओढाताणीतून’ घडत असेल तर प्रत्येक कारणाचे परिणामातील महत्त्व जोखण्याचे हे सांख्यिकीय तंत्र आहे. हवामानाचे अंदाज वर्तवण्यासाठीचा या तंत्राचा वापर, हे सर्वाधिक ‘ओळखीतले’ वापराचे उदाहरण आहे.—-संपादक जर हिंदू मुसलमानात दिसणारा जननक्षमतेतील फरक हा सामाजिक व आर्थिक कारणासाठी आहे असे सिद्ध झाले तर सध्याच्या हिंदूमुसलमानात एक त-हेचे जवळिकीचे नाते जाऊन निर्माण झालेला दुरावा दूर होईल.
जरी केवळ स्वातन्त्र्योत्तर काळाकडे पाहिले तरी १९५१ च्या सुमारास धार्मिक संघटनांची संख्या एक डझनापेक्षाही कमी होती ती आता पाचशेवर गेलेली आहे व त्याचे सभासद कोटींमध्ये मोजावे लागतील. १९६१ मध्ये ६१ जिल्ह्यांत धार्मिक संघटनात संघर्ष आले होते ते १९८७ मध्ये एकूण ३५० जिल्ह्यांपैकी २५० जिल्ह्यांत आले. शिवाय १९८० नंतर किंवा १९९० नंतर जे जातीय तंटे झाले त्यांत प्राणहानी व वित्तहानीही पूर्वीच्या मानाने बरीच झाली व त्यातला बराचसा भाग नियोजित होता. हे तंटे औद्योगिक व व्यापारी केन्द्रांत उभे केले गेले. अशा परिस्थितीत आणखी दोन मुद्यां-वरून आगीत तेल ओतल्यासारखे झाले. पहिला मुद्दा म्हणजे अयोध्यामशीद प्रकरण व दुसरा म्हणजे शहाबानो संबंधित कायद्याची गल्लत. या दोन प्रकरणांमुळे नुसताच धार्मिक विचारांत फरक न राहता ह्या विचारांचे शस्त्र निर्माण होऊन दीनदुबळ्यांच्या वर्गकलहांना प्रोत्साहन मिळाले आहे.
बहुजनसमाजाला वाटते आहे की जननक्षमतेचे आधिक्य, लग्नाच्या पद्धतीतील भेद आणि संततिनियमनाला विरोध यामुळे वेगवेगळ्या धर्मसमूहाची संख्या भिन्नभिन्न वेगाने वाढून अधिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच विषारलेले नाते स्फोटक होण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी श्रिया अय्यरांचे जे प्रयत्न आहेत ते शान्ति निर्माण करण्यासाठी म्हणजे इष्ट मार्गाने चालले आहेत असे म्हणावेसे वाटते. थोडक्यात धर्मा-धर्माच्या वाढीतील फरकामागे धर्माची शिकवण नसून केवळ सामाजिक व आर्थिक कारणे आहेत व ती दूर झाली तर त्यांच्या वाढीमध्ये तेवढा फरक राहणार नाही. एवढेच नव्हे तर श्रिया अय्यरना वाटते की लोकसंख्याविषयक धोरणे किंवा आर्थिक विकास धोरणे ह्यांतही ह्या विचारांचा समावेश करावा म्हणजे ताणतणावाची परिस्थिती सुधारेल.
श्रिया अय्यरनी पहिल्या लग्नाचे वय, संततिनियमनाचा वापर व जननक्षमता ह्यांचा पतींचे व पत्नींचे शिक्षण, त्यांचे व्यवसाय, ऋतुप्राप्तीचे वय, नात्यागोत्यात होणारे विवाह, संयुक्त कुटुंबांचे प्रमाण, दर माणशी होणारा खर्च अशासारख्या घटकांचे वेग-वेगळ्या धर्मात होणारे परिणाम अभ्यासून ह्या परिणामांमुळे जननक्षमता वेगळी दिसते की केवळ धार्मिक शिकवणुकीने ती वेगळी दिसते हे पाहण्याचा प्रयत्न केला. ह्यासाठी त्यांनी एक प्र नपत्रिका तयार केली. त्यात ९३ प्र नांच्या द्वारे अभ्यास केला गेला. त्यांना आढळलेली माहिती अशी:
१९७१ ते ८१ मध्ये भारतात हिंदूंची वाढ २४.१४ टक्क्यांनी झाली. मुसलमानांची वाढ ३०.६९ टक्क्यांनी झाली. १९८१ ते ९१ मध्ये हिंदूंची वाढ २२.७८ टक्क्यांनी झाली तर मुसलमानांची ३२.७६ टक्क्यांनी झाली. केरळ राज्यात १९८१–९१ -मध्ये हिंदूंची वाढ १२.६२ टक्के, मुसलमानांची वाढ २५.४९ टक्के तर ख्रिस्त्यांची वाढ ७.४१टक्के झाली. १९९९ मधील भारतात प्रत्येक स्त्रीमागे हिंदू स्त्रियांना सरासरी ४.२ मुले, मुसलमान स्त्रियांना ५.८ मुले, तर ख्रिस्त्यांना २.१ मुले व इतर धर्मीयांना ३.९ मुले झाली.
२०१ ग्रामीण स्त्रियांच्या पाहणीत हिंदू स्त्रियांना ५.९ वर्षे शिक्षण मिळाले होते. मुसलमान स्त्रियांना ५.६ वर्षे व ख्रिस्ती स्त्रियांना ९.२ वर्षे शिक्षण मिळाले. मुसलमानांत दर डोई ३७० रुपये खर्च झाला तर हिंदूंमध्ये २०९ रुपये खर्च झाला. पहिल्या विवाहाचे वेळी हिंदू स्त्रीचे वय १६.९ वर्षे तर मुसलमान स्त्रीचे वय १७.७ वर्षे होते. संततिनियमनाचा वापर हिंदूंमध्ये ४२ टक्के, मुसलमानांत २९ टक्के व ख्रिस्त्यांत ३४ टक्के होता. अर्थात ख्रिस्त्यांत विवाहाचे वय २० च्याही पुढेच होते. प्रत्येक स्त्रीमागे हिंदूंत २.७ मुले, मुसलमानांत ३.७ मुले व ख्रिस्त्यांत २.५ मुले झालेली होती.
श्रिया अय्यर एवढेच बघून थांबल्या नाहीत. धर्मात होणारा फरक त्यांनी दोन घटकांत विभागला. केवळ धर्मामुळे स्त्रियांचा अपत्यनिर्मितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, धार्मिक पुढारी, त्यांची शिकवण व त्यांची स्त्रीच्या वागणुकीवरील छाप व एकूण धर्मामुळे रोजचे आचरण हा एक घटक पाहिला. दुसरा घटक म्हणजे ह्याच वागणुकीवर सामाजिक व आर्थिक परिस्थितीची छाप. श्रिया अय्यर यांच्या मते शास्त्रीय बारकाव्याने निरीक्षण केल्यानंतर हिंदू व मुसलमानात अपत्यनिर्मितीत जाणवण्यासारखा फरक नाही. व जो थोडा फार दिसतो तो केवळ सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे दोन धर्मात होणारे वेगवेगळे परिणाम-ह्यातूनच होतो.
स्त्रियांनी पडद्यात राहणे, त्यामुळे काही विशिष्ट व्यवसाय न करणे, मुलींना काही विशिष्ट त-हेचेच शिक्षण देणे, जळणासाठी रानावनात जाऊन लाकूडफाटा न गोळा करणे वगैरे गोष्टी सर्वसामान्य माणसाला धर्मभिन्नतेमुळेच झाल्यासारख्या वाटतात. परन्तु रिग्रेशन अॅनॅलिसिसने ह्याला नकारात्मक उत्तर मिळते व ते कळायला कठीण जाते. अर्थात् २००० सालच्या वातावरणात अशा त-हेची मांडणी भिन्न धर्मातले तंटे न होण्यास उपयोगी पडते. परंतु रिग्रेशन अॅनॅलिसिस हे काय कोडे आहे हे सामान्यपणे कळायला कठीण जाते. ह्या प्र नाबाबतचा माझा अनुभव जुना आहे—-१९६० सालच्या सुमाराचा आहे म्हणजे जवळजवळ ऐतिहासिक काळातला आहे, तरी तो नोंदवून त्याचे २००० सालचे चित्रीकरण करण्याची अनिवार इच्छा होते.
१९६० च्या सुमारास रूरल हेल्थ इन्स्टिट्यूट नावाची संस्था आम्ही ८०० कुटुंबांच्या एका खेड्यात सात वर्षे चालविली. यात १५० कुटुंबे मुसलमानी होती. संस्थेत एक दवाखाना, १५ खाटांचे रुग्णालय, दोन डॉक्टर व इतर जरूर तो कर्मचारी वर्ग होता. शिवाय आधी वेळ नेमून पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे वैद्यकीय तज्ज्ञही त्या खेड्यात जाऊन जरूर ते उपचार करीत. तेथील रुग्णालयात तरत-हेच्या शस्त्रक्रियाही होत. या संस्थेतर्फे आरोग्यवर्धक मदतीद्वारे संततिनियमनाचे धडेही दिले जात. ह्या गावी व परिसरात संततिनियमनाच्या चर्चेला हिंदूंचा विरोध नव्हता. परंतु मुसलमानी गुरूंनी आमच्या धर्मात ही चर्चा चालणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही मुसलमानी धर्माचा इजिप्तमधील एक फतवा त्या गुरूंना आणून दिला परंतु त्यांच्या मते त्यांचे सल्लागार अहमदाबादेत असल्याने त्यांच्याशी चर्चा करणे जरूर होते. त्यांच्याशी मी दोन वेळा पत्रव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला प्रतिसाद मिळालाच नाही. अशा अनुभवाचे २००० सालसाठी जर चित्र उभे केले व त्यात गेल्या ४० वर्षात झालेल्या घडामोडींचा आधार घेऊन भविष्य वर्तविले तर कसे चित्र दिसेल ह्याचे अंदाज वाचकांनी करावे. ह्या चित्राचा अनुभव जमेस धरून जर लोकसंख्येची धोरणे ठरविली तर ती कितपत उपयोगी पडतील किंवा धर्माधर्मातील तेढ कमी करतील याकडेही सूक्ष्मदृष्टीने पहावे.
श्रिया अय्यर यांची पुस्तक लिहिण्यामागची दृष्टी नक्कीच स्तुत्य आहे पण ती वस्तुस्थितीला दुजोरा देऊ शकेल का? ऋणानुबंध, भांडारकर रोड, पुणे — ४११ ००४

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.